Home > मॅक्स ब्लॉग्ज > भारतीय गणराज्यातील गण सध्या काय करतायत?

भारतीय गणराज्यातील गण सध्या काय करतायत?

भारतीय गणराज्यातील गण सध्या काय करतायत?
X

भारतीय गणराज्यात मागील हजारो वर्षांपासून वर्ण व्यवस्था सूरू आहे. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र अशी भारतीय समाजव्यवस्था विभागली गेली होती हे आपण सारेच जाणतो. भारतीय गणराज्य अशी ओळख आपल्या देशाला मिळाली. पण आज या गणराज्यातील सद्यस्थिती पाहता गण कुठे हरवले आहेत? ते खरंच हरवले आहेत की त्यांना हळू हळू त्यांच्या सत्यापासून दूर केलं गेलं आहे? असे प्रश्न उपस्थित करणारा पत्रकार शुभम पाटील यांचा सविस्तर लेख....

२६ नोव्हेंबर १९४९ ला सर्वमताने संविधानसभेत आपल्या देशाची राज्य घटना संमत झाली. त्या राज्यघटनेच्या उद्देशिकेची सुरूवात आणि शेवट फार महत्वाचा आहे. आम्ही भारताचे लोक अशी सुरूवात आणि स्वतःप्रत अर्पण करीत आहोत असा शेवट हे संविधान १४० कोटी भारतीयांचं आहे आणि आपण प्रत्येकाने ते स्विकारलं आहे याची ग्वाही देतो. या उद्देशिकेमध्येच आपली सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधूता अशा काही महत्वपूर्ण शब्दांसोबत ओळख होते. हे फक्त शब्द नाहीत तर आपण कोणत्याही जाती धर्माचे पायीक नसून भारतीय म्हणून एक आहोत अशी ओळख आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना संपूर्ण देशात लागू झाली आणि आपल्या देशात लोकांचं राज्य सुरू झालं. भारतीय गणराज्य अशी ओळख आपल्या देशाला मिळाली. पण आज या गणराज्यातील सद्यस्थिती पाहता गण कुठे हरवले आहेत? ते खरंच हरवले आहेत की त्यांना हळू हळू त्यांच्या सत्यापासून दूर केलं गेलं आहे? असे प्रश्न उपस्थित राहतात.

भारतीय गणराज्यात मागील हजारो वर्षांपासून वर्ण व्यवस्था सूरू आहे. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र अशी भारतीय समाजव्यवस्था विभागली गेली होती हे आपण सारेच जाणतो. १४५ कोटींच्या या देशात आजही केवळ ४.५ टक्के ब्राम्हण वर्ग राहतो. ४० टक्के क्षत्रिय आणि वैश्य राहतात पण उर्वरीत ५५.५ टक्के लोक हे क्षुद्र आहेत. या ४.५ टक्के लोकांनी कायम धर्म, स्वातंत्र्य, शिक्षण या मुलभूत हक्कांपासून ५५.५ टक्के वर्गाला वंचित ठेवंलं. हजारो वर्षे हेच सुरू राहिल्यानंतर एक मनुष्य जन्माला येतो, या सर्व समाजव्यवस्थेला आव्हान देण्यासाठी शिकतो आणि संविधान तयार करून साऱ्या भारतीयांना एकाच समान पातळीवर आणतो. त्या भल्या व्यक्तीचं नावं न घेताही आपल्याला कळालंच असेल.

