Home > मॅक्स ब्लॉग्ज > शरद पवारांनी तरुणाईत काय पाहिले?#SharadPawarSpeaks

शरद पवारांनी तरुणाईत काय पाहिले?#SharadPawarSpeaks

सोशल मीडियातून अपप्रचार कसा होतो? महाविकास आघाडी सरकार पाडण्याची भाकीत कोण करत होतं? नव्या पिढीत‌ धर्मवाद कोण पसरवतयं? मी नास्तिक आहे की आस्तिक? सोशल मीडियावरील तरुण काय करतोय? तरुणाईतील धगधगत्या प्रश्नांना आपल्या अनुभवातून उत्तर दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

शरद पवारांनी तरुणाईत काय पाहिले?#SharadPawarSpeaks
X

पुण्यात ज्येष्ठ नेते, संपादक व पत्रकारांच्या सोबत एका प्रकट मुलाखतीत समोर उपस्थित असलेल्या आणि सोशल मीडियावर जागल्याची भूमिका वठवणाऱ्या तरुण मुलांशी संवाद साधताना आणि त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना समाधान वाटले.

महाविकास आघाडीवर प्रश्न स्वाभाविक होता. समान कार्यक्रमावर विविध विचारांचे लोक एकत्र आल्यानंतर सामान्य माणसाला काही पर्याय देऊ शकतात यावर लोकांचा फारसा विश्वास नव्हता. पण गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये काही वैचारिक भिन्नता असताना सुद्धा राज्याच्या भल्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेऊन जी काही पाऊले टाकत आहेत. ती माझ्या मते ही आघाडी योग्य रस्त्यावर आहे. अनेकजणांनी भविष्य वर्तवले होते. कोणी बोलत होते पंधरा दिवस, कोणी सांगत होत महिनाभर, कोणी सांगायचे तीन महिने सरकार चालेल, कोणी सांगायचे सहा महिने हे सरकार चालेल. आता अडीच वर्षे झाली आहेत. त्यानंतर ज्योतिष सांगायचे काम काही लोकांनी बंद केले. ही जमेची बाजू आहे.

बृजभूषण सिंह यांच्यापासून ते पावसापर्यंत मी कुणाकुणाला मॅनेज केलं यासंबंधी शंकेखोर प्रश्न विचारला गेला. एक काळ महाराष्ट्रात असा होता की लातूरला भूकंप झाला की शरद पवारांमुळे भूकंप झाला असं म्हणणारे लोक होते. हा त्यातलाच प्रकार आहे. प्रश्नात ज्यांचं नाव घेतलं ते गृहस्थ पार्लमेंटचे सदस्य आहेत. मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा गेली कित्येक वर्षे अध्यक्ष आहे. मी अध्यक्ष असताना राष्ट्रीय संघटनेचे काम ब्रजभूषण सिंह पाहतात. आम्हाला तिथे लक्ष द्यायला वेळ नाही आणि ते दिल्लीत असतात, त्यामुळे ते या कामात लक्ष घालतात. त्यांची काही मत आहेत, त्यांची काही विचारधारा आहे. खेळाच्या क्षेत्रामध्ये ती ते आणत नाहीत. त्यांनी जी काही मतं मांडली ती त्यांची वैयक्तिक मतं होती. त्यांना कोणी मॅनेज केलं हे डोक्यातून काढून टाका. बृजभूषण ही कोणी मॅनेज करू शकेल अशी व्यक्ती नाही.

सोशल मीडियामध्ये दोन भाग दिसतात. एक वर्ग असा आहे जो राज्य, राष्ट्र आणि समाज या तिघांसंबंधी त्यांच्या मनात अतीव आस्था आहे. तो गांभीर्याने काही गोष्टी मांडत असतो त्यांची नोंद घ्यावी लागते आणि घेणं गरजेचं आहे. दुसरा एक वर्ग आहे ज्याला मॅण्डेट आहे त्यांच्या मार्गदर्शकांचा की तुम्ही व्यक्तिगत हल्ले करा, शिवराळ भाषा वापरा, बदनामी होईल, याची खबरदारी घ्या. असे काम करणाऱ्यांचे जे काही उद्योग आहेत त्याला सामान्य माणसांकडून यत्किंचितही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे असे काही विषय असतील ते दुर्लक्षित करा आणि आपले काम चालू ठेवा हा पर्याय आहे.

