Home > मॅक्स ब्लॉग्ज > Brain Rot Generation : डोपामिनच्या जाळ्यात अडकून तुमचा मेंदू कुजतोय!

Brain Rot Generation : डोपामिनच्या जाळ्यात अडकून तुमचा मेंदू कुजतोय!

तुमच्या मेंदुतला डोपामिन स्क्रीन स्क्रोलिंगचा कसा नाद लावतोय? रिल्स कशी तयार करतेय ब्रेन रॉट पिढी? १५ सेकंदांच्या जगात बंदिस्त झालेल्या पिढीच्या खांद्यावर पुढचा देश, पुढचं विज्ञान, पुढचं तंत्रज्ञान उभं राहणार आहे. आणि हि पिढी कुठंय? वाचा डॉ. नानासाहेब थोरात यांचा अतिमहत्त्वपूर्ण लेख

Brain Rot Generation : डोपामिनच्या जाळ्यात अडकून तुमचा मेंदू कुजतोय!
X

तुमचा मेंदू कुजतोय! - डोपामिनच्या जाळ्यात अडकलेली पंधरा सेकंदाच्या बंधिस्त जगातील 'ब्रेन रॉट' पिढी.

मिलेनियल्स, जेंझी, अल्फा जनरेशननंतर Millennials, Gen Z, and Alpha Generation ऑक्सफर्ड डिक्शनरीने एक नवीन शब्द आणलाय "ब्रेन रॉट" Brain Rot जनरेशन.

"अधाश्यासारखे इंस्टाग्राम, टिकटॉक, युटूबवरील Instagram, TikTok, YouTube पंधरावीस सेकंदाच्या रिल्स तासंतास पाहून झोंबीसारखे त्याच्या आहारी जाऊन स्वतःचा मेंदू कुजवून घेणारी पिढी" हा ब्रेन रॉट या शब्दाचा अर्थ होतोय. चार वर्षाच्या लेकरापासून ते सत्तर वर्षांचे म्हातारे, मिलेनियल्स, जेंझी, अल्फा हे आता ब्रेन रॉटचे झोंबी Brain Rot Zombies झालेत. ऑक्सफर्ड डिक्शनरीने तर या शब्दाला २०२४ मधील "word of the year " म्हणून घोषित केला.

कामावरून बसने-कारने घरी जाणारी मिलेनियल्स, गावभर उंडारत फिरणारी झेंजी, नाहीतर काहीच काम नाही म्हणून निवांत बेडवर सोफ्यावर लोळत पडणारी अल्फा, सगळी पिढी आता फक्त ब्रेन रॉट झाली आहे. रिल्स स्क्रोल करून - करून आता कुठंतरी थांबावं, पण नाही. जरा mobile screen मोबाईलच्या स्क्रीनवरून बोटं बाजूला झाली कि brain मेंदूतून जोराची सनक येतेय, समोर दिसेल त्याच्यावर चिडचिड होतेय "झोंबी स्क्रोलिंग" Zombie Scrolling. एवढा वेळ डोळ्यांची दिवाळी आणि मेंदूचा भुगा करून काहीच कसं मिळालं नाही याची अजूनच सणक येत असेल तर अभिनंदन तुम्ही तुमची एक नवीनच पिढी तयार केली आहे new generation.

आणि हो तुमच्यासारखे असे लाखोजण तुमच्या आजूबाजूला सोशल मीडियाचे रक्तपिपासू झोंबी आहेत "ब्रेन रॉटस" bloodthirsty zombies of social media – "Brain Rots"

