Home > मॅक्स ब्लॉग्ज > Epstein नेटवर्क sex क्लब !

Epstein नेटवर्क sex क्लब !

तरुणांनो, कोणाकोणाची नावे आहेत याच्या पलीकडे जे सहजपणे दिसत नाही, सांगितले जात नाही ते समजून घ्या - संजीव चांदोरकर, अर्थतज्ज्ञ

Epstein नेटवर्क sex क्लब !
X

Child Trafficking कोवळया मुलींचे रक्त, मांस, त्यांची कायमची चुरगळून डस्टबीन मध्ये टाकलेली स्वप्ने, भावना, शरीर यांच्या चिखलात यथेच्छ माखणाऱ्या, सारे जग आपल्या कब्जात ठेवू पाहणाऱ्या पुरुषांचा “एपस्टीन नेटवर्क सेक्स क्लब” !Epstein Network Sex Club

Epstein Files “एपस्टीन फाईल्स”ने जगभर, विशेषतः अमेरिकेत, खळबळ माजवली आहे. सर्वच देशात, जगातील छोट्या मोठ्या सत्ताकेंद्रात, विकेंद्रित पद्धतीने कमी जास्त प्रमाणात, जे नेहमीच अगदी आजदेखील घडत आले आहे, ते या फाइल्समुळे नाट्यमयरित्या जगासमोर आले आहे. एप्सटिनच्या बेटावर घडलेले अपवाद नाही. पण त्याचे स्केल कल्पनातीत आहे.

लक्षात घेऊया. हे सारे सार्वजनिक होऊ शकले कारण “एपस्टीन इस्टेट”ने तेथे जाणाऱ्या उच्चपदस्थ पुरुषांना ब्लॅकमेल करण्याचा आपला धंदा करण्यासाठी या सगळ्यांचे इलेक्ट्रॉनिक दस्तावेजीकरण केल्यामुळे. समजा असे दस्तावेज केलेच गेले नसते. तर ते असे जगासमोर येतेच ना! आपल्याकडे म्हणतात ना, “चोर कोण ? जो चोरी करतो तो नव्हे. तर ज्याची चोरी पकडली जाते तो” चोरी करून देखील जो पकडला जात नाही किंवा पकडला जाऊ शकत नाही, तो राजरोसपणे सर्व मानमरातब घेऊन उच्चपदावर मिरवत राहू शकतो. तसेच काहीसे.

राजकीय दृष्ट्या निरागस लोक फक्त राजकीय नेत्यांना राज्यकर्ते समजतात. देशावर, जगावर राज्य करणाऱ्या वर्गाची राजकीय नेते एक महत्वाची पण एक फ्रंट आहे. या राज्यकर्त्या वर्गात राजघराण्यातील व्यक्ती, गर्भश्रीमंत, सध्याच्या भाषेत अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिविज्युअल्स, उद्योग, बँकिंग/ वित्त क्षेत्रातील, मिडिया, करमणूक, क्रीडा, फॅशन, लष्कर आणि इंटेलिजन्स क्षेत्रातील, थिंकटँक्स मधील शक्तिशाली व्यक्ती इत्यादी मोडतात. या सर्वांचे वर्गीय हितसंबंध एकच असतात. वरकरणी ते स्पर्धक वाटत असले तरी. ते सुटे सुटे ऑपरेट होतात असे आपल्याला वाटते. पण प्रत्यक्षात तसे नसते. समाजशास्त्रामध्ये अतिशय गुंतागुंतीच्या संरचना समजून घेण्यासाठी “नेटवर्क” संज्ञा वापरली जाते. वर उल्लेख केलेल्या राजकर्त्या वर्गातील व्यक्ती नेटवर्क मध्ये राहून आपापले धंदे / व्यवसाय / पैशे करतात.

एपस्टीन क्लब मध्ये सेक्स ही केंद्रस्थानाची ॲक्टिव्हिटी असली तरी ते काही वेश्यागृह नव्हते. हा मुद्दा अधोरेखित करूया. सर्व राज्यकर्त्या वर्गातील पुरुषांना नेटवर्क मध्ये बांधून ठेवणारा, परस्परांशी ओळखी आणि त्यातून डील करण्यासाठी अवकाश आणि संधी उपलब्ध करून देणारा एक क्लब होता. आपल्यातील अनेक जण विविध क्लबजचे सभासद असतील. ते क्लब वेगळे. कारण तेथील सभासदत्व फी बेस्ड असते. तेवढी फी भरण्याएवढे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी ती भरली की त्यांना सभासद केले जाते.

नेटवर्क क्लब सर्वांसाठी असे खुले नसतात. ते बंदिस्त असतात. त्यात फक्त बाय इन्व्हिटेशन सभासदत्व मिळू शकते. अड्ड्याचा जसा दादा असतो, बेटिंग मध्ये जसा बुकी असतो तसा एपस्टीन होता. या क्लब मधील राज्यकर्त्या वर्गाच्या प्रतिनिधींना पैसा, संपत्ती नक्की कशी तयार होते याचे सत्ता गतिशास्त्र / पॉवर डायनॅमिक कळलेले असते. पैसा + सिस्टम मध्ये काय चालले आहे याची माहिती + नेटवर्क सभासदांशी विणलेले सामाजिक बंध ……म्हणजे पैसे, संपत्ती कमावण्याच्या अमर्याद संधी असे नवीन समीकरण त्यांनी प्रस्थापित केलेले असते.

पुस्तके वाचून सर्व जगाला गेले ४० वर्षे नवउदारमतवादी अर्थशास्त्र शिकवणारे सुटेड बुटेड लोक अर्थकारणातील सहज न दिसणाऱ्या पॉवर डायनॅमिक्स बद्दल माहित असून बोलत नाहीत. कारण मग त्यांच्या थियरीच्या चिंध्या उडतील म्हणून .“एपस्टीन नेटवर्क सेक्स क्लब” कडे सुटे बघता कामा नये. गेल्या काही दशकांत ऑक्सफाम पासून अनेक संशोधन संस्था जे सांगत आहेत अशा अनेक बिंदूंशी तो जोडून बघावा लागेल. गेल्या ४० वर्षात जगावर राज्य करणाऱ्या राज्यकर्ता वर्गातील काहीजण किती घृणास्पद पातळीवर जाऊ शकतात हे यातून समोर येते. (सगळे त्यातले नाहीत अशी बाळबोध कमेंट करून प्रकरणाचे गांभीर्य करू नये ही विनंती)

संजीव चांदोरकर

अर्थतज्ज्ञ

(साभार- सदर पोस्ट संजीव चांदोरकर यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 20 Dec 2025 7:39 AM IST
Next Story
Share it
Top