Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > कॉर्पोरेट भांडवलशाही म्हणजे काय रे भाऊ?

कॉर्पोरेट भांडवलशाही म्हणजे काय रे भाऊ?

कॉर्पोरेट भांडवलशाही म्हणजे काय रे भाऊ?
X

कॉर्पोरेट भांडवलशाही बाबत तुम्ही नेहमीच ऐकत असतात. मात्र, ही कॉर्पोरेट भांडवलशाही (क्रोनी कॅपिटलिस्ट) नक्की काय आहे? कॉर्पोरेट भांडवलशाहीचे टीकाकार त्या प्रणालीला फक्त दोन विशेषणं लावतात.

(१) क्रोनी, crony capitalism साट्यालोट्याची, भ्रष्टाचारी

(२) नफेखोर, शोषक

पण कॉर्पोरट भांडवलशाहीला आता, आज कसे हाताळायचे याबद्दल हव्यातश्या चर्चाच होत नाहीत. समाजवादी क्रांती झाल्यावर सारे काही सुरळीत होईल. असा अव्यक्त विचार मनात असतो. ती कधी होईल ते माहित नाही. कॉर्पोरेट भांडवलशाही एवढी ताकदवर आहे की, तिला अनुल्लेखाने आपण टाळू शकत नाही. तिचे “शॉर्ट टर्म” मध्ये काय करायचे याचा विचार तुमच्याकडे असायलाच हवा.

चीन आणि व्हियेतनाम या कम्युनिस्ट पक्ष एकहाती सत्तेवर असलेल्या राष्ट्रांनी देखील जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीला आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी वापरले. त्याचे राजकीय अर्थ लावले पाहिजेत.

कॉर्पोरट भांडवलशाही हा मानवी समाजाच्या उत्क्रांतीत तयार झालेला धष्ट पुष्ट बैल आहे. कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या नाकात वेसण घालून त्या बैलाला आर्थिक विकासाच्या गाडीला जुंपता येईल का ?

हे नाही करता आले तर हा बैल राजकीय सत्तेला आणि एकूणच समाजाला शिंगावर घेऊन, फरफटत नेऊन दरीत ढकलू शकतो आणि स्वतः देखील दरीत पडून आत्मनाश करू शकतो.

कारण कॉर्पोरट भांडवलशाही ह्र्स्वदृष्टी आणि अल्पमती आहे. ती दाखवते तशी रॅशनल / विवेकी नाही, ती इर-रॅशनल / अविवेकी आहे. ती प्रणाली टोचून टोचून टीका केल्यामुळे, नैतिकतेचे आवाहन करून अधिक मानवी होईल हा युटोपियन भ्रम आहे. कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या नाकात फक्त एकच शक्ती वेसण घालू शकते ! कायदे करण्याचे अधिकार असणारी आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करणारी दंडसत्ता हातात असणारी राजकीय सत्ता! ज्याला रूढार्थाने “शासन संस्था” म्हटले जाते.

गेल्या अनेक दशकांमध्ये कॉर्पोरट भांडवलशाही एव्हढी ताकदवर झाली आहे की, तिने अनेक देशात शासन संस्थेला दुय्यम भूमिका घ्यायला भाग पाडले आहे. शासन संस्था व कॉर्पोरट भांडवलशाही यांच्यात सुरूच असणाऱ्या या रस्सीखेचीत कोण वरचढ ठरणार? यावर त्या देशातील कोट्यावधी नागरिकांच्या राहणीमानाची गुणवत्ता ठरणार आहे.

लोकशाही देशात शासनसंस्थेचा आकार उकार, वर्ग चारित्र्य निवडणुकीच्या राजकारणामार्फत ठरतो. त्याच्या मर्यादा सर्वाना माहित आहेत. पण आज हातात त्याच आहेत. म्हणून सत्तेच्या / निवडणुकांच्या राजकारणापासून, सत्ताकारणापासून कोणीही प्रौढ विचारी नागरिकाने, विशेषतः तरुण पिढीने, दूर राहता कामा नये!

Updated : 13 Jan 2020 5:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top