Home > Top News > राजकारणातले ब्रँड आणि ब्रँडेड राजकारण..

राजकारणातले ब्रँड आणि ब्रँडेड राजकारण..

राजकारणातले ब्रँड आणि ब्रँडेड राजकारण..
X

आताच्या राजकारणात खऱ्या ब्रँडपेक्षा भासमान प्रतिमांचे ब्रँड तयार करणे सुरू आहे. सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या, रिया चक्रवर्ती या अभिनेत्रीची चौकशी, कंगना रानौत हीची विधाने यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच राळ उठली आहे. बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी हा विषय फार गांभीर्याने घेतल्याचे विविध माध्यमांतून दिसून येतेच आहे. त्या गदारोळातच कोरोनाचा हैदोस आणि इतर महत्त्वाचे मुद्दे गौण ठरत असतानाच ठाकरे आणि पवार हे दोनच ब्रँड असल्याचे शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाने म्हटल्यानंतर नवीच चर्चा सुरू झाली. त्याला प्रतिवाद करणारे उत्तर भाजपाच्या वतीने देण्यात आले. पण हा मुद्दा एवढ्यापुरता थांबत नाही. ही चर्चा परीघ ओलांडून पुढे गेली पाहिजे. कारण राज्य निर्मितीला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने एकूणच राज्याच्या राजकारणातील वलयांकीत व्यक्तिमत्वं म्हणजेच ब्रँड याचा परामर्ष घेता येईल.

ठाकरे आणि पवार यांच्या आधी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक हे प्रभावशाली ब्रँड होते. त्यांच्या समकालीन असणारे वसंतदादा पाटील हे ही या रांगेत येतात. नंतर वलयांकीत राजकारणी म्हणून काहीशी प्रभावळ शंकरराव चव्हाण, त्यांचे पट्टशिष्य विलासराव देशमुख, भाजपाचे गोपीनाथ मुंडे, नंतर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याभोवतीही दिसून आली आहे. अलीकडे बरेच लोक ठसठशीत ब्रँड म्हणून उठून दिसावे, यासाठी प्रयत्न करत आहेत.

राजकारणात ब्रँड नावाचा हा काय प्रकार आहे, असा प्रश्न निमशहरी, ग्रामीण भागातील जनतेला पडू शकतो. कारण त्यांनी धोती, टोपी, फेटेवाले नेते पाहिले. चिखलात, काट्याकुट्यात वाट तुडवणारे नेतेही पाहिले. जीपशिवाय पूर्वी वाहन नसे. मंत्रीपदाची झूल चढली तरच लालदिवा असलेले पांढरी अम्बॅसेडर गावाकडे धुळीने माखलेल्या रस्त्यांवरून धावताना पाहण्याचे अप्रूप लोकांना असे.

यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक असोत वा त्यांच्या समकालीन इतर प्रभावी नेते असोत. त्यांचे राहणीमान व दिनक्रम सामान्य कार्यकर्ता आणि जनता यापेक्षा वेगळे नसे. त्यातूनही हे नेते जननायक बनले. ते आजच्या भाषेत ब्रँड होते. गावच्या जीवनाशी ते इतके समरस होते की पूर्वी ते सलग दौरे करीत, लोकांच्या गराड्यात रमत आणि मोठा टप्पा संपल्यावरच मुंबईत परतत. वसंतराव नाईक तर मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या कार्यालयात आले तर तो चर्चेचा विषय असे. बहुतेकवेळा ते दौऱ्यावर असत किंवा पुसदला मुक्कामी.

अशा नेत्यांच्या भोवताली कार्यकर्त्यांचे मोहोळ असे आणि त्यातून त्यांचा प्रभाव तयार झाला म्हणजेच एक ब्रँड! त्यांचीच री वसंतदादा पाटील यांनी उचलली आणि तेही एक असेच प्रभावी नेते म्हणून तयार झाले. त्यांच्याभोवतीही कार्यकर्त्यांची रिघ असे. सामान्य माणसेही शेकडोंनी भेटायला येत. त्यांच्या गराड्यात बंडीवरच बसलेले दादा अनेकांनी पाहिले. एवढेच नव्हे तर त्यांच्या माजघरापर्यंत सामान्य लोकांना व कार्यकर्त्यांना प्रवेश असे.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याभोवतीचे वलय मुंबईत झपाट्याने वाढले. त्यांचे राहणीमान मुंबईला साजेसे असणे क्रमप्राप्त होते. इथला चाकरमानी, सर्वसामान्य मराठीभाषी मुंबईकर त्यांच्याशी जोडला गेला आणि हा ब्रँड विकसीत होत गेला. त्यांची भाषा, वागणे, बोलण्याची पद्धत लोकांना भावल्याने ते कोणी वेगळे वलंयाकीत नेते आहेत आणि ते आपल्याशी बोलतील का, बोलले तर कसे बोलतील, याची फिकर लोकांना नसे. सामान्य माणसांच्या नोकऱ्यांचे, महागाईचे, जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेचे, आरोग्यसेवेचे प्रश्न त्यांनी उचलले आणि हा ब्रँड उंचावतच गेला.

