Pune Navale Bridge accident : अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी उपाययोजना !
मृत्यूचा सापळा म्हणजे पुण्यातील नवले ब्रिज… का सतत होतातेय अपघात? कधी थांबणार अपघातांची साखळी? नेमकं कोण चुकतंय? वैज्ञानिक आणि धोरणात्मकदृष्ट्या पुलावरील अपघातांचे प्रमाण कसे कमी करता येईल? यासंदर्भात शास्त्रीय विश्लेषण करून कारणमीमांसा देणारा आणि उपाय सांगणारा लेखक जगदीश काबरे यांचा महत्त्वपूर्ण लेख नक्की वाचा
X
Pune पुण्यातील Navale Bridge नवले पूल परिसर गेल्या काही वर्षांत ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून कुप्रसिद्ध झाला आहे. गेल्या पाच वर्षांत या परिसरात २५७ अपघात नोंदवले गेले असून, त्यापैकी ९५ अपघात Accidentगंभीर स्वरूपाचे होते. त्यात ११५ जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती Traffic police वाहतूक पोलिसांकडून समोर आली आहे. याच काळात ९४ नागरिक जखमी झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी फक्त संख्या नाही; तर या भागातील रस्ते अभियांत्रिकी, वाहतूक नियंत्रण, वाहन संस्कृती आणि मानवी निष्काळजीपणाचे एकत्रित अपयश आहे. नव्या कात्रज बोगद्यापासून नवले पुलाकडे येणाऱ्या रस्त्याला सुमारे ४.३ टक्के उतार आहे, आणि या उतार असलेल्या रस्त्यावर सतत येणारी सर्व प्रकारची वाहने, हे सर्व मिळून हा परिसर जणू ‘अपघातांचा प्रयोगशाळेतील नमुना’ बनलेला आहे. महाराष्ट्रातील घाटात ८–१० टक्के उतार असला तरी तिथे अपघात घडत नाहीत आणि इथे मात्र तुलनेने सौम्य उतारावर इतक्या दुर्घटना का घडतात, हा मूलभूत प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर एका कारणात सापडत नाही; उलट रस्ते अभियांत्रिकी + वाहन यांत्रिकी + मानवी मानसशास्त्र + वाहतूक व्यवस्थापन यांचा एक गुंतागुंतीचा ताळमेळ यात आहे.
सर्वात पहिले तांत्रिक कारण म्हणजे उताराचे स्वरूप आणि त्याचे अचानक होणारे गतिवर्धक परिणाम.
४.३ टक्के उतार दिसायला कमी असला तरी नवले पुलाकडे उतरताना वाहनाचा वेग नैसर्गिकरीत्या वाढतो. भौतिकशास्त्रानुसार उतारावरून वाहन जातांना गुरुत्वाकर्षणाचा घटक वाहनाला पुढे ढकलणाऱ्या शक्तीमध्ये रूपांतरित होतो आणि ब्रेकिंग डिस्टन्स अचानक वाढते. उदाहरणार्थ, सपाट रस्त्यावर ४० किमी/ताशी वेगात असलेली गाडी थांबण्यास जितके अंतर लागते, तेच अंतर हा उतार थोडा जरी वाढला तरी वाढते, आणि चालकासाठी वेळेत प्रतिक्रिया देणे आव्हानात्मक ठरते. घाटात इतके अपघात होत नाहीत, कारण तिथला वाहनचालक ‘घाटातून जात आहे’ या मानसिक तयारीसह चालवत असतो; म्हणून तो सतर्क असतो. वेग नियंत्रित करतो, आणि रस्त्याची रचना त्याला वारंवार ब्रेक लावायला भाग पाडते. परंतु नवले पुलावर उतार दिसत नाही, आणि चालकाला तो ‘घाट’ वाटत नाही. त्यामुळे चालकाचा मेंदू त्याला सतर्क करत नाही. हा मानसिक भ्रम अपघातांचे मूळ कारण आहे.
