Home > News Update > तबलीगचे लोक खरोखरच मशिदीमध्ये लपलेले होते काय?

तबलीगचे लोक खरोखरच मशिदीमध्ये लपलेले होते काय?

तबलीगचे लोक खरोखरच मशिदीमध्ये लपलेले होते काय?
X

तबलीग जमात या संघटनेची स्थापना १९२६ च्या सुमारास झाली असून दिल्ली येथे निजामुद्दीन नावाचे फार मोठे मुख्यालय आहे. त्यालाच मर्कज असे म्हणतात. मुस्लिम धर्मातील सुन्नी पंथातील बहुसंख्य लोक या संघटनेचे सभासद आहेत .तबलिगशी धार्मिक मतभेद असणारा एक वर्ग देखील सुन्नी पंथात आहे.

या संघटनेचे कार्य म्हणजे मुस्लिम धर्माच्या मूळ तत्वांचा प्रचार प्रसार करणे, व मुस्लिम धर्मीय लोकांना धर्म कार्याकडे आकर्षीत करणे, हे आहे. ही संघटना आज पर्यंत भारतात घडल्या जातीय- धार्मिक दंगलीत नव्हती,अथवा कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक कार्यात सहभागी झालेली नाही. धर्म प्रचार व प्रसार व महंमद पैगंबर यांना अपेक्षीत सदाचार या कार्यासाठी धर्म प्रचारक म्हनून त्यांनी वाहून घेतले आहे. अज्ञानी समाज बांधवाना धार्मिक प्रशिक्षण देणे , व गावोगावी व जिथे जिथे मुस्लिम समाज आहे, तेथे जाऊन मशिदीत प्रवचन देणे, धर्माचा खरा अर्थ सांगणे हे कार्य ही संघटना करते.

या संघटनेची कार्यप्रणाली व आचारसंहिता शंभर वर्षात बदलेली नाही. या तत्वापलीकडे जाऊन कोणताच वेगळा विचार मांडण्याची परवानगी कुणालाही या संघटनेत दिली जात नाही. त्यामुळे आजपर्यंत या संघटनेत कट्टर मुस्लिम अथवा धर्मनिरपेक्ष मुस्लिम यांना विचार मांडण्याची कोणतीही अनुमती ही संघटना देत नाही

फक्त धर्म प्रचार करणे, अनिती व वाम मार्गापासून रोखणे, व्यसनाधीन मुस्लिम समाजाचे प्रबोधन करून त्यांना खरा इस्लाम सांगणे, हेच कार्य तबलीग जमात करते.त्यामुळे ही संघटना भारतभर व जगभरातील सुन्नी पंथीय मुस्लिम धर्मीयांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळे जगभर तसेच देशव्यापी फार मोठे नेटवर्क या संघटनेने निर्माण केले आहे

दिल्ली येथे या संघटनेचे मुख्यालय असून जगभरात किमान 50 देशांमध्ये या संघटनेचे धर्म प्रसारक* जातात,व कार्य करतात. आज पर्यंत एकाही देशाने या संघटनेच्या कार्य प्रणालीवर आक्षेप घेतलेला नाही , अथवा या संघटनेवर राष्ट्रविरोधी अथवा समाज विघातक कृत्याचा कसलाही आरोप सुद्धा झालेला नाही. या संघटनेद्वारे धर्म प्रचारासाठी तयार केलेल्या प्रचारकांचे ३ दिवस ते १० दिवसांचे स्थानिक पातळीवर दौरे आयोजित केले जातात. तसेच किमान चाळीस दिवसांचा आंतरजिल्हा दौरा ठरवला जातो व किमान जे लोक एक वर्षांचा पूर्ण वेळ देतील, अशा प्रचारकांना इतर राज्यात अथवा देशात पाठवले जाते .

इतर देशात पाठवताना त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन पासपोर्ट व व्हिसा अशा सर्व प्रक्रिया दिल्ली येथील कार्यालयाकडून पूर्ण केल्या जातात. मगच जमात स्वयंसेवकांस विदेशात जाण्याची परवानगी देते.

या संघटनेच्या कार्या मध्ये त्यागी व निःसंग वृत्तीचे लोक असतात . त्यामुळे मुस्लिम व इतर धर्मीयांमध्ये या संघटने बाबत आत्मीयता आढळते. जे प्रचारक धर्म प्रसारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मशीदी मध्ये जाऊन राहतात,त्यांच्या जेवणाची सोय ते स्वतः करतात. कोणताही खर्च स्थानिक मशीद प्रसनाकडून घेतला जात नाही. प्रवास करणे,राहणे व धर्म प्रचार ही कामे स्वखर्चाने केली जातात.

