Home > Election 2020 > तुमचं मत दुसऱ्या उमेदवाराला जातंय का?

तुमचं मत दुसऱ्या उमेदवाराला जातंय का?

तुमचं मत दुसऱ्या उमेदवाराला जातंय का?
X

ईव्हीएमच्या बॅलेट युनिटवर दिलेले मत व्हीव्हीपॅट भलत्याच उमेदवाराला दाखवत होतं. या मत विसंगतीबद्दल हजारो तक्रारी देशभरातील मतदान केंद्राबाहेर केल्या गेल्या. अशा प्रकरणात तक्रार करण्याची अधिकृत सोय आहे. त्यानुसार मतदारास शंका आल्यास तो चाचणी मताची मागणी करू शकतो. परंतू चाचणी मतदानादरम्यान मशीनची वर्तणूक प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेसारखीच असेल याची खात्री नसल्याने आणि तक्रार चुकीची आढळल्यास एफआयआरचा सामना करावयास लागण्याची भिती असल्याने महाराष्ट्राच्या सांगलीतील एक वगळता देशात कुणीही निवडणुक नियमाच्या कलम ४९ (एमए) अंतर्गत अशा मताला आव्हान देऊन मत चाचणीची मागणी केलेली नाही.. आसामच्या माजी डीजीपीनीही मतदान केल्यानंतर ईव्हीएममध्ये छेडछाड केली गेली असल्याचा आरोप केला परंतु तक्रार करण्याचे धाडस केले नाही.हे बदलण्याची गरज आहे.

मतदान करणा-या व्यक्तीला त्यांचे मत केवळ त्याला अभिप्रेत उमेदवारालाच गेले असल्याचे निश्चित कळले पाहिजे तशी त्याची खात्री झाली पाहिजे. जर त्याच्या मनात त्याबाबतीत शंका असेल तर ती ताबडतोब काढून टाकली गेली पाहिजे. आपण दिलेले मत कुणाला गेले याबाबत त्याला खात्री नसेल आणि केवळ शिक्षेच्या भितीने तो गप्प बसत असेल तर ते निकोप लोकशाहीसाठी घातक आहे.

सध्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदाराने मत दिल्यानंतर त्याला व्हीव्हीपॅटच्या प्रिंटरवर एक चिट्ठी दिसते. आणि लगेचच ७ सेंकदात ती चिट्ठी खालील पेटीत जाउन पडते. त्यानंतर मतदाराला त्याने दिलेले मत आणि व्हीव्हीपॅटने दाखवलेले मत यात काही शंका वाटल्यास तो मतदार केंद्राध्यक्षाकडे तक्रार करू शकतो त्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाने त्याला खोटे प्रतिज्ञापत्र / शपथपत्र केल्याच्या परिणांमाविषयी चेतावणी देउन अशा मतदाराकडून शपथपत्र घ्यावयाचे असते.

शपथपत्र दिल्यानंतर म्हणजे अशा प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा फॉर्म १७ सी भरून घेतल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाने संबधित मतदाराच्या मताची दुस-यांदा परंतु मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या उपस्थितीत म्हणजेच त्यांच्या समक्ष मतदार यंत्रात मतदान घेउन चाचणी घ्यायची असते आणि प्रिंटरवर आलेल्या कागदाची चिट्ठी पहावयाची असते.

आरोप खरा असल्यास मतदान केंद्राध्यक्षाने सदर वस्तुस्थिती निवडणूक निर्णय अधिका-याला कळवायची असते आणि पुढील मत नोंदणी थांबवायची असते. परंतु बरेच मतदार अशी तक्रार करायला घाबरतात याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे ज्या यंत्राने एकदा चुकीची चिट्ठी दाखवली आहे. तेच यंत्र पुन्हा तशाच पद्धतीने वागेल याची खात्री नसते आणि दुसरे म्हणजे जर त्या यंत्राने चाचणी मताच्या वेळी योग्य चिट्ठी दाखवली तर कारवाईची भिती!. आपण दिलेले मत कुणाला गेले याबाबत त्याला खात्री नसेल आणि केवळ शिक्षेच्या भितीने तो गप्प बसत असेल तर ते निकोप लोकशाहीसाठी घातक आहे.

त्यामुळे या प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज आहे. मतदाराला मतामध्ये विसंगती दिसली तर त्याने बटणावर बोट ठेउन मतदान केंद्राध्यक्षाला आणि उमेदवार किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला बोलावून घ्यावयाचे आणि त्याने बॅलेट युनिटवरील मतदान आणि व्हीव्हीपॅट प्रिंटरवरील चिट्ठी यातील विसंगती दाखवून द्यायची. तोपर्यंत बॅलेट युनिटवरील लाईट सुरू राहिली पाहिजे आणि व्हीव्हीपॅट प्रिंटरवरील चिट्ठीही पेटीत जाता कामा नये. अशा प्रकारची विसंगती आढळल्यास मतदान केंद्राध्यक्षाने मतदान थांबवून नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही करावी. या प्रक्रियेचा दुरूपयोग केल्यास मात्र जबर शिक्षेची तरतुद असावी.

राज्यात आतापर्यंत झालेल्या लोक्सभेच्या मतदानाच्या टप्यात एकूण ७६३ बॅलेट युनिटस ५०० कंट्रोल युनिट्स आणि १७५७ व्हीव्हीपॅट युनिट्स तांत्रिक बिघाडाच्या कारणास्तव बदलण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पहिल्या टप्प्यात, ११५ बॅलट युनिट्स (बीयू), ८४ कंट्रोल युनिट्स (सीयूएस) आणि २३५ व्हीव्हीपीएटी मशीन्सची जागा राज्यात बदली करण्यात आली. राज्यात दुसऱ्या टप्प्यात १८५ बीयू, १२१ सीयू आणि ३०४ व्हीव्हीपॅट बदलण्यात आल्या आणि तिस-या टप्प्यात ४६३ बीयू, २९५ सीयू आणि १२१८ व्हीव्हीपीएटी तांत्रिक कारणांसाठी बदलण्यात आल्या. राज्यात सुमारे १ लाख इव्हीएमचा वापर केला जात आहे. बॅलट युनिट्सच्या बाबतीत सुमारे २% तर व्हीव्हीपॅटच्या बाबतीत सुमारे ५% यंत्रे तांत्रिक कारणास्तव बदलण्यात आली आहेत.

एकूण इव्हीएमच्या संख्येच्या तुलनेत बिघाड झालेल्या यंत्रांची संख्या नगण्य वाटत असली ज्या पद्धतीने एव्हीएम मशिन्सची चाचणी होते ते लक्षात हा आकडा मोठा म्हणावा लागेल.

Updated : 26 April 2019 5:54 AM GMT
Next Story
Share it
Top