Home > मॅक्स ब्लॉग्ज > Dr. Baba Adhav : फुले, शाहू, आंबेडकरांचे कृतीशील वारसदार

Dr. Baba Adhav : फुले, शाहू, आंबेडकरांचे कृतीशील वारसदार

महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचे खरेखुरे अनुयायी शोधायचे झाले, तर त्या यादीत जी मोजकी नावे सापडतील त्यामध्ये डॉ. बाबा आढाव यांचे नाव पहिल्या क्रमांकावर येईल.

Dr. Baba Adhav : फुले, शाहू, आंबेडकरांचे कृतीशील वारसदार
X

Dr. Baba Adhav बाबा आढाव गेले. महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींचे बाबा गेले. गोविंद पानसरे, एनडी पाटील यांच्यापाठोपाठ आणखी एक लढवय्या गेला. महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळी आणि चळवळीत काम करणारे शेकडो कार्यकर्ते पोरके झाले.

महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचे खरेखुरे अनुयायी शोधायचे झाले, तर त्या यादीत जी मोजकी नावे सापडतील त्यामध्ये डॉ. बाबा आढाव यांचे नाव पहिल्या क्रमांकावर येईल. तळागाळातल्या घटकांच्यासाठी जिथे जिथे गरज होती, तिथे तिथे बाबा उभे राहिल्याचे गेल्या सात दशकांच्या इतिहासात आढळून येईल. नव्वदीतसुद्धा सामाजिक जीवनात तेवढ्याच तडफेने बाबा सहभागी होताना दिसले. एरव्ही चळवळीतल्या नेत्यांमध्येही राजकारणाबाबत हिशेबी प्रवृत्ती असते. कोणत्याही विषयासंदर्भात भूमिका घेताना कोण दुखावेल, त्यामुळे भविष्यात काही तोटे होतील का याचा विचार करून भूमिका घेणारे अनेक लोक असतात. परंतु बाबा आढाव यांनी तसा विचार कधी केला नाही. सत्तेवर कुठला पक्ष आहे आणि मुख्यमंत्रिपदी कोणता नेता आहे, याचा विचार न करता त्यांनी नेहमीच रोखठोक भूमिका मांडली. महाराष्ट्राला निश्चित भूमिका घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी वाटचाल ठेवली.

बाबांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी अन्नधान्याच्या दरवाढीविरोधात आंदोलन करून तुरुंगवास भोगला. वंचितांना न्याय देण्यासाठी सक्रिय राजकारणात उतरून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक झाले. परंतु झोपडपट्टीसाठी बजेट नाही म्हणून नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा पूर्णवेळ चळवळीवर लक्ष केंद्रित केले. अशा प्रकारे ऐन उमेदीच्या काळात राजकारणाला रामराम ठोकणारे व्यक्तिमत्त्वही दुर्मीळच म्हणावे लागेल.

मला आठवतेय, २००२ साली राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेल्या आरक्षण धोरणाची शताब्दी होती. बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशातून येऊन कोल्हापुरात आरक्षण शताब्दी भव्यतेने साजरी करण्याची तयारी सुरू केली होती. परंतु महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर मात्र अशा काही गोष्टीची नोंदही दिसत नव्हती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी मी कोल्हापूर सकाळमध्ये होतो. राज्य शासनाकडून आरक्षण शताब्दीची उपेक्षा, अशी बातमी मी तेव्हा दिली होती. पुण्याच्या सकाळमध्येही ती बातमी प्रसिद्ध झाली. त्यावर बाबांनी पोटतिडकीने आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र सरकारला सुतक लागले आहे काय, असा प्रश्न त्यांनी जाहीरपणे विचारला होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर काही हालचाली सुरू झाल्या होत्या.

बाबांच्या आयुष्य कष्टक-यांसाठीच्या संघर्षाने भरलेले आहे. त्यांच्या एकेका आंदोलनाचा नुसता नामोल्लेख करायचा म्हटले तरी एक भलामोठा लेख होऊ शकेल. परंतु त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा लढा आणि ज्यामुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली, तो विषय म्हणजे - एक गाव एक पाणवठा.

