Home > मॅक्स ब्लॉग्ज > NationalPressDay:फूस पत्रकारिता म्हणजे काय?

NationalPressDay:फूस पत्रकारिता म्हणजे काय?

फूस पत्रकारिता म्हणजे काय? माध्यमं टीआरपी वाढवण्यासाठी बनावटी बातम्या तयार करत आहेत का? फेक न्यूजचा सर्वसामान्यांवर नेमका काय परिणाम होतोय? पत्रकार आणि पत्रकारितेची विश्वासार्हता कशी जपली पाहिजे? यासंदर्भात प्रा. शिवाजी जाधव यांचे सखोल विश्लेषण नक्की पाहा...

NationalPressDay:फूस पत्रकारिता म्हणजे काय?
X

courtesy - social media

एखाद्याला फूस लावून कृती करायला भाग पाडायची आणि त्याचे शूटिंग करून सनसनाटी बातमी करायची, अशा पद्धतीचे पूर्वनियोजित कटकारस्थानी फूस पत्रकारिता डोके वर काढताना दिसत आहे. या प्रवृत्तींना समाज थारा देणार नाहीच; पण माध्यम संस्थांनी तत्काळ अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त केला तर पत्रकार आणि पत्रकारितेवर असलेला लोकांचा विश्वास अबाधित राहायला मदत होईल.

पत्रकारितेत अनेक अनिष्ट प्रवृत्ती घुसल्या आहेत, हे या उद्योगातील लोक नक्की मान्य करतील. अपप्रवृत्तींची संख्या कमी असली तरी त्यांच्यामुळे हे क्षेत्र मात्र पुरते बदनाम होत आहे. घडलेली घटना जशीच्या तशी लोकांपर्यंत पोहोचवणे हा पत्रकारितेचा धर्म आहे. परंतु पत्रकारच जेव्हा घटना घडविण्याचा उद्योग करतो, तेव्हा ही चिंता वाढते. अलाहाबाद उच्च न्यायालयात अलिकडेच असे प्रकरण आल्याने पत्रकारितेतील चुकीच्या प्रवृत्तींवर चर्चा होणे आवश्यक वाटते.

एका भाडेकरूला घर मालकाने घर खाली करण्यास सांगितले. कोविडमुळे आर्थिक तंगी असल्याने तो घर खाली करू शकत नव्हता. यावर घरमालकाने त्याला शिविगाळ करून धमकावले. ही माहिती संबंधित पत्रकाराला समजली. त्याला यात सनसनाटी बातमी दिसली. पत्रकाराने या भाडेकरूला फूस लावून विधानसभा भवनाच्या समोर स्वतःला जाळून घेण्याचे नाटक करण्यासाठी सुचविले. घरमालकाच्या जाचाला कंटाळून भाडेकरूचा आत्महत्येचा प्रयत्न अशी खळबळजनक बातमी त्याला द्यायची होती. एवढेच नाही तर अन्यायग्रस्त भाडेकरू विधानभवनासमोर स्वतःला जाळून घेत आहे, याचा व्हिडिओ बनवून त्याला टीव्ही माध्यमातून प्रसारित करायचा होता. आत्महत्येचा प्रयत्न आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घरमालक भाडेकरूला घराबाहेर काढणार नाही. तसा त्याच्यावर दबाव येईल, असा दिलासा या पत्रकाराने संबंधित भाडेकरूला दिला. पत्रकाराच्या या भूलथापांना भाडेकरू बळी पडला आणि त्याने विधान भवनासमोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेचा संबंधित पत्रकाराने व्हिडिओ तयार केला. परंतु 24 ऑक्टोबर 2020 रोजी गंभीर भाजलेल्या भाडेकरूचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर पत्रकाराला अटक झाली आणि हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात पोहोचले.

पत्रकाराच्या जामीनावर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाची टिपणी केली. माहिती जशी आहे, तशी लोकांपर्यंत पोहोचवणे हे पत्रकारांचे काम आहे. त्यांनी माहितीची कोणत्याही पद्धतीने मोडतोड करता कामा नये. सनसनाटी आणि भयावह घटनांचे नाटक करून एखाद्या व्यक्तीला दयनीय स्थितीत मृत्यूच्या खाईत लोटण्याची अपेक्षा पत्रकारांकडून करता येत नाही, असे उच्च न्यायालयाने सुनावले.

अलिकडे माध्यम संस्था किंवा पत्रकार कार्यकर्ते तसेच न्यायाधीशांच्या भूमिकेत वावरताना दिसत आहे. घटना घडवून आणण्याच्या कटात पत्रकारांचा सहभाग असणे चिंताजनक आहे. सुशांतसिंह रजपूत प्रकरणात काही माध्यमांनी ज्या पद्धतीची ठरवून सनसनाटी पत्रकारिता केली, त्यावरसुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले होते. माध्यमांची ही सहभागी आक्रमता घातक आहे. विशेषतः माध्यमात काम करणारे पत्रकार जेव्हा स्वतःचा अजेंडा पुढे रेटू लागतात, तेव्हा ही काळजी आणखी वाढते. पत्रकारांनी न्यायाची भूमिका जरूर घेतली पाहिजे परंतु घटनात्मक आणि कायदेशीर चौकटीतही ही भूमिका मांडायला हवी. कायद्याचा गैरवापर करून किंवा भंग करून केवळ प्रसिद्धी आणि नावलौकिक मिळावा म्हणून खळबळजनक वृत्तांच्या पाठीमागे लागणे म्हणजे पत्रकारिता असत नाही. अत्यंत जबाबदारीने आणि तितक्याच शांत चित्ताने करण्याचा हा उद्योग आहे. पत्रकारांवर सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे. हा विश्वास कमावण्यासाठी आधीच्या पिढ्यांनी मोठी किंमत मोजली आहे. त्याची जाणीव ठेऊन या उद्योगात काम करणार्याी घटकांनी जबाबदार वर्तन करणेच माध्यम संस्था आणि समाजाच्या हिताचे आहे.

प्रा. शिवाजी जाधव

Updated : 16 Nov 2021 7:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top