Home > Top News > कोविडकाळातील केदारनाथ : भाग २

कोविडकाळातील केदारनाथ : भाग २

कोविडकाळातील केदारनाथ : भाग २
X

सकाळी दहा वाजताचे फ्लाईट पकडण्यासाठी आठ वाजता घराखालून रिक्षा पकडली आणि केदारनाथचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्या आधी तयारी करताना बायकोने या यात्रेसाठी तिच्यातर्फे दहा हजार रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आणि शिवाय आपला एक जुना स्मार्ट फोन मला तात्पुरता वापरण्यासाठी दिला. सुरुवातीलाच असा गोड शुभशकुन झाल्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. त्या भरात मी तिला पुढच्या जन्मी माझ्यापेक्षा चांगला नवरा मिळेल असा भरघोस आशीर्वाद देऊन टाकला.

बायकोने स्मार्ट फोन दिला खरा परंतू मी त्या आधी स्मार्ट फोन कधीच वापरला नसल्याने मला त्याबद्दल काही माहिती नव्हती. कट्ट्यावरच्या काही मित्रांना विचारून आवश्यक तेवढी जुजबी माहिती करून घेतली. कोविडकाळ सुरू असल्याने विमानतळावर कशा प्रकारे तपासणी होईल त्याची कल्पना नव्हती त्यामुळे मनात थोडी बाकबुक सुरू होती. सतत गळ्याला हात लावून अंगात ताप नाहीये ना याची खात्री करत होतो.

एअरपोर्ट वर पोहोचल्यावर सिक्युरिटीच्या माणसाने सर्वप्रथम मोबाईलमध्ये ‘आरोग्यसेतू’ डाऊनलोड केले आहे की नाही त्याची खात्री केली. मग कपाळाल टेम्परेचर गन लावली. त्या परीक्षेत मी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालो. बाकी नेहमीप्रमाणे होते तशी यंत्रात घालून ब्यागांची रीतसर तपासणी झाली. विमानात चढण्याअगोदर फेस शिल्ड, मास्क वगैरे मिळाले.

इंडिगोच्या विमानात शिरल्यावर कळले की हल्लीच्या नियमाप्रमाणे तीन सीट्स पैकी मधल्या जागेवर बसलेल्या माणसाला ‘PPE किट’ घालणे आवश्यक आहे. माझी जागा खिडकीजवळची असल्याने मी त्यातून वाचलो. हल्ली विमानप्रवासाबद्दल एक मोठा प्रॉब्लेम असा झालाय की पूर्वीप्रमाणे विमानात फुकट जेवण मिळत नाही. मला या जेवणाबद्दल फार उत्सुकता असायची. आता काही पदार्थ विकत मिळतात पण त्यातले काहीही अडीच तीनशे रुपयांच्या खाली नसते. एवढे पैसे देऊन खाण्यापेक्षा मी सरळ घरून पराठे वगैरे बांधून नेतो आणि विमान उडाल्यावर आरामात रवंथ करत खातो.

या बाबतीत गुजराथी लोक सर्वांचे बाप आहेत. मागे एकदा अशाच कुठल्यातरी विमान प्रवासात पंधरा वीस गुजराथी लोकांचा ग्रुप माझ्या विमानात होता. काही वेळानंतर त्यांनी पोतडीमधून फरसाण आयटम काढले. संपूर्ण विमानात घमघमाट पसरला. त्यातल्या दोघा तिघांनी तर सात आठ रांगा सोडून पलीकडे बसलेल्या आपल्या मित्रांकडे थर्ड मॅन वरून विकेटकीपरकडे चेंडू फेकावा तशा कचोऱ्या फेकल्या. माझ्या डोक्यावरून एकामागून एक उडत जाणाऱ्या कचोऱ्या शिंक्याखाली बसलेल्या बोक्याप्रमाणे हताशपणे पाहत राहण्यापलीकडे मी काही करू शकलो नव्हतो.

