Home > Top News > सत्याचा आवाज...

सत्याचा आवाज...

पत्रकार प्रशांत कांबळे यांचं हे आर्टिकल वाचण्यापुर्वी दुरदर्शनवरील 7 च्या बातम्या आठवा... आणि "सत्याचा" "धंदा" कुठंपर्यत पोहोचला आहे. याची जाणीव करुन देणारं हे आर्टिकल नक्की वाचा...

सत्याचा आवाज...
X

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या सोबत असलेले ते सुद्धा जबरदस्तीने ते म्हणजे न्युज चॅनेल. "एंटरटेनमेंट" साठी ज्या चॅनेलचा उगम ह्या मागच्या 10 -15 वर्षात झाला. त्याचे सगळे रेकॉर्ड गेल्या काही वर्षात या न्यूज चॅनेल ने मोडीत काढले. न्यूज अँकर चे चाहते वर्ग निर्माण झाले. त्यांना "हॅशटॅग" या मोहिमेत आणले गेले. जी लोकप्रियता एखाद्या सिनेमाच्या Actor ला मिळत होती. तीच आता यांना मिळू लागली. कारण काय तर हे लोक "सत्य" मांडतात. तेही 24 तास. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सत्य इतकं स्वस्त झालाय का? की 24 तास मुबलक भावाने मिळावे.

काही चॅनेल तर "फ्री टू एयर" आहेत. म्हणजे मोफत फक्त 24 तास आम्हालाच बघा. आम्ही तुमची वेळ घालवण्याची, मनोरंजन करण्याची, तुम्हाला गोष्टी सांगण्याची आणि त्यातून काही उरले तर बातम्या सांगण्याची तसदी घेऊ, काहीश्या या अर्थाने सो कॉल्ड न्यूज चॅनेल आपला धंदा फार जोमाने पुढे नेत आहेत.

दूरदर्शनवर 7 च्या बातम्या आठवतात का? अजूनही आहेत त्या तिथेच. त्याच पद्धतीने बातम्या सांगतात. ज्या पद्धतीने त्या सांगितल्या गेल्या पाहिजे. पण ते चॅनेल बघणार कोण? तिथे "ड्रामॅटिक संगीत" सोबत बातम्या दाखवल्या जात नाहीत. तिकडचे अँकर रंगेबेरंगी कॉर्पोरेट कपडे चढवत नाहीत. बातम्या सांगताना "परफॉर्मन्स" करत नाही, ते उदासी दाखवत नाही, ते उगाच हवे तिथे पॉज घेत नाहीत, उसासे टाकत नाहीत. ते फक्त नीट, योग्य ती माहिती पोहोचेल याच आत्मविश्वासाने बातम्या देत असतात.

नक्की झालाय काय सगळ्यांना? का आरडा ओरड करून सत्य सांगितलं जातंय? म्हणजे त्याचा "नेमका" अर्थ आपण काढायचा की नाही? की जे ओरडून मांडले म्हणजे तेच "सत्य" आहे. असे धरून चालायचे? नेमकं आणि मुळ कळणार कसं? कुठल्याही शोकावस्थेत असताना कुणालाही माईक जवळ घेऊन, "यावेळी तुमच्या काय भावना आहेत"? चॅनेल वेगळे वेगळे पण प्रश्न एकच. काय असतील भावना? ढिगाऱ्याखाली पडलेल्या मुलाच्या काय असतील भावना? तुम्हाला नक्की कुठलं आणि काय उत्तर हवंय? की तुमच्याकडचे प्रश्न संपले की अक्कलच नाही? नक्की काय? आपण लोकांच्या इतक्या जवळ जाऊ शकतो. ही भावना इतकी मारक आहे. या सगळ्यात. कॅमेराने एखादी गोष्ट दाखवली की आपल्याला सत्याची अनुभूती देते. या गैरसमजावर अजून किती "सत्य" मांडणार? मुळात जर विचार केला तर हे सगळे भित्रे वाटतात.

कारण ते आपले "सत्य" ओरडून सांगतात. लोकांच्या कानाचे पडदे फाटू पर्यन्त ओरड्याचे आणि आपण सत्यशोधक आहोत. असा आव आणायचा म्हणजे त्यांना मूळ मुद्दा ऐकूच येणार नाही. ही सगळी भित्रे असण्याची लक्षणे आहेत.

स्टुडिओमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसोबत आगाऊपणे बोलणे किंवा मानापमान करणे. हे उत्तम पत्रकारितेचे लक्षण वाटते. तसे नाही केले तर तुमचे ज्ञान कमी दिसुन येते. ते किती उत्तम आहे किती खोल आहे. हे दाखवण्यासाठी ओरडा फक्त ओरडा दुसरा काही नाही.

