Home > मॅक्स ब्लॉग्ज > मावा नाटेते विकास बस्के आयार ?

मावा नाटेते विकास बस्के आयार ?

एकविसाव्या शतकात प्रगती आणि विकासाचा बाता होत असताना दुर्गम आदिवासी भागात शिक्षण, आरोग्य आणि मुलभुत सुविधांसाठी लोकांना झगडावं लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बेसेगावचा आंखो देखा हाल मांडलाय मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी.....

मावा नाटेते विकास बस्के आयार ?
X

बेसेवाडा एटापल्ली तालुक्यातील एक गाव. सुरजागडच्या दिशेने समोर गेल्यावर एक डांबरी रस्ता सुरजागड पहाडीकडे जातो दुसरा सरळ पुढे. रस्त्यावर येताना समोर तुटलेला पुल दिसला. आणि बाजुला रपट्यावरुन पाणी वाहत होतं. अलिकडच्या कडेला गुडघ्यात मान घालुन एक माणुस बसुन होता. त्याने पाण्याच्या काटावर एक छोटी काटी ठेवली होती. पाहता क्षणी वाटलं की हा मासे पकडतोय. पण नंतर समजल की टु व्हीलर बाजुला लावुन छोट्या काटीच्या खुनेने तो पाणि कमी होण्याची वाट पाहतोय. आम्ही तिघांनी मिळुन त्याची व आमची गाडी बाहेर काढली. सुरजागड पहाड विपुल लोखंडाच्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे.

मात्र सुरजागड गावातल्या तुटलेल्या पुलात क्वचितच लोखंडाच्या सळ्या दिसत होत्या. व्यवस्थेचा हा विरोधाभास लोकांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या असंतोषाचे कारण आहे.पुढे जाता जाता सुरजागडच्या सरपंच बाईंचे घर रस्त्याकडेला लागते. त्यांची विचारपुस केली . समजलं की त्या तुटक्या पुलावरुन कूणीतरी रात्रीची सरळ गाडी घातली. नदीत पडुन जाग्यावर मरण पावला . दवाखान्यात पोहचवुन उपचार मिळाला नाही. आम्ही सुरजागड गावच्या वाकलेल्या पत्र्याच्या बोर्डकडे बघत बघत गट्टा बेसेवाडा च्या दिशेनं गाडी वळवली. रस्त्यात विविध प्रश्न मनात येत होते. या भागात समस्या आहेत म्हणुन नक्षलवाद निर्माण झाला. आणि आज नक्षलवाद आहे म्हणुन काही समस्या सुटू शकत नाहीत हा विरोधाभास आहे. पण पुलाला नक्षल्यांचा विरोध आहे असे मानले तर याच रस्त्यावर इतर पुल कसे काय ? विरोध जर असेल तर जनतेच्या हक्काच काय ? रस्त्यामूळे एखाद्याला उपचार मिळु शकत नसेल तर सरळ सरळ जगण्याचा हक्क नाकारणे नाही का ? रस्त्यांना पुलांना नक्षल्यांचा विरोध असेल कंत्राटदार काम घेत नसेल तर एवढ्या फोर्सेस चा लोकांना उपयोग काय ? कि या फोर्सेस फक्त सुरजागडचा खनिजाचे ट्रक पार करुन देण्यासाठीच आहेत. विचार करता करता आम्ही ग़ट्ट्याला पोहचलो.

गट्ट्यात जिल्हा परीषद सदस्य सैनु गोटा यांची भेट घेतली. त्यांच्याकडुन त्या भागाच्या विविध समस्या समजत होत्या. त्यांच्याकडुन समजल की या भागातील बहुतांशी जिल्हा परीषद शाळा पावसाळ्यात बंद असतात. विशेष म्हणजे काही शाळा इतर वेळी देखील बंद असतात. पंधरा ऑगष्टला झेंडा फडकावायला फक्त शिक्षक येतो. याबाबत त्यांनी प्रत्यक्ष फीरलेल्या 21 शाळांची माहीती आम्हास दीली. त्याबाबतीत त्यांनी तस निवेदन देखील तालुका शिक्षण अधिकाय्रा मार्फत जिल्हा शिक्षण अधिकाय्रांना दिलय. मात्र तपासणी साठी पाऊस कमी होउ द्या असे आश्वासन त्यांना मिळालेले आहे.

आंम्ही त्या एकवीस शाळेतील एका गावात जायचे ठरवले. जंगलातल्या रस्त्याने आंम्ही बेसेवाड्याच्या दिशेने नीघालो. रस्त्यातील चिखलातुन वाट काढत आम्ही जात होतो. माझ्यासोबत त्या भागाची माहीती असणारा हरीदास पदा होता. वाटेत नदी लागली. गाडीवरुन उतरुन आंम्ही पाण्याचा अंदाज घेतला. हरीदास ने झाडाची पाने गोळा केली एक काटकी घेऊन ती पाने गाडीच्या सायलेंसर मध्ये फीट्ट बसवली. आंम्ही गाडी ढकलत त्या वाहत्या प्रवाहातुन बाहेर काढली. पोहचण्याआधीच प्रश्न पडला. आपल्याला इतक्या अडचणी आल्या शिक्षकाने दररोज यातुन कशी वाट काढायची. पोहचल्यावर गावात लोक जमा झाले.

