Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > महामारीचा इतिहास काय सांगतो?

महामारीचा इतिहास काय सांगतो?

जगामध्ये युद्धात जेवढ्या लोकांना मृत्यूमुखी पडावे लागले नाही त्यापेक्षा कैक पटीने जास्त लोकांना आतापर्यंत महामारी ने मृत्युमुखी पडावे लागते आहेत. जगातील तुरळक देश वगळता कुठेही आरोग्य व्यवस्था सक्षम नाही. भविष्यातील मानव जातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करणे आणि त्याच जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करणे त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला बाध्य करावे, हाच आपल्यासाठी शाश्वत उपाय आहे, सांगताहेत अभ्यासक आनंद शितोळे..

महामारीचा इतिहास काय सांगतो?
X

भारताची लोकसंख्या १९४७ साली ३५ कोटी होती हे लक्षात घेऊन आकडेवारी वाचा. साधारण २००० वर्षापूर्वी आलेली प्लेगची साथ २७५ वर्षे अधूनमधून येत होती. जस्टीनाईन नावाच्या राजाच्या नावावरून या प्लेगला ओळखल जात.इस्तंबूल शहरात एकाच दिवसात १०००० माणसांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख तत्कालीन कागदपत्रात आहे. इजिप्त , युरोप मधली २५ टक्के जनता या महामारी मध्ये मरण पावली.

१३४७-१३५३ या काळात युरोपात आलेल्या प्लेग च्या साथीने २५ दशलक्ष लोक मरण पावले, हि संख्या युरोपच्या लोकसंख्येच्या २५ टक्के होती. १८१२ मध्ये नेपोलियन च्या ६ लाख लोकांच्या सैन्यापैकी फक्त ९०००० सैनिक रशियात आक्रमण करायला शिल्लक राहिले, बाकीचे तापाच्या साथीने आजारी पडून मार्गातल्या तात्पुरत्या हॉस्पिटल मध्ये दाखल होते किंवा मरण पावले.शेवटी त्याच्याकडे फक्त ३०००० सैनिक उरलेले होते.सध्या आपल्याकडे लागू असलेला १८९७ चा साथ रोग नियंत्रण कायदा ज्या साथीमुळे अस्तित्वात आला त्या प्लेगच्या साथीमध्ये मुंबई मध्ये १९०००० माणसांच्या मृत्यूची नोंद आहे. कॉलरा, देवी, कुष्ठरोग, टीबी , टायफोईड , डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि इतर अनेक साथीचे रोग वेगवेगळ्या कालखंडात जगात थैमान घालत होते, अजूनही घालतात. जगात जेवढी युद्ध झालीत आणि जेवढी माणस मारली गेलीत त्यापेक्षा कैक पट माणस आजाराने मरण पावतात.मरणारे बहुतांशी गरीब, कुपोषित आणि समाजाच्या तळातल्या वर्गातले लोक असतात. आर्थिकदृष्ट्या सधन माणसांना उपचार परवडतात, काम न करता बसलेल काही काळासाठी परवडत मात्र हातावर पोट असलेल्या लोकांना परवडत नाही, साहजिकच साथीचे रोग असले तरी त्यांना बाहेर पडावं लागतय.

कोरोनामुळे भारतात २१५००० तर महाराष्ट्रात ७०००० माणस मरण पावलीत. एवढी माणस १९४७ नंतरच्या सगळ्या युद्धात मिळून मरण पावलेली नाहीत.मात्र एवढ होऊनही मानवजात काहीही शिकत नाही. प्रत्येक देशाच्या घटनेत कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे, मात्र अपवाद सोडला तर बहुतांशी देश राज्याच कुठल्यातरी शत्रूपासुन रक्षण करायला अब्जावधी डॉलर्स खर्चून विमान, तोफा, बंदुका, बॉम्ब घेतात मात्र देश ज्या माणसांनी बनलेला असतोय त्याकडे दुर्लक्ष करतात.


देश सीमांचा , डोंगराचा, जंगलाचा, समुद्राचा नसतोय, देश माणसांचा असतोय, तिथली माणस निरोगी, धडधाकट राहिली, आनंदी राहिली तर त्याच्या सीमा आणि रक्षणाची गोष्ट येते. अजूनही कुठल्याही देशाच अंदाजपत्रक बघितल तर जास्तीत जास्त खर्च शस्त्राचा व्यापार, निर्मिती यावर असतो आणि अन्नसुरक्षा, आरोग्य, शिक्षण यावर नगण्य खर्च केला जातो. अपवाद वगळता कुठल्याही देशात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था विश्वासार्ह नाही ना सक्षम. कोविड-१९ च्या नंतरच्या जगात जेवढे उरतील निदान तेवढे लोक आपपल्या सरकारांना या विषयावर प्रश्न विचारतील का ?

जगातली जीवघेणी शस्त्रस्पर्धा काही प्रमाणात कमी होईल का ?आरोग्य,शिक्षण, अन्नसुरक्षा या विषयावर जास्तीत जास्त खर्च करायला भाग पाडतील का ? सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करणे आणि त्याच जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करणे हाच आपल्यासाठी शाश्वत उपाय आहे. आकाराने मोठा असलेला देश, इथली भौगोलिक विविधता लक्षात घेता, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण आरोग्य केंद्र, गावपातळीवर असलेल्या आरोग्य सेविका यांना जास्तीत जास्त सक्षम करणे हेच हितकारक ठरेल.ज्याच्याकडे पैसे आहेत त्यालाच आरोग्यसुविधा मिळणार असतील तर मग सरकारांनी कल्याणकारी राज्याचा बुरखा काढून टाकावा आणि फक्त परवाने वाटणाऱ्या खिडक्या म्हणून काम कराव.
या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी आपापल्या राज्याला आणि केंद्राला आपण काम करायला भाग पाडू का ? कारण आज कोरोना आहे, दुसऱ्या लाटेत मृत्यूचे थैमान सगळीकडे बघत आहोत, अजून रुग्णसंख्या शिखरावर जायची आहे तोवर आपली भयावह अवस्था आहे, मे मध्यावर ,जून मध्ये काय आकडे असतील रुग्णांचे आणि मृतांचे याची कल्पनाही करवत नाही, लसीकरण झाल्यावर कोरोना कमी तीव्र होईलही पण त्यानंतर पुन्हा वर्ष दोन वर्षांनी वेगळ्या कुठल्या विषाणूची साथ आली तर पुन्हा लॉकडाऊन होणे परवडणार नाही, त्यापेक्षा आरोग्यव्यवस्था सक्षम करणे हाच उत्तम मार्ग ठरेल.

#कोरोना

#कोरोनानंतरचजग

Anand Shitole

Updated : 3 May 2021 10:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top