Home > Top News > पांडुरंग माध्यमातील जीवघेण्या स्पर्धेचा बळी ठरला का?

पांडुरंग माध्यमातील जीवघेण्या स्पर्धेचा बळी ठरला का?

पांडुरंग माध्यमातील जीवघेण्या स्पर्धेचा बळी ठरला का?
X

(बैल वाचला तर शेतकरी वाचेल.... मात्र गाडीत ओझं (TRP) भरताना बैलाचा विचार केला जात नाही, मग बैल तरी मरतो किंवा चाकं तरी रुततात....)

पांडुरंग रायकर... पत्रकारिता जगतातील काल पर्यंत जिवंत असलेलं हे नाव आज आठवणीत जमा झालयं. त्यांचा बळी कोरोना ने घेतला की मुर्दाड व्यवस्थेने घेतला?? हे प्रश्न विचारले जातायतचं. मात्र, ह्या प्रश्नाबरोबरच पांडुरंग माध्यमातील जीवघेण्या स्पर्धेचा बळी ठरला नाही का? हा प्रश्नही विचारावा लागणार आहे.. माध्यमातली स्पर्धा फक्त जीवच घेत नाही. तर कुटुंबाचा आनंद हिरावून घेते. आज या क्षेत्रात फिल्डवर काम करणाऱ्या एकाही पत्रकाराचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाहीय आणि ते ठीक ठेवलं जाईल. याची सुतराम शक्यताही नाहीये.

सकाळी पुण्यात एका ठिकाणी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि इमारत कोसळून त्या खाली काहीजण दबले, पांडुरंग यांच्या मृत्यूच्या बातमी बरोबरच ही बातमी आली होती. खरंतर माध्यम प्रतिनिधींना पांडुरंगच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी व्हायचं होतं. मात्र, तसं झालं नाही आणि सिलेंडर स्फोटाची बातमी सर्वात आधी दाखविण्याच्या स्पर्धेने आमचा तो अधिकारही हिरावला.

मात्र, आपल्यातलं कुणीतरी गेलं आणि व्यवस्थेबरोबरच त्याच्यावर असलेल्या मानसिक तणावाचाही तो बळी ठरला. ही चर्चा पसरू लागली. तेव्हा माध्यम गृहाचे कारभारी/ मालकं भानावर आली. आणि पांडुरंग गेल्याच्या 3 तासानंतर त्याला न्याय देण्याची भाषा करत आता ते व्यवस्थेवर खापरं फोडत बसलीयत. अशीच घटना काही वर्षांपूर्वीही घडली होती. एका रस्ते अपघातात आम्ही व्यंकटेश चपळगावर नावाच्या अष्टपैलू पत्रकाराला गमावला होतं, व्यंकटेश गेल्यावर आम्ही तेव्हाही रस्ते नीट न बनविणाऱ्या व्यवस्थेवर खापरं फोडली होती. पण त्याला बातमीच्या स्पर्धेत त्या रस्त्यावर कुणी उतरवला होता. हे कुणीच संगितले नव्हतं, सांगणारही नाहीत..

पांडुरंगच कुणी ऐकत नव्हतं का?, त्यांना आर्थिक मदत मिळत नव्हती का? त्यांना कशासाठी न्याय हवा होता रात्री दीड वाजता त्यांनी केलेला msg त्यांची टोकाची मानसिकता दाखविण्यासाठी पुरेसा आहे. मात्र हा अनुभव अनेकांना आलाय येतोय.

एका प्रथितयश न्युज चॅनलचा ब्युरो चीफने नुकतीच कोरोनावर मात केलीय. मात्र, पांडुरंगच्या निधन वार्तेने तो पुन्हा हादरलाय, दहा दिवसांपूर्वी त्याला वेळेत बेड मिळाला नसता. तर कदाचित तोही आपल्यात नसता, पण सुदैवाने आम्ही पटकन निर्णय घेतला आणि तो खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती झाला. त्याची तब्येत सुधारली. डिस्चार्जचा दिवस ठरला. मात्र, त्या दिवशी तो पुन्हा अस्वस्थ झाला. पण ती अस्वस्थता आजाराची नव्हती, तर त्या दवाखान्याचं बील कसं चुकत करायचं यासाठीची होती.

मागील दहा वर्षांपासून तो पत्रकारिता करतोय. मात्र स्वतः आजारी पडल्यावर चांगल्या ठिकाणी उपचार घ्यावेत. एव्हढी सुद्धा तजबीज त्याच्याकडे नव्हती नाहीये. शेवटी दवाखान्याचं बिल उधार ठेऊन तो घरी परतला.

