Home > मॅक्स ब्लॉग्ज > खेड्यांनो, वर्षानुवर्षे वाढवलेली जातीयवादाची कमान केंव्हा उद्ध्वस्थ करणार ?

खेड्यांनो, वर्षानुवर्षे वाढवलेली जातीयवादाची कमान केंव्हा उद्ध्वस्थ करणार ?

कमान हे खेड्यातील अस्मितेचे केंद्र झाले आहे. गावातील कमानीवर गावपुढाऱ्यांच्या आज्ज्या पंजाची नावे कोरलेली असतात. दलित समूहांना देखील आपल्या अस्मिता या स्वरूपात जतन करावे वाटणे स्वाभाविक आहे. पण बाबासाहेबांच्या नावाच्या कमानी खालून आम्ही जाणार नाही अशी जातीयवादी भूमिका घेत दलितांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवणाऱ्या खेड्यातील जातीयवादाच्या कमानी उद्ध्वस्थ केंव्हा होणार वाचा सागर गोतपागर यांचा लेख…

खेड्यांनो, वर्षानुवर्षे वाढवलेली  जातीयवादाची कमान केंव्हा उद्ध्वस्थ करणार ?
X

सांगली जिल्ह्यातील बेडग या गावातील घटनेने महाराष्ट्र ढवळून निघाला. ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पाडल्याच्या निषेधार्थ या गावातील दीडशे कुटुंब गाव सोडून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. यामध्ये वृद्ध, लहान मुलांचा देखील समावेश आहे. बाबासाहेबांच्या नावाची कमान पाडणाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्या जागेवर नवी कमान उभा करण्याची त्यांची मागणी आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारवर राज्यभरातून टिका होऊ लागली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलकांना आरोपींवर गुन्हे दाखल करून सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. हे घडेपर्यंत या आंदोलकांनी झपाट्याने बेडग ते इस्लामपूर असे सुमारे साठ किलोमीटरचे अंतर पार केले होते. पावसात भिजल्याने अनेक वृद्ध आजारी पडले आहेत अनेकांच्या पायाला फोड येऊन फुटलेले आहेत. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तात्पुरत्या बाजूला ठेऊन हे नागरीक पूर्ण वेळ या लढ्यात सहभागी झाले होते.

