Home > मॅक्स ब्लॉग्ज > तिरंगा आमची शान

तिरंगा आमची शान

खालील लेख प्रहार वृत्तपत्राचे संपादक संदेश शिर्के यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केला असून भारतीय असल्याचा अभिमान आणि तिरंग्याची शान केवळ आपल्यालाच नसून भारतात राहणाऱ्या प्रत्येक जीवाला आहे. हे या लेखातून मांडले आहे... वाचा

माझी जात, माझा प्रांत, माझा वर्ण या पेक्षा मी भारतीय असल्याचा सर्वात जास्त अभिमान मला वाटतो .त्या दृष्टीने काही तरी छोटं मोठं करण्याची धडपड नेहमी करीत असतो.. आज देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्यासारखं काही तरी करावं असं मनाला वाटलं आणि मग काय तडक मी निघालो सोबत सुरेश काटे, राजू काउतकर, दत्ता बाठे आणि नीलम चौधरी, महेश गीते या सगळ्या पत्रकार मित्रांना घेतलं आणि शहरभर फिरलो यावेळी काही महापालिका अधिकारी, रिक्षाचालक, प्रवासी, सर्वसामान्य नागरिक, सुरक्षारक्षक, बसचालक, फळविक्रेते, लहान मुले, फेरीवाले भिक्षेकरी या सर्वांच्या छातीवर भारताचा छोटा तिरंगा झेंडा लावून आणि चॉकलेट देऊन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र या दरम्यान मनाला सर्वात जास्त आनंद देणारा क्षण दिला तो एका मनोरुग्ण व्यक्तीने... फाटलेले कपडे घालून भर रस्त्यात सगळ्यांना शिवीगाळ आणि हातवारे करून रागारागात जाणाऱ्या या व्यक्तीला मी पाहिलं आणि त्याला झेंडा लावण्यासाठी पुढे सरसावलो मात्र पत्रकार मित्र सुरेश काटे यांनी मला सांगितलं पुढे जाऊ नकोस तो काही पण करेल. मात्र तरी देखील पुढे गेलो. त्या व्यक्तीला विचारलं भाई जान आज क्या है मालूम है ? त्याने रागाने माझ्याकडे रागाने पाहून नकारात्मक मान डोलावली हातातला लहान झेंडा दाखवत त्याला सांगितलं ये अपने देश का तिरंगा है मालूम है न? बस्स इतकंच ऐकून त्या मनोरुग्ण व्यक्तीच्या चेहऱ्यावर भारताचा तिरंगा पाहून सप्तरंगी हास्य आलं, आणि मी जसं त्याच्या फाटलेल्या शर्टाच्या वर तिरंगा झेंडा लावला तसं त्याने आपली छाती आणखी पुढे काढली आणि अक्षरशः माझ्याकडे अत्यंत आपुलकीच्या नजरेने पाहू लागला, मी त्याच्या छातीवर छोटा झेंडा लावला, आणि त्याला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आणि काय चमत्कार काही मिनिटांपुर्वी रागाच्या भरात हातवारे करीत शिवीगाळ करणारा तो व्यक्ती हाथ छातीवर ठेवून मध्येच मोठ्या अभिमानाने त्या झेंड्याकडे पाहत शिवाजी चौकाच्या दिशेने शांतपणे निघून गेला मात्र जाताना त्याने पुन्हा वळुन पाहिलं आणि त्या मनोरुग्ण व्यक्तीच्या चेहऱ्यावरील ते स्मित हास्य मला बरंच काही सांगून गेलं .. जग जिंकल्यासारखं हास्य होत त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या पेक्षा जास्त पटिने माझ्या चेहऱ्यावर आनंद होता..

ही आहे माझ्या तिरंग्याची शान आणि त्याची कमाल .. अभिमान आहे मला मी भारतीय असल्याचा... सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा जय भारत...

Updated : 27 Jan 2019 4:48 AM GMT
Next Story
Share it
Top