Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > तत्वज्ञ योगीराज !

तत्वज्ञ योगीराज !

भारतीय तत्वज्ञानाला जगाचे दरवाजे उघडून देण्याचे महान कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचा आज स्मृती दिन त्यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...

तत्वज्ञ योगीराज !
X

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया ।।


हा कठोपनिषधामधील मंत्र भारतवसीयांना देऊन त्यांना कार्यप्रवण करणाऱ्या थोर भारतीय तत्ववेत्ते स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मदिन ! स्वामीजींचे जीवन व विचार हा एक चमत्कार होता. नरेंद्र दत्त म्हणून जन्माला आल्यानंतर त्यांनी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची दीक्षा घेतली. हिंदु तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करत ते देशभर फिरत राहिले. ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो आर्ट इन्स्टिट्युट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. सुरुवातीस थोडे नर्व्हस असूनदेखील त्यांनी "अमेरिकेतील माझ्या भावा-बहिणींनो', अशी भाषणास सुरुवात केली आणि सात हजार विद्वतजनांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता.

"जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण जिने दिली, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. या परिषदेत स्वामीजींनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी आपल्या सुंदर वक्तृत्वाने अमेरिकन नागरिकांची मने जिंकली.

आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.

असे स्वामीजी! ४जुलै १९०२रोजी कोलकात्याजवळच्या बेलूर मठात त्यांनी इच्छा मरणाची समाधी घेतली. वेद, उपनिषदे, गीता या आणि अशा भारतीय तत्वज्ञानाच्या विविध विषयांवरील स्वामीजींची प्रवचने ग्रंथरुपात उपलब्ध आहेत. भारतीय तत्वज्ञानाला जगाचे दरवाजे उघडून देण्याचे महान कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली !

Updated : 12 Jan 2021 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top