"DOES GOD EXIST?" जावेद अख्तर आणि मुफ्ती शमाईल नदवी यांच्या चर्चासत्रातून समाजाला काय मिळालं ?
Does God exist? या चर्चेच्या निमित्ताने ईश्वराच्या नावे काय काय होत आहे आणि ईश्वराच्या नावे खरंच काय व्हायला हवे ? समाजाला कसली गरज आहे ? या चर्चेचा सार सांगताहेत मुस्लीम समाज सुधारणा चळवळीचे पैंगबर शेख
X
बायको काल रात्री म्हणाली, मला Debate डिबेट पहायची आहे. ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. कारण पहिल्यांदाच ती असं काहीतरी म्हणाली होती. तत्पूर्वी Facebook फेसबुकवर जावेद अख्तर साहेब आणि मुफ्ती शमाईल नदवी Javed Akhtar and Mufti Shamail Nadvi यांच्या कुठल्यातरी चर्चेवर फेसबुकवर काही पोष्ट पडताना दिसत होत्या. म्हणून मला ती चर्चा पहायची होती. योगायोग असा झाला की बायकोला पण तीच चर्चा पहायची होती कारण तिला ती कोणीतरी पाठवली होती आणि मला त्या दोन विद्वानांची या विषयावर काय मते आहेत हे जाणून घ्यायचे असल्याने ती चर्चा पहायची होती. एवढा योगायोग जुळून आल्याने आम्ही दोघेही ती पाहत होतो. त्यात अलिशाने देखील ते पाहण्यात इंटरेस्ट दाखवल्याने आनंदाला पारावर उरला न्हवता.
एकीकडे बांगलादेश मध्ये इशनिंदा, पैगंबर साहेबांचा अवमान या नावाखाली एका व्यक्तीला दगड मारून मारले जाते, त्याची mob-lynched मॉब लिचिंग केली जाते, त्याला भर चौकात जाळले जाते. अशी घटना घडलेली असताना भारतासारख्या देशात DOES GOD EXIST ? यावर देशातील महान विचारवंत व मुस्लिम समाजातील असलेले पण नास्तिकत्वाचा पुरस्कार करणारे जावेद अख्तर साहेब आणि इस्लामिक स्कॉलर असलेले मुफ्ती शमाईल नदवी साहेब यांचे चर्चासत्र घडवले जाते. हीच भारताची वैचारिक सुंदरता आहे. अर्थातच जय श्री राम म्हणून मॉब लिचिंग केल्याने या सुंदरतेला डाग लागतो हे सांगणे देखील इथे गरजेचे आहे. अशी चर्चा सौरभ द्विवेदी नावाचा एक व्यक्ती घडवतो आणि तोच ती खरेतर घडवू शकतो कारण दोन धार्मिक दृष्टया भिन्न विचारांचे मुस्लिम एकमेकांशी संयम बाळगून बोलणे ही बाब बऱ्यापैकी कठीण आहे. जावेद अख्तर यांच्यावर मुस्लिम विश्वातून कालपासून होणाऱ्या टिकांवरून हे आणखीन जास्त अधोरेखित होताना दिसत आहे. चर्चेला मध्यस्थी इतर धर्माचा असेल तरच या चर्चा आणखीन खुलेपणाने होतात असा माझाही अनुभव आहे. असो...
Does god exist ? हा चर्चेचा विषय होता. Does ishwar exist ? , Does allah exist ? हा चर्चेचा विषय न्हवता. त्या मथळ्यावर ही चर्चा घेतली असती तर बहुदा ही चर्चाच झाली नसती. आयोजकांनी अतिशय विचारपूर्वक आणि एका मर्यादित चौकटीत, अमर्याद स्वरूपाची ही चर्चा घेतली त्याबद्दल त्यांचे विशेष आणि मनापासून कौतुक. अशा शेकडो चर्चा भविष्यात देखील ते घेतील ही अपेक्षा आहे. त्याशिवाय आस्तिकांना आणि नास्तिकांना आत्मपरीक्षण करता येणार नाही. त्यातून एखादा मध्यम मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे.
