"Debate on God's Existence" : आस्तिक VS नास्तिक, चर्चासत्रातला महत्त्वाचा मुद्दा कोणता?
आस्तिक विरुद्ध नास्तिक? ईश्वर अस्तित्वात आहे की नाही या दोन्ही बाजूंचे युक्तिवाद समजून घेण्याच्या दृष्टीने या चर्चेतील चांगलं-वाईट (गुड-इव्हिल)या मुद्द्याचा विस्तार लेखक उत्पल व.बा. यांनी केलाय वाचा..
X
Lallantop 'लल्लनटॉप'वर एक रोचक चर्चा पाहण्यात आली. Does God Exist? 'ईश्वर अस्तित्वात आहे का?' हा चर्चेचा विषय होता. Atheist नास्तिक बाजूने Javed Akhtar जावेद अख्तर आणि Theist आस्तिक बाजूने Mufti Shamail Nadvi मुफ्ती शमैल नदवी हे इस्लामिक अभ्यासक सहभागी झाले होते. Saurabh Dwivedi सौरभ द्विवेदी चर्चेचं सूत्रसंचालन करत होता. प्रत्येकाने आपला पक्ष मांडणं, त्यावर प्रत्युत्तर, एकमेकांशी प्रश्नोत्तरं, समारोपाचा युक्तिवाद असा फॉर्मेट होता. कालमर्यादा ठरवून दिली गेली होती. विशेष म्हणजे दोघाही वक्त्यांनी ती चांगली पाळली. एकमेकांबरोबर झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये आणि श्रोत्यांबरोबर झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये थोडी गहमागहमी झाली. पण एकूणात अशी रचनाबद्ध चर्चा घेण्याची कल्पना मला आवडली. मागे एकदा 'कोलकता डिबेटिंग सर्कल'तर्फे 'जस्टिस इज ऑफन डिमांडेड बट सेल्डम डिलिव्हर्ड' याच्या बाजूने आणि विरुद्ध अशी चर्चा घेतली गेली होती. विशिष्ट रचनेत बांधलेले, कालबद्ध असे वाद होणं ही चांगली बाब आहे. असे वाद-कार्यक्रम अधिकाधिक व्हायला हवेत. फक्त भिती एकच की शेवटी प्रकरण हमरीतुमरीवर येण्याची दाट शक्यता असते. ते टाळता आलं तर बरं. म्हणजे हमरीतुमरीवर यायला हरकत नाही; पण ती नियंत्रणात राहत नाही. विकोपाला जाते, एकमेकांचा राग वगैरे येतो आणि मग विषय बाजूला पडतो!
वर म्हटलं तसं याही चर्चेत थोडी हमरीतुमरी झाली; पण फार नाही.
नदवी वापरत असलेली परिभाषा (काँटिंजन्ट बीइंग, नेसेसरी बीइंग, इंफायनाइट रीग्रेस ऑफ कॉजेस, ऑब्जेक्टिव्ह मोरॅलिटी-सब्जेक्टिव्ह मोरॅलिटी इ.) जावेद अख्तर यांच्या परिचयाची नव्हती. नदवींनी हिंदी-उर्दूत त्याचा खुलासा केला. पण या संकल्पना बहुधा जावेद अख्तर यांच्या नीट लक्षात आल्या नाहीत. नदवी म्हणत होते की मी बरीच अकादमिक तयारी करून आलो होतो; पण जावेद अख्तर 'ईश्वर आहे की नाही' यावर चर्चा करण्यापेक्षा धर्म, धार्मिक कल्पना, बुरसटलेपणा यावर जास्त बोलतायत. आजच्या चर्चेचा तो हेतूच नाही. त्यांचं म्हणणं बरोबर होतं; पण जावेद अख्तर अकादमिक अंगाने बोलणाऱ्यांपैकी नसल्याने संवादात गॅप राहणार असं मला वाटत होतं तसंच झालं. (जावेद अख्तर यांनी 'मेटाफिजिक्स'लादेखील निकालात काढलं. त्यांच्या दृष्टीने ईश्वराचे पुरस्कर्ते उगीच जड शब्द कॉइन करत असतात). जावेद अख्तर यांच्याऐवजी रिचर्ड डॉकिन्स किंवा त्या स्कूल ऑफ थॉटचे अन्य कुणी असले असते तर कदाचित नदवी यांच्याबरोबर पारिभाषिक संवाद होऊ शकला असता. पण तरी जावेद अख्तर यांनी त्यांचे काही तार्किक मुद्दे प्रभावीपणे मांडलेच. (ते सुरुवातीलाच म्हणाले होते की मला विज्ञानातलं खूप जास्त कळत नाही; पण मला कॉमन सेन्स कळतो!)
ही चर्चा ऐकावी अशी नक्कीच आहे. मुख्य म्हणजे नदवी ईश्वर या संकल्पनेबाबत काही मूलभूत बोलू पाहत होते. ते नास्तिकतेला विरोध करत होते; पण त्यांची आस्तिकतादेखील विना चिकित्सा, केवळ परंपरेने रुजलेली वाटत नव्हती. त्यामागे त्यांचा काही विचार होता असं वाटत होतं. अर्थात त्यासाठी त्यांची इतर भाषणं, मांडणी पाहावी लागेल.
