Home > News Update > 'अर्नबगेट' राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड आहे का?

'अर्नबगेट' राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड आहे का?

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्क संस्थेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पार्थो दासगुप्ता यांचे व्हॉट्सअप चॅट समोर आलेत. पुलवामा हल्ल्या, बालाकोट स्ट्राइक, 370 कलम या सर्वाबाबतची माहिती अर्णब गोस्वामी यांना आधीच माहिती होती असा खुलासा या चॅटमधून उघडकीस आलाय. अर्णब गोस्वामी सारख्या विकृती जवानांच्या मृत्यूवर पोळ्या भाजणाऱ्या संपादकाच्या व्हॉट्सॲप संभाषणाचे तपशील बाहेर येऊनही लोक ढिम्मच आहेत. या सर्व प्रकरणावरती भाष्य करणारा वरिष्ठ पत्रकार दिपक लोखंडे यांचा लेख....

अर्नबगेट राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड आहे का?
X

टी आर पी घोटाळ्याच्या चार्जशीट चा एक भाग म्हणून मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चे मालक संपादक अर्णब गोस्वामी आणि टीव्ही चॅनल्स च्या रेटिंग जाहीर करणाऱ्या बी ए आर सी ब्या संस्थेचे माजी चेअरमन पार्थो दासगुप्ता यांच्या मधील व्हॉट्सॲप संभाषणाचे तपशील जोडले आहेत. गेल्या तीन वर्षात या दोघांनी एकमेकांशी (आणि आणखी एक कर्मचारी) केलेल्या संभाषणाचे 512 PDF आहेत. अगदी रिपब्लिक सुरू झाल्यापासून पार्थो दासगुप्ता यांनी अर्णबला पावलोपावली कशी मदत केली हे या संभाषणातून दिसून येतं.

आधी पोलिसांच्या हाती हे संभाषण लागलं कसं? तर आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा गूगल ड्राईव्ह/ icloud मध्ये व्हॉट्सॲप चा बॅकअप ठेवतो. पोलिसांनी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली तेव्हा त्यांचा फोन ताब्यात घेतला. त्यातून या संभाषणाचे बॅकअप मिळवलेले दिसत आहेत. सध्या व्हॉट्सॲप च्या प्रायव्हसी पॉलिसी वरून खूप संशयाचं वातावरण आहे म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे बॅकअप फक्त पार्थो दासगुप्ता यांच्याच मोबाईल मधून मिळालेत म्हणून फक्त या दोघांचं संभाषण बाहेर आलंय. असो.

या संभाषणातून काय दिसतं? पार्थो दासगुप्ता हे केवळ एका रेटिंग एजन्सी चे प्रमुख म्हणून इथे दिसत नाहीत. तर अर्णब गोस्वामी ला पावलोपावली मदत करणारे, कार्यक्रमाच्या कल्पना सुचविणारे, अँगल देणारे, वेळप्रसंगी इतर चॅनल्स काय करताहेत हे सांगणारे, अगदी इंग्रजीत ज्याला मेंटोर (Mentor) म्हणतात तशा भूमिकेत वावरणारे असे पार्थो दासगुप्ता यातून समोर येतात. अर्णबच्या एन डी टी वी पासून सुरू झालेल्या प्रवासाचे सुरवातीला साक्षीदार आणि नंतर साथीदार असा त्यांचा रोल दिसून येतो.

ट्विटरवर मी या संभाषणाचे सार मांडण्याचा प्रयत्न केला, पण ट्विटरच्या माध्यमाच्या काही मर्यादा आहेत. इथे थोडं विस्ताराने मांडण्याचा प्रयत्न करतो. अर्णब ने रिपब्लिक टीव्ही सुरू केला तो टाइम्सच्या व्यवस्थापनाशी मतभेद झाले म्हणून. २०११ साली सुरू झालेलं अण्णा आंदोलन देशभर पोचवण्यात अर्णब चा मोठा हात होता आणि त्याला अरब स्प्रिंगच्या धर्तीवर अर्णब स्प्रिंग म्हटलं गेलं ही नशा डोक्यात गेली होती. महाराष्ट्रात आदर्श घोटाळा ऐरणीवर आणून अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेतला तेव्हा अर्णब पुन्हा किंगमेकर बनला.