1 जून 1980 साली पहिलं 24 तास न्युज चॅनेल "CNN"(Cable News Network) च्या रुपात वास्तवात आलं, टेड टर्नर या व्यक्तीने ते सुरु केलं. तेंव्हा त्यांचा उद्देश आणि आता 24 तास चालणाऱ्या न्यूज चॅनेलचा उद्देश यामध्ये खूप मोठा फरक आहे. हा बदल फक्त भारतात नव्हे तर एकंदरीत जगात झाला. मग त्यामध्ये "24 अवर न्युज सायकल" या संकल्पनेचा उगम झाला.

एका गोष्टीचा 24 तास पाठलाग करणे आणि रिपोर्टींग करणे हे सुरु झालं. पाहिलं 24 तास न्यूज सायकल 1994- 95 साली" The O J Simpson murder case" या रुपात झालं. याचं 24 तास पाठलाग करून बुलेटिन दिलं गेलं. आणि एका वेगळ्या जगाची सुरुवात झाली. लोकं ते बघू लागली त्यांची उत्सुकता वाढू लागली. याचाच फायदा "धंदेवाईक" लोकांनी घेतला आणि पत्रकारितेचा नवीन ऐरा सुरु झाला असं म्हणता येईल.

पण ते या पातळीवर येऊन पोहचेल याची कुणालाही दूरदृष्टी नसावी. 24 Hr न्यूज सायकल चा इतका गैरवापर कुणी केला नसेल. म्हणजे आज, "अमिताभ बच्चनने जुस घेतला" ते "रिया ला रात्री झोप लागली नाही" इथपर्यंत येऊन पोहोचली. याची नक्की आपल्याला गरज आहे का? आणि असेलही तेही या पद्धतीने आहे का? परत त्याच प्रश्नावर हे नक्की फक्त "सत्या"साठीच का? की दुसरं काही? म्हणजे फटाक्याच्या आवाजात बंदुकीतून सुटलेल्या गोळीचा आवाज येत नाही असं काही? ही यातली मूळ भीती आहे. "सत्याचा" "धंदा" या पातळीवर आलाय हे ओळखलं पाहिजे.

2006 साली प्रिन्स नावाचा मुलगा बोरवेल मध्ये पडला होता आठवतंय का? आपण कसे 24 तास ते बघत होतो. त्याला कसे बाहेर काढले? याची क्षणाची बातमी आपण सगळे 24 तास टीव्ही समोर बसून बघत होतो. तेव्हा त्या चॅनेलचा TRP सगळ्यात जास्त होता. तसेच प्रत्येक वेळी लोकांना गृहीत धरून बातम्यांचा भडिमार सुरु आहे. सुशांतचे आत्महत्या प्रकरण हे त्याचे अगदी ताजे उदाहरण. आपल्या देशातल्या लोकांचे सगळे प्रश्न सुटले आणि हाच एक शेवटचा प्रश्न बाकी आहे. या पद्धतीने सगळं सुरु होतं. बाकी कुठल्या प्रकारचे दुःख अस्तित्वात नाही. असेच वाटत होते. जवळजवळ 40 लाख लोक बेरोजगार झाले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात याची एक साधी बातमी करू नये? इतके आपण असंवेदनशील झालो आहोत का?

त्यांनी काही आंदोलनसुद्धा केलीत त्याची बातमी कुठे होती? त्यांचे नेमकं काय झालं? त्या लोकांनी काय खाल्लं? किंवा ते कसं जगत आहेत आणि पुढे कसे जगतील? यातले "सत्य" कुठे आहे, की सरकारच्या विरोधात जायचे नाहीच. यामध्ये काही "सेन्सेशनल" नाही ना. त्यांचं नशीब वाईट आहे की त्यांनी अश्या घरात जन्म घेतला की जिथे सत्य अत्यंत "फिकट" रंगाचे आहे. ते डोळ्यात भरत नाही.

हे सगळं असंच सुरु राहिलं तर नुकसान एकच आहे. ते म्हणजे सत्य आणि असत्य मधला फरक ओळखता येणार नाही आणि खरं कोण सांगतंय हे समजणार नाही? आणि याहून भीतीदायक म्हणजे, की यातून आपण अशी पिढी घडवू शकू का? की जे सत्याच्या मूळापर्यन्त जातील आणि सत्य शोधतील.? तर याचे उत्तर अंधारात आहे. ते अस्पष्ट आहे.

जेंव्हा 24 तास न्यूज चॅनेल चे पर्व सुरु झाले. तेव्हा अमेरिकेचे जेष्ठ पत्रकार बिल कोवाच आणि टॉम रोसेनस्टील (Bill Kovach and Tom Rosenstiel) यांनी परखड मत व्यक्त केले होते . त्यांच्या "Wrap Speed-America in The Aged of Mixed Media" या पुस्तकात त्यांनी असं म्हटलेले आहे, "The press has moved toward Sensationalism, entertainment, and opinion" and away from traditional values of verification, proportion, relevance, depth, and quality of interpretation. They fear these values will be replaced by a "journalism of assertion" which de-emphasizes whether a claim is valid and encourages putting a claim into the arena of Public discussion as quickly as possible.

-प्रशांत कांबळे

Updated : 26 Sep 2020 9:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top