Home > मॅक्स ब्लॉग्ज > बिनभिंतीची शाळा

बिनभिंतीची शाळा

बिनभिंतीची शाळा
X

खडीच्या रस्त्यावरुन अनवाणी पायानं झपझप चालताना ठेचा लागायच्या. नखं उडायची, बोटं फुटायची. तीन-साडेतीन किलोमीटर अंतर चालून गेल्यावर शाळेच्या वाटेत प्रवरा नदी आडवी यायची वाटेत. नदीतून पैलतिरावर जायला होडी असायची. इतकं लांबवरुन धावत आल्यावर नेमका होडीनं नदीचा काठ सोडलेला असायचा. पुन्हा माणसं आली, होडी भरली की येणार. तोपर्यंत शाळेचा परिपाठ संपलेला असायचा. शाळेची शिस्त कठोर. शाळेत परिपाठाला वेळेत पोहोचलो नाही, की हातावर छडया बसायच्या. त्या इतक्या जोरात की अंगात रग असलेली टोंगळ टोंगळ पोरं मार बसल्यावर कळवळायची. रडायची. तळहात काळेनिळे व्हायचे. गुरुवारी सकाळी माराच्या भीतीनं ती शाळाच नकोशी वाटायची! एका बाजूनं तीन, पाच, सात किलोमीटर अंतरावरुन मुलं शाळेत यायची. हा जीवघेणा मार चुकवायचा असेल तर मग एकच पर्याय समोर असायचा. तो म्हणजे लवकर शाळेत येणं. ते तर शक्यच होत नसायचं. कारण घरचे लोकं रोज सकाळी उठून काही ना काही काम सांगत असत. जनावरांना वैरणकाडी-चंदीचारा करु, नांगरट करायला गेलेल्या औतकऱ्यांच्या भाकरी पोहोचवूणं, पाण्याचा सांगळा काढणं किंवा अशीच काहीतरी हाताजोगती कामं करुन लांबवरुन तंगडतोड करत शाळेत येताना, काही मुलांना हमखास उशीर व्हायचाच व्हायचा.

मग उशीर झाला की दुसरा पर्याय असायचा. तो म्हणजे टाचाटिभा घातलेली ठिगळाची, ढगळी हाफ चड्डी वर खोचायची. दप्तराची तंगाची पिशवी बगलेत पकडायची. नदीत उतरायचं. मोठमोठे दगड मांडलेल्या उताऱ्यावरुन, एकमेकांचे हात पकडून, स्फटिकासारख्या नितळ पाण्यात बघत, सावध पावलं टाकत पैलतीर गाठायचा. तीन-चारशे फुटांचं नदीचं पात्र दोस्तांच्या मदतीनं पार करायचं. कधी शेवाळलेल्या दगडावरुन पाय सरकून पाण्यात पडायचो, कपडे भिजायचे. प्लास्टिक पिशवीत गुंडाळलेल्या वह्या-पुस्तकांना जीवापाड जपायचो. काहीही झाले तरीही त्यांना पाणी लागू द्यायचं नाही!

शिक्षकांच्या माराच्या भीतीभेनं ही 'लेटकमर्स' मुलं होडीची वाट बघत बसायची नाहीत. सरळ नदीत उतरायची. होडीची वाट बघत काठावर बसलेल्या मुलींच्या जीवाची उलघाल दिसायची. मात्र त्या पाण्यात उतरत नसत. खेरीज आजच्या सारख्या तेव्हा नदीवर मोटारी बसवलेल्या नव्हत्या. पाण्याचा उपसा व्हायचा नाही. बाराही महिने नदी वहायची. मोठ्या पुरातदेखील आम्ही होडीनं ये-जा करत असू. होडी हलली तसा एकदा नववीतला सुरेश नावाचा मुलगा पाण्यात पडला. नशीब कोणीतरी बघितलं. होडीवाल्यानं उडी मारली, मोठ्या शिताफीनं त्याला वाचवलं. आम्ही दहावी पास झाल्यानंतर पूल झाला. मग होडी बंद झाली. पाच वर्षे होडीतून केलेली ये-जा मात्र कधी विसरू शकणार नाहीत मुलं...

नदीत उतरायला लागायचं म्हणून पोहायला शिकलो. मुख्य म्हणजे एकमेकांची मदत घेऊन, हातात हात पकडून नदीतून पैलतिरी जायला लागायचं. याची जाणीव पोरांना होती. रस्त्यानं येता-जाता भांडणं, मारामाऱ्या, कंडी करणारी पोरं हे लगेच विसरुनही जायची. ताणाताणी करायची नाहीत. कारण आयुष्यात पदोपदी एकमेकांची मदत लागणार आहे, याचं भान ठेवायला लागायचं!

परस्पर सहकार्य करणं आयुष्यात कसं महत्त्वाचं असतं हे सहज शिकलो. परिस्थितीच्या रेटयानं सामाजिकीकरणाचे हेच धडे आम्हाला बिनभिंतीच्या शाळेत गिरवता आले. हे खरेच आहे, की औपचारिक शिक्षणानं साक्षरता दिली, मात्र समाज नावाच्या शाळेनं जगायला उपयोगी पडणारी समज, जीवन कौशल्ये दिली!

आजच्या ग्याझेट्सच्या जमान्यात फेसबुक, व्हॉट्सऍपनं दोस्तीचे सारेच संदर्भ बदलवलेत. पूर्वीसारखी स्थिती नाही. परिस्थितीशी संघर्ष करणं नाही, झुंजणं, झगडणं, सहजी यशापयश पचवणं नाही. आयुष्यात अकाली आलेल्या स्क्रीनमुळे मुलं एकमेकांना प्रत्यक्ष भेटायचे, बोलायचे महत्त्व मुलं आता हळूहळू विसरत चाललेत. खेळ वजा झालेत. एकलकोंडया मुलांच्या सामाजिकीकरणाचे प्रश्न नव्यानं आ वासून उभे राहिले आहेत. साहजिकच मला आम्ही जगलेलो समृद्ध बालपण आठवत रहाते, हटकून! आजच्या मुलांच्या वाटयाला हे सगळं नाही, याचं फार वाईट वाटतं.

Updated : 2 Jan 2019 8:46 AM GMT
Next Story
Share it
Top