Home > मॅक्स ब्लॉग्ज > Pune City Challenges : ट्रॅफिकमध्ये उडणारा आगीचा बंब !

Pune City Challenges : ट्रॅफिकमध्ये उडणारा आगीचा बंब !

महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना नागरिक म्हणून शहर नियोजनातील समस्या आणि लोकप्रतिनिधींची त्यावर काम करण्याची पद्धत काय? हे समजून घेणं गरजेचं आहे. वाहतूक कोंडी, दाटीवाटीने बांधकामे असलेल्या पुण्यात आगीसारखी दुर्घटना घडली तर काय होईल? तंत्रज्ञानयुक्त उडणारा आगीचा बंब आणि पुण्यातील आव्हानं सांगताहेत मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे

Pune City Challenges : ट्रॅफिकमध्ये उडणारा आगीचा बंब !
X

Pune Traffic तुम्ही म्हणाल ट्रॅफिकमध्ये उडणारा fire engine आगीचा बंब हि काय भानगड आहे. आपण सर्व क्षेत्रात तज्ञ नसतो पण भेडसावणारी समस्या तरी मांडू शकतो त्यातील हा भाग १ ला आणि ही समस्या राज्यातील बहुतांश शहरांना लागू आहे.

मागील आठवड्यात पुण्याच्या गर्दीच्या सदाशिव पेठेतील एका स्वेटर जॅकेट बॅगच्या दुकानाला आग लागली होती. वर्दळीच्या लक्ष्मी व बाजीराव रस्त्याच्या जवळ असलेल्या या दुकाना समोरील रस्त्यावरून हजारो वाहने जात असतात. आग लागली तेव्हा बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती त्यात मोबाईल मधून शुटिंग करणारे बहुतांश होते. त्यात मित्राचा AI जगातला मुलगा होता, मला म्हणत होता काका यापुढे बंब वगैरे लागणार नाही. AI नियंत्रित हेलिकॉप्टर व ड्रोनने आग विझवणारे तंत्रज्ञान येईल. AI-controlled helicopters and drone

मी त्याच्या कल्पना शक्तीने भारावून जाण्यापेक्षा भानावर आलो. परदेशात आग विझवणारी हेलिकॉप्टर्स आलीत तशी पुण्यात आणली तरी या इमारती वरून त्या इमारतीवर केबल्सचे प्रचंड जाळे पुण्यावर आहे. काय करतील हेलिकॉप्टर्स? पूर्वी पुण्यात एखादी आगीसारखी घटना झाली तर बादली ने पाणी मारणारे, बघ्यांची गर्दी हटवून पाण्याच्या बंबाला रस्ता करून देणारे पुणेकर होते. आता AI नियंत्रित आग विझवणाऱ्या तंत्रज्ञानाची अपेक्षा धरणारी पिढी आलीय. पूर्वी पुण्याच्या पेठामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर फायर प्लग होते. त्या लगतच्या भिंतीवर FP किंवा एखाद्या वाड्यात विहीर असेल तर WELL असे लिहिलेले जुन्या पुणेकरांना आठवत असेल.

आग विझविण्यासाठी ती व्यवस्था होती. काळाच्या ओघात ते फायर प्लग आणि विहिरी बुजल्या गेल्या. त्यामुळे मोठी आग लागल्यावर अग्निशमन केंद्राच्या मदतीशिवाय आग विझवणे शक्य नाही. ती वेळेत पोचण्यासाठी पुण्यातील महाप्रचंड वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणेकरापुढे किती संकट समोर आहे याची कल्पना नसावी. आता बैठ्या वाड्यांच्या ठिकाणी इमारती आणि टॉवर्स उभे राहात आहेत. नव्या इमारती टॉवर्समध्ये पाण्याच्या टाकीला जोडलेली आग प्रतिबंधक व्यवस्था (इमारतीत जे लाल पाइप दिसतात ) केलेली असते. आता सोसायट्यात एकवेळ पाणी येते ते लगेच संपून जाते.

पुणे परिसरात टँकरने पाणी पुरवठा केला जातो अशा वेळेस सोसायटीच्या टाकीत पाणी असणार तरी कोठून ? वर्षानुवर्षे शेजारच्या सोसायटीत कोण राहत ढुंकून न पाहणारे पुणेकर पाणी उसने देतील का नाही याची शंका आहे. सद्या पुणे शहरामध्ये अग्निशमन दलाची एकूण २० अग्निशमन केंद्रे कार्यान्वित आहेत नवीन ०५ अग्निशमन केंद्रे कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

Pune Fire Department पुणे अग्निशमन दलात एकूण ९१० इतकी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे असून, ४९१ इतके अधिकारी-कर्मचारी कार्यरत असून ४१९ रिक्त पदे आहेत. महाकाय पुण्याला मनुष्यबळ पुरेसे आहे का हे या क्षेत्रातील तज्ञ सांगू शकतील.

पुणे परिसरातील उपनगरात तर मोटरकार जाणार नाही अशी दाटीवाटीने बांधकामे सुरूच आहेत आणि उभी आहेत. अक्षरशः १० ते १५ फुटाचे अरुंद रस्ते आहेत.

पण वास्तव हेच आहे कि रहदारी वाहतूक कोंडी असलेल्या, दाटीवाटीने बांधकामे असलेल्या पुण्यात आगीसारखी दुर्घटना घडली तर बंब वेळेत पोचण्यासाठी कल्पनेतला रस्त्यावरून धावणारा वाहतूक कोंडीत अडकला तर उडणारा चार चाकी आगीचा बंब होणार नाही.

पण पुण्यापुढचे हे आव्हान तुम्ही आम्ही समजून घेतले पाहिजे.

राजेंद्र कोंढरे

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष

Updated : 26 Dec 2025 9:58 AM IST
author-thhumb

राजेंद्र कोंढरे

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष


Next Story
Share it
Top