Home > मॅक्स ब्लॉग्ज > सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष छत्रपती लोकराजा

सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष छत्रपती लोकराजा

वेदोक्त प्रकरण काय होते? शाहू महाराजांचे क्षत्रियत्व कोणी नाकारले होते? शाहू महाराजांना कोणी शूद्र ठरवले होते? वेदोक्त प्रकरणाचा शेवट कसा झाला याविषयी छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दीनिमीत्त तुषार गायकवाड यांनी लिहीलेला लेख जयंतीनिमीत्त पुनः प्रकाशित करीत आहोत.

सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष छत्रपती लोकराजा
X

सन १८९९ च्या सुमारास कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने छत्रपती शाहूंचे क्षत्रियत्व नाकारुन त्यांना शूद्र म्हटले. शाहूंना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले.

बाळ गंगाधर टिळकांनी वेदोक्ताची बाजू घेतल्याने प्रकरण अजून चिघळले. शाहू महाराजांनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. भिक्षुकशहांनी हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले. पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली.

कोल्हापुरातील ब्राह्मण वर्गास अखेर गुडघे टेकून समेट करावा लागला. तरीही महाराष्ट्रातील इतर वेदोक्त वाला ब्राह्मण वर्ग शेवटपर्यंत शाहू महाराजांच्या विरोधातच राहिला. यात भर पडली ती, कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना पाठिंबा यामुळे वेदोक्तवाल्यांचा विरोध वाढतच गेला.

या वेदोक्त वाल्या सनातन्यांची विरोधाची सर्व अस्त्रे क्षीण झाली की, मग चारित्र्यहनन सुरु होते. त्यानुसारच या भिक्षुकशहांनी शाहू महाराजांची घसरगुंडी सारखी अत्यंत निर्लज्ज व धादांत खोटारडी टूम काढली. भटाळलेला बहुजनवर्ग आजही हा विषय आवडीने चघळतो.

वेदोक्त प्रकरणातील अनुभवांमुळे भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्तता झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही. हे शाहू महाराजांनी जाणले होते. त्यामुळे शाहू महाराज महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. महाराजांनी कधीही महात्मा फुलेंचे अनुयायीत्व स्वीकारले नव्हते. पण सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा संपूर्ण पाठिंबा होता.

शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी महाराजांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी 'श्री शिवाजी वैदिक स्कूल'ची स्थापना केली. मराठ्यांसाठी स्वतंत्र 'क्षात्रजगद्‌गुरु' पद निर्माण करुन त्यावर सन १९२० च्या दरम्यान सदाशिवराव पाटील यांना नेमले.

बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत. यास्तव महाराजांनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. यासाठी सन १९१७ मध्ये करवीर संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा करुन तो अंमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरु केली.

खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी. यासाठी शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. अठरा-पगड जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. महाराजांच्या याच प्रेरणेतून व सहाय्याने नाशिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी अशीच अनेक वसतिगृहे सुरु झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.

आज त्याच पिढ्यांना आपल्या छत्रपतींच्या बद्दलचा इतिहास शिकवण्याची व सूपूर्द करण्याची गरज आहे. सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष छत्रपती लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त १०० वेळा मुजरा. विनम्र अभिवादन!!

- तुषार गायकवाड

Updated : 26 Jun 2022 4:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top