Home > मॅक्स ब्लॉग्ज > नक्की कोणाचा DNA श्रेष्ठ?

नक्की कोणाचा DNA श्रेष्ठ?

अलिकडे अनेक लोक डीएनए वरून भेदभाव करत असतात. याचा डीएनए श्रेष्ठ त्यांचा डीएनए कनिष्ठ… मात्र, डीएनए मध्ये खरंच असा प्रकार असतो का? वाचा मुग्धा कर्णिक यांचे विश्लेषण

नक्की कोणाचा DNA श्रेष्ठ?
X

अनुवंशशास्त्र- जेनेटिक्सबद्दल अनेक अडाणी उच्चशिक्षितांना कशी माहिती द्यावी विचार पडतो.

जाती, धर्म, पंथ, प्रांत म्हणजेच वेगवेगळे (आपले ते एकदम भारी-) डीएनए असा एक जबरा स्वतःचा खोटाखोटा गौरव करणारा समज त्यांच्यात खोलखोल भिनलेला असतो. त्यातूनच 'ते' लोक, त्यांचा डिएनए वेगळाच आहे वगैरे बकवास भक्तीभावाने केला जातो.

इतरांच्या सार्वत्रिक द्वेषाची पहिली पायरी स्वतःचा डीएनए फारफार उच्च आहे असं समजण्यातून ओलांडली जाते.

मग येतो धर्माभिमान, जात्याभिमाना, प्रांताभिमान, खोट्यानाट्या इतिहासाचा अभिमान... नसतो तो फक्त सत्याचा सन्मान.

मग आमचा धर्म सर्वात जुना म्हणत हे जुनाट होतात, आमचा धर्म सर्वात शांतीप्रिय म्हणत हे क्रूर खूनी होतात, आमचा धर्म सर्वात श्रेष्ठ म्हणत हे सर्वाधिक नीचपणा करतात, आमचा धर्म सर्वात विद्वत्तापूर्ण म्हणत हे विद्वानांची नालस्ती किंवा आत्ताच्या भाषेत ट्रोलिंग करतात, आमचा धर्म सर्वात मंगल म्हणत चिखलात फुदकतात...

कारण त्यांचा डीएनए निःशंकपणे उच्च असतो असे ते एकमेकांना डबक्याडबक्यांतून डरावडरावत सांगत रहातात.

डीएनए आणि जेनेटिक्सचा अभ्यास करणाऱ्या प्रा. डॉ. श्रीकांत माने (येल विद्यापीठ) यांचे व्याख्यान मुंबई विद्यापीठातील सेंटर फॉर बेसिक सायन्सेसमधे सुस्मृत प्रा. डॉ. शशीकुमार चित्रे यांच्या आग्रहावरून ठेवण्यात आले होते, तेव्हा डॉ. मानेंनी सांगितले की सर्व मानवांच्या डीएनएमधला फरक हा 0.1 इतकाच असतो. तेव्हा तेथे आलेला एक उच्चशिक्षित अगदीच हडबडून गेला होता... असं कसं असं कसं असं कसं शक्यच नाही म्हणताना त्याची बोबडी वळली होती.

वर्णद्वेषी अमेरिकनांनाही हे पचवायला जड जातं... वर्णद्वेषी कुणालाही ते पचत नाही, म्हटल्यावर इथल्या अर्धवटरावांना ते पटणारच नाही.

आजकाल इथल्या स्वतःला ईश्वराच्या मस्तकापासून तयार झालेले मानणाऱ्या लोकांत एक नवी शिवी रुजताना पाहिली म्हणून हे आठवले.

उदारमतवादी, निधर्मी, सत्यशोधक, मानवतावादी असे कुणीही विरोधात काही बोलले की त्यांचा मिक्स डीएनए आहे का असं ते मोठ्या टेचात तुच्छतेने बोलतात. आपण लईच स्मार्ट कमेंट केली असेही यांना वाटत असावे. त्यांची तुच्छता घोर असते.

पण हे अडाण्यांनो, सगळ्यांचेच डीएनए मिक्स असतात- कमीअधिक लाखभर वर्षांच्या मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात किती डीएनए मानवाच्या मानवाशी असलेल्या नात्याचे धागे विणत आले आहेत. हा गोफ सुटणारा नाही.

आत्ता तुम्ही ज्या नीच तुच्छतेने इतरांबाबत बोलता यात डीएनएचा नव्हे तुमच्या घरच्या संस्कारांचा किंवा तुमच्या सर्वथा व्यक्तिगत अशा बिनडोकपणाचा संबंध आहे.

कळेल तुम्हाला कधीतरी तर आम्हालाच बरं वाटेल...

तुम्ही विरुद्ध आम्ही आहोतच आता, पण तरीही आपल्या डीएनएमधे 0.1 इतकाच फरक आहे हे कळून तुमच्या बिनडोक द्वेषाबद्दलही कणव वाटते.

पैसेवाली बडी झुंड तात्पुरती जिंकते पण चिरंतन मानवी मूल्ये जपणारी छोटीछोटी माणसं मूल्यरूपाने कायम होतात इतिहासात.

बेनामही सही!

Updated : 22 March 2022 11:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top