याशिवाय या भागात विविध प्रकारच्या वाहनांची (म्हणजे जड वाहने, हलकी वाहने, दुचाकी वाहने, अशा सर्व प्रकारची वाहने) वाहतुक असणे हा सुद्धा मोठा धोक्याचा घटक आहे. या रस्त्यावर ट्रक, बसगाड्या, कार आणि दोनचाकी असे विविध वाहनांचे मिश्रण असते. वजनदार वाहनांचे ब्रेकिंग अंतर त्याच्या वजनामुळे खूप मोठे असते. ट्रकला चालकाने ४.३% उतारावर अचानक ब्रेक लावायचा प्रयत्न केला तर उष्णता निर्माण होऊन ब्रेक निकमी होण्याची शक्यता असते किंवा गाडी डळमळून नियंत्रण सुटू शकते. हा वैज्ञानिक मुद्दा घाटातही लागू होतो, परंतु घाटात गाड्या कमी वेगाने आणि सतत ब्रेक वापरून उतरत असतात, त्यामुळे अपघाताची शक्यता कमी होते. नवले पुलावर जलद वेगाने आलेला ट्रक अचानक समोरच्या वाहनावर आदळतो आणि साखळी अपघात होतात. सपाट भागात उतारावर ट्रकच्या ब्रेकची तपासणी किंवा तापमान नियंत्रणासाठी कोणतेही औचित्यपूर्ण ‘रनवे ट्रक रॅम्प’ Runway truck ramp उभे केलेले नसणे, हा रस्ते अभियांत्रिकीतील गंभीर दोष मानला जातो.
नवले पुलाचा आणखी एक तांत्रिक दोष म्हणजे सड़क-आकृतीतील सातत्याचा अभाव (lack of geometric consistency). घाटात वाकडी-तिकडी वळणं, साइनबोर्ड, सततचे ब्रेकिंग या सर्व गोष्टी चालकाला सतर्क ठेवतात. नवले पुलाकडे उतरणारा रस्ता मात्र सरळ, रुंद आणि ‘स्वच्छ उतरणी’सारखा दिसतो. या रचनेमुळे चालकाचा मेंदू ‘वेग वाढविण्यास हरकत नाही’ असे समजतो. त्याचवेळी समोरील पुलाचा अरुंद भाग मात्र अचानक समोर येतो. म्हणजेच त्याच्या दृश्य आकलनात खंड पडतो. ही विसंगती अपघाताचे छुपे कारण आहे. याशिवाय या उतारावर जलद वाहनांच्या लेन, रस्त्याच्या मध्यभागी असलेले विभाजक, अधूनमधून येणारी पादचारी वळणे, दोन चाकींची मोकळी चढ-उतार, आणि ट्रॅफिकचे अनियमन ही सर्व कारणे एकाच बिंदूवर एकत्र येऊन अपघाताची शक्यता वाढवतात.
जरी रस्त्याचा दोष महत्त्वाचा असला तरी चालकाचे वर्तन हे या समीकरणातील सर्वात कळीचा मुद्दा राहिलेला आहे. भारतातील वाहनचालकांचा सरासरी वेगमर्यादा पालनाचा दर कमी आहे. कात्रज बोगद्यातून बाहेर आल्यानंतर अनेक जण मोकळा रस्ता दिसल्याच्या भावनेने बेफिकिरीने वेग वाढवतात. तांत्रिकदृष्ट्या, उतारावर वेग वाढण्याचा दर चालकाला समजत नाही. त्याला गाडी ६० ऐवजी ७५-८० किमी/ताशी गेली आहे असे जाणवते तेव्हाच तो ब्रेक लावतो, परंतु तेव्हा लागोपाठच्या दोन वाहनातील अंतर आणि ब्रेकिंग अंतर पुरेसे रहात नाही, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावते. अनेक अपघातांमधून असेही दिसते की, मोबाईलचा वापर, थकवा, घाई, हेडलाइटचा अयोग्य वापर, आणि ओव्हरलोड ट्रकचे नियंत्रण सुटणे ही मानवी वर्तनात्मक कारणे प्रबळ आहेत. चालक दोषी नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे; परंतु संपूर्ण दोष फक्त चालकांवर ढकलणे हेही तितकेच चुकीचे आहे. अपघातशास्त्र सांगते की, अपघात हा नेहमीच तीन घटकांच्या संयोगाने घडतो: रस्ता + वाहन + मानव. नवले पुलावर हे तीनही घटक एकाच वेळी अवतरतात.