शाळेबाबत विचारले असता मंगेश नरोटे सांगतात " पंधरा ऑगष्टला झेंडा फडकवायला फक्त शिक्षक शाळेत आला होता. पावसाळ्यात येणं जाणं जमत नसेल ना तर आंम्ही त्यायला गावात घर म्हणाल घर तांदुळ म्हणाल तांदुळ देवाले तयार आहो. पण गावात येऊन मास्तरने आमच्या पोरानले शिकवायला हवं". मुरा नरोटे सांगतात "दोन वर्षापुर्वी गावात 12 मुले होती मास्तर येत नाही म्हणुन मुलांना आश्रमशाळेत घातले. गेल्या वर्षी सहा आणि यावर्षी केवळ दोन मुले राहीली आहेत. शिकवायच जमत नसेल तर आमच्या मुलाच्या नावाने त्याने पगार घेऊ नये आम्ही आमच्या ग्रामसभेच्या मार्फत शिक्षक नेमतो". पाहता पाहता गावात लोकं जमा झाली होती. ते त्यांचे प्रश्न आंम्हाला सांगत होती.

सैनु मट्टामी सांगत होते तीन महीन्यापासुन गाव अंधारात आहे. कोणी लक्ष देत नाही. लाईट नाही मात्र बिल नियमित येत आहे. पुन्हा मीटर मिळणार नाही म्हणुन लोक आलेले बिल देखील भरत आहे. गावातल्या एक एक गोष्टी समजत होत्या. आरोग्याच्या सोयी नाहीत. कुणी आजारी पडले तर खाटेला बांबु बांधुन खांद्यावरुन दवाखान्यात न्यावे लागते. तर तेथे कर्मचारी नसतात.तेथुन एटापल्ली आणि तेथुन जिल्ह्याला रुग्नाला रेफर केलं जातं. सैनु मट्टामी यांनी परीश्रमाने आजारी मुलीला सायकलवरुन उपकेंद्र गट्टा येथे पोहचवले.तर तेथुन एटपल्ली ला डॉक्टरने रेफर केले. ते म्हणाले डॉक्टर साहेब माझ्या पोरीला हात तरी लावुन बघा रस्त्यात मेली तर जबाबदार कोण ? हे ऐकुन डॉक्टरने उपचार सुरु केले आणि पोरगी तिथेच बरी झाली.

या भागात नुकतेच शिक्षण पुर्ण केलेले डॉक्टर कंत्राट बेसीस वर एक दोन वर्षाकरीता येतात. ते रीस्क घेत नाहीत. दवाखाण्यात साधने नसतात. मात्र लोकांची माणसिकता रुग्नाला दवाखान्यात न्यायची नसते. ते सांगतात सायब काय व्हायच ते होउद्या इथेच उपचार करा. या आरोग्य केंद्रामध्ये मलेरीया वर्कर तसेच इतर अनेक कर्मचाय्रांची पदे रिक्त आहेत. गट्टा आरोग्य केंद्र गळत आहेत. याच आरोग्य केंद्रामध्ये काही दिवसापुर्वी छत्री धरुन बाळंतपण करायची वेळ डॉक्टर वर आली होती. 48 घरच्या बेसेवाडा गावात एकही स्लॅबचे पक्के घर नाही. गावात एकही टीवी नाही मोबाइलला नेटवर्क नाही. उज्वला योजनेचे एकदा घेतलेले गॅस सिलेंडर संपल्यानंतर एकदाही कुणी नवीन सिलेंडर घेतलेला नाही.

लोक समस्या मांडत होते. मात्र लोकांनी आपापल्या स्तरावर या प्रश्नांची उत्तरे शोधुन आपले जगणे सुरु ठेवले होते. निरोपाच्या वेळी मुरा नरोटे जवळच्या मोठ्या डोंगराकडे हात दाखवत बोलले "सायेब सरकार आमच्यासाठी पुल बनवत नाही आरोग्याच्या योग्य सुविधा पोहचवत नाही. गावात शिक्षणाची हि अवस्था आहे. आणि सरकारला त्या डोंगरातील आंम्ही वर्षानुवर्षे जतन केलेली खनिजे हवी आहेत. आम्ही वर्षानुवर्षे या भागातील ही जल जंगल जमीन जतन केली आहेत. दुष्काळ असताना मोहाची फुले पाने खाऊन आमच्या पूर्वजांनी आयुष्य काढलं पण हा परीसर सोडला नाही. त्यामुळे आज हे जंगल शाबूत आहे. या डोंगराला आम्ही कोणाला नख लावू नाय देवू"

त्यांचे बोलणे ऐकुन डोकं सुन्न झाले होते. आंम्ही त्यांना जोहार घातला बेसेवाड्यातील ग्रामस्थांचा निरोप घेतला. पुढच्या प्रवासाला निघालो. रस्त्याकडे सागाची ऐनाची मोठमोठी झाडे आभाळाकडे झेपावत होती. उंचीच्या स्पर्धेत या झाडांनी टॉवर ला देखील हरवले होते.

Updated : 3 Dec 2020 8:19 AM GMT
Next Story
Share it
Top