काही काळाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील मंडळींची उठबस वाढत गेली तरी सामान्य माणसाला बाळासाहेब आपल्यापासून दूर गेल्याचे कधी वाटले नाही. शिवसेना भवनात त्यांची हजेरी ठरलेली असे. त्यामुळे तिथे ते भेटणार आणि आपण त्यांना भेटू शकणार याची खात्री लोकांना असे. पुढे त्यांच्याभोवती संरक्षण व्यवस्थेचा गराडा पडल्यामुळे त्यात थोडासा खंड पडू लागला. पण सामान्य शिवसैनिक आणि जनता यांना आपण बाळासाहेबांना भेटू शकू याची खात्री वाटत असे.

चव्हाण असोत वा वसंतराव नाईक वा बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारण पाहत ७८ सालापासून स्वतःचे वलय वाढवणाऱ्या शरद पवार यांनी स्वतःचे समर्थक आणि नेते यांची बांधणी व्यवस्थित सुरू केली. पुढे काँग्रेसमधून आत-बाहेर जाणे येणे झाले तरी काही खास वर्तुळ विकसित केल्यामुळे पवार यांना मानणारा कार्यकर्तावर्ग, नेते, उद्योग, व्यापार जगतातील लोक सोबत राहिल्याचे दिसून आले.

ठाकरे असोत वा पवार, यांना एकहाती सत्ता मिळवणे कधी जमले नाही. हे जरी खरे असले तरी त्यांच्या राजकारणाचा मूळ आधार हा त्यांनी विकसीत केलेला समर्थकवर्ग हाच राहिला. काँग्रेसबाहेर पडूनही स्वतःचा दखल घ्यावीच लागेल असा गट पवार यांनी तयार केला. हा एक ब्रँडच..

बाळासाहेबांची गादी त्यांचे सुपुत्र चालवित असले तरी त्यांचा मूळ आधार ठाकरे ब्रँड हाच आहे. पवार तर याही वयात राज्याची बारीकसारीक माहिती तर ठेवतातच शिवाय दौरे करण्यात जराही मागेपुढे पाहत नाहीत. राजकारणाकडे करीयर म्हणून पाहणाऱ्यांनी अथवा स्वतःचा ब्रँड विकसीत करू पाहणाऱ्यांनी त्यांच्याकडून किमान काही गोष्टी नक्कीच शिकल्या पाहिजेत.

वर उल्लेख केलेल्या प्रत्येकाचे वलय अथवा विकसित झालेला ब्रँड हा काही कामामुळे तयार झाला आहे. त्यासाठी त्यांनी ना ब्रँडींग करणाऱ्या खासगी कंपन्या नेमल्या ना कुणाला कंत्राट दिले. त्यांनी राजकारण कसे केले, कोणाचे प्रश्न प्राधान्याने सोडविले यावर चर्चा होऊ शकेल, पण शेवटी जनमाणसातील कोणता ना कोणता वर्ग त्यांच्याभोवती बांधला गेला. यशवंतराव चव्हाण पंचायत राज व्यवस्था व आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना शिक्षणातील सवलती, वसंतराव नाईक शेतीतील प्रयोग, वसंतदादा पाटील सहकार चळवळ, शंकरराव चव्हाण जलसिंचनाचे मोठे प्रकल्प, यामुळे ओळखले गेले. पवार यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फलोत्पादनाला चालना, महिलाधोरण याद्वारे ब्रँडींग केलं. या सर्व नेत्यांच्या ब्रँडची व्हॅल्यू वाढली, म्हणजेच वेगळ्या अर्थाने प्रभावळ, वलय विकसीत होत गेलं. ते ज्यांना रुचलं ते त्या त्या ब्रँडचे अम्बॅसेडर म्हणून जिल्हा, तालुका पातळीपर्यंत वावरू लागले.