उपायांच्या दृष्टिकोनातून
१. मुख्य पाऊल म्हणजे रस्त्याचा उतार व वक्रता यांच्यात सुधारणा होणे आवश्यक आहे. ४.३ टक्के उतार कमी करणे शक्य नसले तरी उतारावर स्टेप्ड ब्रेकिंग झोन तयार करता येतात. हायवे अभियांत्रिकीत अशा झोनमध्ये खडबडीत पृष्ठभाग, सूक्ष्म उतार-घट-बदल, आणि वायुगती कमी करणाऱ्या बाजूच्या भिंती वापरतात. यामुळे नैसर्गिक वेगाचा वाढता कल मंदावतो. नवले पुलावर २०० मीटर आधी ‘डायनॅमिक स्पीड कॅल्मिंग’ ‘Dynamic Speed Calming’ तंत्रज्ञान वापरणे हा वैज्ञानिक उपाय ठरेल. यात वाहनाच्या वेगानुसार साईनबोर्ड चमकतात, चेतावणी देतात आणि आवश्यक असल्यास लेन बदल व सिग्नल आधारित वेग नियमन केले जाते.
२. गोष्ट म्हणजे ARAI व IIT मधील अभ्यास सांगतात की, उतारावर फक्त फूट-ब्रेक वापरणे घातक आहे. नव्या कात्रज बोगद्याबाहेर जड वाहनांसाठी गाडी न्यूट्रल न करता कमी गिअरमध्ये ठेवणे अनिवार्य आहे, असा दूरूनही दिसणारा डिजिटल बोर्ड लावणे आवश्यक आहे. तसेच सेन्सर-आधारित तपासणी प्रणाली उपयोगात आणली पाहिजे, आणि ओव्हरलोड वाहनांसाठी पोलिसांनी चिरीमिरी न घेता नियमानुसार दंडात्मक बंदोबस्त केला पाहिजे.
३. रचना-आधारित वेग नियंत्रण करण्यासाठी फक्त स्पीड गन पुरेशा नाहीत. सरळ उतारावर चालकाची वेग वाढण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असल्याने आभासी अडथळे ऑप्टिकल स्पीड बार, झिकझ्याग लेन खुणा आणि रंबलर स्ट्रिप्स हे संयोजितरित्या बसवले तर वाहनचालकाची वेग कमी करण्याची मानसिकता तयार होते. जपान, जर्मनी, सिंगापूर या देशांत असे उपाय केल्यामुळे अपघातात ४०–५०% घट होते, असे तेथील अभ्यास सांगतात.
४. दृश्य-मानसशास्त्रीय सुधारणा करणे. नवले पुलाच्या आधी लेन स्पष्टपणे दर्शवणारे, पुलाचा अरुंद भाग स्पष्ट दाखवणारे मोठे फ्लुरोसंट साइनबोर्ड लावले तर चालकाची सजगता वाढवण्यास उपयुक्त ठरेल. घाटात वाकडी वळणे असल्यामुळे चालक सतत सतर्क असतो, परंतु नवले पुलासारख्या सरळ रचनेत ही सतर्कता कमी होते. हा मानसशास्त्रीय सापळा मोडणेही अत्यंत महत्त्वाचे आहे.
५. वाहतूक व्यवस्थापनाची पुनर्रचना करणे. नवले पुलावर सध्या ट्रक्स, कार, दुचाक्या अशी सर्व प्रकारचे वाहने एकत्र उतरत असल्याने एकच गोंधळ उडतो. असे होऊ नये म्हणून जड वाहनांना वेगळा उतरणीचा मार्ग ठेवणे आवश्यक आहे किंवा त्यांच्या आवागमनासाठी ठराविक वेळा ठरवून द्याव्यात. त्यामुळे अपघात टाळता येतील. शहरात अनेक मुख्य रस्त्यांवर जड वाहनांच्या वाहतुकीवर वेळेची मर्यादा घातल्यामुळे अपघात कमी झालेले दिसतात.
