Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'मधाचे गाव' म्हणून महाबळेश्वर च्या 'मांघर' गावची निवड.

'मधाचे गाव' म्हणून महाबळेश्वर च्या 'मांघर' गावची निवड.

मधमाशांची घटती संख्या संपुर्ण सजिव सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांसाठी घातक आहे. अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून मधमाशांचे कार्य अनन्यसाधारण असेच आहे. खादी ग्रामोद्योग विभागाच्या पुढाकाराने मांघर हे गाव मधाचे गाव म्हणून पुढे येत आहे. खादी व ग्रामोद्योग विभाग, मुंबई चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी याविषयी लिहिलेला सविस्तर लेख नक्की वाचा...

मधाचे गाव म्हणून महाबळेश्वर च्या मांघर गावची निवड.
X

पर्यावरणात मधामाशांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्नसाखळीत मधमाशी महत्वाचा घटक आहे. शेतीपिक उत्पादनात मधमाशांमुळे ३५ ते ४० % परपरागीकरणामुळे वाढ होते. निसर्गातील मधमाशांची घटती संख्या आपल्या पिकउत्पादनावर सरळ परिणाम करणार आहेत. त्यामुळे मधाचे गाव लोकांना निसर्ग व मधमाशांमुळे होणारे फायदे समजण्यासाठी उपयोगी पडेल. मधाचे गाव या संकल्पनेमुळे लोकांना गावातच कायमचा रोजगार मिळणार आहे. महिलांना हा उद्योग फायदेशीर होणार आहे.

मध मेण यांचे उत्पादनांची विक्री करुन इतर उप उत्पादने देखील मधाच्या गावात मिळतील राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मागील साठ वर्षापासून मधमाशा पालन संदर्भात कार्यरत आहे. मधमाशांचा विकास व विस्तार व्हावा या उद्देशाने १९५७ साली मध संचालनालयाची स्थापना देखील महाबळेश्वर ला करण्यात आली आहे. मधमाशांची घटती संख्या संपुर्ण सजिव सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांसाठी घातक आहे. अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून मधमाशांचे कार्य अनन्यसाधारण असेच आहे. आज जागतिक स्तरावर देखील मधमाशांच्या संवर्धनासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत.





मधमाशांची संख्या वाढावी तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा, जंगल व डोंगराळ भागातील लोकांना कायमस्वरुपी रोजगार मिळावा ,कृषी पर्यटनाच्या धर्तीवर मधुपर्यटन ही संकल्पना रुजावी या मुख्य उद्देशाने खादी ग्रामोद्योग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंन्शू सिंन्हा यांनी 'मधाचे गाव' ही संकल्पना मांडली. या संकल्पनेला साकारण्यासाठी खादी ग्रामोद्योग विभागाने कामकाज सुरु केले आहे. 'मांघर' या महाबळेश्वर तालुक्यातील गावाची निवड 'देशातील पहिले मधाचे गाव' म्हणून करण्यात आली आहे. या बाबतची घोषणा लवकरच राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई करणार आहेत. मांघर गावातील एकूण लोकसंख्येच्या ऐंशी टक्के लोक मधमाशापालन करीत आहेत. या गावाच्या आजूबाजुला घनदाट जंगल असून वर्षभर राहणारा फूलोरा आहे.

या गावाने आज अखेर शासनाचे जवळपास दहा पुरस्कार मिळवले आहेत. स्वातंत्र्य नंतर आज पर्यंत या गावात निवडणूक झाली नाही. सुंदर स्वच्छ असणाऱ्या या गावात मधमाशांमुळे समृद्धी आली आहे. या सगळ्याचा विचार करुन मांघर गावची निवड करण्यात आली आहे. महाबळेश्वर ला येणारे लाखो पर्यटक या गावाला भेट देऊन येथील मधपाळांनी संकलीत केलेला शुद्ध मध चाखणार आहेत. या गावात सामूहीक मधमाशांचे संगोपन केले जात आहे. प्रत्येक ग्रामस्थांच्याकडे कमीत कमी दहा मधमाशांच्या पेट्या आहेत. मधमाशांच्या पासून मध मेण व इतर उत्पादने तयार करण्यासाठी या गावात मधमाशांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संकलीत केलेला मध गावच्या ब्रँन्डने विकला जाणार आहे.





गावात मधमाशांची माहीती देणारे फलक लावण्यात येणार असून संपुर्ण गाव मधमाशांच्या विविधतेने सुशोभित केले जात आहे. मधमाशांच्या माध्यमातून गावातील शेती ला सेंद्रीय प्रमाणिकरण करून आणि लोकांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध विभागांच्या योजना मांघर गावात प्रभावीपणे राबविण्याचा मानस आहे. नुकतेच वन विभागाच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली.

शेतीपिकांवर दिंवसेंदिवस वाढत असलेली रासायनिक किटकनाशके आणि खते यांच्या प्रभावाने मित्रकिडी आणि मधमाशांसारखे किटक नाश पावत आहेत या बाबतची जनजागृती करण्यासाठी मधाच्या गावाचे नियोजन केले आहे. 'मधाचे गाव' ही संकल्पना केवळ मांघर पर्यत सिमीत नसून राज्यातील इतर जिल्हात देखील राबविण्यात येणार आहे. मधमाशांच्या परपरागिकरणामुळे शेतीपिक उत्पादनात भरघोस वाढ होत असते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी मधमाशापालनाकडे वळण्यासाठी 'मधाचे गाव' हे मैलाचा दगड ठरेल असा विश्वास आहे.

- बिपीन जगताप
उप मुख्य कार्यकारी अधिकारी
खादी व ग्रामोद्योग विभाग, मुंबई.

Updated : 20 May 2022 7:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top