Home > मॅक्स ब्लॉग्ज > Labeling Children in Schools : मुलांना लेबल नको, समजून घेणारी शिक्षणव्यवस्था हवी.

Labeling Children in Schools : मुलांना लेबल नको, समजून घेणारी शिक्षणव्यवस्था हवी.

मानसशास्त्र सांगते की ‘Each and every child is unique.‘ सगळी मुलं एकसारखी नसतात. “तुमचं मूल स्पेशल आहे” असे ठपके ठेवल्याने मुलांच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? सांगताहेत भाऊसाहेब चास्कर

Labeling Children in Schools : मुलांना लेबल नको, समजून घेणारी शिक्षणव्यवस्था हवी.
X

Labeling Children in Schools अलीकडेच एका मित्राशी बोलताना तो सांगत होता की त्याच्या नात्यातील एका मुलाला, तो ज्या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता, त्या शाळेतील शिक्षकांनी थेट “तुमचे मूल विशेष आहे” असा शिक्का मारला आहे...

काही दिवसांपूर्वी आणखी एका शिक्षिका मैत्रिणीने सांगितलेला अनुभव याहूनही अस्वस्थ करणारा होता. तिच्या कुटुंबातील बालवर्गात (केजी) शिकणाऱ्या मुलाबाबत शाळा व शिक्षकांनी पालकांना सांगितले की “हे मूल विशेष (special child) आहे, त्याला विशेष शाळेत घाला.” हे ऐकून त्या पालकांवर जणू आभाळच कोसळले. पुढे त्या पालकांनी शाळा बदलली; मराठी माध्यमाच्या शाळेत त्या मुलाने चांगली प्रगती केली आणि आज तो मुलगा अमेरिकेत नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहे.

ही दोन उदाहरणे अपवाद नाहीत. अधूनमधून असे किस्से माझ्या कानावर पडत असतात. मुलांची गोपनीयता(privacy) आणि त्यांचे मूलभूत अधिकार यांची कोणतीही तमा न बाळगता शाळा, शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून मुलांना विविध लेबले लावतात.

त्या त्या वर्गासाठी ठरवून दिलेल्या अध्ययन निष्पत्ती (learning outcomes) एखाद्या मुलाने ठराविक वेळेत आत्मसात केल्या नाहीत की लगेच त्या मुलावर शिक्कामोर्तब करणे सुरू होते. गती मंद, मतिमंद, अध्ययन अक्षम, स्पेशल... अशी लेबले सहजपणे लावली जातात. माझ्या निरीक्षणानुसार, हे प्रकार खाजगी शाळांमध्ये आणि त्यातही विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अधिक प्रमाणात घडतात. माध्यम मातृभाषा नसल्याने अनेकदा मुलांना शिक्षणाचा आशय समजत नाही. अर्थ उलगडत नाही म्हणून त्यांचं शिकवण्याकडे लक्ष लागत नाही. मग लेबल लावले जाते.

खरं तर प्रश्न मुलांचा नसतो. अनेकदा शिक्षकांना शिकवताना अडचणी येऊ शकतात. मुलांना काही संकल्पना समजून घेण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. समजावून सांगण्याचे अनेक मार्ग असू शकतात. वेगवेगळ्या पद्धती, भिन्न उदाहरणे, वैयक्तिक लक्ष. पण आपल्याला शिकवता आलं नाही किंवा मुलाला त्या पद्धतीने शिकता आलं नाही याचं अपयश झाकण्यासाठी मुलांवर लेबले लावणं हे अत्यंत भीषण आहे.

“तुमचं मूल स्पेशल आहे” असे ठपके ठेवणारे शिक्षक खरे तर शिक्षक म्हणून काम करण्याच्या पात्रतेचे, लायकीचे नाही आहोत असेच दर्शवत असतात. कारण अशा लेबलांनी मुलांचे क्षणापुरतं नुकसान होत नाही; त्यांचं संपूर्ण आयुष्य आणि भविष्य एका मानसिक विवंचनेत ढकललं जातं, याचं भान ठेवायला लागेल. गंभीर बाब म्हणजे जेव्हा शिक्षक किंवा मुख्याध्यापक आई-वडिलांना हे सांगतात, तेव्हा त्या पालकांच्या मनात काय वादळ उठत असेल, याचा साधा विचारही केला जात नाही.

मानसशास्त्र सांगते की ‘Each and every child is unique.‘ सगळी मुलं एकसारखी नसतात. सगळ्यांची शिकण्याची गती, पद्धत आणि वेळ वेगवेगळी असते. मात्र येथे ठराविक अध्ययन निष्पत्ती ठराविक वेळेत गाठल्या नाहीत, की दोष थेट मुलावर आणि अप्रत्यक्षपणे पालकांवर टाकला जातो. अशा पद्धतीने खाजगी विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळा पालकांच्या मनात अपराधगंड पेरतात. पालक मग नशिबाला दोष देत मुलाला क्लासमध्ये पाठवू लागतात...

मुलांना अशा प्रकारे लेबले लावणं हे शिक्षण नाही; ती हिंसा आहे. मानसिक, भावनिक आणि सामाजिक हिंसा.

शाळा आणि शिक्षकांनी ही प्रवृत्ती जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर थांबवायला हवी. कारण शिक्षणाचं काम मुलांना गुणांमध्ये आकड्यांमध्ये मोजण्याचं नसून, त्यांना समजून घेण्याचं आणि घडवण्याचं आहे.


Updated : 13 Jan 2026 8:40 AM IST
Next Story
Share it
Top