याच संविधानामुळे भारतातील प्रत्येक व्यक्तीला राजकारणात येण्याची संधी प्राप्त झाली खरी पण ती संधी मिळालेली व्यक्ती किती प्रभावशाली ठरलीय? याचा देखील विचार होणं गरजेचं आहे. या देशाचं प्रथम नागरीकत्व एका आदिवासी महिलेला दिलं गेलं तेव्हा सर्व स्तरातून सरकारच्या त्या निर्णयाचं कौतूक झालं. सत्ताधाऱ्यांनी कसं एका अनूसूचित जमातीचा सन्मान केला असा गवगवा केला गेला. पण प्रत्यक्षात मात्र किती अधिकार त्या महिलेला दिले गेले? देशाच्या सर्वात महत्वाच्या इमारतीचं उद्घाटन करण्यापासून तिला वंचीत ठेवलं गेलं. इतकंच काय जेव्हा दलितांवर, महिलांवर या देशात अत्याचार होत आहेत. घोळक्यांमधून महिलांचं वस्त्रहरण केलं जातं आणि अशा वेळी देखील जर देशाची प्रथम नागरीक काहीच बोलणार नसेल, राज्यकर्त्यांवर ताशेरे ओढणार नसेल तर त्यापेक्षा दुसरी खेदाची बाब नाही. सत्ताधाऱ्यांकडून जर बाहूलीप्रमाणे त्या पदावरील व्यक्तीचा वापर केला जाणार असेल तर ती व्यक्ती प्रथम नागरीक असली काय आणि नसली काय…..काहीही फरक राहत नाही. यातून मात्र सत्ताधाऱ्यांकडून एक संदेश अप्रत्यक्षपणे दिला जातो तो म्हणजे या देशात अजूनही या ४.५ टक्के समाजाचंच राज्य आहे. आणि हे कळत असूनही या देशातील बहुतांशी जनता शांत आहे.

ज्या वर्गाने आजपर्यंत दलितांना, बहुजनांना अच्छुत समजलं होतं, त्यांना कचपटासमान वागणूक दिली त्यानेच, बहुजन वर्गाला आज धर्माच्या जाळ्यात सत्तेची लालसा देऊन ओढलंय. ४.५ टक्के समाज या बहुजन वर्गाला हवं तसं वागवून घेतोय. भाजप शासित राज्यांमधील द्वेष, हिंसा हे त्याचंच द्योतक आहे. हरियाणा, मणिपूर मधील हिंसाचार असो वा मध्यप्रदेश मधे दलितावर लघुशंका असो वा हाथरस बलात्कार असो वा अहमदाबाद बलात्कार असो.... बहुजन आणि दलित समाज धर्माच्या नावाखाली एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. ब्राम्हण वर्ग सत्तेचा मलिदा खाण्यात व्यस्त आहे. बहुजन वर्ग इतका संवेदनाहिन होत चालला आहे की बलात्कार, mob lynching सारख्या भयानक घटना घडल्यानंतर देखील त्याला काहीच वाटत नाहीये. विनादिक्कत धर्माची टिमकी मिरवण्यात तो व्यस्त असल्याचं वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतंय.

आतापर्यंत आपण वर्णवादाची जी टक्केवारी पाहिली त्यात ब्राम्हण म्हणजे ब्राम्हणवाद जपणारी मानसिकता बाळगणारी लोकं; मग ती कोणत्याही जातीची असो.. तसंच इतर टक्केवारीच्या बाबतीतही म्हणता येईल. सध्याच्या भारतीय गणराज्यात कुणीही ब्राम्हण समाजाला दोष देत नाहीये तर त्या ब्राम्हणी मानसिकतेचा विरोध करतायत जी सत्ता उपभोगण्यात व्यस्त आहे. मग या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली सत्ता उपभोगणारी व्यक्ती ही जातीने बहुजन असो वा दलित पण सामान्यांचं रक्त शोषताना तीचा स्तर ब्राम्हणाचाच राहतो. आणि अगदी याउलट नियमितपणे कर भरणारी पण महागाई, बेरोजगारी आणि तत्सम मुद्द्यांनी त्रासलेली व्यक्ती जातीने ब्राम्हण जरी असली तरी तीचा स्तर बहुजनाचाच राहतो. हा आता जन्माने ब्राम्हण असल्याने काही फायदे तर काही आर्थिक आणि सामाजिक तोटे भोगावे लागतात आणि जन्माने दलित तसेच बहुजन असलेल्या बहुतांशी व्यक्तींच्या नशिबात गरीबी पाचवीला पुजलेली असते हा भाग अलाहिदा…