२०१४ च्या राहुल गांधीच्या मुलाखतीनंतर तर अर्णब भाजपच्या गळ्यातील ताईत बनला. उंट तंबूत शिरला होता आणि टाइम्सच्या व्यवस्थापनाला वाटलं याला बाहेर केलं तर हा संपेल. ब्रँड आपण कसाही उभा करू शकतो हा माज टाइम्सच्या व्यवस्थापनाला होता आणि आजही आहे. माध्यम क्षेत्रातल्या बऱ्याच लोकांनाही तेव्हा तसंच वाटत होतं. पण अर्णब ने आपल्या आक्रस्ताळीपणाचा एक ब्रँड तयार केला होता. मी त्याला पत्रकार म्हणणार नाही, कारण तो आणि टेलिव्हिजनवर बरेच अंकर्स हे अंकर्स आहेत. पत्रकार नव्हेत. अर्णब ने आपली ब्रँड व्हॅल्यू तयार केली होती आणि त्याला गरज होती एका नेटवर्कची. भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या राजीव चंद्रशेखर यांचं आर्थिक पाठबळ घेऊन अर्णब ने रिपब्लिक टीव्ही सुरू केला. आणखी कोण मागे होतं यात मी जाणार नाही कारण इथे फक्त व्हॉट्सॲपवरचं संभाषण इतका व्याप ठेवायचा आहे. आणि तरीही ही पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपण एकटे निष्पक्ष पत्रकारिता करतो आणि इतर सगळे काँग्रेसचे दलाल आहेत अशी अर्णब ची आरडाओरड सुरू असते.

तर रिपब्लिक च्या सुरुवातीच्या दिवसात अर्णब पार्थो दासगुप्ता यांच्यासोबत अजिजीने बोलताना दिसतो. आपण कशा मोठमोठ्या स्टोरीज प्लॅन केल्या आहेत आणि त्या कशा धमाकेदार आहेत याच्या बढाया मारणारा अर्णब पार्थो यांना सतत लंच, डिनर, ब्रेकफास्ट मीटिंग साठी विनंती करताना दिसतो. चॅनल/ पेपर यशस्वी व्हावा म्हणून चांगल्या बातम्या प्लॅन करण्याचा प्रयत्न सगळे पत्रकार/संपादक करतात. त्यात गैर काही नाही. उलट ते जर कुणी करत नसेल तर तो मूर्खपणा म्हणावा लागेल. असं नियोजन साधारणपणे व्यवस्थेच्या (म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या) विरोधात केलं जातं. कारण जर तुम्ही सत्ताधाऱ्यांना जाब विचारू शकला तरच तुम्ही विरोधक सत्तेत आले तर त्यांनाही जाब विचारण्याची हिम्मत दाखवू शकता. पण इथे अर्णब जे करताना दिसतो ते केवळ आणि केवळ विरोधी पक्षांची नाकेबंदी करताना.

म्हणजे बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि मुस्लिम अशा बातम्या चालवायच्या, काश्मीर वरून अख्खा देश पेटवून द्यायचा, शशी थरूर यांच्यावर त्यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू वरून चिखलफेक करायची हे सगळं आगदी व्यवस्थित आखून केलं गेलेलं काम इथे दिसून येतं. कंगना आणि हृतिक रोशन यांच्या कथित प्रेमप्रकरणात देखील आपल्याला रेटिंग कसे मिळतील याची चर्चा अर्णब करतो. त्यात कंगना ला हृतिक बद्दल erotomania आहे असा शेरा देखील तो मारतो.सभ्य शब्दात याचा अनुवाद करायचा तर हृतिक आपल्याखेरिज इतर कुठल्याही स्त्रीसोबत असू नये असं तिला वाटायचं असं अर्णबचं निरीक्षण आहे.

या सगळ्यामध्ये काही काही गोष्टी शिसारी आणणाऱ्या आहेत. एकीकडे देशभक्ती, राष्ट्रवाद याची चूड पेटवायची आणि दुसरीकडे पुलवामा हल्ल्याच्या काही तासात 'we won crazy' असा उन्माद दाखवायचा. याचा निवडणुकीत कसा जबरदस्त फायदा होईल याची चर्चा करायची. लक्षात घ्या हे संभाषण आहे एका चॅनलच्या संपादकाचं आणि एका रेटिंग एजन्सी प्रमुखाचं. दोघांचे पॉलिटिकल स्टेक्स असू नयेत. पण दोघांना आपण जे काही करतोय ते काही गैर आहे असं वाटत नाहीय.