पुढे राजकारणाचा पोत बदलला तसे वलय, जनसंग्रह याचे स्वरूप बदलत गेले आहे. अलीकडच्या दशकांत विशिष्ट धर्म, जातसमूह, पोटजाती अथवा विभाग यांचेच विषय हाताळणारे ब्रँड तयार होत गेले. त्यामुळे नेत्यांचा ब्रँड व्यापक अर्थाने राज्याचा न राहता विशिष्ट जात, वर्ग अथवा विभाग यापुरता सिमीत होत गेला आहे. या परीघाबाहेर पडण्याचीही मानसिकता जणू राहिलेली नाही. कारण निवडणुकांचे राजकारण करायचे असेल तर मतपेढीची हक्काची बेगमी झाली पाहिजे आणि ती करणारेही हवेत असाच विचार पुढे आला आहे. त्यामुळे व्यापक अर्थाने राज्याचा, सर्वसमावेशक नेता कोण, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा यातून बाहेर पडून काही करेल अशी शक्यता निर्माण झाली होती. पण राज ठाकरे यांनीच स्वतःवर मर्यादा घालून घेतल्याने त्या पक्षाची वाढही मर्यादित झाली आणि समर्थकही मर्यादित राहिले. उपजतच मिळालेल्या ब्रँडची व्हॅल्यू वाढवण्याकडे पक्षाच्या जन्मदात्याचा कल दिसत नसल्याने बाकीच्यांनी तरी काय करायचे हा प्रश्न निर्माण न झाला तर नवलच.

सोशल मिडियाचा विस्तार वाढत गेला तसा आपला व्यक्तिगत ब्रँड विकसीत झाला पाहिजे, याकडे नेतेमंडळींचे लक्ष वाढू लागले आहे. त्यासाठी नेतेमंडळींनी स्वतःसाठी विशेष चमू तयार केले आहेत. दरम्यान, केवळ नेत्यांचेच नव्हे तर पक्षाचेही ब्रँडींग सुरू झाले आहे. काही पक्षांनी स्वतःहून तर काहींचे लोकांनीच ब्रँडींग करून टाकले. बहुतेक पक्षांचे ब्रँडींग समाजातील विशिष्ट धर्म अथवा जातसमूह अथवा विभाग यांचेच विषय घेऊन लढणारे पक्ष म्हणून झाले आहे. हे ब्रँड विकसित करण्यासाठी पक्षाच्या स्तरावर विशेष कक्ष सुरू झाले. कारण मतपेढीचे राजकारण. प्रसार माध्यमे, समाज माध्यमे याद्वारे पक्षाचे प्रतीमासंवर्धन करणे, विरोधात मोहीम सुरू झाली तर त्याचा प्रतिवाद करणे, पक्षाची भूमिका सादर करणे हे या कक्षाचे काम बनले.

पक्षाच्या व्यवस्थेवर समाधान न मानता बऱ्याच नेतेमंडळींनी समांतर रचना व्यक्तीगत पातळीवर तयार करणे सुरू केले. याचे कारण स्वतःचा ब्रँड तयार झाला पाहिजे हेच आहे. हा प्रकार इतका वाढला आहे की पक्षापेक्षा जास्त ब्रँडींग नेतेमंडळींचे होऊ लागले आहे. राजकीय रोखे बाजारात पक्षनामक कंपनीपेक्षा स्वतःचा निर्देशांक उंचावत गेला पाहिजे. पक्षाचा एकवेळ कमी झाला तरी चालेल पण स्वतःचा वाढता हवा, ही भावना त्यामागे आहे. कारण आता व्यक्तीगत ब्रँडींग जास्त महत्त्वाचे मानले जाऊ लागले आहे. समाज माध्यमांत कसेही करून दिसत रहा, अस्तित्व दाखवत रहा असा एक नवाच प्रकार हल्ली विकसीत झाला आहे.

प्रतिमासंवर्धनासाठी विशिष्ट पोशाख महत्त्वाचा मानला जाऊ लागला आहे. पूर्वीची नेतेमंडळी कधी सफारीत, कधी धोती तर कधी कुर्ता-पायजामा, डोक्यावर गांधी टोपी या वेशात मोकळेपणाने वावरताना दिसत. आता जणू विशिष्ट पोशाखाच्या बाहेर पडलो तर गहजब होईल की काय असे समजून सकाळ ते संध्याकाळ विशिष्ट प्रकारचे कपडे अंगावर दिसतात. फोटो चांगला यावा यासाठीही क्लप्त्या लढविल्या जातात.

पूर्वी नेतेमंडळी कामातून दिसण्याला जास्तीतजास्त महत्व देत असत. आता कामातून दिसण्यापेक्षा प्रतिक्रियावादी रहा, त्यामुळे सतत अस्तित्व तरी दिसत राहील, ही एक नवीच विचित्र पद्धत तयार झाली आहे. त्यामुळे होते काय की एखादी घटना घडली अथवा एखाद्या क्षेत्रात मोठी घडामोड घडली की त्याचा थेट संबंध असो वा नसो, त्या त्या नेत्यांचे ब्रँड विकसित करणारा बेभान व उत्साही चमू प्रतिक्रिया जारी करून टाकतो. काहीवेळा तर नेत्याला अडचणीत आणणाऱ्या गोष्टी या टीमकडून होत असतात. कधी मान्यवर व्यक्तिमत्वांचा उल्लेखच चुकतो, भाषेचा वापर चुकतो तर कधी एखाद्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करताना आपल्याच पक्षाच्या बड्या नेत्याचे ट्वीटर अकाउंट समजून भलतेच अकाउंट जोडले गेल्याच्या घटना घडतात.