सुरवातीला या शब्दला विरोध झाला अशी काही पिढी अस्तित्वातच नाही त्यामुळे हा शब्द माघारी घ्या म्हणून लोकांनी आवाज उठवला. पण कोंबड झाकलं म्हणून दिवस उगवायचा थांबत नाही या म्हणीप्रमाणे researchers in Australia ऑस्ट्रेलियातील काही संशोधकांनी सुमारे एक लाख लोकांच्यावर मानसिक कसोटीच्या आधारवर प्रयोग आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन ब्रेन रॉट अस्तित्वात आहे हे सिद्ध केले. अगदी दोन आठवड्यापूर्वी त्यांनी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये American Psychological Association आपले संशोधन प्रसिद्ध केले आणि मग जगभरतील Media मीडिया जागी झाली, या पिढीच्या अस्तित्वाला विरोध करणारे नास्तिक अचानक पुन्हा ब्रेन रॉटचे आस्तिक झाले. हे संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणतायत ब्रेन रॉट फक्त एक मानसिक रोग नसून त्याच्याहीपुढ निघून गेला आहे जो आता एक शारीरिक दुष्परिणाम झाला आहे ज्याला डॉक्टर "न्यूरोकॉग्निटिव सिंड्रोम" neurocognitive syndrome असं म्हणतात जो मेंदूपेशींचे आतून नुकसान करतोय.

या सगळ्याच्या मागे एकच केमिकल लोचा आहे तो म्हणजे Dopamine "डोपामिन" तो नाद लावतोय, नवीन काहीतरी बघा, पुढं जावा अजून स्क्रिनवर बोटं फिरवा मग मी तुम्हाला आनंदी ठेवेन, तेच ते बघत राहिलात तर तो आनंद कमी करेन.

डोपामिन आपल्याला म्हणतं: “काहीतरी नवीन बघ… अजून बघ… अजून स्क्रोल कर… मी तुला लगेच आनंद देतो.” पंधरावीस सेकंद करत करत पुढं तासंतास डोकं त्यामध्ये गुरफटून जातेय आणि

शेवटी उरतोय रिकामपणा.... डोकं सुन्न करणारा. !!!!

मग हा मेंदूचा “रिवार्ड सिस्टम” reward system डोपामिन ओव्हरलोड होतोय, आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी मेंदूमधील डोपामिन रिसेप्टर कमी करतो. डोपामिन वारंवार वाढल्यामुळे मेंदूतील काही भाग सतत उत्तेजित राहतोय, सारखी सारखी उत्तेजना पाहिजेय त्याला, मग त्या उत्तेजनेच्या नादात एकाग्रता, निर्णय घेणे (Prefrontal cortex ) रोजच्या सवयी (Striatum) यांचा लय बिघडतोय आणि मग पुन्हा मेंदूच्या सर्किट्सवर ताण येतोय आणि आपले लक्ष एखाद्या कामावरून कमी होतेय. मग हे आशाळलेले मन मेंदूकडे अजून डोपामिनची मागणी करतेय.

विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर मेंदूमध्ये डोपामिन मुख्यतः मिडब्रेनमध्ये तयार होते त्यानंतर त्याला सुरक्षित पॅकेजमध्ये ठेवून सिनॅप्समध्ये सोडली जातात. सिनॅप्स हा एक जंक्शन आहे जिथे एक न्युरॉनने दुसऱ्या न्युरॉनशी संवाद साधतो, जेणेकरून मेंदूचा संदेश दुसऱ्या न्यूरॉन्सपर्यंत पोहोचेल. पुढे अति झालेलं डोपामिन transporters आणि एंझाइम्सद्वारे metabolize केलं जात म्हणजे हे होताना काही प्रमाणात reactive oxygen species (ROS) तयार होतात, जे जर जास्त झाले तर पेशींना oxidative stress होऊ शकतो. या नादात मेंदूच्या पेशींमध्ये ऑक्सिडेटिव स्ट्रेस वाढतो हा केमिकल स्ट्रेस म्हणजे पेशींमध्ये मोकळी फिरणारी विषारी रसायने, जी त्या पेशींना आतून वाळवीसारखे पोखरतात. हा मेंदूच्या पेशींमधील स्ट्रेस सारखाच वाढत राहिला तर पेशींची न भरून येणारी हानी होतेय या मेंदूपेशींना हा स्ट्रेस डॅमेज करायला सुरवात करतो. अशी स्थिती फक्त अत्यधिक किंवा pathological dopamine activity मध्ये होते, जसे की काही ड्रग्स वापरल्यास किंवा dopamine नियमन बिघडल्यास. हाच बिघडलेला डोपामिन पुढे जाऊन तो पेशींच्या प्रोटीन, DNA आणि ऊर्जा केंद्रांवर हल्ला करतो आणि मग जगण्यासाठी पेशींना जास्तीचा ऑक्सिजन वापरायला भाग पडतो. त्यातून सतत ऑक्सिडेटिव स्ट्रेस वाढू लागल्यास न्यूरॉन्स नीट काम करत नाहीत किंवा मरतात, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता कमी होते, मानसिक थकवा, चिंता, डिप्रेशन आणि अल्झायमर, पार्किन्सन सारखे न्यूरोडीजेनेरेटिव आजार होऊ शकतात.