याशिवाय, पुलाखालील व वरच्या भागातील अंधारे झोन, आकस्मिक वळणे, अडथळे, चुकीची लेन डिझाइन, या सर्व त्रुटी कमी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष निरीक्षणात दिसते की, नवले पुलावर दृश्यमानता कमी आहे. रात्रीच्या वेळी गाडीचा वेग जास्त असल्यास समोरील अडथळा उशिरा दिसतो. उच्च-तीव्रता LED स्ट्रीटलाइट्स, प्रतिबिंबक पट्टे, आणि पुलाच्या कडेवर प्रकाश परावर्तक बसवणे हे अत्यंत सोपे पण प्रभावी उपाय आहेत.
अखेरची आणि सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे चालक प्रशिक्षण व तांत्रिक निरीक्षण याचे काटेकोर पालन करायला हवे. भारतातील वाहनचालकांना उतारावर वाहन नियंत्रण, इंजिन ब्रेकिंगचे तत्त्व, ब्रेक फेल टाळण्याची पद्धत, आणि जड वाहन चालवताना भार वितरणाचे नियम, या गोष्टी साधारणपणे शिकवल्याच जात नाहीत. युरोपमध्ये हलक्या आणि जड वाहन चालकांना या नियमनाचे प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे. भारतातही ’स्लोप सेफ्टी मोड्युल’ Slope Safety Module परवाना प्रशिक्षणात समाविष्ट केल्याशिवाय नवले पूलसारख्या ठिकाणांची परिस्थिती सुधारणार नाही. नवले पुलावरील अपघातांसाठी चालक, रस्ता, वाहन, आणि व्यवस्थापन ही चारही कारणे दोषी ठरणारी आहेत. केवळ रस्त्यावर दोषारोप करणे चुकीचे आहे; परंतु चालक पूर्ण निर्दोष आहेत हे म्हणणेही तितकेच वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आहे. अपघातशास्त्रातील सिद्धांत सांगतो की जर रस्ता अशाप्रकारे तयार करायला हवा की, चालक चुकला तरी अपघात घडू नये, तरच मानवी त्रुटी नियंत्रित होते. म्हणून रस्त्याची पुनर्रचना, वेग नियंत्रण, दृश्यात्मक चेतावणी देणाऱ्या सूचना, ट्रॅफिक व्यवस्थापन, जड वाहन नियंत्रण, आणि चालक प्रशिक्षण, या सर्व गोष्टींचा समन्वय साधल्यास नवले पुलावरील अपघातांची श्रृंखला थांबू शकते.
नवले पुलावरील अपघातांचा प्रश्न केवळ स्थानिक वाहतूक कोंडी किंवा उताराच्या चुकीच्या रचनेपुरता मर्यादित नाही, तर त्यामागे रस्ते-अभियांत्रिकी, वाहतूक व्यवस्थापन, वाहनांची यांत्रिक स्थिती, चालकांचे मानसशास्त्रीय प्रतिसाद आणि संस्थात्मक समन्वय या सर्व घटकांचे एकत्रित अपयश आहे. म्हणूनच या ठिकाणच्या मृत्यूजनक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्थानिक प्रशासनाने बहुआयामी, परस्परसंबंधित आणि वैज्ञानिक पातळीवर आधारित धोरणात्मक आराखडा स्वीकारणे अनिवार्य बनते. सर्वप्रथम रस्ते-अभियांत्रिकी सुधारणा ही प्राथमिक आणि सर्वात निर्णायक पायरी आहे. नव्या कात्रज बोगद्यानंतर अचानक येणारा ४.३ टक्के उतार, पुलावरचे अरुंद होणारे जंक्शन आणि त्याची दृश्य-गोंधळ निर्माण करणारी रचना चालकाच्या प्रतिक्रिया-वेळेत मोठा फरक घडवते. त्यामुळे उताराची रचना टप्प्याटप्प्याने ‘फ्लो-ब्रेक’ निर्माण करेल अशा प्रकारे बदलणे, उच्च घर्षण गुणांक असलेले पृष्ठभाग लावणे, पुलापूर्वी २००–२५० मीटरचा विस्तारित चेतावणी क्षेत्र तयार करणे आणि रस्त्याच्या पृष्ठभागावर ऑप्टिकल स्पीड बार्स, झिग-झॅग मार्किंग आणि परावर्तक पट्ट्या लावणे हे उपाय तातडीने करण आवश्यक आहे. अशा मानसशास्त्रीय चिन्हांचा घाट रस्त्यांवर अपघात कमी होण्यात मोठा वाटा असल्याचे आंतरराष्ट्रीय अभ्यास सांगतात, आणि नवले पुलावर हेच वातावरण कृत्रिमरीत्या तयार करता येऊ शकते.
