Home > मॅक्स ब्लॉग्ज > उना घटना आणि तो जिग्नेश मेवानी

उना घटना आणि तो जिग्नेश मेवानी

मराठी दैनिकांत आणि चॅनलवर मेवाणी यांना कितपत जागा आहे हे मला माहित नाही. हनुमान चालीसा, भोंगे आणि मशिदी त्याचप्रमाणे राज्यातल्या राजकीय क्षितिजावर पुन्हा एकदा अवतरलेल्या धूमकेतूकडे त्यांचे बहुधा जास्त लक्ष असेल सांगत आहेत ज्येष्ठ पत्रकार कॅमिल पारखे..

उना घटना आणि तो जिग्नेश मेवानी
X

उना घटना आठवते ? हो, तीच गुजरातमधील घटना. चारपाच तरुण मुलांना एका झुंडीने वाहनाला बांधून फरफटत नेले होते भर गर्दीत त्यांना मनसोक्त फटके दिले होते आणि आपली ती मर्दुमकी सगळ्या जगाने पहावी म्हणून ही कारवाई व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केली होती. त्या पोरांचा अपराध होता ते दलित जातींतले होते आणि त्यांनी गोहत्या केल्याचा संशय होता.

त्या आरोपांत काही तथ्य नव्हते हे चौकशीनंतर सिद्ध झाले पण त्यानंतर या खालच्या जातीतल्या लोकांनी मग आपण मेलेल्या ढोंरांना गावातून बाहेर नेणार नाही, चामडी सोलणार नाही असा निर्णय घेतला. हे प्रकरण देशभर लावून धरणारा तरुण होता गुजरातमधला जिग्नेश मेवाणी.

गेली आठवडाभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटर वर टीका केल्याबद्दल आसाम पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उचलला होता. गुजरातमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मोदी आणि शहांच्या या राज्यात गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल गांधींनी भाजपच्या नाकातोंडाला अगदी फेस आणला होता. पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या फेरीत गुजरातमध्येच तळ ठोकला तेव्हाच भाजपला कशीबशी सत्ता राखण्यास यश आले होते हे ध्यानात ठेवावे लागेल.

गुजरातच्या निवडणुका अशा तोंडावर आलेल्या असताना भाजप सत्तेवर असलेल्या आसाम सरकारने जिग्नेश मेवाणीला पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर एकदम प्रकाशझोतात का आणावे हे कळत नाही. एकदा तुरुंगातून बाहेर आल्यावर पुन्हा नवी केस टाकून त्यांना तुरुंगात टाकण्याचा आसाम सरकारने चंग बांधला होता. न्यायालयाने त्याबद्दल पोलिसांना फटकारले आहे.

लोकसभेत पाशवी बहुमत असल्याने आणि अधिकृतरित्या विरोधी पक्षनेताच नसताना कुठलाही कायदा लिलया मंजूर करण्याची धमक असलेला आणि सद्या देशातील सर्वात ताकदीचा पक्ष असलेल्या भाजपला एका राज्यातील अपक्ष आमदाराची इतकी भीती वाटावी हे खरे पाहता अनाकलनीय आहे.

गुजरातमध्ये बेचाळीस वर्षाचे मेवाणी हे एकमेव अपक्ष आमदार आहेत आज इंडियन एक्स्प्रेसला ` संडे प्रोफाईल' या सदरात मेवाणी यांच्यावर अर्ध्या पानाहून अधिक मोठा लेख आहे. त्याशिवाय शेजारच्या पानावर दलितालीटी या सदरात मेवाणी यांच्यावर या Why they are afraid of Jignesh Mewani ? या शीर्षकाचा लेख आहे.

मराठी दैनिकांत आणि चॅनलवर मेवाणी यांना कितपत जागा आहे हे मला माहित नाही. हनुमान चालीसा, भोंगे आणि मशिदी त्याचप्रमाणे राज्यातल्या राजकीय क्षितिजावर पुन्हा एकदा अवतरलेल्या धूमकेतूकडे त्यांचे बहुधा जास्त लक्ष असेल. आज महाराष्ट्र दिनाबरोबरच जागतिक कामगार दिनसुद्धा आहे याची आठवण मात्र काही दैनिकांनी ठेवली आहे.

ज्येष्ठ पत्रकार कॅमिल पारखे

Camil Parkhe, May 1, 2022

Updated : 1 May 2022 10:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top