Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनी कोरोना तपासणी कधी करावी?

कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनी कोरोना तपासणी कधी करावी?

कोरोना ला आपल्यात येऊन दीड वर्ष होऊन गेलंय, मात्र, अजुनही कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोणती तपासणी करावी? तपासणी करण्याची योग्य वेळ नेमकी कोणती? ही बाब लक्षात येत नाही. या संदर्भात साथरोग तज्ञ डॉ. प्रिया देशपांडे यांचा लेख...

कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनी कोरोना तपासणी कधी करावी?
X

हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि याविषयी फार गैरसमजुती पण आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे म्हणजे "Contact tracing".

साथ आटोक्यामध्ये आणण्यासाठी ही कृती फार महत्त्वाची आहे. कारण प्रत्येक नवा रुग्ण हा आधीच्या रुग्णाच्या संपर्कातील / कुटुंबातील एखादी व्यक्ती असते. मात्र, बऱ्याच वेळा नकळत किंवा गर्दीमध्ये संपर्क आला असल्याने काही जणांना आपल्याला करोना संसर्ग कोणापासून झाला? हे समजत नाही. किंवा कधीकधी कोविड झाल्याची माहिती इतरांपासून तसेच आरोग्य व्यवस्थेपासून लपवली गेल्यामुळे अश्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना याविषयी माहिती मिळू शकत नाही.

मात्र, जेव्हा अशी माहिती उपलब्ध असते, तेव्हा रुग्णाच्या सर्व कुटुंबियांनी / निकट सहवासितांनी व इतर अति-जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींनी पुढील १४ दिवस अलगीकरण (Quarantine) करणे अपेक्षित आहे. पण जर १४ दिवस एकांतामध्ये राहणे शक्य नसेल तर घरामध्ये रहाणे, विशेषतः इतर व्यक्तींना न भेटणे /गर्दी वा समारंभ टाळणे अत्यावश्यक आहे. या काळामध्ये मास्कचा वापर अतिशय काटेकोरपणे करायला हवा. कारण जर तुम्हाला संसर्ग झाला असेल तर लक्षणे जाणवण्यापूर्वीच दोन दिवस तुम्ही संसर्ग पसरवायला सुरु करता! म्हणून मास्क महत्वाचा !

नियमानुसार संपर्कातील व्यक्तींनी १४ दिवस अलगीकरण करून त्या दिवसांमध्ये जर लक्षणे दिसू लागली तर swab तपासणी करावी असे सांगितले आहे.

मात्र, आजूबाजूला बघितले तर असे दिसेल की अलगीकरण योग्य रीतीने पाळले जात नाही. रुग्ण सापडला की कुटुंबीय लगेच swab तपासणी करतात. रिपोर्ट निगेटिव्ह आला की मग घरी न थांबता इतरांमध्ये मिसळतात. याने साथ कमी होण्यामध्ये मोठी अडचण येते. तसेच काहीजण लक्षणे आली तरी देखील तपासणी करणे टाळतात व इतरांचा धोका वाढवतात.



कुटुंबामध्ये सहजपणे पसरू शकणाऱ्या नव्या व्हेरीयंटमुळे आपल्याला उपलब्ध माहितीनुसार आपण सर्वात सुरक्षित प्लान बनवूया.

संपर्कातील व्यक्तींनी कोणती तपासणी करावी?

रिपोर्टची वाट बघावी लागली तरी देखील antigen तपासणी ऐवजी RTPCR तपासणी करणे अधिक फायद्याचे आहे. कारण RTPCR मुळे लक्षणविहीन आजार देखील ओळखणे शक्य आहे.

तपासणी करण्याची योग्य वेळ कोणती?

१. रुग्ण सापडल्यानंतर लगेच सर्वांनी तपासणी करणे सध्याच्या काळामध्ये संयुक्तिक वाटते. कारण ज्या रुग्णाला लक्षणे दिसू लागली त्यापेक्षा वेगळा लक्षणविहीन रुग्ण कुटुंबामध्ये असू शकतो. विशेषतः आता सर्वांसाठी लसीकरण सुरु झाल्यामुळे त्यांच्यामध्ये लक्षणविहीन कोविड असू शकतो. मात्र लगेच केलेली तपासणी निगेटिव्ह आली तरी काही जणांना संसर्ग झालेला असू शकतो. म्हणून १४ दिवस पूर्ण होईपर्यंत सर्वांनी संसर्ग पसरू नये यासाठी घराबाहेर न पडणे व काळजी घेणे आवश्यक आहे.

२. पुढील १४ दिवसांमध्ये संपर्कातील कोणाही व्यक्तीला एखादे कोविड-सदृश्य लक्षण जाणवू लागले कि त्या व्यक्तीने वेळ न घालवता लगेच तपासणी करून घ्यावी व इतरांपासून विलग व्हावे. संपर्कातील व्यक्तीला लक्षण येते तेव्हा कोविड असण्याची खूप जास्त शक्यता असते.

३. लक्षणे नसतील तर लगेच सर्वांची तपासणी न करता ५-६ दिवस थांबून नंतर देखील तपासणी करता येते. यामध्ये आजार सापडण्याची शक्यता ५०% ने वाढते. मात्र हा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी देखील १४ दिवस पूर्ण होई पर्यंत काळजी घेणे / लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

संपर्कातील व्यक्तींनी लक्षणे नसताना तपासणी करणे योग्य आहे का?

संपर्कातील व्यक्तींनी तपासणी करण्यास हरकत नाही मात्र त्या निगेटिव्ह रिपोर्टमुळे १४ दिवस संपण्यापूर्वी जोखमीचे वर्तन करणे, गर्दीमध्ये जाणे, इतरांना भेटणे चुकीचे आहे.

कुटुंबातील व्यक्तींनी तपासणी केल्यास लक्षणविहीन रुग्ण सापडून इतर कुटुंबीय सुरक्षित होऊ शकतात. डेल्टा व्हेरीयंट मुख्यतः कुटुंबांमध्ये पसरत असल्याने कुटुंबाला सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक आहे.

मात्र, १४ दिवस सर्वांनी अलगीकरणाचे नियम पाळणे आवश्यक आहे. विशेषतः या काळामध्ये एकत्र जेवण करणे टाळायला हवे. शक्य असल्यास घरामध्ये मास्क देखील वापरता येईल.




करोना प्रसार टाळणारे अलगीकरणाचे नियम व RTPCR तपासणी यांच्या सहाय्याने संपर्कातील व्यक्तींपासून करोना संसर्ग पुढे फैलावणार नाही याची काळजी घेवू या आणि साथ थांबवण्यामध्ये हातभार लावूया !

संसर्ग साखळी तोडूया!

(सोबतच्या चित्रामध्ये अलगीकरणामुळे करोना प्रसारास कसा आळा बसतो व १४ दिवस नियम पाळणे हे सर्वात जास्त सुरक्षित का आहे हे दर्शविले आहे. लेख: https://elifesciences.org/articles/63704)

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोग तज्ञ, मिरज.

(साभार @UHCGMCMIRAJ)

Updated : 5 July 2021 3:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top