Muslims मुस्लिमांना कालच्या चर्चेनंतर कसला आनंद झाला आहे काय माहिती? त्यांनी मुफ्ती शमाईल नदवी यांना डायरेक्ट चर्चेचा विजेता घोषित करून टाकले आहे. बरेच जण ती चर्चा पहा म्हणून एकमेकांना सांगत आहेत. मुफ्ती शमाईल नदवी काय बोलले, त्यांनी काय शब्द वापरले, हे बहुतांश लोकांच्या जशी मशिदीतील बयाने डोक्यावरून जातात अगदी तसेच गेलेले आहेत. पण आपला माणूस चुकूच शकत नाही या अविर्भावात सर्व सुरू आहे. मुफ्ती शमाईल नदवी यांच्या चर्चेतील एकूण भाव देखील तसाच होता. ते सुरुवातीपासून विजेता आहे याच भावनेतून बोलताना दिसत होते ज्याला खूप सारे आत्मविश्वास म्हणतात. पण मला त्यात अहंकाराची दुर्गंधी येताना दिसत होती. ती दुर्गंधी चर्चा संपल्यावर पत्रकारांशी बोलताना दिलेल्या बाईट्स मधून देखील जाणवत होती. खूप वेळा त्यांनी जावेद अख्तर यांना कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला, टिका केली. पण जावेद अख्तर संयम न सोडता बोलत होते. जावेद अख्तर ८० वर्षांचे आहेत. त्यांच्या वयाच्या मानाने ते तितक्या अधिक तीव्रपणे आणि शरीराची खूप हालचाल करून बोलू शकत न्हवते आणि त्यालाच मुस्लिम पराभव म्हणून मिरवण्यात धन्यता मानताना दिसत आहेत. या वैचारिक दिवाळखोरपणाला काय म्हणावे ?अगदी एक छोटी क्लिप देखील फिरवली जात आहे. ज्यात मुफ्ती शमाईल नदवी स्वतःच ठरवत आहेत की जावेद अख्तर काय बोलतात आणि ते स्वतःच उत्तर देखील देत आहेत. अशाच गोष्टी मुस्लिमांच्याबाबतीत माध्यमे करतात त्यावेळी आपल्याला वाईट वाटते आणि कालपासून मुस्लिम स्वतः तसे करत आहेत. याच मला विशेष काहीही वाटत नाही.
जगात ईश्वर (ईश्वर हा शब्द प्रातिनिधिक स्वरूपात घेतला आहे. तिथे तुम्ही गॉड, अल्लाह हे शब्द बिनदास्त वापरू शकता) आहे की नाही ? ही चर्चा जगाच्या अंतापर्यंत सुरू राहणार आहे. ही चर्चा कधीही न संपणारी आहे. यावर सर्वात सुंदर उत्तर माझ्या माहितीप्रमाणे जर कोणी दिले असेल तर ते म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी. बुद्धांना विचारले जाते की, या जगात ईश्वर आहे की नाही? त्यावर बुद्ध म्हणतात तो प्रश्नच महत्वाचा नाही. बुद्ध हा प्रश्न अनुत्तरित सोडून देतात. त्यात जास्त गुरफटून बसत नाही. हा विचार बुद्धाने अडीच हजार वर्षांपूर्वी मांडला. हा प्रश्न बुद्धांच्या आधीही अस्तित्वात होता आणि आजही तो अस्तित्वात आहे. माणूस अजूनही या प्रश्नावर चर्चा करतो, भांडतो, अगदी तुझा ईश्वर खरा मी माझा ईश्वर ? या मतभेदाचा आधार घेऊन एकमेकांना संपवतो. बहुदा या कारणेच बुद्धाने हा प्रश्नच महत्वाचा नाही हे उत्तर दिले असावे. पण बुद्ध हेच उत्तर प्रमाण म्हणून माना असे म्हणत नाही. बुद्ध 'अत्त दीप भव:' हा विचार सांगतो. बुद्ध स्वयंप्रकाशित व्हायला सांगतो. स्वयंप्रकाशित होणे म्हणे काळाप्रमाणे नावीन्य स्वीकारणे, काळाप्रमाणे सद्सद्विवेक बुद्धी वाढवणे. पण सद्य काळात काळाप्रमाणे माणूस तांत्रिकदृष्ठ्या प्रगत आणि मानसिक दृष्टया मागास होत चाललेला दिसत आहे. ज्याची झलक मुफ्ती शमाईल नदवी यांच्यासारख्या अनेकांमध्ये दिसून येते. असे लोक सर्वच धर्मात आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