मुंबई डेहराडून विमान प्रवास एकूण दोन तासांचा होता. तासाभराने विमान कुठल्यातरी नदीकाठच्या शहरावरून चालले होते. काचेला नाक लावून खाली पाहत ते कुठले शहर असावे याचा अंदाज लावण्याचा मी प्रयत्न केला परंतू तो अयशस्वी ठरला. खर तर विमानाचे पायलट अशी अवांतर माहिती प्रवाशांना का देत नाहीत? समजा आपण कुठल्या शहरावरून प्रवास करतोय हे प्रवाशांना कळले तर कुठल्या राष्ट्रीय गोपनीयतेचा भंग होतो? प्रवाशांचा विमानप्रवास रंजक करण्यासाठी या अत्यंत साध्या साध्या गोष्टी विमान कंपन्या का करत नसाव्यात? अशा विचारांच्या आवर्तात आणि तीनपैकी एका एअर होस्टेसकडे बघण्याच्या नादात डेहराडून कधी आले कळलेच नाही. विमानतळा बाहेरच एका तंबूत कोविड रिपोर्ट वगैरे सर्व कागदपत्रे तपासली जात होती. एक फॉर्म भरून घेतला जात होता. त्या भरलेल्या फॉर्मवर तिथला अधिकारी सही करायचा. मग आपण त्या सही केलेल्या फॉर्मचा फोटो काढून दरवाजावरच्या पोलिसाला दाखवला की तो आपल्याला बाहेर सोडणार.

सर्व सोपस्कार उरकून बाहेर आलो. ऋषीकेशला जाण्यासाठी वाहनाची चौकशी केली तर सातशे रुपये दराने फक्त टॅक्सी उपलब्ध होती. तिथेच एक माणूस भेटला. तो ही एकटा होता व त्यालाही ऋषीकेशला जायचे होते. दोघांनी मिळून एक टॅक्सी केली. वट्ट साडे तीनशे रुपये वाचले. ऋषीकेशला उतरल्यावर आधी एका साध्याशा ढाब्यावर जेवलो आणि मग बाईक भाड्याने कुठे मिळेल त्याची चौकशी सुरू केली. तिथून पंधरा वीस मिनिटांवर असलेल्या गुरुद्वाराच्या शेजारीच मिळते असे कळले. एक वडाप पकडून दहा रुपयांत तिथे गेलो. महेंद्रसिंग नावाच्या सरदारजीचे ते हॉटेल होते. तिथेच ते भाड्याने बाईक्स देण्याचा देखील व्यवसाय करतात.

बुलेट, पल्सर, KTM, अपाचे, यामाहा FZ वगैरे सर्व बाईक्स तेथे भाड्याने मिळतात. कंडीशन उत्तम असते. भाडे गाडीप्रमाणे असते. दिवसाला साधारण पाचशे ते बाराशे या दरम्यान ते आकारले जाते. कितीही किलोमीटर चालवा. त्यावर बंधन नाही. पेट्रोल अर्थातच आपण घालायचे. बाईक घेताना आधार कार्ड, व्होटर कार्ड वगैरे तत्सम असे आपले एक ओळखपत्र त्याना द्यावे लागते बस्स. बाकी डिपॉझीट रक्कम वगैरे काही नाही. हेल्मेट, सामान बांधण्यासाठी बंजी रोप वगैरे तेच देतात. दिल्लीच्या करोल बागेत तर बायकर्स जॅकेट पासून बुटापर्यंत सर्व भाड्यावर मिळते. मी यामाहा FZ बाईक घेतली. तपासणी करतांना लक्षात आले की तिचा मागचा टायर साफ बाद झालाय. महेंद्रसिंग साहेबांच्या ते निदर्शनास आणून दिल्यावर ताबडतोब त्यांनी आपल्या माणसाला नवीन टायर टाकून आणायला सांगितला. नवीन टायर बसवलेली गाडी हातात येऊन सोनप्रयागच्या दिशेने निघेपर्यंत साडे चार वाजले.

