Home > मॅक्स ब्लॉग्ज > प्रशांत किशोर यांचे मौन आणि राजदीप सरदेसाईंची शिट्टी

प्रशांत किशोर यांचे मौन आणि राजदीप सरदेसाईंची शिट्टी

प्रशांत किशोर यांच्यासारखी चेष्टा राजदीप सरदेसाई टीव्हीवर अमित शहा यांची करतील का? किंवा संन्यास घेतो म्हणाले तर का घेत नाही असे प्रश्न बिहार मधले ते धारदार पत्रकार अडवाणी यांना रिटायर केले तर मोदी यांनी निवृत्तीचा शब्द का पाळला नाही ? असा प्रश्न भाजप नेत्यांना विचारतील का ? नेहमी सॉफ्ट टार्गेटवर का पत्रकारांचा निशाणा असतो ? बिहार निवडणुकींच्या निमित्ताने मतदारांची सुज्ञता नेमकी कशी समजून घ्यायची ? यासंदर्भात हेरंब कुलकर्णी यांचा लेख

प्रशांत किशोर यांचे मौन आणि राजदीप सरदेसाईंची शिट्टी
X

Bihar बिहारमध्ये दारुण पराभव झालेले जनसुराज्य पक्षाचे Prashant Kishor प्रशांत किशोर आज आत्मचिंतन करण्यासाठी गांधी आश्रमात मौन धारण करून २४ तास बसले आहेत. नेहमीप्रमाणे हा एक स्टंट आहे अशा पद्धतीच्या बकवास पोस्ट येतीलच. प्रशांत किशोर हे सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे अनेक जण त्यांच्यावर तुटून पडले आहेत. Rajdeep Sardesai राजदीप सरदेसाई यांच्यासारखा जेष्ठ पत्रकार चॅनलवर शिट्टी वाजवत हाताने शून्याचे चिन्ह करत त्यांची खिल्ली उडवत होता तर भारतीय पत्रकारितेचे धारदार दर्शन प्रशांत किशोर यांच्या निवडणुकीनंतरच्या पत्रकार परिषदेत दिसते.

भारतीय पत्रकार Indian Journalist किती आक्रमक आणि बाणेदार आहेत सत्याचा शोध घेणारे आहेत ते राजकीय नेत्याची तमा न बाळगता त्याला कसे रडकुंडी आणतात हे त्या पत्रकार परिषदेत बघता आले. मनात फक्त इतकेच आले की अशी चेष्टा राजदीप सरदेसाई टीव्हीवर अमित शहा यांची करतील का? किंवा संन्यास घेतो म्हणाले तर का घेत नाही असे प्रश्न बिहार मधले ते धारदार पत्रकार अडवाणी यांना रिटायर केले तर मोदी यांनी निवृत्तीचा शब्द का पाळला नाही ?असा प्रश्न भाजप नेत्यांना विचारतील का ?

पण आपल्याकडे सॉफ्ट टार्गेट दिसले की त्यांना नैतिकता शिकवायला अनेकांना मजा वाटते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी एकदाच फक्त मते मागायला आले तर जोड्याने मारा असे एक संदर्भ घेऊन बोलले होते पण तेवढेच वाक्य तोडून घेऊन त्यांच्या मृत्यूनंतर अजूनही अनेक जण हातात जोडे घेऊन रस्त्यावर उभे आहेत.

पण असे तत्त्वनिष्ठ लोक त्यांचे धारदार प्रश्न फक्त सज्जनांसाठीच घेऊन येत असतात. आदल्या दिवशी राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष आहे असे पंतप्रधान म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी त्या पक्षाच्या नेत्यांना सत्तेत घेतात. आपदधर्म नाही नाही नाही, राष्ट्रवादी सोबत युती नाही असे मोठ्या आवाजात बोलणारे फडणवीस तीन वेळा एकत्र शपथ घेतात पण प्रशांत किशोर, शरद जोशी केजरीवाल यांचे उलट तपासणी करणारे तिथे मात्र चालायचेच, राजकारणात असेच असते असे म्हणत राहतात.

प्रशांत किशोरने पैसे कुठून आणले हे विचारणारे नगरसेवक निवडणुकीत कुठून खर्च करतो हे विचारायची हिम्मत कधीच करत नाही.

प्रशांत किशोर निवडणूक हरल्यानंतर त्यांच्या स्वभावात कसा अहंकार आहे इथपासून अनेक सल्ले त्यांना दिले जात आहेत. त्यांचा संपर्क कसा कमी पडला असे सांगणारे मात्र गायिका मैथिली कशी जिंकली ? मतदार संघातील ५० गावांची नावे सुद्धा सांगता येणार नाही तिला मतदारांनी कोणत्या विवेकाने मतदान केले याची मात्र हे तज्ञ चर्चा करत नसतात.

