असाधारण आणि अजातशत्रू संयुक्ता!
निडर, निस्पृह आणि निगर्वी संयुक्तासारखी मुलगी आपल्या पोटी जन्माला यावी असे कुठल्याही स्त्रीला वाटावे! कोण आहे संयुक्ता पराशर? जाणून घ्या लेखक समीर गायकवाड यांच्याकडून
X
Samyukta Parashar संयुक्ता पराशर, दोन दशकापूर्वी त्या तान्ह्या मुलाच्या माता होत्या तेव्हापासूनचा त्यांचा निडर शौर्याचा इतिहास आहे. घरी असताना त्या चिमुरड्या बाळाला वेळ देत असत आणि अतिरेक्यांशी लढताना गरज पडल्यास एके 47 चालवत! फिल्मी कचकडी छाप नाजूक अभिनेत्र्यांपेक्षा त्या देखण्या आहेत पण त्या केवळ मॉडेल वा शोपीस देखील नाहीयेत! त्यांच्या नावानेच अतिरेकी थरथर कापत. त्या आसामच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत आणि आता त्या आसामच्या पहिल्या आयजी ऑफ पोलीस आहेत.Assam's First Female IG
2008 मध्ये तिनसुकीया जिल्ह्यातील माकूम या शहरात त्यांची पहिली नियुक्ती झाली. बांगलादेशी निर्वासित आणि स्थानिक बोडो यांच्या सततच्या संघर्षाने हा परिसर ग्रासलेला होता. कॉंग्रेस पक्षाचे शासन होते, तरुण गोगोई मुख्यमंत्री होते. गृहमंत्रालयाचा पदभारही त्यांच्याकडेच होता. गोगोई यांनी संयुक्ता पराशर यांच्यातला स्पार्क अचूक हेरला आणि त्यांची नियुक्ती उदलगिरी जिल्ह्याच्या स्वतंत्र चार्जवर केली. 2008 ते 2015 या काळात संयुक्ता पराशर यांनी बोडो आंदोलनाची पाळेमुळे खणून काढली.
2015 ते मे 2016 या दिड वर्षांत त्यांनी शब्दश: जिवावर उदार होऊन 16 अतिरेक्यांना कंठस्नान घातले. बोडो आंदोलन इथून जे कमजोर झाले ते आजही तोंड वर काढू शकले नाही. याच काळात त्यांनी 64 कुख्यात अतिरेकी जेरबंद केले.
संयुक्ता पराशर यांची सर्वात जिगरबाज गोष्ट ही आहे की, 2006 साली युपीएससीच्या परीक्षेत त्यांनी आयएएस श्रेणी मिळवली होती मात्र आपल्याला आयपीएस सर्व्हिस बहाल करावी असे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला कळवले. 2008 मध्ये त्या रुजू झाल्या आणि तेव्हापासून ते आजतागायत त्या आसाम पोलिस दलाच्या शान झाल्या आहेत.
देशाच्या पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी पोलीस अधिकारी म्हणून केलेली कामगिरी नक्कीच तडफदार आणि निर्भीड होती, नंतर त्यांनी अनेक वादग्रस्त गोष्टी केल्या त्यामुळे झाकोळल्या गेल्या. संयुक्ता पराशर यांचे तसे नाहीये. त्यांचा ग्राफ चढता आहे. तोही विनाकलंक! सशक्त महिला पोलीस अधिकाऱ्याचे त्या जाज्वल्य उदाहरण ठरल्या आहेत.
दिल्लीतल्या इंद्रप्रस्थ महिला महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी मिळवली आहे आणि जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातून (JNU ! ) त्यांनी अंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर पीएचडी केलेली आहे.
इथे पत्रकारितेत काम करत असणाऱ्या अथवा सजग वाचन असणाऱ्या अनेकांच्या लक्षात असेल की देश स्वतंत्र झाल्यापासून काळ्या जादूचे आणि डाकीण चेटूक प्रथेचे सर्वाधिक बळी आसाममध्ये नोंदवले गेले. वृद्ध स्त्रिया देखील यातून सुटल्या नव्हत्या. एखाद्या बाईला चेटूक करते म्हणून वा डाकीण ठरवून मारले जायचे. पुरुषांनाही मारले जायचे मात्र स्त्रियांना अधिक मारले गेले.
कोक्राझार, उदलगिरी आणि चिरांग हे बोडोलँड टेरिटोरियल डिस्ट्रिक्टस यासाठी कुख्यात होते. कारबी, अंगलोंग आणि गोवालपाडा हे आदिवासी बहुल प्रांतदेखील यासाठी ओळखले जात. या शिवाय तीनसुखिया, मोरिगाव, सोनीतपूर, लाखीमपूर आणि जोरहाट हे सर्व जिल्हे या अंधश्रद्धेने ग्रासले होते. तरुण गोगोई यांनी संयुक्ता यांना फ्री हँड दिला आणि त्यांनी या शोषणामागचे म्होरके जेरबंद केले. आसाममध्ये या प्रथेचे आता अवघे काही टक्के नामोनिशाण बाकी आहे.