दिल्ली येथील निजामुद्दीन मर्कज(मुख्यालय) येथे देशातील व देशाबाहेरील हजारो प्रचारक नेहमी प्रमाणे आपल्या कामासाठी आलेले होते . त्यामुळे त्यांच्या येण्यावर पोलीस अथवा स्थानिक प्रशासन कुणीही आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे , हे लोक निर्धास्त होते. मात्र अचानक प्रधानमंत्री मा. नरेंद मोदी यांनी २२ तारखेपासून राष्ट्रीय संचारबंदी लागू केल्यामुळे सगळ्या राज्यांनी आप आपल्या पाळतीवर कडक अमलबजांवणी केल्यामुळे तालुका-जिल्हा-राज्य-इतर देशातील तबलीग जमातचे प्रचारक गुंतून पडले आहेत.

तेथील मर्कज प्रमुखांनी दिल्ली पोलीस व स्थानिक प्रशासन* यांना प्रचारकांची माहिती व संख्या कळवली होती. मात्र दिल्ली पोलिसांनी कोणतीही उपाय योजना न केल्यामुळे हजारो लोक अडकून पडले याचा अर्थ ते मशीद मध्ये लपून बसले होते,असा होत नाही .

लपून बसले आहेत, हा आरोप निराधार व वस्तूस्तिथीला धरून नाही. उलट त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने पसरवलेली अफवा आहे. हाच प्रकार नगर जिल्ह्यातील जामखेड येथेही घडला आहे. आता त्या प्रचारकांपैकी जर कोरोना पॉझिटीव्ह असतील तर त्यामध्ये स्थानिक लोकांचा दोष काय ? उलट ते ही संपर्कात आले असल्याने त्यांनाही आज महाभयंकर आजाराचा मुकाबला करावा लागत आहे. त्यामुळे वस्तूस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.

तबलीग जमातीचा मुस्लिम धर्मावर प्रचंड मोठा पगडा असून करोडोच्या संख्येत अनुयायी आहेत. त्यामुळे देशातील काही ठराविक विचारांचे लोक मुस्लिम धर्मियांना बदनाम करण्याची कोणतीच संधी सोडत नाहीत. या उपर आजही काही स्थानिक लोक नमाज अदा करणेसाठी एकत्र जमत असतील , तर त्याचे समर्थन कुणीही करणार नाही.

तबलीग जमातीचा लाखो लोकांचा इजतेमा (धार्मिक संमेलन) कार्यक्रम मी स्वतः औरंगाबाद येथे पहिला आहे. प्रचंड शिस्तप्रिय व शांततेत लाखो लोक हा कार्यक्रम यशस्वी करतात. तेथील व्यवस्था ही पाहण्याजोगी असते. शिस्त व अनुशासन पालनाशिवाय दहा लाख लोक एकत्र येऊन मुक्कामी राहणे, हा कार्यक्रम यशस्वी करणे एवढे सोपे नाही .

त्यामुळे काही tv चॅनेल व सोशल मीडियातील काही महाभाग जाणीवपूर्वक मुस्लिम धर्मीयांवर जी चिखलफेक करीत आहे ,ती अन्यायकारक आहे. या संघटनेने आजवर कधीही हिंदूविरोधी भूमिका घेतलेली नाही. हे टीकाकारांनी ध्यानात घ्यावे.मुस्लिम समाजाने कडव्या अथवा बंदी असलेल्या राष्ट्रविरोधी संघटनेला थारा न देता ताब्लिग सारख्या मवाळ व निरुपद्रवी आंदोलनास आपलेसे केले.त्यांना 'साप' समजून भुई थोपटणारानी याचे जरूर आत्मपरीक्षण केले पाहिजे. ही मवाळ संघटना जर अस्ताला गेली तर त्याची उणीव भरून काढणारा पर्याय सहिष्णूच असेल कशावरून...?

(टिळक भोस श्रीगोंदा - अहमदनगर येथे राहतात व ते संभाजी ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष आहेत. संपर्क : 94 22 36 6000)

Updated : 1 April 2020 2:30 PM GMT
Next Story
Share it
Top