देशात जाणीवपूर्वक नव्या पिढीमध्ये धर्मवादाचा प्रसार करण्याचे काम काही लोक करत आहेत. माझे स्पष्ट मत आहे की त्याला अखेरीस यश येणार नाही. लोक ऐकतील दुर्लक्ष करतील आणि हा विषय सोडून देतील.

काश्मीर फाईल हा सिनेमा सबंध देशावर परिणाम करावा या दृष्टीने तयार केलेला आणि खोटी स्थिती मांडलेला चित्रपट आहे. त्यात जे दाखवले आहे त्यात पंडितांची हत्या तिथे होते त्या काळात देशामध्ये भाजपच्या मदतीचं असलेले सरकार होते. आज जे घडतंय त्याठिकाणी... आजही केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे. या पंडित घटकांना संरक्षण देण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरले ते चुकीचा इतिहास मांडून लोकांची मते डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात हे जाणून घेतले पाहिजे.

माझ्यावर टीका झाल्यावर हे ठरवले पाहिजे की पुढची ॲक्शन काय घ्यायची, कधी घ्यायची आणि कशाप्रकारे घ्यायची. तरुण कार्यकर्त्यानी आपली प्रतिक्रिया तातडीने दिली तर त्यात आश्चर्य नाही. ते स्वाभाविक आहे. तो मत व्यक्त करतो आणि तो तिथे थांबतो. पण बाकीचे जे सीनियर नेते आहेत त्या सगळ्यांची या क्षेत्रातली जी कामगिरी आहे ती ही आपण तयारीत राहिले पाहिजे योग्य वेळ येईल त्यावेळेला ही प्रवृत्ती उलथून टाकली पाहिजे त्याचा पराभव केला पाहिजे. त्या सगळ्या कामाला सर्व वडीलधारी लोकांची शक्ती कामाला लावणे हे आमचे काम आहे ते आम्ही करतो. पण या गोष्टी जाहीरपणे बोलत नाहीत.





या वृत्तींना सक्षमपणे उत्तरे देण्यासाठी सर्वांनी वाचले पाहिजे. अनेक गोष्टी यापुढे येत असतात. अलीकडे मीडिया सुद्धा बायस झाला आहे. मीडियावर नियंत्रण काही घटकांच्या हातात आहे. ज्यांच्या हातात हे नियंत्रण आहे त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे. या दबावापोटी अनेकवेळा ते आपली मते स्पष्ट मांडत नाहीत. पण काही लोक आहेत राऊतांच्यासारखे जे कशाचीही फिकीर करत नाहीत. ते लोक योग्य असेल त्याला योग्य आणि चुकीचे असेल त्याला जी बाळासाहेबांची ठाकरी भाषा आहे त्याचा उपयोग करून पावले टाकत असतात. अशा स्पष्ट भूमिका मांडणाऱ्यांचं वाचन नव्या पिढीने कटाक्षाने करायला पाहिजे.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते का असा प्रश्न विचारला गेला. जेव्हा क्रायसिस असतो आणि विशेषतः राजकीय क्रायसिस असतो त्यावेळी बाळासाहेब असते तर त्यांनी काय केलं असतं, हा विचार डोक्यात येतो आणि जो क्रायसिस आहे त्याचं उत्तर सापडतं.