बेडग या गावात घडलेली ही घटना म्हणजे हिमनगाचे एक टोक आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. कमान हे ग्रामीण भागातील अस्मितेचे केंद्र आहे. गावागावात अनेक ठिकाणी आपल्या बापाच्या आज्ज्या पंजाच्या नावाच्या कमानी उभा केल्या जातात. बहुतांशवेळा त्यांच्या परवानगीची रीतसर यंत्रणाच अस्तित्वात नसते. किंवा कुणी अशा कमानींना विरोध देखील करत नाही. अशा कमानी बहुतेक वेळा गावातील श्रीमंत कुटुंबाद्वारे उभारल्या जातात. गावातील कमानीवरील नाव हे प्रतिष्ठेचे प्रतिक मानले जाते. प्रतिष्ठेच्या या स्पर्धेतून गावात दोन-दोन, तीन-तीन कमानी देखील उभ्या केल्या जातात. या ग्रामीण वातावरणात दलितांना आपली प्रतीके सार्वजनिक ठिकाणी उभी करावी वाटणे स्वाभाविक आहे. अशा वेळी जर यासंदर्भात त्यांनी प्रयत्न केले तर त्याला गावातून सार्वजनिक विरोध केला जातो(अपवाद). गावाच्या कमानीला इतर कुणाचेही नाव चालेल पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखालुन आम्ही जाणार नाही अशी जातीयवादी भूमिका घेतली जाते. हे मुख्य कारण लपउन ठेऊन इतर अनेक कारणे पुढे करत कमानीला विरोध केला जातो.
अशाच प्रकारचे एक उदाहरण सांगली जिल्ह्यात घडले आहे. कडेगाव तालुक्यातील हणमंत वडीये या गावातील बौद्ध समाजातील नागरीक तब्बल दोन दशकांपासून अशाच प्रकारचा संघर्ष करत आहेत. भौगोलिक रचनेनुसार या गावातील मुख्य प्रवेशद्वार बौद्ध वाड्यात आहे. या मुख्य प्रवेशद्वाराला डॉ बाबासाहेबांच्या नावाची कमान आहे. याच कारणाने या गावात १९९५ या वर्षी जातीय दंगल घडलेली होती. या घटनेबाबत येथील नागरिक सर्जेराव जाधव सांगतात “बाबासाहेबांच्या कमानीखालून जावे लागत असल्याचा राग येथील लोकांना होता. याच दरम्यान एका व्यक्तीच्या लग्नाचे वराड या कमानितून आत आले. कमानीवरील नाव वाचून मुलाच्या बापाला काही लोकांनी प्रश्न केला की तुझी पोरगी महार वाड्यात दिलीस की काय” ? या घटनेनंतर त्यांच्यात मोठा वाद झाला. यानंतर काही काळात अज्ञात व्यक्तींनी बाबासाहेबांची कमान वाकवली. सदर बाब समजताच समाजातील लोक खवळले. त्यावेळी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. प्रशासनाने आरोपींवर गुन्हे दाखल केले. घटनेचे तथ्य तपासले आणि बौद्ध समाजाच्या बाजूने निर्णय दिला. हा निर्णय देताना मुख्य कमानीवरील बाबासाहेबांचे नाव तसेच ठेवावे व त्यावर ग्रामपंचायत हणमंत वडिये असे नाव टाकण्याचा आदेश दिला गेला”. त्यानुसार या कमानीवर बाबासाहेबांचे नाव पुन्हा दिमाखात उभे राहिले. पण यासाठी या समाजाला मोठा संघर्ष करावा लागला. जीवाचा धोका पत्करावा लागला. काही दिवस वाळीत राहावे लागले. प्रशासनाने १९९५ साली काढलेल्या या तोडग्यानंतर येथील काही नागरिकांच्या मनातील हा द्वेष संपला असे आपल्याला वाटेल. परंतु तो संपलेला नव्हता. ते फक्त योग्य संधीची वाट पाहत होते. जातीय द्वेष असा दिवाळीतील नागगोळी सारखा त्यांनी हृदयात जतन करून ठेवलेला होता. २०२३ या वर्षी संधी मिळताच या छोट्याशा गोळीतून जातीयवादाचा विषारी आक्राळ विक्राळ साप बाहेर आला. या गावात २०२३ ला काय घडलं याची माहिती प्रत्यक्ष येथील रहिवासी स्वप्नील जाधव यांनी दिली “ गावातील या कमानी लगतच बस थांबा होता. नव्या रस्त्याचे काम सुरु झाले आणि जुना थांबा पाडण्यात आला. बस मधून उतरल्यावर बाबासाहेबांचे नाव असलेल्या कमानीतून आत जावे लागते. त्यापेक्षा हा बस थांबाच हलवण्याचा निर्णय काही लोकांनी घेतला. यानुसार रातोरात बस थांब्याची जागा बदलण्यात आली. नव्या ठिकाणी बस थांबा उभा करण्यात आला”.

येथील बौद्धांना १९९५ ला त्यांनी केलेला संघर्ष पुन्हा त्यांच्या पुढच्या पिढीला करावा लागेल याची कल्पना देखील नव्हती. तातडीने या नागरिकांनी सदर बाब परिवहन अधिकाऱ्यांना कळवली. विरोधातील नागरिकांनी नव्या थांब्याबाबत पत्राद्वारे मागणी केली. परिवहन अधिकाऱ्यांनी दोन वेळा ही मागणी अवैध असल्याचा निर्णय दिला. यानुसार बस जुन्याच थांब्यावर थांबत होती. अचानक परिवहन अधिकारी सांगली यांनी आपल्या दोन पत्रांमध्ये दिलेला निर्णय बदलत नव्या ठिकाणी बस थांब्याचे स्थलांतर केले.

जुना थांबा पूर्ववत व्हावा यासाठी येथील बौद्ध समाज आजही संघर्ष करत आहे. परंतु राजकीय वजन वापरून त्यांचे विरोधक प्रशासनावर दबाव टाकत आहेत. यामुळे केलेली मागणी न्याय असूनही न्याय मिळत नाही. अशा प्रकारे दलितांना त्यांच्या अस्मिता जतन करण्यापासून रोखले जात आहे.

बेडग येथील एक घटना समोर आली. परंतु अशा अनेक घटना ग्रामीण भागात घडत आहेत. राजकीय दबावातून प्रशासन अल्पसंख्य असलेल्या समुहावरील अशा अन्यायाकडे दुर्लक्ष करत असतो. ज्या गोष्टीसाठी पूर्वजांना लढावे लागले त्याच गोष्टींसाठी या समूहाच्या आणखी किती पिढ्यांना लढावे लागणार ? गावातील बहुसंख्य समुदायाच्या डोक्यातील जातीयवाद संपणार तर कधी ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे...

Updated : 22 July 2023 9:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top