Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'तिळगुळ घ्या:गोड बोला' हा महाराष्ट्राचा स्वभाव बनतो आहे : हेरंब कुलकर्णी

'तिळगुळ घ्या:गोड बोला' हा महाराष्ट्राचा स्वभाव बनतो आहे : हेरंब कुलकर्णी

तिळगुळ घ्या गोड बोला 'हे आज सामाजिक वचन बनले आहे आणि त्याचा फटका समाजातील सर्वात गरीब जनतेला बसतो आहे, शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केलेले एक मुक्त चिंतन...

तिळगुळ घ्या:गोड बोला हा महाराष्ट्राचा स्वभाव बनतो आहे : हेरंब कुलकर्णी
X

आपल्या संस्कृतीत जे काही वेगळे सण आहेत.त्यात संक्रांतीचा समावेश करावा लागेल.मतभेद मिटवून प्रेम व्यक्त करणे यासाठी संक्रांतीचा सण हा खूप महत्त्वाचा आहे.दिवसेंदिवस त्याची सामाजिक गरज वाढतेच आहे. त्यामुळे या सणावर कोणतीही टीका टिप्पणी करण्याचा हेतू नाही. हे प्रथम लक्षात घ्यावे. 'तिळगूळ घ्या गोड बोला' हा एक वाक्प्रचार बनला आहे त्याबद्दल मला लिहावेसे वाटते.महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके शिक्षण विभागाच्या बैठकांमध्ये नेहमी म्हणायचे की अधिकारी कठोर होत नाहीत.विद्यार्थीहितापेक्षा ते फक्त संबंध जपतात.तिळगुळ घ्या गोड बोला याच भूमिकेत असतात आणि तिळगुळ घ्या गोड बोला हेच वर्षभर सुरू असते असे ते म्हणायचे.. तो संदर्भ मला फार आवडला.

आज विचार करताना लक्षात येते की तो आपला सामाजिक स्वभाव बनतो आहे. चुकीला चूक म्हणायची नाही. आपले संबंध जपायचे. असे सर्वच क्षेत्रांमध्ये होते आहे का ? राजकारणात सुद्धा हे स्पष्टपणे जाणवते.विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचे कोणत्या पातळीवर सेटिंग आहे हेच समजत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस संजय राठोड यांच्या प्रकरणात जितके आक्रमक होतात तितके धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात होत नाहीत असे अनेक वेगवेगळे पदर राजकारणात दिसू लागतात. नरेंद्र दाभोळकर एकदा गमतीने मला म्हणाले होते की तामिळनाडूच्या राजकारणात एखाद्या पक्षावर टीका केली की ती त्याच पक्षाला लागते महाराष्ट्रात एखाद्या पक्षावर बोललो ते दुसऱ्या पक्षातल्या कोणत्या नेत्याला राग येईल हे सांगता येत नाही.. या प्रकारामुळे राजकारणात जनतेचे प्रश्न कुठल्याकुठे फेकले गेले. कोण कोणाचा मित्र आहे ? हेच समजत नाही. कोण कोणाला अंधारातच तिळगुळ देतो व उजेडात टीका करतो हेच समजत नाही.

हे राजकारणाचे झाले. परंतु सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातही चुकीला चूक म्हणण्याची वृत्ती कमी होते आहे. पुरस्कारवापसी ही आक्रमक मोहीम सोडली तर इतर साहित्यिक, बुद्धिवादीसुद्धा सरकारवर टीका करताना दिसत नाहीत.दुर्गा भागवत,विजय तेंडुलकर,पुष्पा भावे यांचा निर्भीडपणा व अलीकडे लक्ष्मीकांत देशमुख हे 'राजा तू चुकतो' आहेस हे ठामपणे साहित्य संमेलन अध्यक्षस्थानावावरून म्हणाले; त्यानंतर सांस्कृतिक व्यासपीठावरून सरकारला खडसावले असे प्रकार फारसे घडले नाहीत. किंबहुना राजकीय नेत्यांच्या स्वागत अध्यक्षपदाशिवाय साहित्य संमेलन नाही होत नाहीत. असेच दुर्दैवाने झाले आहे.

व्यक्तिगत जीवनात सुद्धा आपल्याला हेच जाणवते की एखाद्यासाठी वाईटपणा घेणे दुर्मिळ झाले आहे. पूर्वी ग्रामीण भागात एखाद्याच्या घरात एखाद्याने बायकोला मारले, घरात शेतीवाटपात चुकीची भूमिका घेतली तर संपूर्ण गाव एकत्र येऊन त्या चुकीला चूक म्हणायचं. पण आज असे जाणवते की तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे म्हणून गावातील प्रमुख लोक सुद्धा मध्ये पडत नाहीत. भांडण सोडवायला ही कोणी मध्ये उतरत नाही कारण लोकांना दोन्हीकडच्या लोकांशी संबंध चांगले ठेवायचे असतात हे सर्व स्तरात पसरले आहे त्यामुळे भूमिका चूक की बरोबर हा प्रश्नच उरला नाही तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे म्हणून लोक मध्ये पडत नाहीत.