यानंतर वाहतूक व्यवस्थापनातील वैज्ञानिक हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचा आहे. उतारावर वाहने प्रवेश करताच त्यांचा वेग सेन्सरद्वारे मोजणारी डिजिटल नियंत्रण प्रणाली,Digital control system आवाज आणि प्रकाश चेतावण्या देणारी डायनॅमिक स्पीड फीडबॅक तंत्रज्ञान, आणि चुकीचा वेग पकडून तात्काळ ई-चलान देणारी प्रणाली हे उपाय चालकाच्या वेगासंबंधीच्या बेपर्वाईवर तात्काळ नियंत्रण आणतात. दिवसातील जास्त ट्रॅफिकच्या वेळेत जड वाहनांना पर्यायी मार्ग देणे, पुलावरील एका लेनमध्ये jd वाहनांना प्रतिबंधित करणे आणि पादचारी तसेच दोनचाकींसाठी वेगवेगळ्या ‘सुरक्षा पॉकेट लेन्स’ तयार करणे यामुळे संघर्ष-बिंदू कमी होऊन अपघाताचे प्रमाण नैसर्गिकरीत्या घटण्यास मदत होईल.
जड वाहनांच्या बाबतीत यांत्रिक दृष्टीने होणाऱ्या त्रुटी हे नवले पुलावरील अपघातांचे मोठे कारण आहे. उतार असलेल्या रस्त्यांवर ट्रक व कंटेनरच्या ब्रेकमध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण होते आणि अनेकदा ‘ब्रेक फेड’ किंवा ‘ब्रेक फेल’ Brake failureही घटना घडते. म्हणून नव्या कात्रज बोगद्यानंतर अनिवार्य ब्रेक हिट चेक झोन उभारणे अत्यावश्यक आहे. येथे ब्रेकचे तापमान, टायरचा दाब, वाहनाचे ओव्हरलोडिंग आणि गियर-संबंधित दोष तपासता येतील. ओव्हरलोडिंग हा ब्रेक फेल होण्याचा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने ‘weigh-in-motion’ सेन्सर्स बसवून जड वाहनांना तात्काळ दंड आकारणे आणि चुकीच्या गियरमध्ये उतरणी घेणाऱ्या वाहनांवर गियर सेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे कारवाई करणे हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी ठरतील.
