Home > मॅक्स ब्लॉग्ज > बीच का रास्ता नहीं होता...

बीच का रास्ता नहीं होता...

नथुराम हा दहशतवादी आहेच, त्याच उद्दात्तीकरणं तर त्याहून वाईट आहे....त्यामुळं २०१७ नंतर कोल्हे यांच्यात विचारसरणीत थोडेफार बदल झालेत हे मान्य करावं लागेल.. त्यामुळं चूक तर चूक, बरोबर तर बरोबर, उजवी तर उजवी अन डावी तर डावी पण भूमिका घ्यावी असं विश्लेषन केलं आही पत्रकार अश्विनी सातव डोके यांनी..

बीच का रास्ता नहीं होता...
X


आमच्या जवळच्या शिरुर मतदार संघातून अगदी अलीकडे म्हणजे २०१९ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करत खासदार म्हणून निवडून आलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे नथुरामाची भूमिका साकारत असल्याची ब्रेकिंग आली....डॉ. कोल्हे यांनीच आपल्या वैयक्तिक फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत ही ब्रेकिंग दिली.....तेव्हापासून मी ही पोस्ट लिहीपर्यंत आणि दुसरा नवा विषय मिळेपर्यंत डॉ. कोल्हे ट्रोल होत राहणार यात शंका असण्याचे कोणतेच कारण नाही....आपल्या सगळ्यांना सारं काही लवकर विसरायची सवय आहे....

असो.

तर मुद्द्यावर येऊयात.....केवळ राष्ट्रवादीत प्रवेश केला....राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार झालं म्हणजे डॉ. कोल्हे हे जन्मापासूनच पुरोगामी आहेत....असं मानणं हेच हास्यास्पद आहे....जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव सारख्या एका गावातून कोल्हे येतात....सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आणि अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमीवर नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटूंबात कोल्हे लहानाचे मोठे झालेत....अभिनयाची आवड असल्यानं मेडिकलचं शिक्षण घेऊन देखील त्यांनी अभिनयातच करीयर केलं. अभिनयाच्या क्षेत्रात जम बसवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली....अगदी 'कुकिंग शो' पासून मिळेल त्या भूमिका त्यांनी साकारल्या....त्यानंतर २००८ साली छत्रपती शिवाजी महाराज या मालिकेद्वारे कोल्हे यांना ब्रेक मिळाला अन् कोल्हे घराघरात पोहोचले....

छत्रपती शिवाजी महाराज या मालिकेने कोल्हे यांना मिळणाऱ्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी शिवसेनेने त्यांना आपल्यात सामावून घेतलं आणि त्यांनीही हातात शिवबंधन बांधलं.... पण राजकारणात आल्यावर पोटाचा प्रश्न सुटतोच असं सगळ्यांच्या बाबतीत होत नाही..... कोल्हेंच्या बाबतीतही तेच झालं. अभिनयाची आवड असल्यानं कोल्हे तिकडेही अभिनयाच्या क्षेत्रात कामाच्या शोधात होते...दरम्यानच्या काळात काही छोटे मोठे चित्रपटही केलं.... शिवसेनेलाही 'जय महाराष्ट्र' केला....

त्यानंतर पुन्हा संभाजी मालिकेद्वारे कोल्हे यांची लोकप्रियता यशाच्या शिखरावर पोहोचली....कोल्हे पुन्हा घराघरात पोहोचले....निवडणुका जवळ आल्या....मोदी लाट काही ओसरत नव्हती....राष्ट्रवादीला शिरुर मध्ये उमेदवार मिळत नव्हता... मग कोल्हे यांना राष्ट्रवादीने आमंत्रण दिलं.... नुसतं आमंत्रण नाही तर सोबतीला शिरूरची उमेदवारीही दिली....त्यानंतर साताऱ्यातल्या पावसाच्या सभेने जे वातावरण फिरलं... अगदी तसचं नाही....पण, कोल्हे यांच्या सभेतल्या भाषणांनीही थोडं फार वातावरण फिरवलं... हे राष्ट्रवादीतले जेष्ठ नेते खासगीत तरी मान्य करतील....कोल्हे यांनी सभांना गर्दी जमवली....भाषणं ठोकली इतकचं नव्हे तर त्याच रूपांतर हे काही प्रमाणात मतदानात ही केलं..... स्वतः खासदार म्हणून निवडून संसदेत गेले.....