आजच्या भारत देशातील समाजव्यवस्थेचं स्वरूप हे असं वरीलप्रमाणे आहे. शिवाय ज्या पध्दतीचे राज्यकर्ते आपल्या देशावर सध्या राज्य करतायत त्यामुळे श्रीमंतांच्या दौलतीत आणखी वाढ होत चालली आहे तर गरीबांची झोळीला पडलेल्या भोकाचं रूपांतर आता भगदाडात झालंय. त्यात काहीही टाकलं तरी ते त्या झोळीत टिकतच नाही. आता उरतो मध्यमवर्गीय भारतीय गण! ज्याचं मन दोलायमान आहे. समोर वाटेत खड्डा असला तरी डोळ्यांवर लावलेल्या पैशांच्या झापडांमुळे ती व्यक्ती खड्ड्यात पडून कंबरडं मोडून घ्यायलाही तयार असते. त्यामुळे बराचसा वर्ग उपाशी राहिलो तरी मत ‘नमो’लाच देणार असं म्हणताना दिसतो. तर दुसरीकडे असाही वर्ग आपण पाहतो ज्याच्या केवळ हताश झालेल्या डोळ्यांत आलेलं पाणी गमछ्याने पुसत “मेरी गुजर नही हो रही” असं म्हणतो. ते दृश्य पाहताना जर आपल्या काळजात चर्रर नाही झालं तर आपल्यातील माणसाचा केव्हाच मृत्यू झाला आहे असं समजायला हरकत नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये आपल्यातील भावनाशुन्यता, असंवेदनशीलता वाढत चालली आहे. वसुधैव कुटूंबकम्, हे विश्वची माझे घर ही वाक्य आता केवळ परदेशात जाऊन गमजा मारण्यापुरतीच राहिली आहेत. एका धर्माप्रती वाढता द्वेष इतका वाढलाय की शासकीय नोकरीतील फौजदार या विश्वगूरू नेत्यालाच मत द्यावं लागेल असं सांगत चार निष्पापांचा बळी घेतो आणि हे सराकार त्याला मानसिक रोगी सांगत वाचवण्याचा प्रयत्न करतं. पण सत्य काही वेगळंच आहे. दिल्लीत मागील चार पाच वर्षांत झालेल्या धार्मिक दंगलींमध्ये पोलिसांसमोर समाजकंटक गोळीबार करत होते आणि पोलिसांनी बघ्याची भुमिका घेतली होती. फार मागे का जा आत्ताच ४ मे ला मणिपूर मध्ये झालेल्या सामुहिक बलात्कारामध्ये फिर्यादी महिलेच्या सांगण्यानुसार या महिलांना पोलिसांनीच जमावाच्या स्वाधीन केलं होतं. सध्या सुरू असलेल्या हरीयाणा मधील जातीय दंगलींमध्ये काही दंगलखोर पोलिसांसमक्ष इतरांवर गोळीबार करत आहेत. या सर्व घटनांचे व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत आपण ते पाहू शकता.

जेव्हा मणिपूर मधील महिलांना विवस्त्र करणारा व्हिडीओ समोर आला तेव्हा अनेकांच्या रागाचा पारा चढला आणि अशांत मणिपूर हाताळता न येणाऱ्या सरकारला त्यांनी भरभरून धारेवर धरलं. पण काही जण असेही होते जे मणिपूरच्या अमानवीय घटनेची तूलना बंगाल, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांतील घटनांशी करू लागले. इतका असंवेदनशीलपणा आपल्यात कसा आणि कुठून आला आहे? कोणे एके काळी भ्रष्ट शासनकर्त्यांविरूध्द, महागाईविरूध्द, बेरोजगारीविरूध्द, बलात्काऱ्यांविरूध्द जातीभेद विसरून एकत्र रस्यावर उतरणारा भारतीय गण आज समाजमाध्यमांमध्ये अडकून पडलाय. “अरे... घटना मणिपूर मध्ये घडलीय ना... आहे चूकीचीच... पण आपण कधी गेलोय मणिपूरला? दुर्लक्ष करूयात”, “ही दुनियादारी सोड, पोटापाण्याचं बघू दे”, अस म्हणू लागलाय. आणि हे म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर जी भावनाशुन्यता दिसते ती या देशाच्या भवितव्यासाठी फार घातक आहे. सध्याच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या युगात स्वतःची आर्थिक घडी बसवणं गरजेचच आहे पण एक चांगला समाज घडावा, त्यातून आपला देश समृध्द व्हावा यासाठी प्रयत्न करणं. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं देखील तितकंच गरजेचं आहे.