दृश्य आणि मानसशास्त्रीय सुरक्षिततेकडे प्रशासन सहसा दुर्लक्ष करते, परंतु उतारावर येणाऱ्या वाहनांच्या चालकावरील मानसिक दडपण आणि ‘वेग-भ्रम’ हे अपघातातील मोठे घटक आहेत. पुलाच्या आधी उच्च-तीव्रता LED प्रकाशयोजना, परावर्तक स्तंभ, मोठे चेतावणी फलक आणि रात्री वाहनांच्या संख्येनुसार प्रकाश-पातळी वाढवणारी स्मार्ट लाइटिंग प्रणाली बसवली तर चालकाची दृश्य प्रतिक्रिया सुधारते. घाट रस्त्यांवर अपघात कमी होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे दृश्य-पद्धतीने तयार केलेली सततची चेतावणी; नवले पुलावर ही कृत्रिम चेतना निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
या सगळ्या उपायांची अंमलबजावणी चार वेगवेगळ्या विभागांकडून अपेक्षित असल्याने सुटसुटीत समन्वयाशिवाय या समस्या सुटू शकत नाहीत. म्हणून पुणे महानगरपालिका, वाहतूक पोलीस, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मिळून नवले सुरक्षा यंत्रणा स्थापन करणे गरजेचे आहे. यात महिन्याला एक ब्लॅक स्पॉट विश्लेषण करणारा अहवाल तयार केला जाईल, पुणे विद्यापीठातील इंजिनिअरिंग कॉलेज किंवा IIT तज्ज्ञांच्या मदतीने अपघातांचे भविष्यसूचक मॉडेलिंग तयार केले जाईल, आणि तीन महिन्यांनी सार्वजनिक सुरक्षा ऑडिट घेऊन प्रत्यक्ष चालकांच्या अनुभवांवर आधारित बदल केले जातील. संस्थात्मक समन्वय हा या आराखड्याचा कणा आहे; अन्यथा वेगवेगळ्या उपायांची एकमेकांवरची परस्परपूरक शक्ती कमी होते.
कायद्याच्या पातळीवरही काही सुधारणांची आवश्यकता आहे. उतारांसाठी स्वतंत्र वैज्ञानिक वेग-कोड तयार करणे, जड वाहनांचे वार्षिक फिटनेस तपासणी सक्तीने करणे, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम व्यवस्थेची खात्री करणे, आणि अपघात घडल्यास चालक व वाहनमालक दोघांवर संयुक्त जबाबदारी लागू करणे हे बदल अपघात कमी करण्यात निर्णायक ठरतील. यासोबतच आपत्कालीन प्रतिसादाच्या क्षेत्रात ‘गोल्डन रिस्पॉन्स’ प्रणाली आणून पुलाजवळ कायमस्वरूपी एम्बुलन्स, फायर-रेस्क्यू टीम आणि ड्रोन निरीक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अपघाताच्या पहिल्या पाच मिनिटांत प्रभावी प्रतिसाद मिळाल्यास मृत्यूदर जवळपास निम्मा कमी करता येतो.
या सर्व उपायांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सहभाग आणि व्यापक जनजागृती अपरिहार्य आहे. कात्रज बोगद्याच्या बाहेर चालकांसाठी छोट्या व्हिडिओद्वारे उताराची सुरक्षितता, ब्रेकिंग दूरीचे विज्ञान, गियरचा वापर आणि वाहन ओव्हरलोडिंगचे धोके याबाबत सतत जागरूकता निर्माण केली पाहिजे. शाळा, महाविद्यालये आणि आयटी पार्कमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग आधारित ड्रायव्हिंग सिम्युलेटर प्रशिक्षण दिल्यास शहरातील एकूण वाहतूक संस्कृती अधिक सुरक्षित होईल.
वरील सर्व धोरणात्मक उपायांचा टप्प्याटप्प्याने विचार केल्यास, पहिल्या तीन महिन्यांत दृश्य व संकेत-आधारित सुधारणा, सहा महिन्यांत डिजिटल नियंत्रण प्रणाली आणि यांत्रिक तपासणी, आणि पुढील एका वर्षात संरचनात्मक सुधारणा आणि जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग हा संपूर्ण आराखडा अंमलात आणता येईल. हा संपूर्ण प्लॅन व्यवहार्य, वैज्ञानिक आणि धोरणात्मकदृष्ट्या संयुक्त आहे. या उपायांची अंमलबजावणी झाली तर नवले पुलावरील अपघातांचे प्रमाण ३० ते ६० टक्क्यांनी कमी करण्याची प्रत्यक्ष शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे केवळ रस्त्याचा प्रश्न म्हणून नव्हे, तर एक बहुआयामी सार्वजनिक आरोग्य, अभियांत्रिकी आणि प्रशासनिक सुधारणा कार्यक्रम म्हणून पाहिले, तर हा ‘मृत्यूचा सापळा’ सुरक्षित मार्गामध्ये रूपांतरित करणे शक्य आहे.
जगदीश काबरे
(लेखक विज्ञान प्रसारक आहेत)