राष्ट्रवादीचे खासदार झाल्यावर कोल्हे हे नखशिखांत पुरोगामी आहेत असा भाबडा समज इथल्या तमाम राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा झालाय....पण मुळात कोल्हे यांची पार्श्वभूमीवर लक्षात घेतली तर त्यांची कोणतीही एकच एक वैचारिक बैठक नाहीये...ना ते कोणत्या 'ईझम'ला फॉलो करतात...अगदी शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात कोणत्या एखाद्या प्रश्नावर कोल्हे यांनी निषेध केल्याची कुठे नोंद आहे?

तर मूळ मुद्दा असा आहे....'कोल्हे हे नेता होण्या अगोदर अभिनेता आहेत....' २०१७ ला हातात काहीच काम नसताना त्यांनी नथुरामाची भूमिका स्वीकारली...आता ती भूमिका आव्हानात्मक वाटली अस कोल्हे कितीही म्हणत असले... तरी, यामुळं आपण चर्चेत येणार हे त्याही वेळी त्यांना ठाऊक होतं...त्यामुळं पुढच्या काळात आणखी एक दोन कामे मिळून पैसा मिळेल हेही माहिती होत... म्हणजे ही भूमिका साकारण्याचा हेतू हा 'व्यावसायिक' होता, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.... पण योगायोग म्हणा किंवा आणखी काही २०१७ ला भूमिका साकारून हा चित्रपट त्यावेळी प्रदर्शित झालाच नाही....पुढे संभाजी मालिका आली आणि कोल्हे यांचा मार्ग बदलला....

हा मार्ग बदलल्यानंतर आता २०१७ साली त्यांनी केलेला चित्रपट २०२२ मध्ये OTT वर येतोय....त्यात नथुरामाची भूमिका कोल्हे करतायेत....चर्चा आरोप तर होणारचं.... होतायेत....पण जर २०१७ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला असता तर....? हा देखील विचार व्हावा...कोल्हे यांना ट्रोल करताना मनोहर भिडेला राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी कसं बळ दिलं.... देत आहेत.....पहाटेचा शपथविधी कसा झाला,खैरलांजी हत्याकांडाचे आरोप असणाऱ्या आरोपींची पाठराखण करणारे मधुकर कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते, हे देखील रिकॉल करा आणि पुरोगामी विचारांचा पक्ष हे लेबल लावून बघा आता...बरं हे जे करतायेत ते तर जन्मापासून पुरोगामी आहेत.... त्यांच्या रक्ता रक्तात पुरोगामीत्व आहे....पण कोल्हेंच तर असं काहीच नाहीये....

आता शेवटाला थोडक्यात, नथुराम हा दहशतवादी आहेच, त्याच उद्दात्तीकरणं तर त्याहून वाईट आहे....त्यामुळं २०१७ नंतर कोल्हे यांच्यात विचारसरणीत थोडेफार बदल झालेत हे मान्य करावं लागेल... (असं मला वाटतं...) २०१९ ते २०२२ या कालावधीत जे काही पुरोगामीत्वाचे धडे त्यांना मिळालेत त्यानुसार त्यांनी पुढचा प्रवास करावा ही अपेक्षा आहे....अन सर्वात महत्वाचं म्हणजे कवी पाश म्हणतो, बीच का रास्ता नहीं होता....

त्यामुळं चूक तर चूक, बरोबर तर बरोबर, उजवी तर उजवी अन डावी तर डावी पण भूमिका घ्यावी....

ता.क.-

कोल्हे यांनी खासदार म्हणून संसदेत शेतकरी कायद्या विरोधात केलेलं भाषण आठवा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलेल्या शुभेच्छा आठवा...कोरोना काळात झालेल्या मृत्यू बद्दल केलेलं भाषण आठवा....लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असण्याबाबत केलेलं भाषण आठवा....बैलगाडा शर्यत सुरु होण्यासाठी केलेली भाषणं आठवा.....अन मतदारसंघात स्थानिक प्रस्थापित नेत्यांकडून होणाऱ्या कोंडीला तोंड देत ते जे काही काम करत आहेत तेही आठवा....

अश्विनी सातव डोके.

Updated : 21 Jan 2022 8:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top