Home > मॅक्स ब्लॉग्ज > पत्र नव्हे प्रताप !

पत्र नव्हे प्रताप !

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बने राजकीय भूकंप घडवून आणला यासंदर्भात विश्लेषण केले आहे,ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी..

पत्र नव्हे प्रताप !
X

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात वादळ उठले आहे. या पत्राच्या पुढच्या मागच्या घटना घडामोडींचा बारकाईने विचार करूनच या पत्राचा अन्वयार्थ लावावा लागेल. तसे केले तर त्यातून अनेक अर्थ निघू शकतात आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाच्या अनेक शक्यता समोर येऊ शकतात.

प्रताप सरनाईक हे ठाण्यापुरते चर्चेत असलेले नाव होते. अशा स्थानिक पातळीवरच्या महापालिका, जिल्हा परिषद पातळीवरच्या नेत्यांची एखादी चमत्कृतीजन्य कृती त्यांना राज्याच्या पातळीवर प्रसिद्धी मिळवून देते. टीआरपीसाठी वखवखलेल्या वृत्तवाहिन्यांच्या सर्वात पुढे राहण्याच्या वृत्तीमुळे अशा फालतू गोष्टींना अवास्तव महत्त्व प्राप्त होते. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करूनही अलीकडे अशा गोष्टी करणे शक्य होते. रमेश वांजळे यांच्यासह काही गोल्डमॅन अशाच चमत्कृतीजन्य व्यवहारांमुळे राज्यभर चर्चेत आले. घाटकोपरचे राम कदम पंचवीस लाख बक्षिसांची हंडी लावून प्रसिद्धीच्या झोतात आले, परंतु त्यांनी बक्षिसांमध्ये फसवाफसवी केल्याचीही खूप चर्चा झाली. नाम नही, बदनाम सही या वृत्तीमुळे फसवणुकीचाही त्यांना फायदाच झाला. प्रताप सरनाईक यांच्याबाबतीतही असेच झाले. सिद्धीविनायक मंदिराला एका भक्ताने भेट दिलेला हिरेजडित मोबाईल २००८मध्ये वीस लाखांना खरेदी करून प्रताप सरनाईक राज्यपातळीवर चर्चेत आले. हा मोबाईल त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना भेट देण्याचे जाहीर करून आपण अजितदादांचे तानाजी मालुसरे असल्याचा डंका पिटला. अजितदादा असल्या भंपकपणाला थारा देत नसल्यामुळे त्यांनी तो मोबाईल सिद्धीविनायक मंदिराकडे परत दिला. तो मोबाईल पुढे कुणाकडे गेला, याचा तपशील काही वाचण्यात ऐकण्यात आला नाही. तर प्रताप सरनाईक यांनी २००८ साली अजितदादांवरील प्रखर निष्ठा प्रदर्शित केली आणि २००९ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश करून ते शिवसेनेचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे तानाजी मालुसरे बनले. या इतिहासाची उजळणी एवढ्यासाठीच की, आज उद्धव ठाकरे यांचे तानाजी मालुसरे असलेले सरनाईक काही महिन्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तानाजी मालुसरे बनले तरी आश्चर्य वाटायला नको!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ जूनला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आधी ते अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासोबत भेटले. नंतर एकट्यानेच मोदींशी अर्धा तास चर्चा केली. ही चर्चा राजकारणासंदर्भात होती, की मोदींकडे असलेल्या फाईलींसंदर्भात होती याचा तपशील त्या दोघांनाच ठाऊक! याचा अर्थ असा असू शकतो, की दिल्लीत जी भेट झाली, ती उद्धव ठाकरे यांच्या इच्छेनुसार नव्हे, तर मोदींच्या इच्छेनुसारच झालेली असू शकते. अर्थात शक्यतांचाच विचार करायचा असल्यामुळे ही शक्यताही विचारात घेतली तर तो धागा पकडूनही आणखी एखादा पतंग उडवता येऊ शकेल. तर आठ जूनला ही भेट झाली आणि दुस-याच दिवशी म्हणजे नऊ जूनला प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहिले. शिवसेनेच्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागायला अकरा दिवस जावे लागले. अर्थात असली पत्रे कुणी पत्रकार फोडत वगैरे नसतात. ती सोयीस्कररित्या माध्यमांकडे पोहोचवली जातात. हे पत्र मुख्यमंत्र्यांच्या गोटातून फोडले गेले, की प्रताप सरनाईक यांनी एवढाच प्रश्न उरतो. शिवसेनेचा वर्धापनदिन आणि त्या दिवशीचे उद्धव ठाकरे यांचे संबोधन झाल्यानंतर दुस-या दिवशी हे पत्र बाहेर काढण्यात आले,हा कालक्रमही लक्षात घ्यावा लागतो. राजकीय चर्चा व्हावी यासाठीच असल्या पत्रांचे उपद्व्याप केले जात असतात. परंतु शिवसेनेचा वर्धापनदिन असल्यामुळेच हे पत्र अकरा दिवस कसोशीने दाबून ठेवण्यात आले. वर्धापनदिन पार पडल्यानंतर दुस-या दिवशी `लेटरबॉम्ब` म्हणून ते बाहेर काढण्यात आले. त्याआधी ते बाहेर आले असते तर त्याचा उद्धव ठाकरे यांच्या त्यादिवशीच्या भाषणावर परिणाम झाला असता. स्वबळाच्या पिपाण्यांऐवजी त्यांना पत्रातील मुद्यांवर बोलावे लागले असते आणि अर्थातच ते शिवसेनेसाठी अडचणीचे ठरले असते.

