Politics of Reflections : “फडणवीस आणि ओवेसी : आरशातली लोकशाही”
देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवेसी एकाच आरशातले आवश्यक प्रतिबिंब... या दोघांच्या राजकीय भाषेचं, शब्दांचं विश्लेषण करणारा डॉ. सुभाष देसाई यांचा लेख
X
Mirror of Democracy लोकशाही ही आरशासारखी असते म्हणतात. पण आपल्या देशात हा आरसा थोडा खास आहे तो समोर उभ्याचं प्रतिबिंब दाखवतोच, पण इथे चेहेरे वेगळे असले तरी प्रतिबिंब एकमेकांशिवाय अपूर्ण आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवेसी हे केवळ विरोधी नाहीत; ते एकमेकांचे आरशातले आवश्यक प्रतिबिंब आहेत. शिवाय संघ प्रमुख म्हणतात हिंदू-मुसलमान, दलितांचा डीएनए एक आहे यामुळे अलिकडच्या निवडणुकीत त्यांची युती झाली होती. याच पार्श्वभूूमीवर या प्रतिबिंबाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.
देवेंद्र फडणवीस बोलतात तेव्हा शब्दांमध्ये प्रशासनाची शिस्त असते. विकास, स्थैर्य, कायदा-सुव्यवस्था हे त्यांच्या वाक्यांचे हमखास उपपद. ते सत्तेत असोत किंवा विरोधात, त्यांच्या वाक्यरचनेत सत्ता कायम राहते. कारण राजकारणात सातत्य म्हणजे भूमिका न बदलता संदर्भ बदलण्याची कला... आणि ती कला त्यांना उत्तम जमते.
असदुद्दीन ओवेसी बोलतात तेव्हा संविधान मंचावर येतं. अनुच्छेद, अधिकार, अल्पसंख्याक हे त्यांच्या भाषणांचे स्थायी भाव. ते मोठ्याने बोलतात, कारण त्यांना ऐकून घ्यायचं असतं; आणि आपल्या लोकशाहीत ऐकून घ्यायला अनेकदा आवाज वाढवावा लागतो असं त्यांचं ठाम मत आहे.
विडंबन इथे सुरू होतं.
फडणवीस बहुसंख्याकांचा आत्मविश्वास सांभाळतात; ओवेसी अल्पसंख्याकांची असुरक्षा मांडतात. फडणवीस गणित मोजतात; ओवेसी जखमा. दोघेही देशाबद्दल बोलतात पण देशाची व्याख्या वेगळी. आरशात पाहिलं तर चित्र असं दिसतं. ओवेसी नसते तर फडणवीसांचं राष्ट्रीयत्व अधिक सहज वाटलं असतं. फडणवीस नसते तर ओवेसींचं संविधान अधिक एकाकी वाटलं असतं. म्हणजे विरोध नसता, तर ओळखच धूसर झाली असती. फडणवीस “सर्वसमावेशकता” उच्चारतात तो शब्द नीट आहे, सुरक्षित आहे, आणि निवडणुकीपुरता लवचिक आहे.
ओवेसी “संविधान” म्हणतात तो मंत्र प्रभावी आहे, पण सर्वांना आपलासा वाटेल इतका व्यापक होतो का, हा प्रश्न राहतो. खरी लोकशाही कुठे हरवते? जेव्हा फडणवीस ओवेसींना केवळ राजकीय अडथळा मानतात आणि ओवेसी फडणवीसांना फक्त सत्तेचं प्रतीक समजतात. आरशात पाहताना दोघेही आपलंच प्रतिबिंब पाहतात; समोर उभा माणूस दिसतच नाही. लोकशाहीला नेते हवेत, आरसे हवेत; पण त्याहून जास्त हवी आहे... आरशाबाहेरची नजर. ती नजर जी बहुसंख्याकांना आत्मविश्वास देते आणि अल्पसंख्याकांना सुरक्षितता देते. ती नजर जी विकासाला न्यायाशी भिडवत नाही, आणि संविधानाला घोषणांपुरतं मर्यादित ठेवत नाही. तोपर्यंत एवढंच म्हणता येईल फडणवीस आणि ओवेसी हे विरोधक नाहीत; ते आरशातली लोकशाही आहेत. आरसा फुटला तर दोघेही जखमी होतील आणि लोकशाहीला मात्र कायमचं भेगाळलेपण येईल.
Indian Politics, Democracy,Devendra Fadnavis, Asaduddin Owaisi, BJP, AIMIM, Maharashtra Politics, Constitutionalism, Nationalism, Indian Constitution

डॉ. सुभाष के देसाई
वयाच्या 19व्या वर्षापासून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, पर्यटक, गिर्यारोहक, संशोधक, धर्म आणि विज्ञान विषयातील तज्ञ अशा विविध भूमिकेतून कार्यरत असणारे डॉक्टर सुभाष के देसाई हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. गुलमोहर आर्ट गॅलरी येथे संस्थापक आहेत दैनिक सिंहवाणीचे संस्थापक संपादक, पीटीआय, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, सकाळ, पुढारी अशा विविध वृत्तपत्रात लिखाण केले अकॅडमी ऑफ रिलीज युनिटी या विविध धर्मांना एकत्र आणणाऱ्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात त्यांनी 25 वर्षे योगदान केलेले आहे. जवळजवळ 30 देशांमध्ये, साऱ्या हिमालयात त्यांनी भ्रमंती केली आहे. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले जगातील आणि देशातील अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला याशिवाय स्वामी विवेकानंद या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर आजन्म प्रभाव राहिला ते अविवाहित असून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे त्यांनी जीवनाचे ध्येय ठेवले.





