Dhurandhar Movie Review : राजकारण, Propaganda आणि दिग्दर्शकासह अभिनेत्यांची कामगिरी
काय आहे धुरंधर चित्रपटाची कहाणी? राजकारण ते ॲक्शन ? दिग्दर्शक कुठे कमी पडला? चित्रपट समीक्षक गणेश मतकरी सांगताहेत धुरंधर चित्रपटाचा रिव्ह्यू
X
ऑल सेड ॲंड डन, मला Dhurandhar Movie धुरंधर चांगली वाटली. त्यात propaganda फिल्मचे घटक आहेत निश्चितच. चवीपुरते, आणि प्रेक्षकातल्या काही लोकांना उत्तेजन देण्यासाठी ते वापरलेही आहेत, पण ते खटकण्याइतपत त्रासदायक होत नाही. मला वाटतं हल्ली आपल्याला अधिक त्रास होतो राजकारण बायनरी झाल्याने. तुम्ही या बाजूचे का त्या हा प्रश्न प्रेक्षकांना नको इतका विचारावासा वाटतो. त्यापलीकडे एक फिल्म म्हणून ती पहावी असं सहसा होतच नाही. आता अगदी पंधरावीस वर्षांपूर्वीपर्यंत राजकारणी म्हणजे स्वार्थी, चोर किंवा इनकॅाम्पिटन्ट असंच चित्र होतं आणि सिनेमात ते रुटीनली दाखवलं जायचं. ‘धुरंधर’मध्येही ते बरचसं तसंच रहातं. In fact ते पहाता, एका अंडरकव्हर हिरोच्या गोष्टीत प्रत्यक्ष झालेल्या घटना बऱ्या पेरल्या आहेत असंच इथे वाटतं. या सगळ्या घटना झाल्या हे तर खरंच आहे. बहुधा पुढल्या भागात पुढे सत्तेवर आलेल्या तथाकथित कर्तबगार राजकारण्यांची झलक आपल्याला दिसेल, पण यात तरी जितपत आहे ते टॅालरेबल आहे.
फिल्म मध्ये पुरुषांची गर्दीच गर्दी आहे यात वाद नाही, ( स्त्री भूमिका नाहीत आणि जी आहे ती उभी करणारी अभिनेत्री अगदीच यथातथा आहे ) पण या विषयात त्याचं आश्चर्य ते काय? अनेक फिल्म तशा असतात. ‘डॉनी ब्रास्को’पासून ‘रेगे’ पर्यंत अनेक उदाहरणं देता येतील. प्रश्न इतकाच असतो की निवडलेले अभिनेते परफॅार्म काय करतात. इथे रणवीर आणि अक्षय दोघांनीही कामं लक्षात येण्यासारखी चांगली केली आहेत. संजय दत्त अनेकदा करतो तशी त्याने रोलची कॅामेडी करुन टाकली आहे. त्याऐवजी तिथे जर पंकज त्रिपाठी किंवा त्याच्या प्रकारचं कोणी असतं, तर फायदा अधिक झाला असता. तो गंभीर प्रसंगातही उगाचच कॅरीकेचर करतो आणि परिणाम कमी होतो. त्याच्या इन्ट्रोचा सीन तर अक्षरशः का-ही-ही आहे. अक्षय खन्नाचा परफॅार्मन्स ‘क्विन्टेसेन्शीअली अक्षय खन्ना’ आहे. मला वाटतं इथली आणि औरंगजेबाची व्यक्तीरेखा मिळून त्याचा नॅशनलसाठी विचार होऊ शकतो. रनवीरने अंडरस्टेटेड परफॅार्मन्स चांगला दिला आहे. एरवी त्याची ओव्हर द टॅाप काम करण्याची सवय पहाता हे फारच कौतुकास्पद.
फिल्म व्हायलन्स बाबत एन्वलप पुश करते, जी चांगली गोष्ट आहे. ते मधेमधे व्हायलाच हवं. शिव्याही सेन्सॅारने पास केल्या असत्या तर बरं झालं असतं. त्यांनी जरा भूमिका घ्यायला हवी कधीतरी.
फिल्म घसरते त्यात एक मुख्य भाग आहे तो लांबीचा. ती कमी करायलाच हवी होती. तीन तासांच्या वर जाणार असाल तर मालिका करा फिल्म नको. सात तासांच्या घरात जाणाऱ्यांनी तर करावीच. हल्ली ओटीटी साठीही भरपूर पैसे उडवले जातात, त्यामुळे तो प्रश्नही आता उरलेला नाही. ‘धुरंधर’ सेल्फ इन्डल्जन्ट आहे, स्वतःच्या प्रेमात आहे, हे आणखी एक. लेखक-दिग्दर्शक आदित्य धर ने थोडं अंतर ठेवून विचार करायला हवा होता. संकलनातही काही कापता आलं असतं, शार्प करता आलं असतं. चॅप्टर्स वगैरे करण्याची काहीही गरज नव्हती. काही वेळा त्यांची शीर्षकं स्पॅायलरसारखी आहेत. इतर काही वेळा ते खूप लहान आहेत. कशाला ?
लेखक आणि दिग्दर्शक एक असले की काही वेळा असं होतं. दुसऱ्या दिग्दर्शकाने ज्याला कात्री लावली असती तेही कापलं जात नाही. सारं तसंच चित्रीत केलं जातं आणि पडद्यावरही येतं. मग विस्कळीत होण्याची शक्यता वाढते. काल एका पाकिस्तानी व्यक्तीचा ट्वीट फिरत होता की यात दाखवलेलं राजकारण कसं चुकलय, खरं तर ते वेगळच आहे. आता हे कदाचित खरं असेलही. पण ते ठीकच आहे. हे काही बातमीपत्र नाही, ही मल्टीस्टारर मसाला फिल्म आहे. ते जे दाखवतायत ते कथेच्या युनिव्हर्समध्ये वर्क होतं का, इतकाच खरा प्रश्न आहे. तर मला वाटतं की ते पुरेसं होतं. गाणी हा फिल्मचा वीकेस्ट भाग वाटला. ती नसती तरी चाललं असतं. किंवा असायची तर याहून बरी हवी होती. पण हे सारं धरुन फिल्म चांगली वाटली, निदान हा भाग. पाहण्यासारखा आहे. पुढच्या भागाचं आत्ताच काही सांगता येत नाही.
गणेश मतकरी
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)






