जातीचा पेट

जात संपवायची असेल तर क्रोधापेक्षा प्रेम करणे महत्त्वाचे आहे. आईच्या ममत्व भावनेने जात पेटू शकते वाचा सागर गोतपागर यांच्या आयुष्यात घडलेला डोळ्यात पाणी आणणारा किस्सा…

जातीचा पेट
X

"म्हाराच्या हातचं आम्ही पाणी बी पेत नाय, आण ह्या पोरांन मला त्येंच्या घरात निऊन ठेवलं." पूर्वीच्या एका स्टाफ मेंबरच्या रूमवर आलेली त्याची आज्जी मला सांगत होती. "आमच्या जालन्यात आम्ही अजून बाटलो न्हाय, आणि मेलो तरी बाटणार नाय". त्या आज्जीचे शब्द जखम करत शरीरात घुसनाऱ्या गोळी सारखे घुसत होते. मनातून संताप येत होता. चीड येत होती. माझा मित्र संदीप त्याला माझी जात माहीत असल्याने तो डोळा मारून त्याच्या आजीला गप्प करत होता. मी त्याला खूनावून गप्प राहायला सांगितलं.

"खरं आहे आज्जे तुझं ही जातच लय बेक्कार" मी म्हातारीच्या सुरात सुर मिसळला. तिच्याशी संवाद सुरू केला. संदिप कडून तिला माझी जात न सांगण्याचे वचन घेतले. मी आठवड्यातून वेळ मिळेल तेंव्हा त्या आजीकडे जाऊ लागलो. हळूहळू तिची काळजी घेऊ लागलो. तिचं बोलणं ऐकून घेऊ लागलो. आमची जवळीक वाढली. तिने हळू हळू तिच्या नातवाच्या कागाळ्या मला सांगायला सुरवात केली. आमच्या जवळीकतेची ती पहिली चाचणीच होती. मी तिचं मन हळू हळू जिंकत गेलो. माझ्याशी बोलताना तिला सुरक्षित वाटायचं. मी गेलो नाही की म्हातारी माझी आठवण काढायची. मग मला माझा मित्र फोन करून आमचं बोलणं घडवून आणायचा. हळूहळू म्हातारीचा माझ्यावर इतका जीव बसला की घरात काही खास बनवलं की ती आवर्जून मला बोलवायची.

म्हाताऱ्या माणसांना कुणी वेळ देत नाही ती जे सांगू पाहतात ते कुणी ऐकून घेत नाही. त्यांना खूप काही सांगावस वाटतं. सतत कुणाजवळ तरी बसावं वाटतं. त्यांना जे खायची इच्छा असते ती गोष्ट ते सांगत नाहीत. पण एखाद आईस क्रिम (ice cream ) मुलांचा खाऊ जबरदस्तीने खाऊ घातला तर त्यांचा नकार हा लटका असतो. ऐन केन प्रकारे मी म्हातारीला जीव लावला. एक दिवस मी आणि माझ्या मित्राने मार्कंडा येथे म्हातारीला फिरायला घेऊन जायचा बेत आखला. आम्ही बाईकवरून रिमझिम पावसात फिरलो. म्हातारीला देवदर्शन घडवून आणले. म्हातारीचा सेल्फी घेतला. माझा फोटो तिला काढायला लावला. छत्री घेऊन वेगवेगळ्या पोजमध्ये आजी चा फोटो आम्ही घेत होतो. आजी मोहरुन जात होती. लाजत होती. आम्ही भेळ खाल्ली ice cream खाल्लं घरी आल्यावर मी स्वतः मित्राच्या मदतीने जेवण बनवलं. म्हातारीला खाऊ घातले.

दुसऱ्याच दिवशी आज्जी तिच्या गावी जाणार होती.मला तिथून निघायचं होतं. आमची आयुष्यात पुन्हा भेट होईल की नाही हे देखील माहीत नव्हत. निघताना मी तिचा सुरकुत्या पडलेला हात हातात घेतला. हात हातात घेऊन मोठ्या आवाजात तिला मी बौद्ध जयभिमवाला आणि पूर्वाश्रमीचा महार असल्याचे तिला खणखणीतपणे सांगितले.

ऐकताच म्हातारीनं मला पोटाशी धरलं. तिला हुंदका आला होता. ती रडवेली झाली होती. पुन्हा कधी भेटणार लेकरा म्हणून तिनं आवंढा गिळला. ती मला निरोप देत होती. मी तिचा कदाचित कायमचा निरोप घेत होतो. दोघांच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते. करुणेने टपकत असलेल्या आमच्या दोघांच्या अश्रुमध्ये जात धडधडा पेट घेत होती

Updated : 26 Aug 2023 12:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top