Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'गोलपीठ्या'तील बंडखोर

'गोलपीठ्या'तील बंडखोर

दलितांच्या, शोषितांच्या व्याकूळ वेदनेला शब्दरूप देणारा बंडखोर, हेच वर्णन नामदेव ढसाळ यांना लागू पडते. १९६० नंतरच्या मराठी कवितेला वेगळे वळण देणाऱ्या ढसाळ यांचा आज स्मृतिदिन ! त्यांच्या अफाट शब्दसंपदेला व प्रतिभेला सलाम करणारा ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांचा लेख नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमीत्त पुन्हा प्रसिध्द करीत आहोत.

गोलपीठ्यातील बंडखोर
X

नामदेव ढसाळ केवळ प्रतिभावंत व संवेदनाशील कवी नव्हे समाज आभ्यासक व सुधारक आणि जागरुक राजकारणीसुद्धा होते. त्यामुळेच त्यांनी ब्लॅक पॅन्थर्सच्या धर्तीवर दलित पॅन्थरची स्थापना केली व ती जोपासली. 'गोलपीठा'पासून सुरू झालेला त्यांचा कवितेचा प्रवास विविध वाटांनी पुढे जात राहिला. त्यांच्या कवितेने भारतीय साहित्य प्रांतात क्रांती घडवली.

त्यामुळेच साहित्य अकादमीने पहिला जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिली. ढसाळांना तब्येतीने मात्र साथ दिलीच नाही. त्यांना पोटाच्या दुर्धर रोगांनी ग्रासले. त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला. 'तुही सत्ता कंची?' हा सवाल करणारे व 'मी मारले सूर्याचे घोडे सात' ही प्रंजळ कबुली देणारे ढसाळ त्यांच्या शब्दकळेमुळे अमर झाले.

ढसाळांचे क्रमिक शिक्षण तुकड्यातुकड्यातच झाले. पण जन्मापासूनच येत राहिलेल्या भीषण अनुभवांची शिदोरी हेच त्यांचे शिक्षण बनले. पंडित कवींच्या तोडीचे तत्वज्ञान ते आपल्या कवितेतून मांडत राहिले. त्यांच्या शब्दांना मध्यमवर्गाला पुरते हादरवून टाकण्याचे सामर्थ्य होते. एकेकाळी उच्चविद्याविभूषित मध्यमवर्गीय विद्वानांनी त्यांच्या कवितेवर कठोर टीका केली खरी पण पुढे त्यांच्या कवितांनी पाठ्यपुस्तकांत प्रवेश मिळवला. हा शोषित शब्दांनी व्यवस्थेवर मिळवलेला विजय आहे, असे ते मानीत.

ढसाळांबरोबर वैयक्तिक दोस्ती होणे, हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव होता. गप्पा मारताना नामदेव पुराणांबरेबरच फ्रेंच, जर्मन, रशियन साहित्यातले दाखले देत. त्यांच्या गप्पांत ते एका बाजूला संत ज्ञानेश्वर, कबीर, चोखा मेळा यांच्या बरोबरीने साक्रेटिस, प्लुटो यांच्या वचनांचेही सहज दाखले देत. भारतीय तत्वज्ञानासारख्या गहन विषयावर ते तासन् तास बोलत; कोणतेही संदर्भ टांचण समोर नसतानाही ते कधी नामदेव तर कधी ॲरिस्टॅाटलचे दाखले सहज देत. महाराष्ट्र टाइम्सच्या वार्षिकात त्यांना कविता लिहिण्यास सांगितले तेव्हा माझ्याच कार्यालयात बसून त्यांनी 'मी मारले सूर्याचे घोडे सात' ही दीर्घ कविता लिहून काढली, तो प्रसंग अजून आठवतो.

त्यांनी जगभरच्या बंडखोर कवींची मुंबईत दोन संमेलनेही भरवली. शोषितांच्या आक्रोशाचे शब्द भाषा-प्रांतागणिक वेगळे असले, तरी वेदना एकच असते, असे ते मानीत. त्यांच्या वेदनेच्या शब्दफुलांना ही आदरांजली !

Updated : 15 Feb 2023 1:54 AM GMT
Tags:    
author-thhumb

भारतकुमार

Print & TV Journalist,Political Analyst and formerMember of Parliament (RS). Worked in India & abroad and in English & Marathi. Opinions are strictly personal.


Next Story
Share it
Top