“लहान मुलं ही बागेतील कळ्यांसारखी असतात, त्यांना फार काळजीपूर्वक आणि प्रेमाने हाताळावं लागतं. कारण ते या देशाचं भविष्य आणि उद्याचे नागरीक आहेत. आपण त्यांचं ज्या प्रकारे पालन पोषण करू त्यावर देशाचं भवितव्य ठरेल.”, असं आपल्या या स्वतंत्र भारताच्या आणि भारतीय गणराज्याच्या पहिल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं. हे किती तंतोतंत खरं ठरतंय हे आपल्याला आज कळत असेल. आज आपल्या गणराज्यात जनतेमध्ये जे दोन गट झालेत. जो धर्मांधपणा आलाय त्याची सुरूवात ऐंशीच्या दशकाच्या शेवटी आणि नव्वदीच्या दशकाच्या सुरूवातीला काढलेल्या रथयात्रेपासूनच झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यानंतर बाबरी मशिद पडल्यानंतर देशभरात झालेल्या दंगली आपल्याला विसरून चालणार नाही. हे जे धर्मांधतेचं विष आहे ते याच रथयात्रेदरम्यान तेव्हाच्या तरूण पिढीमध्ये कालवलं गेलं. त्यानंतर सध्या जे विश्वगुरू देशाचे पंतप्रधान आहेत ते मुख्यमंत्री असताना २००२ मध्ये घडलेल्या दंगली देखील याच मानसिकतेच्या द्योतक होत्या. बरं रथयात्रेपुर्वी या गोष्टी घडल्या नव्हत्या का? तर हो घडल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर देशाची फाळणी झाली तेव्हा दंगली झाल्या. १९४८ ला गोडसेने राष्ट्रपित्यांची हत्या केली तेव्हा महाराष्ट्रात ब्राम्हणांविरूध्द दंगली झाल्या. १९८४ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या शीख सुरक्षा रक्षकाकडून करण्यात आली त्यावेळी दिल्ली मध्ये शीखांविरूध्द दंगली उसळल्या होत्या. या सर्व घटना प्रांसंगिक होत्या. घडलेल्या क्रियेला प्रतिक्रीया होत्या. पण सध्या जो धर्म द्वेष्टेपणा वाढलाय तो जाणून बुजून नियोनपूर्वक पसरवला गेलाय. आणि हेच आजच्या भारतीय गणांना कळत नाहीये. एखादं भयानक कृत्य केल्यावर क्षणिक मिळणारा धर्माभिमान त्यांना मुलभूत सुखसुविधांपेक्षा महत्वाचा वाटू लागलाय. असो या द्वेषमय वातावरणात भरकटलेल्या गणांना पुन्हा एकदा प्रेमाची भाषा शिकवावी लागणार आहे. पहिल्या पंतप्रधानांचा वंशज म्हणे सध्या प्रेमाचं दुकान सुरू करू पाहतोय. जगातील सर्वात तरूण देश त्या प्रेममय वातावरणात पुन्हा एकदा रममाण होऊन द्वेषाच्या राजकारणाला आसमान दाखवेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

-शुभम पद्मावती हरेश पाटील

Updated : 17 Aug 2023 8:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top