अस्पृश्यता निर्मूलनासाठी संतांपासून आधुनिक काळापर्यंत अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले होते. महात्मा फुल्यांनी पाण्याचा हौद खुला करण्यापासून विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेल्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीपर्यंत अनेक गोष्टी समोर येतात. राजर्षी शाहू महाराजांनी त्यादृष्टिने केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे. एका राजाने अस्पृश्यता निर्मूलनासाठी कृतीशील चळवळ उभारणे त्या काळात फार मोलाचे होते. गंगाराम कांबळेला हॉटेल सुरू करून देणे, अस्पृश्यांसाठीच्या शाळा बंद करून सर्व मुलांच्या शाळा एकत्र करणे आणि त्यानिमित्ताने अस्पृश्य समाजातील मुलांना मंदिर प्रवेश खुला करणे अशा अनेक माध्यमांतून शाहू महाराजांनी काम केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मंदिरातील शाळांच्या माध्यमातून शाहूंच्या कृतीचा धागा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. याच शृंखलेत तेवढेच प्रभावी काम करणारे नेते म्हणून बाबा आढाव यांचा उल्लेख करावा लागेल.

बाबांनीच एका मुलाखतीत सांगितल्यानुसार त्यावेळी ते समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते होते. एका शिबिरात प्रबंध वाचताना सत्यशोधक चळवळीचा सुटलेला धागा जोडण्याची संधी घेण्याचा विचार त्यांनी मांडला होता. महात्मा जोतिराव फुल्यांनी १९७३ मध्ये स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला तेव्हा शंभर वर्षं पूर्ण होणार होती. १९७४ हे वर्ष श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभाच्या त्रिशताब्दीचे आणि राजर्षी शाहू छत्रपतींच्या जन्मशताब्दीचे होते. गायीपेक्षा आणि गणपतीच्या सोंडेपेक्षा आपल्यासारख्याच माणसांची, गरीब व दलितांवर अन्याय झाल्यावर उसळून बंड करणार्‍या बंडखोरांची महाराष्ट्राला गरज असल्याचे विचार बाबांनी मांडले होते.

पुढची दोन वर्षे किमान या एका उद्दिष्टासाठी तरी सर्व महाराष्ट्रात प्रबोधन होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. १९७३ च्या सप्टेंबर महिन्याच्या २४ तारखेला महाराष्ट्रातील सर्व खेडयात सर्वांसाठी एक विहीर सुरू व्हावी. फुल्यांचे स्वप्न साकार व्हावे, असे विचार बाबा मांडू लागले. महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानची सुरवात २७ नोव्हेंबर १९७१ रोजी झाली. २८ सप्टेंबर हा जोतिरावांचा स्मृतिदिन. संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिनी भ्रमंती सुरू झाली. 'एक गाव, एक पाणवठा' मोहिमेचे अर्ज तयार करून घेतलेले होते. ते अगोदर जागोजागी पाठवलेले होते. फिरणे आणि लिहिणे सुरू झाले. ग्रामीण भागातील शेतमजुर दुष्काळाने एकवटले होते. मोठया संख्येने स्त्री- पुरुष दुष्काळी कामावर भेटत होते. दीड- दोन वर्षांत जवळपास सत्तर पंच्याहत्तर मोठया गावांतील तरुणांपुढे व्याख्याने दिली. तीस तालुक्यातील चारशेच्या वर खेडी त्यांनी पाहिली.

फिरायला लागल्यावर त्यांच्या लक्षात आले की, प्रकरण फक्त पाण्यापुरते मर्यादित नाही. जमिनीचे प्रश्न, स्मशानाचे प्रश्न, साखर कारखानदारीशी संबंधित प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, देवदासींचे प्रश्न, भटक्या विमुक्तांचे प्रश्न असे प्रश्नांचे मोहोळ समोर आले. वैशिष्ट्य म्हणजे बाबांनी यातल्या प्रत्येक प्रश्नाशी स्वतःला जोडून घेतले. आंदोलनांच्या माध्यमातून जोडून घेतले. संघटनात्मक पातळीवर जोडून घेतले. राज्याच्या कानाकोप-यात श्रमिक, कष्टकरी, दलितांसाठी जिथे जिथे लढे उभे राहिले तिथे तिथे हजर राहून बाबांनी या चळवळींना बळ दिले.

प्रा. एन. डी. पाटील राजकीय आणि शैक्षणिक पातळीवर सक्रीय असतानाही अनेक चळवळींशी जोडून घेऊन काम करीत होते. त्याच पद्धतीने बाबासुद्धा महाराष्ट्रातल्या परिवर्तनाच्या चळवळीत सक्रीय राहिले. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीची सात दशके बाबांच्या नावाशी जोडली आहेत. देशातील असंघटित कामगार वर्गाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लढे दिले, अंगमेहनत करणाऱ्या तमाम घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बाबा सक्रीय राहिले.