संयुक्ता पराशर यांचा विवाह 2008 मध्ये आयएएस अधिकारी पुरू गुप्ता यांच्याशी झाला. पीएमओमध्ये नियुक्ती झालेल्या आम्रपाली कत्ता यांच्या जागी ते आता आसामच्या वाणिज्य मंत्रालयाचे सचिव आहेत. 2013 मध्ये त्यांच्यावर संपत्ती दडवण्याचे आरोप झाले मात्र त्यात ते निर्दोष सिद्ध झाले. पूर्वी आसाममध्ये सातत्याने अतिरेकी हल्ले होत तेव्हा रिलीफ कॅम्पमध्ये हे दोघेही जात असत. लोकांना त्याचे अप्रूप असले तरी ते कर्तव्यनिष्ठेने काम करत राहिले.
संयुक्तांनी मनात आणले असते तर त्यांना तेथील मंत्रालयातील डेस्कवरची साधीसोपी झिगझिग नसणारी आरामदायी श्रेणी त्या निवडू शकल्या असत्या पण त्यांनी तसे न करता एक नवा आदर्श घडवताना स्वतःचा जीव धोक्यात घालून महिलाच नव्हे तर पुरुषांना देखील एक नवा धडा घालून दिला.
स्वतःसाठी जसा कठीण मार्ग त्यांनी निवडला तसेच त्यांनी अतिरेक्यांना देखील एक नवा ऑप्शन दिला, तो म्हणजे पोलीस भरतीचा! ज्या तरुणांना संशयाने पाहिले जायचे आणि भावी काळात राज्यात अस्थिर कारवाया करण्यासाठी कच्चा माल म्हणून पाहिले जायचे त्यांना पोलीस दलाचे दरवाजे खुले केले. एकीकडे अतिरेकी संपवले आणि दुसरीकडे त्यांचेच मनुष्यबळ पोलीस दलात आणले! ही योजना सफल ठरली.
संयुक्ता पराशर यांचं काम इतकं लखलखीत आहे की त्यांना कुणी नाकारू शकत नाही. 2016 मध्ये आसाममध्ये सत्ताबदल झाला आणि कॉँग्रेसची दीर्घकाळाची सत्ता संपुष्टात आली. सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री झाले. पुढच्या निवडणुकांतही पुन्हा भाजपचीच सत्ता आली, पूर्वी कट्टर कॉँग्रेसवासी असणारे हेमंत बिस्वा शर्मा सीएम झाले. सत्ताधारी पक्ष आणि मुख्यमंत्री बदलूनही संयुक्ता यांना कुणी आडकाठी केली नाही. त्यांच्या कर्तृत्वास साजेशी अशीच बढती त्यांना दिली गेली.
आयजी या पोलीस दलातील सर्वोच्च पदापैकी एक असणाऱ्या पदावर त्या सध्या रुजू आहेत. हे सर्व आज का लिहिलेय? आसामचा लाडका गायक झुबीन गर्ग सर्वांना आठवत असेलच! झुबीनचा चुलत भाऊ असणाऱ्या संदीपान गर्गचे डीसीपी पदावरून निलंबन करण्यासाठीचे इनपुट्स देऊन संयुक्ता पराशर यांनी पहिला मोठा धक्का दिला होता. झुबीनच्या संपूर्ण केसचा गुंता परदेशात जाऊन आसाम पोलिसांनी कसा सोडवला याची सुरस माहिती काल बऱ्यापैकी समोर आली आहे. या सर्वामागे मुन्ना प्रसाद गुप्ता यांचे मास्टर माइंड आहे.
या घटनेचे राजकीय लाभ कुणी उठवू नयेत यासाठी त्या जातीने नजर ठेवून आहेत. मध्यंतरी अशी कुणकुण होती की 8 डिसेंबर रोजी या गुन्ह्याचे चार्जशीट दाखल केले जाईल तेव्हा त्यात एक नाव विलक्षण धक्कादायक असेल, मात्र त्यात आता केवळ गुन्ह्यातले पूर्वी समोर आलेले आरोपीच आहेत हे जवळपास निश्चित झालेय.
निडर, निस्पृह आणि निगर्वी संयुक्तासारखी मुलगी आपल्या पोटी जन्माला यावी असे कुठल्याही स्त्रीला वाटावे! आता प्रत्येक आसामी असामीस त्यांच्यावर गर्व आहे, शिवाय त्या मूळच्या आसामी आहेत ही बाब त्यांच्या मातृभूमीच्या निष्ठेतून नेहमी जाणवत राहते! असाधारण आणि अजातशत्रू संयुक्ता!असे पोलीस अधिकारी राष्ट्राची शान वाढवतात आणि अशा महिला अनेकांना प्रेरणा देतात. आदर्श घेण्याजोगे लोक कमी उरलेत, सबब शेअर केल्याशिवाय राहवले नाही!
- समीर गायकवाड
(साभार - सदर पोस्ट समीर गायकवाड यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे)