ईश्वराने एका उद्देशाने पृथ्वीची निर्मिती केली. तुमचं हे आयुष्य म्हणजे एक परीक्षा आहे. हा अतिशय सामान्य विचार आहे. अज्ञानी आणि अपरिपक्व माणसाला सांगण्यासाठी या गोष्टी खूप चांगल्या आहेत. लोकांनी चांगले वागावे आणि त्यावर कुठल्यातरी तिसऱ्या गोष्टीचे लक्ष आहे असे सांगून समाजात एखादी व्यवस्था निर्माण केली जाऊ शकते. जी व्यवस्था वेगवेगळ्या धर्मात ईश्वराची भिती दाखवून निर्माण केली गेली. पण यातील बहुतांश व्यवस्था आता कोसळताना दिसत आहेत. जे नियम ईश्वराच्या नावावर किंवा ईश्वरानेच बनवले असे सांगितले गेले तेच नियम जागतिक स्तरावर वेगवेगळे देश कालसुसंगतपणा स्विकारून बदलत आहेत. यात प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत. मात्र सर्वांचा ईश्वर एकच आहे.
या जगात ईश्वर असेलही. पण तो असेल तर त्याचे या पृथ्वीवर कुठलेही नियंत्रण दिसून येत नाही. यासाठी फक्त पॅलेस्टाईनचे उदाहरण का द्यावे ? जगभरात अनेक ठिकाणी धर्माच्या नावावर जी काही हिंसा सुरू आहे त्या सर्वांची जबाबदारी अल्लाहची आहे. त्याच्या मर्जीशिवाय झाडाचे एक पानही हालत नाही त्यामुळे ही जबाबदारी त्याचीच राहील. माझ्या असं बोलण्याचा राग खूप जणांना येईल. पण याचा राग धुळीच्या कणाएव्हढया असलेल्या मानवाला येण्यापेक्षा याचा राग अल्लाहला यायला हवा.
तुमच्या भागात नागरी समस्या निर्माण झाल्या तर तुम्ही नगरसेवकासमोर प्रश्न उपस्थित करता. तुमच्या विधानसभा मतदारसंघात काही प्रश्न असतील तर आमदाराला तुम्ही प्रश्न विचारता. देशात काही घडत असेल तर प्रधानमंत्रीला त्यासाठी तुम्ही जबाबदार धरता, त्याला प्रश्न विचारता, (तो उत्तर देत नाही हा वेगळा भाग), त्याच्यावर टिका करता. मग जगभरात धर्माच्या नावावर जो काही उन्माद सुरू आहे. त्याची नैतिक जबाबदारी अल्लाहने घ्यायला हवी. कोणीतरी अल्लाहचे नाव घेऊन बुरखा परिधान न करणाऱ्या महिलेला गोळ्या घालतो. कोणीतरी जय श्री राम बोलले नाही म्हणून मॉब लिचिंग करून मारला जातो. मुस्लिम पोशाख पाहून रेल्वेमध्ये लोकांना गोळ्या मारल्या जातात. इशनिंदाच्या आरोपाखाली बांगलादेशमध्ये माणूस जाळला जातो. या सर्व गोष्टी ईश्वराने निर्माण केलेल्या धर्माच्या नावाखाली घडत आहेत. या गोष्टी थांबवण्याची जबाबदारी कोणाची ? याचे उत्तर ज्याने त्याने शोधावे. महत्वाचे म्हणजे हा मुद्दा भावनिक नसून वास्तविक आहे.