आपल्या माजी कलिग्स बद्दल अर्णब अगदी तुच्छतेने बोलताना दिसतो. सगळे मंत्री आपल्यासोबत आहेत म्हणून सांगतो. माहिती प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी एक तक्रार आपल्या सांगण्यावरून बाजूला ठेवली म्हणून सांगतो. राठोड यांची गच्छंती झाल्यावर स्मृती इराणी माहिती प्रसारण मंत्री झाल्या तर त्या आपल्या किती जवळच्या आहेत हे सांगतो. नंतर प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख useless असा होतो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृह मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय यांचे अत्यंत निकट संबंध दर्शविणारे उल्लेख वारंवार येतात.

यात दोन गोष्टींची दखल घेणं गरजेचं आहे. ट्विटरवर यावर थोडीशी चर्चा झाली. नरेंद्र मोदी, राज्यवर्धन राठोड, स्मृती इराणी, अरुण जेटली, प्रकाश जावडेकर यांची नावं घेतली जातात. राठोड यांचा उल्लेख नंतर गरज सरो वैद्य मरो अशा स्वरूपाचा आहे. जेटली यांच्या काळात अर्थव्यवस्थेची वाट लागली अशी चर्चा होते. आगदी ते मरणशय्येवर असताना कृतघ्न आणि विकृत अर्णब 'he is stretching it' असं म्हणतो. पण एका माणसाचे फक्त इनिशिअल्स वापरले जातात - ए एस. आता हे ए एस कोण? वाचकांस सांगणे नलगे. दुसरं: टीव्ही १८ च्या स्पर्धेचा उल्लेख होतो, पण पुन्हा मालकाचा उल्लेख नाही. टाइम्स च्या जैन यांचं नाव घेतलं जातं, इंडिया टुडे च्या अरुण पुरी यांचं नाव घेतलं जातं, पण मुकेश अंबानी यांच्या नावाचा उल्लेख करण्याची जिगर ५६ इंची छातीच्या शिष्याकडे नाही.

एका खटल्यात न्यायाधीश aggressive आहेत तर त्यांना विकत घे असं पार्थो दासगुप्ता सुचवतात. ज्या अँकर बरोबर खुन्नस म्हणून एन डी टी वी मधून अर्णब बाहेर पडला ( आणि अधून मधून दोघांची नोकझोक सुरू असते), त्या अँकर ने मला फोन करून माझ्या पत्नीला तुझ्या चॅनलमध्ये घे असं सुचवलं असा अर्णब चा दावा आहे. टाइम्स तिला सडवत आहे, तिला तुझ्या चॅनलमध्ये सरकारला प्रश्न विचारणारा चेहरा म्हणून वापर अशा प्रकारची ती विनंती होती असं अर्णब सांगतो.

एकंदरीत आपले पत्रकार, आपल्या यंत्रणा, आपलं राजकारण किती पोखरले गेले आहे याचं विदारक चित्रण या ५१२ पानांमध्ये आहे. गुरुदत्त यांच्या एका चित्रपटामध्ये ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है असं गाणं आहे. जला दो, इसे फूंक डालो ये दुनिया, तुम्हारी है, तुम ही संभालो ये दुनिया असं साहिर ने त्यात लिहिलं आहे. तीच विषण्ण भावना हे संभाषण वाचल्यावर येते.

गेले दोन महिने अमेरिकेतली निवडणूक आणि त्यानंतर चालू असलेलं कवित्व बारकाईने पाहत होतो, तेव्हा आपल्या आणि तिथल्या लोकशाहीतील साम्य स्थळं आणि फरक दोन्ही लक्षात आले. आपल्यासारखा तिथेही ट्रम्प ने उच्छाद मांडला होता. त्याच्याही भक्तगणांनी हिंसक प्रतिसाद दिला .वर्णभेद, स्थलांतरित द्वेष, मुस्लिम द्वेष तिथेही पराकोटीला पोचले आहेत. आणि यांच्या जोरावर आपण निवडून येऊ असं ट्रम्प ला वाटत होतं. पण तिथला मेन स्ट्रीम मीडिया त्याच्या विरोधात ठामपणे उभा राहिला. तिथेही आपल्याकडच्या गोदी मीडिया सारखा ट्रम्प मीडिया आहे. फॉक्स न्यूज यात आघाडीवर आहे. पण इतरांनी ट्रम्प ला एक्सपोज करणं चालू ठेवलं. इतकंच नव्हे तर खुद्द ट्रम्प ने नेमलेल्या न्यायाधीशांनी ट्रम्पचे बेलगाम आरोप स्वीकारायला नकार दिला.