सत्ता नसताना लांब राहणारे आणि सत्ता आली की जवळ येणाऱ्या लोकांबद्दल तरुणांनी विचारलं. नेतृत्वाने सत्ता नसताना जे लोक दूर होते आणि सत्ता आल्यावर त्यांचे चेहरे दिसायला लागले त्या लोकांना कितपत किंमत द्यायची, कितपत त्यांना महत्त्व द्यायचं याचं तारतम्य पाळावं लागतं आणि ते तारतम्य वर्तणुकीतून दिसलं पाहिजे.

शिवसेनेमुळे भाजपा महाराष्ट्रात वाढली का असा प्रश्न विचारला गेला. शिवसेना आणि भाजप वाढीचा काहीही संबंध नाही. भाजप ही विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आहे. ही विचारसरणी स्वातंत्र्याच्या आधी महाराष्ट्रात जन्माला आली. नागपूर हे तिचं केंद्र होतं आणि तिथून ती वाढत गेली. त्यांचा सुरुवातीचा कालखंड महाराष्ट्राने त्यांना जवळ केलं नाही पण एखादी चळवळ सुरू झाली, संघर्ष सुरू झाला तर त्याचा त्यांनी लाभ घेतला. याचं उदाहरण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हा सुरू झाली तेव्हा जनसंघातील लोक कमिटीमध्ये येऊन कुठेतरी आपले स्थान प्रस्थापित करायला लागले. त्यानंतर जनता पक्षाच्या कालखंडात त्यांनी याचा अधिक फायदा घेतला. या सगळ्या गोष्टींचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही.

आस्तिक आणि नास्तिक हा व्यक्तिगत प्रश्न आहे. माझ्यापुरतं मी सांगितलं की मी फार नास्तिकतेचा किंवा आस्तिकतेचा गवगवा करत नाही. पण समजा मी पंढरपूरला जात असेन आणि विठ्ठलाचं मंदिर समोर दिसलं तर विठ्ठलाला हात जोडतो. का जोडतो तर देशातील सामान्य माणूस विठ्ठल हा आपला संकटमोचक आहे असं समजून श्रद्धेने त्याचा विचार ठेवतो. त्यामुळे सामान्य माणसाच्या श्रद्धेचा अनादर होऊ नये या भावनेने माझा नमस्कार असतो.

हेरवाडला विधवांचं विद्रुपीकरण करण्याची कुप्रथा थांबवण्याच्या निर्णयाच्या निमित्ताने पुरोगामी महाराष्ट्राबद्दल प्रश्न विचारला गेला. ग्रामीण महाराष्ट्रात पुरोगामी विचार स्वीकारायला उशीर झाला असेल तरी त्याची सुरुवात झाली आहे. आज अनेक तरुण मुली सार्वजनिक जीवनात काम करतात. त्या मुली गावात असलेल्या एखाद्या भगिनीचे पती हयात नाही अशी महिला दिसली तर थांबून तिला सांगतात की कुंकू लाव. गळ्यात मंगळसूत्र घाल आणि तू इतरांपेक्षा वेगळी नाहीस हा आग्रह धरणारा मुलींचा संच अनेक ठिकाणी काम करतोय याची मला कल्पना आहे आणि त्यांना प्रतिसादही मिळतोय.

समाजात विष पेरण्याचे काम होत असते. आणि सोशल मीडिया अशा विष पेरणाऱ्या प्रवृत्ती दिसल्यावर ज्या पद्धतीने त्यांना प्रतिवाद केला जातो ते बघितल्यावर आनंद आणि आश्चर्य दोन्ही वाटतं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की देशातील आणि राज्यातील तरुण पिढी जागरुक आहे. अशा खोडसाळ वृत्ती ते सहन करत नाही. आणि आपली सगळी ताकद अशा वृत्तीला प्रतिवाद करण्यासाठी त्यांना एक्सपोज करण्यासाठी वापरते. आणि कुणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या विचाराने.

- शरद पवार




#connectmaharashtraconclave #कनेक्टमहाराष्ट्रकाँक्लेव्ह2022

Updated : 6 Jun 2022 9:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top