Bihar Election 2025: “सुबह कभी तो आयेगी”
साखळलेली स्वप्ने डोळ्यात घेऊन या आज्या, वेळ पडली तर काही मैल चालण्याचे कष्ट घेऊन, आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत, आपल्यासाठी राजकीय लोकशाही ठेवण्यासाठी!
X
“सुबह कभी तो आयेगी” म्हणत देशातील मागास भागातील गरीब प्रौढ स्त्री पुरुष प्रत्येक निवडणुकीत आवर्जून मतदान करायला जातात. बिहार मधील मतदारांनी विशेषतः स्त्रियांनी ऐतिहासिक उच्चांक नोंदवला आहे.
खालील फोटो प्रातिनिधिक आहे. काहीही नाव द्या सावित्री, फातिमा, ज्योती, लक्ष्मी, एलिझाबेथ काहीही; शहरातील घ्या नाहीतर खेड्यातील. स्वातंत्र्याला दीड वर्षांनी ऐंशी वर्षे होतील. त्या काळात देशाला स्वांतत्र्य मिळाल्यांनतर आपले राहणीमान सुधारेल म्हणून बघितलेली स्वप्ने, आता खरेतर साखळली आहेत. तरी देखील ती साखळलेली स्वप्ने डोळ्यात घेऊन या आज्या, वेळ पडली तर काही मैल चालण्याचे कष्ट घेऊन, आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत, आपल्यासाठी राजकीय लोकशाही ठेवण्यासाठी !
या कोट्यवधी सामान्य नागरिकांमुळे आपल्या देशातील “राजकीय लोकशाही” जिवंत आहे. आणि लोकशाही त्यांना रिटर्न मध्ये काय देते ? केलाय आपण कधी हा प्रश्न किमान आपल्याशी तरी? कोठून येते या लोकांना ऊर्जा कोणतेही कंपल्शन नसताना एव्हढे कष्ट घेऊन, जीव धोक्यात घालून, १० सेकंदाचे ते पवित्र कर्तव्य करण्यासाठी ? शहरी निष्क्रिय मध्यमवर्गीयांच्या नेहमीच्या गप्पा असतात: ” पैसे देऊन आणतात रे त्यांना” कोणत्याही प्रातिनिधिक गरीब मतदाराला विचारा: निवडणूक म्हणजे काय? तुम्ही का मतदान करता? ते शहरी माणसासमोर बोलणार नाहीत. पण या मतदारांना त्यांची उत्तरे माहित आहेत. ठामपणे माहित आहेत.
ते लोक मतदान करतात कारण त्यांना विश्वास आहे कि आज ना उद्या राजकीय लोकशाहीतून “आर्थिक” लोकशाही येईल. आपण म्हातारे झाले आहोत, एक दिवस मरणार हे माहित असून का येतात साखळलेली स्वप्ने मोतीबिंदूसारखी डोळ्यात घेऊन फिरणारी हि माणसे? कारण आपल्याला या देशाने फारसे काही नाही दिले तरी आपल्या नातवंडांना, पतवंडाना हा देश भविष्यात काही तरी देईल हा विश्वास असतोय त्यांच्या हृदयात कोठे तरी खोलवर
“सुबह कभी तो आयेगी आयेगी” हे गाणे या म्हाताऱ्यांना माहित नसेल कदाचित, पण ते जगत आहेत ते गाणे... त्यांच्या दृष्टीने राजकीय लोकशाही व आर्थिक लोकशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवू या, या आज्या, पणज्या, आजोबा, पणजोबांकडे स्वप्ने कधीतरी प्रत्यक्षात येतील म्हणून वाट पाहण्याची दशकानुदशकांची जी सहनशक्ती / पेशन्स आहे तो त्यांच्या नातवंडाकडे व पतवंडाकडे नसणार आहे.
संजीव चांदोरकर
लेखक, अर्थतज्ज्ञ
(साभार - सदर पोस्ट संजीव चांदोरकर यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)