त्याच्या पक्षातल्या लोकांनी त्याचा दबाव झुगारून निकाल फिरवू दिला नाही. अगदी त्याच्या नंबर दोन म्हणजे व्हाइस प्रेसिडेंट माईक पेन्स ने देखील ट्रम्प चे आदेश नाकारले. सर्वांनी अमेरिकन राज्य घटनेला स्मरून घेतलेल्या शपथेला जागण्याची भूमिका घेतली. आपल्याकडे काय परिस्थिती आहे? न्यायाधीश विकत घेण्याची भाषा झालीय, पण न्याय व्यवस्थेला दखल घ्यावीशी वाटत नाही. अर्णब ला पाहिजे तेव्हा त्याला सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळतो, सगळ्या यंत्रणा त्याच्या घरी पाणी भरत असल्यासारखं वागतात. राजकीय पक्षांवर बोलण्यात अर्थ नाही. पण हे संभाषण बाहेर आल्यावर समाजात किती उद्रेक झालाय? २०१४ मध्ये जणू काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालं अशा आविर्भावात लोक होते. आज एकही आश्वासन पूर्ण झालेलं नसताना, जवानांच्या मृत्यूवर पोळ्या भाजणाऱ्या संपादकाच्या व्हॉट्सॲप संभाषणाचे तपशील बाहेर येऊनही लोक ढिम्मच आहेत.

गेले दोन महिने अमेरिकेतली निवडणूक आणि त्यानंतर चालू असलेलं कवित्व बारकाईने पाहत होतो, तेव्हा आपल्या आणि तिथल्या लोकशाहीतील साम्य स्थळं आणि फरक दोन्ही लक्षात आले. आपल्यासारखा तिथेही ट्रम्प ने उच्छाद मांडला होता. त्याच्याही भक्तगणांनी हिंसक प्रतिसाद दिला त्याला. वर्णभेद, स्थलांतरित द्वेष, मुस्लिम द्वेष तिथेही पराकोटीला पोचले आहेत. आणि यांच्या जोरावर आपण निवडून येऊ असं ट्रम्प ला वाटत होतं. पण तिथला मेन स्ट्रीम मीडिया त्याच्या विरोधात ठामपणे उभा राहिला. तिथेही आपल्याकडच्या गोदी मीडिया सारखा ट्रम्प मीडिया आहे. फॉक्स न्यूज यात आघाडीवर आहे. पण इतरांनी ट्रम्प ला एक्सपोज करणं चालू ठेवलं. इतकंच नव्हे तर खुद्द ट्रम्प ने नेमलेल्या न्यायाधीशांनी ट्रम्पचे बेलगाम आरोप स्वीकारायला नकार दिला. त्याच्या पक्षातल्या लोकांनी त्याचा दबाव झुगारून निकाल फिरवू दिला नाही. अगदी त्याच्या नंबर दोन म्हणजे व्हाइस प्रेसिडेंट माईक पेन्स ने देखील ट्रम्प चे आदेश नाकारले. सर्वांनी अमेरिकन राज्य घटनेला स्मरून घेतलेल्या शपथेला जागण्याची भूमिका घेतली. आपल्याकडे काय परिस्थिती आहे? न्यायाधीश विकत घेण्याची भाषा झालीय, पण न्याय व्यवस्थेला दखल घ्यावीशी वाटत नाही. अर्णब ला पाहिजे तेव्हा त्याला सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळतो, सगळ्या यंत्रणा त्याच्या घरी पाणी भरत असल्यासारखं वागतात. राजकीय पक्षांवर बोलण्यात अर्थ नाही. पण हे संभाषण बाहेर आल्यावर समाजात किती उद्रेक झालाय? २०१४ मध्ये जणू काही आपल्याला स्वातंत्र्य मिळालं अशा आविर्भावात लोक होते. आज एकही आश्वासन पूर्ण झालेलं नसताना, जवानांच्या मृत्यूवर पोळ्या भाजणाऱ्या संपादकाच्या व्हॉट्सॲप संभाषणाचे तपशील बाहेर येऊनही लोक ढिम्मच आहेत.


Updated : 17 Jan 2021 3:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top