History of Ink and Writing : शाईचा इतिहास !
जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त लेखक गणेश विसपुते यांचा लेख
X
World Handwriting Day लहानपणी कॅम्लिनची शाई तेवढी परवडायची. (आताही त्यांची पर्मनंट ब्लॅक आवडते-) सराफ्यात, लायब्ररीच्या शेजारी चित्रकलेचं साहित्य विकणारं एक दुकान होतं औरंगाबादेत. तिथं सगळ्या प्रकारच्या शाईच्या बाटल्या मिळत. चेल्पार्कची शाई घ्यायची ती ते टर्क्वाइझ ब्लू रंगातली शाई आणायचे म्हणून. सगळ्यात महाग शाई होती ती फाउंट ब्लॅक Fountain Pen Ink. ती क्रोक्विलमध्ये, जाड्या पेनांमध्ये, लिहिण्याशिवायच्या कामासाठी वापरायची लिहिताही यायचं, पण रेखाटण्यात मजा यायची. लिहिण्यासाठीची पेनं, ट्रेसिंग क्लॉथवर संकल्पचित्रांसाठी वा रेखाटनांसाठीची रोटरिंग पेनं यांची वेगळी शाई, अर्कायव्हल इंक वेगळी असं कळत गेलं. वेगवेगळ्या शाई वापरून लिहिण्यातली मजा हळूहळू समजत गेली.
शाईत पाण्याशिवाय कोणते घटक असतात, रंग कसे तयार करतात याची उत्सुकता राहिली. शाई पातळ राहावी, निबांमध्ये जमून राहू नये, कागदावर ती नीट पोचण्यासाठीचे घटक मिसळावे लागतात. ती सुकू नये, दमट ओली राहावी, तिला बुरशी लागू नये म्हणूनही काही रसायनं मिसळतात. लवकर सुकणारी शाई डावखुऱ्यांसाठी योग्य असते. शाईचे उत्पादक लोक घटकांचे तपशील देत नसले तरी एवढं तर त्यात असतंच.
पण पूर्वीच्या काळात, म्हणजे १८४०च्या दरम्यान त्यात काय वापरतात हे उघड करावं लागे. माहीत नसलेल्या शाईनं लिहिणं, अशा शाईनं छापलेली पुस्तकं वाचणं म्हणजे ओवळं होणं- अपवित्र होणं असं मानणारे त्या काळात होते. दादोबा पांडुरंगांनी पाणिनीचीं अष्टाध्यायींतलीं सूत्रं मराठीत भाषांतरित केली होती. ती बोर्ड ऑफ एज्युकेशननं छापावीत असं त्यांना वाटलं. परंतु ही सुत्रे वेदोक्त आहेत, ती छापून ओवळीं केली तर लोकास आवडणार नाही म्हणून ते बाड तसंच त्यांच्याकडे राहिलं.
'मुंबईचे वर्णन'मध्ये गोविंद नारायण माडगांवकरांनी लिहिलंय, "आमचे कित्येक भोळे व नैष्टिक ब्राह्मण छापलेल्या कागदांस स्पर्श करण्यास भीत असत. आणि अद्याप (म्हणजे १८६३ सालीं) मुंबईत व बाहेरगांवीं छापील कागदांस शिवत नाहींत व छापलेले पुस्तक वाचीत नाहींत असे पुष्कळ सांपडतील."
त्यामुळे, बाळशास्त्री जांभेकरांना आपल्या 'दिग्दर्शन' मासिकात छापण्याच्या शाईची ही अशी कृती द्यावी लागली होती (१८४०). :
"लाख-चपट्या वड्या तोळे ४, साबु बिलायती-तोळे ४, रुमामसतकी- तोळे ५, मेण पिवळें- तोळे ३, तूप अथवा चर्बी-तोळे ४, लाख तोळे ४, मेण तोळे ४, साबण तोळे ४."
त्यात पुढे लिहिलंय, "या छपाईच्या शाईत चर्बी पडत असती, यामुळे छापलेले पुस्तक अपवित्र अशी लोकांची समजूत आहे. म्हणोन याविषयी काहीं लिहिलें पाहिजे. वर जिनसाच्या यादी लिहिल्या आहेत त्यांत तूप अथवा चर्बी असें आहे, परंतु हे 'दिग्दर्शन' ज्या छापखान्यांत छापतात तेथें चर्बीच्या ठिकाणी तुपाचा उपयोग करितात, व तेणेंकरून काम चर्बीप्रमाणेच होतें. परंतु तुपामध्ये चरबीप्रमाणें तेज नाहीं. म्हणोन कांहीं मेहनत जास्त पडती."
एकुणात, शहाण्यासारखं मुलायम चालणाऱ्या पेनानं लिहिणं मजेचं असतं. पण हे ही खरं आहे की 'लिहिण्यात' 'मेहनत जास्त पडती.'
(साभार - सदर पोस्ट गणेश विस्पुते यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)