मात्र या सर्व प्रकारांतून नेत्यांच्या भासमान प्रतीमा तयार होत आहेत, याकडे कोणाचेच लक्ष नाही. नेत्याची प्रतीमा उंचावणे गैर मुळीच नाही. पण मुळातच नेतेपदाला काही मर्यादा असतील तर त्यापेक्षा अधिक उंच प्रतीमा तयार करण्याच्या नादात फार उलटेसुलटे प्रकार होत आहेत. यात अनेक लोक भरडले जात आहेत. अनेक नेत्यांना व्यक्तिगत पातळीवर अनाठायी, गैरवाजवी, द्वेषमुलक टीकाटिप्पणी व निंदानालस्ती याला सामोरे जावे लागत आहे. हे पाहणे क्लेषदायक आहे. पण ही आपल्यावर होणारी पुष्पवृष्टीच आहे, असाही समज कोणी करून घेत असतील तर मग गोष्टच निराळी. यातून भलताच ब्रँड तयार होत आहे. पक्षापेक्षा आपला ब्रँड अधिक ठशठशीत व आखीवरेखीव झाला पाहिजे या नादात संकटसमयी काहींच्या बाजूला पक्षच ठामपणे उभा राहिलेला दिसून येत नाही, हे ही दिसते आहे.

अलीकडे पक्ष आणि नेते यांनी जनमानसाच्या भावभावनांशी असलेली स्वतःची बांधिलकी मर्यादित करून टाकली आहे. कारण जनसमान्यांना महत्त्वाचे वाटणारे सर्वच प्रश्न त्यांना उचलून धरता येत नाहीत. त्यामागे काही खास, वेगळी कारणे, राजकीय हिशेबही असतात. त्यामुळे होते काय की पक्षाच्या कामाचे ब्रँडींग करताना सिने तारे-तारका यांची मदत घ्या, त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करा, त्यांना प्रचार मोहीमेत सहभागी करून घ्या, असे प्रकार वाढीला लागले आहेत.

असे करावे लागणे ही राजकीय क्षेत्राची प्रगती निश्चितच दर्शवित नाही. एक काळ असा होता की महाविद्यालयांचे वार्षिक स्नेहसंमेलन एखादा नेता तारीख देऊ शकत नाही म्हणून पुढे ढकलले जाण्याचे प्रकार झाले आहेत. आताशा किती आणि कोणत्या नेत्यांना अशा कार्यक्रमांना बोलावण्यास विद्यार्थी उत्सुक असतात याचा शोध घ्यावा लागेल. पूर्वी मोठ्या नामांकित व्याख्यानमालेत नेतेमंडळींना एखाद्या विषयावर व्याख्यानासाठी बोलावले जाई. आता कोणाला बोलावले जाते का हे ही तपासावे लागेल.

एकूणच काय तर पक्षाचा मेळावा, कार्यकर्ता संमेलन, समाजाची बैठक अथवा शासकीय कार्यक्रम यापलीकडे वेगळ्या अशा किती कार्यक्रमांना नेतेमंडळी दिसतात हे तपासावे लागेल. एकीकडे हे होत आहे तर दुसरीकडे नेत्यांनी उभ्या केलेल्या संस्था हळूहळू खासगी होऊ लागल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांपलीकडे अथवा होयबापलीकडे कोणी त्या संस्थांवर दिसत नाही. त्यामुळे नेत्यांना, त्यांच्या नेतृत्वाला, भोवती होणाऱ्या लोकांच्या गर्दीला आपोआप खूप मर्यादा येऊ लागल्या आहेत. भोवताली घुटमळणारे लाभार्थी कार्यकर्ते हेच उच्च दर्जाचे भांडवल समजायचे असेल आणि मतदारसंघात विरोधी पक्ष तर मॅनेज केलाच आहे, तेव्हा आव्हानच नाही, असे मानायचे असेल तर प्रश्नच मिटला. पण या परीस्थितीत त्यांचे जननायक, लोकनायक म्हणून ब्रँडींग करणे फारच आव्हानात्मक काम आहे. भासमान प्रतीमा तयार करणाऱ्या चमूकडून ते होत आहे यावर ते जर समाधानी असतील तर त्यांना शुभेच्छा देणे एवढेच आपल्या हाती उरते.

Updated : 22 Sep 2020 3:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top