Home > मॅक्स ब्लॉग्ज > ह.भ.प.महाराज काळाची चक्रे पुन्हा उलटी फिरवताहेत ? रवींद्र पोखरकर

ह.भ.प.महाराज काळाची चक्रे पुन्हा उलटी फिरवताहेत ? रवींद्र पोखरकर

कीर्तन - प्रवचनाचे कोणतेही पैसे घेऊ नयेत, इतकेच काय तिथला अन्नाचा दाणाही स्पर्शू नये हे तुकाराम महाराजांनी ( Tukaram Maharaj) अगदी रोखठोक शब्दांत सांगून ठेवलंय.प्रत्यक्षात आज काय स्थिती आहे ? वारकरी संतश्रेष्ठ यांच्या मूळ विचारांना मूठमाती देणाऱ्या ह.भ.प वर कठोर शब्दात प्रहार केला आहे. लेखक रवींद्र पोखरकर यांनी...

ह.भ.प.महाराज काळाची चक्रे पुन्हा उलटी फिरवताहेत ? रवींद्र पोखरकर
X

मागील काही वर्षांमध्ये ज्ञानदेव-तुकोबारायांपासून ते बहुतेक सर्व वारकरी संतश्रेष्ठांच्या मूळ विचारांना मूठमाती देण्याचे काम या बहुसंख्य ह.भ.प. महाराजांनी केलेय.उठताबसता ज्ञानदेव तुकोबांचा फक्त गजर करायचा आणि प्रत्यक्षात त्यांच्या विचारांशी प्रतारणा करण्याचे काम या महाराजांनी केलंय.संतांनी आपल्या आचारविचारांतून कर्मकांडात अडकलेल्या तत्कालीन समाजाला त्यातून बाहेर काढून खऱ्या ज्ञानाच्या वाटेवर आणण्याचे काम केले तर या आधुनिक संत ह.भ.प.महाराजांनी काळाची चक्रे पुन्हा उलटी फिरवून समाजाला केवळ कर्मकांडे आणि अंधश्रद्धायुक्त दैववादाकडे नेण्याचे घातक कार्य केले.

संतांनी समाजाला जातीभेद मुक्तीची, वर्णभेद गाडून टाकण्याची,ब्राह्मणांच्या दानधर्माच्या काव्यात न अडकण्याची ,कर्मकांडात न अडकण्याची,सर्वधर्म समभावाची,जबाबदारीने संसार करण्याची,महिलेचा आदर राखण्याची,नैतिकता पाळण्याची शिकवण दिली.आजचे ह.भ.प.महाराज यातील कोणत्या बाबींवर कीर्तन करतात ? तुकोबारायांचा एखादा अभंग घ्यायचा आणि त्याचा मूळ गर्भितार्थ बाजूलाच सारून सगळी चिरफाड करून टाकायची.तासभर कीर्तन ऐकून ऐकणाऱ्याच्या पदरी काय पडतं तर शून्य..!

कुणी महाराज ते चला हवा येऊ दे चे कलाकार करणार नाहीत इतके खालच्या पातळीचे मनोरंजन कीर्तनाच्या नावाखाली करीत बसतो तर कुणी महाराज अप्रत्यक्ष राजकारणात घुसून देशाला आता कसे सोन्याचे दिवस आलेत आणि आता लवकरच कसे रामराज्य अवतरणार आहे ती भाटगिरी करीत बसतो ! कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तर जणू काही यांच्यावर आभाळच कोसळलं.गावागावातील श्रद्धाळू नागरिकांना सरकारविरोधात भडकवण्याचे काम या महाराजांनी एखादी सुपारी घेतल्यासारखे बजावले !फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात ज्या वक्ते महाराजाला प्रतिष्ठेचा ज्ञानदेव-तुकाराम पुरस्कार देऊन गौरविले त्याची काय गुणवत्ता होती ? कीर्तनात प्रचंड शिव्या,नेहरू-आंबेडकरांपर्यंत सगळ्या नेत्यांना दूषणं,जातीपातीचा वृथा अभिमान ही त्या महाराजांची वैशिष्ठ्ये ! त्या मनोहर उर्फ संभाजी भीडेसारख्यांनी वारीला,तुकोबारायांना अवमानित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा यांच्यातील किती बुवा-महाराज चवताळून त्याविरोधात उभे राहिले ?

