26/11 terrorist attack : अतिरेकी हल्ल्याचे ध्वनी आणि प्रतिध्वनी
२६/११ अतिरेकी हल्ल्यावेळी आणि हल्ल्यानंतर राजभवनात काय घडलं ? सांगताहेत राजभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर
X
आज बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर ! सन २००८ साली देखील २६ नोव्हेंबर या दिवशी बुधवारच होता. रात्री अकरा साडेअकरा वाजताRaj Bhavan राजभवन परिसरात दारुगोळ्याचे आवाज आले. सुरुवातीला आभाळ अचानक गडगडत असावे, असे वाटले. थोड्याच वेळात मोठा आवाज आला आणि खिडक्यांची तावदाने हलली. राजभवनाच्या पूर्वेला गिरगाव चौपाटी - मरिन ड्राइव्ह - नरिमन पॉईंट असा समुद्रकिनारा असल्याने समुद्राच्या दुसऱ्या बाजूला मोठ्याने फटाके फुटले तरीही आवाज या बाजूला येतो. यावेळी मात्र आवाज साधारण वाटले नाही.
साधारण साडेअकरा वाजता इंटरकॉम वाजला. इतक्या उशिरा इंटरकॉम वाजल्याने थोडी शंका आली. राज्यपालांचे परिवार प्रबंधक फिलिप फर्नांडिस यांनी 'टीव्ही बघितला का?' म्हणून विचारणा केली. 'नाही', असे सांगितल्यावर त्यांनी मुंबई वरील हल्ल्याची माहिती दिली. टीव्ही लावून पाहिला तर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अतिरेकी हल्ल्यात मृत्यूची बातमी समजली.
रात्र वैऱ्याची
सर्वत्र तणावाचे वातावरण होते. टीव्ही चॅनेल्स वरील बातम्या आणखी गांभीर्य वाढवत होत्या. राजभवनावर पहाटेच (दि. २७) केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील येत असल्याची माहिती आली. पहाटे पाच वाजता राज्यपाल एस सी जमीर व केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत राजभवन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.
दिनांक २७ नोव्हेंबर रोजी राज्यपाल जमीर यांच्या सूचनेनुसार मुंबईवरील महाभयंकर अतिरेकी हल्ल्याची निंदा करणारे आणि हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्याप्रती तसेच निरपराध लोकांप्रती दुःख व्यक्त करणारे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. दिनांक २८ नोव्हेंबर रोजी राज्यपाल जमीर यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून राज्यातील जनतेला संबोधित केले. त्याच दिवशी राज्यपाल जमीर यांनी हौतात्म्य प्राप्त झालेले सहायक पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक शिंदे व पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
दिनांक २९ नोव्हेंबर रोजी राज्यपालांनी हौतात्म्य प्राप्त झालेले पोलीस सहआयुक्त हेमंत करकरे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
..... राजकीय प्रतिध्वनी
तीन दिवसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली. परंतु, दिनांक ३० नोव्हेंबर २००८ रोजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दुसऱ्याच दिवशी दिनांक १ डिसेंबर २००८ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तीन दिवसांनी दिनांक ४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी देखील मंत्रिमंडळासह आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला.
दिनांक ७ डिसेंबर रोजी कुलाबा, मुंबई येथील ज्यू धर्मियांचे प्रार्थनास्थळ केनिसिथ इलियाहू सिनॅगॉग येथे प्रार्थनासभा झाली. यावेळी अतिरेकी हल्ल्यातील निरपराध नागरिकांना, हौतात्म्य प्राप्त झालेल्या सैन्य दलातील व पोलीस दलातील अधिकाऱ्यांना तसेच हल्ल्यात मृत झालेल्या ज्यू नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दिनांक ८ डिसेंबर २००८ रोजी राज्यपाल जमीर यांनी राजभवन येथे अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची व छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी २४ कॅबिनेट मंत्री व १३ राज्यमंत्र्यांना देखील शपथ देण्यात आली.
उमेश काशीकर
जनसंपर्क अधिकारी, राजभवन