एक गाव एक पाणवठा इतकेच बाबांच्या नावाशी एकरूप झालेले नाव म्हणजे हमाल पंचायत. हमाली करणा-या कष्टकरी वर्गाचे संघटन ही कितीतरी कठीण गोष्ट, परंतु बाबांनी तीही करून दाखवली. तिला स्वतंत्र ओळख दिली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दशकभराच्या आतच पुण्यात 'हमाल पंचायतीची' स्थापन झाली. बिगारी आणि वेठबिगारी कष्टकऱ्यांच्या श्रेणीतील मजुरांना संघटित करण्याबरोबरच त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम या पंचायतीने केले. ओझी वाहणारा हमाल हासुद्धा माणूस आहे, त्याचा सन्मान जपला पाहिजे, त्याला सुरक्षा दिली पाहिजे हा आग्रह बाबांनी धरला आणि पुण्यातून सुरू झालेली ही चळवळ महाराष्ट्राच्या छोट्या तालुक्यापर्यंत पोहोचली.

तत्कालीन मराठी साहित्यात हमालांचे रंजक चित्रण येत असताना बाबा आढाव नावाचा माणूस या घटकाच्या प्रतिष्ठेसाठी जिवाचे रान करीत होता, हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातले सुवर्णपान आहे. त्यातूनच महाराष्ट्र सरकारला 'हमाल मापाडी महामंडळ' स्थापन करावे लागले. १९६९ साली झालेल्या या कायद्यामुळे हमाल वर्गाला रोजगाराची सुरक्षा मिळाली.

वैचारिक भूमिका घेतानाही बाबांनी कुणाचा मुलाहिजा ठेवला नाही, किंवा तडजोड केली नाही. आणीबाणीच्या काळात तुरूंगात असताना संघ विचारसरणीच्या दांभिकतेवर प्रहार केला. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनात ते अग्रभागी होते. नामांतरासाठी पुणे ते औरंगाबाद असा लाँगमार्च देखील त्यांनी काढला.

बाबांची आंदोलने दिखाव्यापुरती किंवा प्रसिद्धीपुरती कधीच नसायची. जे करायचे ते झोकून देऊन ही त्यांची वृत्ती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलेल्या एका किस्स्यातून त्याची प्रचिती येते. पानशेत धरणाच्या विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर असताना बाबा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. त्या दिवशी यशवंतराव चव्हाणांच्या गाडीचा ताफा त्याच रस्त्यावरून जात होता. यशवंतरावाच्या गाडीच्या पुढची पायलट गाडी पुढे सरकताच बाबांनी गाडीसमोर स्वतःला झोकून दिले. ब्रेक दाबले गेले म्हणून बरे, नाहीतर त्यांच्या जिवावर बेतले असते!

बाबांनी ज्यांच्यासाठी काम केले त्या घटकांच्यावर नजर टाकली तरी बाबांच्या कार्याची तळमळ लक्षात येऊ शकेल. हमाल, कष्टकरी, देवदासी, कचरावेचक महिला, प्रकल्पग्रस्त शेतकरी, अपंग, शेतमजूर, विस्थापित समूह, महापालिकेतील सफाई कामगार, झोपडपट्टीतील गरीब, तलाक पीडित महिला, मोलकरणी, विडी कामगार महिला, भटके-विमुक्त इत्यादी घटकांसाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतले. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बाबा ख-या अर्थाने फुले-शाहू-आंबेडकर-महर्षी शिंदे यांचे सच्चे वारसदार आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींनी वेळोवेळी बाबांच्या कार्याप्रती कृतज्ञता दाखवली. परंतु राज्य सरकारचा करंटेपणा मात्र सातत्यान दिसून आला. नानासाहेब धर्माधिकारी यांच्यापासून बाबासाहेब पुरंदरे यांच्यापर्यंत अनेकांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणा-या महाराष्ट्र सरकारला बाबा आढाव हे नाव त्या नामावलीत घ्यावेसे वाटले नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कारामुळे बाबांना काही फरक पडला नाही, परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असती, एवढेच!

बाबांना भावपूर्ण आदरांजली!!

- विजय चोरमारे

(साभार- सदर पोस्ट विजय चोरमारे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 8 Dec 2025 11:16 PM IST
Next Story
Share it
Top