भारतीय मतदारांना सुज्ञ मतदार, विचारी मतदार वगैरे म्हणण्याची एक फॅशन आहे आणि मतदारांनी चुकीचा कौल दिला असे म्हणणे हा लोकशाहीचा अपमान वगैरे म्हणण्याची ही आपल्याकडे पद्धत आहे पण ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून शरद जोशी पर्यंत मतदारांनी अनेकांना पराभूत केले त्यावरून मतदारांची सुज्ञता नेमकी कशी समजून घ्यायची ? अमिताभ बच्चन मुंबईतून अलाहाबादमध्ये जातो आणि हेमवतीनंदन बहुगुणासारख्या ज्येष्ठ नेत्याला पराभूत करतो.. गोविंदासारखा एक नट राम नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पराभूत करतो हे बघितल्यावर आणि अनेक निवडणुकांचे निकाल बघून मतदाराच्या या तथाकथित सुज्ञतेचे उदात्तीकरण का केले जाते ? हेच कळत नाही.

हेच सामान्य मतदार सातत्याने राजकारणी किती वाईट आहेत भ्रष्ट आहेत. याबद्दल बोलत असतात. यांच्यापेक्षा कोणीतरी चांगले उमेदवार राजकारणात आले पाहिजे असेही म्हणत असतात पण जेव्हा जेव्हा अशा प्रकारे वेगळे प्रयोग राजकारणात करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. तेव्हा सामान्य माणसे ते प्रयत्न उधळून लावतात. त्यांच्या छोट्या चुका असल्या तरी तेच मोठ्या आवाजात सांगत राहतात आणि आपल्याकडे पत्रकार बुद्धिवादी सुद्धा अशा धडपड करणाऱ्यांना सूक्ष्मदर्शकाखाली तपासतात.

केजरीवाल, प्रशांत किशोर किती अहंकारी आहेत याची चर्चा करतात आणि असाच अहंकार दाखवणारे सत्ताधारी असणारे नेते यांचा उर्मटपणा ही कार्यशैली आणि बेधडक म्हणून कौतुकाने स्वीकारतात. अर्थात प्रशांत किशोर यांच्या दोषांची मर्यादांची जाणीव मला आहे, गुजरात दंगलीतील मोदींची प्रतिमा त्यांनी आभासी बदलवली व दंगलीवर रंग सफेदी केली याबद्दल असली तर व्यक्ती म्हणून माझ्या मनात कटुता आहे. पण ज्याप्रकारे त्याच्या आजच्या राजकारण बदलण्याच्या प्रयत्नांची खिल्ली उडवली जाते आहे याने उद्विग्नता येते.

प्रशांत किशोर सारख्या माणसाला इतका प्रचंड सन्मान आणि पैसा मिळत असताना आणि कोणताही राजकीय पक्ष त्यांना मंत्रिमंडळात घेण्यापासून खासदारकी देण्यापर्यंत सहज तयार असताना हा माणूस बिहारच्या गावागावात फिरतो,चिखल तुडवतो. गावागावात मुक्काम करतो. निवडणूक जात धर्माच्या पलीकडे नेऊन बिहारमधील शिक्षण, आरोग्य, पलायन, करिअर या गोष्टींवर निवडणूक लढवतो. जिथे प्रचारात फक्त शिवराळ टीका केली जाते. अशा भारतीय निवडणुकींमध्ये खेड्यापाड्यात तात्विक चर्चा आकडेवारी आणतो. बिहार मधील छोट्या वस्तीवर शिक्षणाच्या गळती पासून अनेक गोष्टींची आकडेवारी साध्या साध्या सभांमध्ये बोलली जाते आणि असा माणूस पराभूत झाल्यानंतर एक दुःख व्यक्त करण्यापेक्षा प्रशांत किशोर त्यासाठी कसा दोषी आहे हे सांगण्याची स्पर्धा लागते.

राजदीप सरदेसाई सारखा ज्येष्ठ पत्रकार चॅनलवर शिट्टी वाजवून त्याची खिल्ली उडवतो हे बघितल्यानंतर हताश व्हायला होते. आसाम मधील प्रफुल्ल कुमार महंत दिल्लीतील केजरीवाल राज्या राज्यात लढणारा कम्युनिस्ट पक्ष समाजवाद यांचा सोशॅलिस्ट फ्रंट प्रयोग हे सारे ज्या प्रकारे लोक पराभूत करतात. अशा मतदारांना विवेकी वगैरे म्हणून आणि पैसा फेकून सत्ता मिळवणाऱ्यांना मुत्सद्दी म्हणायचे आणि दुसरीकडे लढणाऱ्या माणसांचे दोष काढायचे तेच त्यांच्या पराभवाला कसे जबाबदार आहेत आणि त्यांना कशी जमीन समजत नाही, हे उपदेश करायचे. या दांभिकपणातच लोकशाही कमजोर झाली आहे. लोकांना लायकीप्रमाणे सरकार मिळते हेच खरे असते का ? अशा जनतेला सत्तेच्या लाथा खाण्यासाठी शुभेच्छा.

हेरंब कुलकर्णी

लेखक

Updated : 21 Nov 2025 6:51 PM IST
Next Story
Share it
Top