दुसऱ्या एका मोठया web पोर्टल चॅनलचे ग्रामीण भागातील अत्यंत अभ्यासू पत्रकार सध्या सर्व कुटुंबासह कोरोनाशी लढा देतायत, त्यांना कोरोनाची लागण झाली. हे मी-मी म्हणणाऱ्या अनेक पत्रकारांनाही त्याची खबर सुद्धा नाहीय, अनेक कॅमेरामन, फोटोग्राफर, वृत्तपत्रकार आणि चॅनल मध्ये काम करणारे पत्रकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

फिल्डवर काम करून दररोज घरी केवळ चिडचिड घेऊन जाणाऱ्या या अनेकांनी ह्यावेळी नकळत कोरोनालाही घरी नेलं आणि आता या सगळ्यांच्या घरचेही कोरोनाशी झुंज देतायतं. परवा सरकार मधल्या एका जेष्ठ नेत्याने कोरोनाचा संसर्ग होईल. या भीतीने माध्यम प्रतिनिधीनीं पुढे केलेल्या माईकवर सॅनिटाईझर फवारले आणि पुण्यात सगळं आलबेल आहे. असं सांगून तो निघून गेला, त्याला प्रसिद्धी मिळाली, मात्र त्याचा byte घेण्यासाठी गर्दी करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या पदरात कोरोना पडला नसेल का?

त्या नंतर पिंपरी चिंचवड मध्ये काम पूर्ण झालेली नसतानाही उभारलेल्या दोन COVID सेंटरची मोठा गाजावाजा करून शासनाने घालून दिलेले नियम मोडून केवळ प्रसिद्धी मिळावी. ह्याच हेतूने प्रेरित असलेल्या या नेत्यांनी उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले. साहजिकच गर्दी होणार होती. ती झाली, नेत्यांना प्रसिद्धी मिळाली. तेव्हा आमच्या पदरात कोरोना पडला नसेल का?

काल परवा प्रकाश आंबेडकर हजारो कार्यकर्ते घेऊन पंढरपुरात दाखल झाले तेव्हा त्यांना प्रसिद्धी मिळाली. मात्र, त्या गर्दीतून बातमी शोधणा-या पत्रकारांच्या पदरात कोरोना पडला नसेल का? पांडुरंग गेल्या नंतर आता लोकप्रतिनिधी दुःख, शोक व्यक्त करतायत, मात्र या पैकी अनेक प्रसिद्धी पिपासुनी मागच्या 6 महिन्यात फोन करून करून बोलावून घेत आम्ही वाटंत असलेल्या धान्य किट्स आणि करत असलेल्या कामाला प्रसिद्धी द्या. असा तगादा लावला होता. तेव्हा त्यांना नाही वाटलं की आपण बोलविलेला प्रतिनिधी आल्यावर तो अनेकांच्या संपर्कात येईल आणि त्याला कोरोना होईल.

हा विचार तर सोडाच ह्यांनी कोणत्या माध्यम प्रतिनिधीच्या घरात राशन दिलं, हे तरी दाखवा. अचानक नोकरी वरून काढल्या गेल्यामुळे आत्महत्या सारखा टोकाचा विचार करणाऱ्या कोणत्या पत्रकार, छायाचित्रकाराला जवळ घेऊन यांनी विचारपूस केली का? लोकप्रतिनिधी सोडा हो साध्या नागरिकांनीही विचारलं नाही. मात्र या क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेकांसाठी हा प्रश्न गौण आहे. कारण त्यांना प्रसिद्धी आणि चॅनल्सना बातम्या हव्यायत त्याही सर्वात आधी...

मग तुम्ही मरा, उपाशी रहा किंवा आजारी रहा काही घेणं देणं नसतं. कारण स्पर्धा आहे. तिथे टाकायचं असेल तर पळावं लागेल.

आता पांडुरंगच्या मृत्यूची चौकशी वैगरे होईल, पांडुरंग हे पर्मनंट- पगारी कर्मचारी असल्याने कदाचित शासन आणि त्यांचं चॅनल त्यांच्या कुटुंबियाला अर्थसहाय्य देईलही. (माध्यम क्षेत्रातील 80 टक्के कर्मचारी /पत्रकार/प्रतिनिधी/ रोजंदारीवर काम करतात ते फिल्डवर मेले तर त्यांना कोणतीही सुरक्षा किंवा अर्थसाह्यय देणं चॅनल्सना बंधकारक नाहीय)... आणि काही दिवसांनी हे प्रकरणही तुम्ही आम्ही विसरून जाऊ पण उरलेल्या पांडुरंगांचं ( बैलांच) काय? रुतलेला चाक काढण्यासाठी जोर लावतोय फक्त असा दिखावा करून ते चाक निघत नसतं हो... त्यासाठी गाडीतील (TRP) चा भार कमी करावा लागतो. मात्र, तो भार कोण कमी करेल या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नसल्याने मग गाडी ओढणा-यांनाच फटके मारले जातात... हे नैराश्य सहकारी गमावल्याचं नक्कीच आहे. तसंच हे नैराश्य केवळ त्या स्पर्धेमुळेही आलंय, जी स्पर्धा असे बळी घेण्यासाठी तयार झालीय.... आमचा माणूस गेलाय हो..... पांडुरंग यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

Updated : 4 Sep 2020 8:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top