या सगळ्या गोष्टींचा विचार करताना प्रश्न उपस्थित होतो की, प्रताप सरनाईक यांनी हे पत्र लिहिले आहे की, त्यांच्याकडून कुणी लिहून घेतले आहे? सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईमुळे त्रासून त्यांनी हा मार्ग स्वीकारल्याची एक शक्यता आहे. परंतु त्यातून दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की, शिवसेनेच्या आमदाराला व्यक्तिगत दुखण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहावे लागते, इतकी मुख्यमंत्री आणि आमदारांच्यातील दरी वाढली आहे काय? प्रताप सरनाईक यांच्यासारख्या मातोश्रीच्या जवळ असलेल्या आमदाराची ही अवस्था असेल तर बाकीच्या आमदारांची काय स्थिती असेल, याचा विचार केलेला बरा!

दुसरा जो मुद्दा आहे तो प्रताप सरनाईक यांच्याकडून हे पत्र लिहून घेतले असेल तर ते कुणी? शिवसेनेतल्या त्यांच्यासारख्याच अन्य सुपातल्या मंडळींनी की थेट शिवसेना नेतृत्वाने? यापैकी कुणीही नसेल तर मग शिवसेनेला सोबत घेऊन पुन्हा सत्तेच्या बोहल्यावर चढण्यासाठी आतुर झालेल्या भाजपच्या नेत्यांनी पत्रासाठी त्यांच्यावर दबाव आणला असेल का? नाहीतर मग थेट ईडीच्या अधिका-यांनीही त्यांना पत्र लिहिण्यासाठी भरीस घातलेले असू शकते. नाहीतर अभाविप, भाजयुमो, महिला आघाडी अशा भाजपच्या अनेक आघाड्यांपैकी ईडी हीसुद्धा भाजपची एक आघाडी म्हणूनच काम करू लागली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटापासून अँटिलियापर्यंतच्या अनेक प्रकरणात ईडीची तशी भूमिका समोर आली आहे. तेव्हा प्रताप सरनाईक यांच्यामार्फत चर्चेला तोंड फोडून आमदारांच्यामार्फत शिवसेना नेतृत्वावर दबाव आणण्याचे नियोजन असू शकते. खरोखर प्रताप सरनाईक यांनी शरणागती पत्करली आहे की, शिवसेनेनेच ती स्वीकारली आहे आणि त्यासाठीची नेपथ्यरचना म्हणून प्रताप सरनाईक यांना पुढे केले आहे, याचे उत्तर मिळण्यासाठी थोडी कळ काढावी लागणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले, तेव्हा संभाव्य धोक्यांचा विचार त्यांनी केला असणार. अशा परिस्थितीत प्रताप सरनाईक यांचे पत्र त्यांच्यासाठी दखलपात्र ठरत नाही. परंतु ते जर लिहून घेतले गेले असेल तर मात्र त्याचे गांभीर्य वाढते. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक आणि शिवसेना या दोहोंनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, की जो ईडीला घाबरतो तो एकतर भाजपमध्ये जाऊन लाचारीचे आयुष्य पत्करतो किंवा राजकारणात संदर्भहीन बनतो. जे ईडीशी लढतात तेच सन्मानाने जगतात, त्यांचेच भवितव्य उज्ज्वल असते. उदाहरणादाखल जगनमोहन रेड्डी, शरद पवार, छगन भुजबळ, डी. के. शिवकुमार, पी. चिदंबरम अशी काही प्रातिनिधिक नावे घेता येतील. शरद पवार यांनी ईडीला आव्हान दिले, म्हणून ते महाराष्ट्रात भाजपला एका मर्यादेत रोखू शकले आणि त्याचमुळे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊ शकले. जगनमोहन रेड्डी, छगन भुजबळ, डी. के. शिवकुमार दीर्घकाळ तुरुंगाची हवा खाऊनसुद्धा डगमगले नाहीत, त्याचमुळे आजही ते खंबीरपणे उभे आहेत.

प्रताप सरनाईक यांच्या पत्राचा आणखी एक थेट अर्थ म्हणजे, भाजपशी पंगा घेऊन आपल्याला कोणतेही गैरव्यवहार करता येणार नाहीत किंवा गैरव्यवहारांना संरक्षण मिळणार नाही. आपले दोन नंबरचे धंदे सुरू ठेवायचे असतील तर भाजपशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही, असेच सरनाईक यांनी पत्रातून सुचवले आहे. त्यामुळे आपल्या अनुयायांच्या गैरव्यवहारांना संरक्षण मिळावे यासाठी भाजपशी जुळवून घ्यायचे, की ज्या स्वाभिमानी बाण्याने भाजपला शिंगावर घेतले आहे, तो बाणा कायम टिकवून भाजपशी संघर्ष करायचा असे दोनच पर्याय शिवसेना नेतृत्वापुढे उरतात.

इति सरनाईक पत्र प्रताप समाप्त !

Updated : 22 Jun 2021 2:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top