आज शक्य झाल्यास चंबा, टिहरी, श्रीनगर, रुद्रप्रयाग मार्गे सोनप्रयाग गाठायचे उद्दिष्ट होते. हिमालयातील रस्त्यावर बाईक चालवण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग. तथापि या आधी कोकणातल्या आणि दक्षिण भारतातल्या वळणावळणांच्या घाट रस्त्यांवर भरपूर ड्रायव्हिंग केलेले असल्यामुळे उत्तम अनुभव गाठीशी होता. बाईक चालवणे मला मनापासून आवडते. गाडी की बाईक यात माझी पहिली पसंत केव्हाही बाईक हीच असते. ‘काला पत्थर’ मधल्या शशी कपूर प्रमाणे ‘एक रास्ता है जिंदगी, जो थम गये तो कुछ नही’ म्हणत, जंगलातल्या रानफुलांचा सुगंध आणि गार वारे अंगावर घेत बाईक प्रवास करायला जी मजा येते त्याला तोडच नाही.

गाडीतला एसी कितीही शीतल वाटला तरी भोवतालची खुली हवा मला केव्हाही जास्त प्रिय वाटते. ऋषीकेश सोडताच तीव्र चढणीचा घाटरस्ता सुरू होतो आणि अर्ध्या तासात तुम्ही उंच डोंगरमाथ्यावर पोहोचता. वातावरणात आल्हाददायक थंडावा येतो, पावसाळी ढगांचे थवे कापत तुम्ही निघालेले असता. आपोआप ओठांतून शिट्टीवर ‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहां कल क्या हो किसने जाना’ सुरू होतंच. मागे हेमामालिनी बिलगून बसलेली नसतानाही स्वत:ला राजेश खन्ना समजण्याची हीच ती वेळ ! मनाच्या अशा उन्मनी अवस्थेत, वाटेत एकदा चहासाठी थांबून मी ‘चंबा’ या उत्तरखंडातल्या थंड हवेच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे साडेसहा वाजले होते.

एव्हाना या डोंगराळ भागात उन्हे उतरणीला लागली होती. आसमंत गिळणारा अंधार हाकेच्या अंतरावर उभा होता आणि सोनप्रयाग अजून दोनशे किलोमीटर दूर होते. या अनोळखी मुलखात पुढे रात्रीचा प्रवास करावा की, नको ते ठरत नव्हते. तिथेच नाक्यावर एक तरुणांचा ग्रुप उभा होता. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एकट्याने रात्री बाईकवर पुढे प्रवास करण्यापेक्षा आजची रात्र चम्बामधेच काढण्यास सुचविले, कारण पुढच्या रस्त्यातल्या काही निर्जन जंगलभागात वाघ आणि अस्वलाची भीती होती. त्यांनी जवळच्या एका हॉटेलबद्दल माहिती देखील दिली. हॉटेल शोधून तिथे गेलो तर त्याने एका रात्रीसाठी एक हजार रुपये दर सांगितला.

दुसऱ्या हॉटेलात गेलो तर तिथेही तोच प्रकार. कोविडमुळे हॉटेल ओस पडले असतानाही हे लोक भाव धरून बसले होते. तिसऱ्या ठिकाणी मात्र मालक आधी हजाराचा आकडा सांगून नंतर पाचशे रुपयांवर तयार झाला. बऱ्यापैकी रूम होती. मुख्य म्हणजे गरम पाण्यासाठी गीझर होता. रूम ताब्यात घेऊन आधी गरम पाण्याने आंघोळ केली. खाली उतरून शेजारच्या रस्त्याकडेच्या ढाबेवजा हॉटेलात गेलो, तीस रुपयांत मिळणारे अर्धे ‘चाऊमीन’ म्हणजे नूडल्स खाल्ले आणि वर येऊन दुलईच्या उबेत गुरफटून गुडूप झालो. दुसऱ्या दिवशी नवीन रस्ता, नवीन प्रदेश, नवीन लोक माझी वाट बघत होते.

क्रमश:

Updated : 29 Sep 2020 3:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top