नोकरशाही आणि कार्यकर्ते या नात्यातही ग्रामीण भागात ते जाणवते. पूर्वी सरपंच व राजकीय कार्यकर्तेही अतिशय आक्रमक संस्था होती. तहसीलदार च्या केबिन मध्ये उभे राहून मोठा आवाज चढवून आपल्या गावाचे प्रश्न हे सरपंच लोक मांडायचे पण आज जाणवते असे ज्याप्रमाणात विकास योजनांसाठी पैसा खेड्यापाड्यात यायला लागला. त्यातून लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या अजिबात वाटेला जात नाहीत.उलट त्यांना साहेब म्हणतात. त्यांनी ते मंजूर करावे गावात यावे. यासाठी अजिजी करतात.कितीतरी राजकीय कार्यकर्तेच ठेकेदार झाल्यामुळे अधिकाऱ्यांशी जमवून घेतात. त्यामुळे गावातील शाळा, दवाखाना, रोजगारहमीची कामे, रस्त्याची कामे याबाबत कितीही तक्रारी असल्या तरी गाव पातळीवरून आक्रमक आवाज उठत नाही. असेच जाणवत राहते. गावात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गावातील राजकीय कार्यकर्त्यांचा वचक असायचा पण सर्वजण एकमेकांशी गोड संबंध ठेवण्याच्या मूडमध्ये असल्यामुळे तो वचक अजून कमी झाला. त्यातून जाब विचारणे ही थांबले.त्याचा परिणाम गावातील विविध सेवांवर झाला.

सर्व प्रमुख कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवायचे. सर्व राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांशी गोड बोलायचे व आपले व्यक्तिगत महत्त्व तालुक्यात वाढवायचे. अशी स्थिती बहुतेक राजकीय कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करणे हे दिवसेंदिवस खूप दुर्मिळ होताना दिसत आहे.

नोकरशाहीच्या उतरंडीतसुद्धा असेच जाणवते पूर्वी कार्यालयाच्या प्रमुखाचा कर्मचाऱ्यांवर धाक असायचा राज्य पातळीवरील अधिकारी अतिशय कडक असायचे. त्यांची भीती जिल्ह्याला व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची भीती तालुका अधिकाऱ्यांना असायची पण जसे आर्थिक भ्रष्टाचार वाढले त्यातून नवे हितसंबंध तयार झाले. त्यातून एकमेकांना सांभाळून घेणे वाढले. त्यातून कोणालाच कोणाची भीती वाटत नाही. उलट अतिशय स्नेहपूर्ण संबंध तयार झाले आहेत. वर्षभर तिळगुळ वाटप सुरू आहे. अधिकारी पूर्वी चिडचिड करण्याचे एक कारण जनतेचे प्रश्न हा त्यांचा प्राधान्यक्रम असायचा व खालच्या कर्मचाऱ्यांनी ते काम केले नाही तिथे ते संतापायचे. पण आज जनतेचे प्रश्न हा मुद्दाच कमी कमी होताना कशाला आपण लोकांच्या प्रश्नांसाठी उगाच वाईटपणा घ्यायचा ? अशी मानसिकता बनली आहे. जनता महत्वाची की आपला कर्मचारी महत्त्वाचा अशा मानसिकतेत कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग जातो आहे.

' तिळगुळ घ्या गोड बोला 'हे आज सामाजिक वचन बनले आहे आणि त्याचा फटका समाजातील सर्वात गरीब जनतेला बसतो आहे. त्यातून प्रत्यक्ष आंदोलनेही कमी होत आहेत हे लक्षात येते. ज्या माध्यमांनी हे सारे प्रश्न धसास लावायचे ती माध्यमेही राजकीय दडपणामुळे म्हणा किंवा मालकांच्या भूमिका बदलल्यामुळे म्हणा अतिशय बदलली आहेत टीका, संघर्ष हळूहळू कमी होऊन त्यांचा प्रवासही मनोरंजनाकडे किंवा सौम्य होण्याकडे होतो आहे. यावर तर अनेकदा अनेक पद्धतीने लिहिले गेले आहे.

काही सामाजिक राजकीय कार्यकर्ते अधिकारी,सरपंच, ग्रामीण कार्यकर्ते हे वरील स्थितीला नक्कीचअपवाद आहेत पण ती संख्या खूप खूप कमी आहे. आपले राजकीय जीवन सांस्कृतिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन कोणीच कोणाला दुखवायचे नाही चुकाबद्दल बोलायचे नाही. फक्त व्यक्तिगत संबंध जपायचे असे झाले आहे.याचा फटका समाजाच्या तळातल्या माणसांना बसतो आहे. यांचे प्रश्नच गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंत पुढे येत नाहीत. हे मात्र दुर्दैव आहे ....

हेरंबकुलकर्णी

Updated : 2022-01-15T17:36:06+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top