कीर्तन-प्रवचनाचे कोणतेही पैसे घेऊ नयेत,इतकेच काय तिथला अन्नाचा दाणाही स्पर्शू नये हे तुकाराम महाराजांनी अगदी रोखठोक शब्दांत सांगून ठेवलंय.प्रत्यक्षात आज काय स्थिती आहे ? माणसाच्या मृत्यूपश्चात जे काही दशक्रिया वगैरे श्राद्धादी विधी केले जातात त्यावरही तुकोबारायांनी स्पष्ट शब्दात कोरडे ओढत त्या विधींमधला आणि त्यानिमित्त होणार दानधर्म,भोजनावळी आदींमधला फोलपणा दाखवून दिलाय. प्रत्यक्षात आज काय स्थिती आहे ? गावोगावचे दशक्रिया विधी या ह.भ.प.महाराजांच्या कीर्तनाशिवाय पारच पडत नाहीत ! आपण प्रत्यक्ष तुकोबारायांच्या विचारांशीच ही प्रतारणा करतोय याची काहीच लाज या महाराजांना अशावेळी वाटत नाही ? मन शुद्ध ठेवा,ते शुद्ध ठेवलं तर तुम्हाला कोणत्याही तीर्थयात्रेची गरजच नाही,भविष्य-ज्योतिष या फंदात कधीही अडकू नका,त्यात काहीही तथ्य नाही,वास्तुशांती वगैरे सगळं थोथांड आहे,नवसाने कोणताही देव-देवी कधी पावत नसतो आदी सगळे तुकोबांचे विचार किती ह.भ.प.महाराज जनतेला सांगताना दिसतात ?

अजूनही तुकोबा हे असे रथात बसले आणि सदेह वैकुंठाला गेले हीच टेप सगळे बुवा,महाराज सतत वाजवताना दिसतात.बरं..हे असत्य कथन करत राहता तर तुकोबांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांच्या कुटुंबियांना देहूत केवढा मानसन्मान मिळायला हवा होता ? त्यांना किती आदराचे आणि पूजनीय स्थान मिळायला हवे होते ? परंतु प्रत्यक्षात तसे काहीही न होता तुकोबारायांची पत्नी,मुलं,भाऊ यांना आपलं गाव,आपला जमीन-जुमला सोडून परागंदा होण्याची पाळी आली.जिजाईला आपल्या लहान पोरांना घेऊन माहेरी जावं लागलं.त्यांची जमीन,राहते घर मंबाजीने बळकावले.

तुकोबांचे सदेह वैकुंठ गमन खरंच झालं असतं तर देहूत त्यांच्या कुटुंबाची अशी परवड लगेच झाली असती ? देहूवासीयांनी होऊ दिली असती ? नंतर वीस-बावीस वर्षांनी तुकोबांची मुलं मोठी झाल्यावर संभाजी राजांच्या मदतीने मंबाजीशी भांडली आणि त्यानंतर त्यांची जमीन त्यांना परत मिळवता आली.हा सगळं घटनाक्रम काय दर्शवतं ? कुठला ह.भ.प.महाराज याबाबत काही तर्कसंगत विश्लेषण करतो ? असो..लिहावं तेव्हढं कमीच अशी याबाबत अवस्था आहे.वारकरी पंथाची बदनामी किंवा अवमान बाहेरच्या कुणाच्या काही बोलण्याने होत नाही तर या आधुनिक,बुध्दीभ्रष्ट झालेल्या ह.भ.प.महाराजांच्या आणि ते डोक्यावर घेत असलेल्या तथाकथित वारकरी नेत्यांच्या,संघटनांच्या उथळ,अविवेकी कृतींनी अधिक होतोय.पण हे लक्षात कोण घेणार?

(कोणीतरी कॉमेडीयन महिला पण आलीय म्हणे आता ह.भ.प. च्या पंक्तीत.. बोकडाचं नाव घेत नुकतंच काही बरळलीय म्हणे..आज नेमकी माझी ही जुनी पोस्ट आज मेमरीत वर आली.म्हणून रिपोस्ट)

Updated : 20 March 2023 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top