ईश्वर एक आहे असे सांगणारा इस्लाम हा एकमेव धर्म आणि कुराण हा एकमेव ग्रंथ नाही. हे मागील एका लेखात लिहिले होते. निराकार ईश्वराच्या देखील जगभरात अनेक व्हरायटी आहेत. त्यात तुमचा ईश्वर कुठला ? हा खूप मोठा प्रश्न आहे.
मी मानत असलेला अल्लाह खूप उदार मनाचा आहे. त्याच्या भावना वारंवार दुखावत नाहीत. तो कुठल्या मूर्तीत नाही. तो निराकार आहे. मला तो स्वतःच एक मोठा निर्माता आणि वेगवेगळे प्रयोग करणारा सायटिंस्ट वाटतो. आकाशगंगा, पृथ्वी, मानव आणि सर्वकाही त्याची निर्मिती. बहुदा मानव हा त्याचा सर्वात मोठा फसलेला प्रयोग असावा. माणूस हा स्वतःला सर्वश्रेष्ठ प्राणी म्हणत असला. तरीही मला मानव प्राणी ईश्वराचा सर्वात मोठा फसलेला प्रयोग वाटतो.
मुफ्ती शमाईल नदवी जावेद अख्तर यांना तुम्ही ईश्वर नाही असे ठामपणे कसे काय सांगता? तो असूही नसुही शकतो. असे तुम्ही बोलायला हवे असे चर्चेत बोलताना दिसले. मुफ्ती शमाईल नदवी स्वतः असे बोलू शकतील का? निदान एखाद्या चर्चेत त्यांनी असे बोलावे. त्यानंतर सद्य परिस्थितीत काय घडेल ? हे मी सांगू शकत नाही.
जावेद अख्तर आणि मुफ्ती शमाईल नदवी या चर्चेत व्यक्ती म्हणून कोणीही जिंकले नाही. जर काही जिंकले असेल तर ते चर्चाविश्व जिंकले. या आणि अशा अनेक धार्मिक विषयांवर बोंबाबोंब न करता, न चिडता चर्चा होऊ शकते. असा एक विश्वास चर्चा विश्वात निर्माण झाला आहे. याने कुठल्याही विचारधारेचे लोक लगेच वाढणार नाहीत. पण प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पूर्ण चर्चा कुठलीही पूर्वग्रहदूषित मानसिकता न बाळगता पहा. अशा चर्चा अतिशय सामान्यपणे आणि नित्यपणे व्हायला हव्यात. ईश्वर आहे का नाही ? या चर्चेच्या निमित्ताने ईश्वराच्या नावे काय काय होत आहे आणि ईश्वराच्या नावे खरंच काय व्हायला हवे ? या मध्यम मार्गावरील निष्कर्षापर्यंत लोकांना पोहोचायला लोकांना मानसिक आधार मिळेल. अगदी महात्मा फुले सांगतात त्यापद्धतीने
सर्वांचा निर्मिक आहे एक धनी ।
त्याचे भय मनी । धरा सर्व ।।१।।
न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा ।
आंनद करावा । भांडू नये ।।२।।
धर्मराज्य भेद मानवा नसावे ।
सत्याने वर्तावे । इशासाठी ।।३।।
#समजलंतरठीक
पैगंबर शेख
मुस्लिम समाज सुधारणा चळवळ
(अल्लाहचा मुस्लिम)
पुणे, महाराष्ट्र
संपर्क - ९९७००७०७०५






