Home > मॅक्स ब्लॉग्ज > अस्पृश्य बाराखडीचं हस्ताक्षर..

अस्पृश्य बाराखडीचं हस्ताक्षर..

जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्तानं निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या सत्यभामा सौंदरमल यांचा एक अनुभव..

अस्पृश्य बाराखडीचं हस्ताक्षर..
X

माझी आई माझ्या बापाकडं मुंबईत होती तेव्हा म्हणजे 1989 च्या वेळेस त्यावेळेस मला पहिलीला माझ्या मायनं (माय आज्जी) शाळेत घातलं होतं पण शाळेत घालण्या अगोदर मला शिकवणीला घातलं होतं. यात पहिली शिकवणी ही लक्ष्मण काका एरंडे आजोबाच्या इथं असायची.लक्ष्मण आजोबा फी जास्त घेत नसत मग माझी माय त्यावेळी त्यांना रोज एक छटाक साखर अन एक पत्तीची पुडी(आठाणे छटाक साखर अन चाराण्याची चहापत्ती पुडी)असं रोज द्यायची तसेच आठवड्यातुन एक गवताचा भारा द्यायची.

त्यावेळेस त्यांच्या बैठकीत सकाळी सकाळी 7 वाजता शिकवणी भरवली जायची. ही बैठक सकाळीच त्यांची बायको भोयशिर्या सारवण करून ठेवायच्या यामुळे ते गार लागायचं.यामुळे एका बोंदरीच्या पोत्यावर मी कोपर्यात बसत असे. तेथील इतर वस्तुंना किंवा मुलांना खेटुन बसायचा किंवा त्या आजोबांना ही हात लावायचा नाही असं ठरलेलं होतं कारण ईतर वस्तुना हात लागला की, बाट (इटाळ )होयचा. पण तरीही मला ते आजोबा चांगलं शिकवायचे.

मी जेव्हा शिकवणीला जायची तेव्हा माझ्यासोबत एक पाटी लेखण अन एक मायच्या जुन्या लुगड्याच्या कापडाचा पाण्यानं भिजवलेला बोळा असायचा. पिपळाच्या पानाला काटे लाऊन दुरण करून त्यात तो बोळा मी ठिवत असं (पाटी पुसण्यासाठी)कारण थुका लाऊन मी पाटी पुसत नसं तर ते आजोबा मला पाढे शिकवताना म्हणजे (एक ते दहा )शिकवताना म्हतार्याची काठी एकाचा, उभे माणुस पाचाचा,खोबर्याची वाटी साताचा(एवढच आठवतय)एवढं मजेशीर आवाजात शिकवायचे की ते चटकन लक्षात रहायचे. आणि पाटीवर ते अक्षरं काढुन देताना त्यांचं बोट अगोदर पाण्यात बुडवायचे अन नंतर माझ्या पाटीवर पाण्याच्या थेंबांन ते अक्षरं काढायचे अन त्यावर मला गिरवायला लावायचे.(कदाचित बाट होऊ नये म्हणुन ते पाण्यात बोट बुडवायचे) त्यांनी पाटीवर पाण्याच्या थेंबाने काढलेल्या अक्षरावर मला गिरवायला लावायचे त्या काढलेल्या वळणदार अक्षरावरुन मला गिरवायची सवय लागली अन मग माझं अक्षर वळण घ्यायला लागलं

एकदा असच शिकवणीत असताना माझा पाटी पुसायचा बोळा घरी विसरून राहिला अन पाटीवर लिहिलेलं पुसणं गरजेचं होतं म्हणुन मी बैठकीच्या बाहेर एका कोपर्यात जुनं काठं फुटलेलं गाडगं जे पाणी भरून ठेवलेलं असायच(बाहेरून आल्यास त्यातुन पायावर पाणी घेतलं जात असं)त्यात हात घालून मी त्या पाण्याचा शिपका पाटीवर मारला अन माझ्या झग्याने ती पाटी पुसली.

हे त्यांच्या मुलाने अमोल एरंडे(फारू दारूडे होते आणि खुप लोक त्यांना भ्यायची) यांनी बघीतले आणि हे बघितल्या बरोबर अमोल एरंडे यांना कोपर्यात उभी ठेवलेली वल्या फोकाची छडी टाईप जाड काठी घेतली.अन सपसप माझ्या अंगावर मारत सुटले माझ्या अंगात गुडघ्यापर्यंतचा पाँलिस्टर झगा असल्याने आणि त्यात हिवाळ्याचे दिवस होते अशा स्थितीत ते काठीचा मार एवढा मारत होते की,मी चड्डीत लघवी केली तरी ते मला मारतच होते😭माझा झगा अन लघवीचे वघळं बघुन मग त्यांनी मारणं बंद केलं त्यात माझ्या चिरकण्याने आवाजाने आजुबाजुच्या माड्यावर माळवदार लोक जमा झाले होते यामुळेही कदाचित त्यांनी मारतं बंद केलं होतं

नंतर तशीच मी भिझलेल्या अवस्थेत अंगावरचे वळं पोत्याची बोंदरी पाटी अन लेखण घेऊन घरी आले.आजीनं अंगावरचे वळं बघुन मला तसच गावात सरंपचाकडं घेऊन गेली (तवा पोलीस स्टेशन ला जात नसत लोकं अन कायदा ही नव्हता) सरपंच तात्या की कोण आठवत नाही पण ते

येशीत त्यांच्यापुढे माझा झगा काढून दाखवत एवढं लेकराला मारतेत काय?असं विचारत अंगावरचे वळं दाखवले अन सरपंचाला बोलली की ,मह्या नातीचा त्याच्या गाडग्याला इटाळ झाला होता तर म्या कुंभाराकुन नवं गाडगं देलं असतं ना!!

पण सरपचं पण त्यांचेच असल्याने गार्हाणं मांडुन झाल्यावर माय मला पून्हा तिथं वढीत दारात घेऊन गेली.मी थरथर कापत असताना मायच्या नाटीला धरून उभी रहायले अन मग माझ्या अंगावरचे वळं दाखवित मायनं काय शिव्याचा सपाटा सुरू केला की, त्यात भाड्यापसुन पिदाडगांड्या,पसुन "तोहं नाक तोंड मह्या रक्तानी मरदी अन तुला आली बारा महिन्याची सर्दी"असं काय काय बोलत होती 😀

मला मुतुतस्तर मारल्याच्या दुःखापेक्षा त्याला मायने दिलेल्या शिव्या याचा जास्त आनंद झाला होता. (माझी माय पक्की फेमिनिस्ट आहे यामुळं तिला आजही अगुचर बोलण्याचा सुंबार नाही असं म्हणतात) नंतर मी कधीच एरंडे आजोबच्या शिकवणीला गेले नाही.पण त्यांनी शिकवलेली #तिसदाहीतिनशेचीउजळणी अन पाण्याच्या थेंबातील #अस्पृश्यबाराखडी आजही वळणदार अक्षरात लिहिते. पुढे काँलेज जिवनात माझ्या चांगल्या हस्ताक्षरामुळे सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते बीए च्या तिन्ही वर्षातील प्रमाणपत्रे शुद्धलेखन स्पर्धेतील मला मिळाली होती. (कदाचित माझ्या ईतरांपेक्षा कमी चुका झाल्या असतील😀)

( कदाचित मी जर पोलीस कोठडीत एक दिवस अन दोन रात्री नसत्या घालवल्या तर माझं करियर नक्कीच वेगळं असत) सत्यभामा सौंदरमल, निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था, बीड

Updated : 25 Jan 2022 4:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top