ईश्वर अस्तित्वात आहे/नाही या दोन्ही बाजूंचे युक्तिवाद समजून घेण्याच्या दृष्टीने या चर्चेतील बऱ्याच मुद्द्यांचा, प्रश्नांचा विस्तार करता येईल. पण सध्या इथे चांगलं-वाईट (गुड-इव्हिल) संदर्भातल्या एका मुद्द्याचा थोडा विस्तार करावासा वाटतो आहे.
जावेद अख्तर आणि श्रोत्यांमधल्याही एक दोघांनी (यात जेएनयूचे पुरुषोत्तम अग्रवालदेखील होते) गाझामध्ये मारल्या गेलेल्या हजारो बालकांचं उदाहरण देऊन विचारलं की ईश्वर अशा अमानुष संहाराला मान्यता कशी देतो? तो काही करत का नाही? या मुद्द्यावर ते भावनिक झाले होते. त्यांनी नदवी यांचं उत्तर ऐकलं; पण त्यांचं समाधान झालं नाही. नदवी यांचं म्हणणं असं की ईश्वराने माणसांना 'फ्री विल' दिलेली आहे. त्याचा वापर माणसं ज्या प्रकारे करतात त्यासाठी ईश्वराला जबाबदार धरता येत नाही. फ्री विल दिली नाही तर माणसं रोबोटसारखी होतील. ते म्हणाले की ईश्वर माणसांची परीक्षा घेत असतो. शाळेत परीक्षा सुरु आहे असं समजा. एखादा विद्यार्थी चुकीचं उत्तर लिहितो आहे हे वर्गात फेरी मारताना शिक्षकाच्या लक्षात येतं; पण शिक्षक त्याची चूक दुरुस्त करत नाहीत. कारण ती परीक्षा आहे. हे उदाहरण जावेद अख्तर, पुरुषोत्तम अग्रवाल यांना खटकलं कारण त्यांना ते असंवेदनशील वाटलं. म्हणजे विद्यार्थ्याने परीक्षेत चुकीचं उत्तर लिहिणं आणि लहान बालकांनी जीव गमावणं एकसारखंच?
मला इथे काही प्रश्न पडले. काय योग्य आणि काय अयोग्य याबाबत विविध धर्मांनी आपापलं म्हणणं मांडलं आहे. पण आपण आत्ता खुद्द ईश्वराबद्दल बोलत आहोत. तर लहान बालकांना मारणं, स्त्रियांवर बलात्कार करणं, खून मारामाऱ्या करणं याबाबत ईश्वराची स्वतःची काही भूमिका आहे की नाही हे कसं कळणार? या गोष्टी करू नयेत असं आपण माणसं म्हणतो. ईश्वरही तेच म्हणतो का? की त्याची/तिची काही वेगळी गणितं आहेत? याबाबत काही मतप्रवाह आहेत. माणूस जी मोरॅलिटी - नैतिकता मानतो ती ईश्वराचीच इच्छा/आदेश आहे असा एक सिद्धांत आहे तर ईश्वर अगोदरच ठरलेले काही नैतिक नियम मानतो/मानते असं एक मत आहे. आणखीही मतं असू शकतील. आता खुद्द ईश्वराने अमुक अमुक नियम घालून दिले हे कसं सिद्ध होईल हा प्रश्न येईल. पण कुराण, शकेल. 'ईश्वराचं अस्तित्व इंटेलिजंट डिझाइनचं गृहीतक न वापरता सिद्ध करणं' या कसोटीवर आस्तिक टिकू शकले नाहीत तरी जग ज्याअर्थी आहे त्याअर्थी ते कुणीतरी बनवलेलं आहे हे सरळच आहे हाच त्यांचा मूळचा घट्ट विश्वास असल्याने ईश्वर नाकारणं किंवा निदान त्याबद्दल शंका घेणं त्यांना शक्य होणार नाही. पण तरी या संदर्भातल्या अकादमिक, तात्त्विक स्वरूपाच्या चर्चा ऐकायला हरकत नाही. त्यातून काही संकल्पनांची ओळख होऊ शकते. ('ईश्वर मेला आहे' हा नित्शेचा विचारही मला फार लक्षणीय वाटतो. कदाचित यातून बरेच प्रश्न निकालात निघू शकतील!) आपलं जग कुठून आलं, का आलं हे प्रश्न नेहमीच पडतात. त्यावरचे वर्ल्ड व्ह्यूज समजून घेणं रोचक ठरू शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे शांतपणे, उत्तेजित न होता, एकाग्रतेने बोलणं आणि ऐकणं हा 'व्यायाम' करण्यासाठी इतरही विषयांवर अशा शिस्तबद्ध चर्चा अवश्य व्हाव्यात.
उत्पल व. बा.
(मुक्त लेखक, संपादक आणि भाषांतरकार. सामाजिक-राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर लेखन. कवितासंग्रह, लेखसंग्रह आणि भाषांतरित पुस्तकं प्रकाशित. 'मिळून साऱ्याजणी' मासिकाचे माजी सहसंपादक. 'आंदोलन', 'आजचा सुधारक' या मासिकांच्या संपादनात सहभाग. सध्या 'संपर्क' या धोरणअभ्यास आणि धोरणपाठपुरवठा (पॉलिसी रीसर्च अँड ॲडव्होकसी) करणाऱ्या संस्थेत कार्यरत.)