खरेतर बाबा आमटे म्हणाले होते “देश उभा करायला आणि बुडती नाव वाचवायला समुद्रात झोकून देणारे कॅप्टन हवे असतात.” हे कॅप्टन अंगमेहनती असले पाहिजेत, तासंतास एकाग्रचित्त होऊन वाचन करणारे अभ्यास करणारे विचारवंत असले पाहिजेत. रात्रदिवस प्रयोगशाळेत प्रयोग करणारे शास्त्रज्ञच जपान-जर्मनीसारखे बेचिराख झालेले देश राखेतून उभा करू शकतात. पण आमचे जेंझी आणि अल्फा ज्यांच्यावर मिलनियल्सच्या म्हातारपणाच्या अपेक्षा आहेत त्यांची एकाग्रता पंधरा सेकंदावर आली आहे. आता पुढच्या पिढीतून कुठले अब्दुल कलाम आणि सीव्ही रामन...!!!

याच पिढीच्या खांद्यावर पुढचा देश, पुढचं विज्ञान, पुढचं तंत्रज्ञान उभं राहणार आहे. आणि हि पिढी कुठाय?

१५ सेकंदांच्या जगात बंदिस्त......

"अंगमेहनती लोक, सतत शिकणारे, वाचन करणारे, प्रयोग करणारे, विचार करणारे" जपान-जर्मनी राखेतून उभे राहिले ते अशा लोकांच्या कष्टांवर.

या पंधरा सेकंदाच्या व्यसनामुळं शास्त्रज्ञांना असं दिसून येतेय एक पिढीचं सामाजिक जीवनातून एकांतपणा घेतेय. कमी जीवन समाधान, आत्मसन्मान कमी, स्वतःच्या प्रतिमेबद्दल चिंता, नीट झोप न येणे, चिंता आणि एकटेपणा यांसारखे नकारात्मक परिणाम या ब्रेन रॉट पिढीमध्ये वाढतायत. पंधरा सेकंदांच्या जगात बंदिस्त असलेली ही पिढी तरी बदलू शकते; स्वतःला डिजिटल व्यसनापासून दूर ठेवून, एकाग्रता जपून, सतत शिकत राहून आणि विचार करून मेंदूला शांत होण्याची कला शिकवणारीच पिढी पुढील अब्दुल कलाम, सी.व्ही. रामन तयार करू शकते.

नाहीतर तुम्हाला माहित आहे का मेंदूचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे जो आजपर्यंत कोणताच शास्त्रज्ञ सोडवू शकला नाही....

"The brain loves the stimulation but struggles with the comedown"

मेंदूला उत्तेजना खूप आवडते, पण त्यानंतर शांत होणे त्याला कठीण जाते.

पंधरा सेकंदाच्या बंदिस्त जगातील ब्रेन रॉट "झोंबी स्क्रोलिंग" पिढी आता या मेंदूच्या जाळयात अडकत चालली आहे.

प्रा. डॉ. नानासाहेब थोरात,

फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन. लंडन.

[email protected]

Updated : 18 Dec 2025 2:22 PM IST
author-thhumb

प्रा. डॉ. नानासाहेब थोरात

प्रा. डॉ. नानासाहेब थोरात, फेलो ऑफ रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन. लंडन.


Next Story
Share it
Top