डॉ. बाबा आढाव यांच्या अंत्ययात्रेतील गर्दीचा अर्थ !
रांगेत ताटकळत उभी राहिलेली आणि बाबांच्या देहाकडे टक लावून पाहणारी माणसे बघून गलबलून येत होते. स्वतःच्या दुःखाचा कड दाबून श्रमगीते म्हणणाऱ्या महिला त्यांच्या आवाजातील कातरता सारे काही सांगून जात होती.
X
अखेर बाबा गेले त्यांच्या अंत्ययात्रेतील गर्दीने त्यांच्या जाण्याचा अर्थ थोडाफार उमगला. त्या गर्दीला कष्टकऱ्यांचा चेहरा होता. बंदूक घेतलेले सैनिक जसे होते तसे वजन उचलणारे हमाल त्यात होते, त्यात तमाम कष्टकरी होते. रिक्षावाले होते टांगेवाले होते, उच्चशिक्षित माणसे होती आणि लेखकही होते आणि निरक्षर माणसेही होती. निवडणुकीच्या सभेसारखी अशी गर्दी भाड्याने आणता येत नाही. किंवा लग्नपत्रिका वाटून लग्नाला जशी गर्दी जमा होते तशीही गर्दी जमत नसते. दिवसाचा रोज बुडवून रांगेत उभे राहून अंतदर्शन घेणारी ही माणसं आणि त्यांच्या अश्रूंचा अर्थ लावणे हेच मोठे आव्हान असते.
रांगेत ताटकळत उभी राहिलेली आणि बाबांच्या देहाकडे टक लावून पाहणारी माणसे बघून गलबलून येत होते. स्वतःच्या दुःखाचा कड दाबून श्रमगीते म्हणणाऱ्या महिला त्यांच्या आवाजातील कातरता सारे काही सांगून जात होती... अशीच गर्दी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेत होती आणि हीच माणसे साने गुरुजींच्या अंत्ययात्रेत होती... जत्रेच्या गर्दीत आईचा हात सुटल्यानंतर कावरे बावरे झालेले लेकरू आणि या गर्दीत फारसा फरक नसतो... लेकरू आपल्या रडण्याला मोकळी वाट करून देते आणि ही माणसे केविलवाणी होतात इतकाच तो फरक....
कदाचित ही माणसे महिने महिने बाबांना बघत नसतील, भेटत नसतील पण जगण्याचा संघर्ष करताना कोणीतरी भक्कमपणे आपल्या पाठीशी आहे, कोणीही मला त्रास दिला तर त्यांच्याकडे जाऊन मी सांगू शकते, दुःखाचा अतिरेक झाला तर माझं मन मोकळे करू शकते. हा आधार सुटल्याने सैर भैर झालेली ही माणसे असतात.
ही गर्दी बघितल्यावर बाबांच्या जाण्याचा अर्थ लक्षात येतो. कोणत्याही समाजात एक सुस्थिर वर्ग निर्माण झाला की त्या वर्गाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शहरात कष्टकरी वर्ग तयार होतात. हा आत्मकेंद्रित वर्ग पराकोटीचा स्वार्थी असतो. त्यांना फक्त सेवा हवी असते पण ती सेवा करणाऱ्या माणसांची जबाबदारी नको असते. त्यांना त्यांच्या बिल्डिंग साफ करणारे मजूर हवे असतात, गाडी चालवणारे ड्रायव्हर हवे असतात... प्रवासासाठी रिक्षा हव्यात, घरात भांडीवाली हवी असते आणि त्याचा पुरेपूर मोबदला देण्याचे त्यांच्या जीवावर येते, मॉल्स, इस्क्वेअर हॉटेलमध्ये पैशाकडे न बघणारी माणसे यांच्या घामाचा हिशोब करतात. पॅकेज घेणारी माणसे यांचे खाडे मोजतात.
व्यवस्थेत अशा हरलेल्या माणसांना बाबांनी आधार दिला. लोकांचे लक्ष धरणाकडे असताना, बाबांचे लक्ष धरणग्रस्तांकडे होते. लोकांचे लक्ष बिल्डिंगकडे असताना बाबांचे लक्ष त्या इमारती झाडणाऱ्यांकडे होते. लोकांच्या लक्ष टुमदार बंगलांकडे असताना बाबांचे लक्ष त्या घरातल्या मोलकरणीकडे होते. लोकांचे लक्ष महागड्या गाडीकडे असताना बाबांचे लक्ष रिक्षा चालक ड्रायव्हर कडे होते. लोकांचे लक्ष ग्रामीण भागातल्या तथाकथित विकासाकडे असताना बाबांचे लक्ष दलितांना नाकारलेल्या पाणवठ्याकडे होते. संघटित क्षेत्राच्या विकासावर या देशाचा विकास मोजला जाताना बाबांचे लक्ष शेवटच्या असंघटित माणसाकडे होते या शेवटच्या माणसांकडे त्यांची नजर अखेरपर्यंत राहिली म्हणूनच ती शेवटची माणसे त्यांच्या अंत्ययात्रेत रडत होती.
आज जागतिकीकरणात एक उच्च मध्यमवर्ग आणि मध्यमवर्ग निर्माण होतो आहे आणि या वर्गाची सेवा करणारा त्याचबरोबर ग्रामीण भागात खेड्यात शहरी झोपडपट्टीत रोज मरणारा वर्ग हा आपल्या संवेदनाचा विषय नाहीये. आपल्या संवेदनाचा गहिवर या माणसांसाठी येत नाहीये. या माणसांच्या वेदनेकडे लक्ष देणे हाच बाबांच्या जगण्याचा सांगावा आहे.
बाबांसारखे माणसे म्हणूनच मोठी असतात.
आयुष्यभर ती फक्त या नाकारलेल्या माणसांचा विचार करत असतात विकासाच्या त्यांच्या व्याख्या या माणसांभोवती फिरत असतात. तोच त्यांच्या चिंतनाचा परिघ असतो आणि म्हणून महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा याच रांगेमध्ये बाबा उभे असतात याचे कारण आयुष्यभर या माणसांच्या कल्याणाचा त्यांनी विचार केला असतो...
बाबांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न ते असंघटित क्षेत्रासाठी पेन्शन आणि असंघटित क्षेत्रासाठी कल्याणकारी योजना यासाठी त्यांनी दिल्लीपर्यंत धडक मारली पण आजच्या आत्मकेंद्रीत सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत त्या माणसांना आता कोणीही वाली नाही.. आपल्याला जर करायचे असेल तर त्या असंघटित माणसांसाठीच केले पाहिजे हाच बाबांच्या जगण्याचा सांगावा आहे.... आणि हाच त्या गर्दीतील माणसांच्या अश्रूंचा अर्थ आहे
हेरंब कुलकर्णी






