Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'सॅनिटायझर टनेल'मागचं ब्रेन प्रा. डॉ. सोनकवडे सर

'सॅनिटायझर टनेल'मागचं ब्रेन प्रा. डॉ. सोनकवडे सर

सॅनिटायझर टनेलमागचं ब्रेन प्रा. डॉ. सोनकवडे सर
X

शिवाजी विद्यापीठामध्ये शिकणे त्यातही पदार्थविज्ञान अधिविभागामध्ये शिक्षण घेणे यासारखा भाग्योदय माणसाच्या आयुष्यात कोणता असेल. आजही संपूर्ण विद्यापीठामध्ये 'भौतिकशास्त्र' अधिविभागच अग्रस्थानी आहे. अर्थातच त्याचे श्रेय जाते ते तेथील प्राध्यापकांना. यांमधील एक व्यक्तिमत्त्व आदरणीय डॉ. आर. जी. सोनकवडे. त्यांचं नाव आज अगदी विद्यापीठातील सर्वांच्या जिभेवर आहे. सोनकवडे सर म्हणजे सर्वांचा कौतुकाचा विषय.

प्रा. डॉ. राजेंद्र गिरीजाप्पा सोनकवडे यांनी अवघ्या वयाच्या 46 वर्षात आपल्या संशोधनाने आपल्या राज्यभरासाठी देवदूताची अनुभूती दिली आहे असे म्हटले तर योग्यच ठरेल.२०१४ ला ते शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्र अधिविभागात रुजू झाले, तेव्हा त्यांच्याबद्दल जुजबी माहिती होती. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण १९९५ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे भौतिकशास्त्रातील 'इलेक्ट्रॉनिक्स' या विषयात पूर्ण झाले. यानंतर त्यांनी 'किरणोत्सर्गी भौतिकशास्त्र' चा डिप्लोमा कोर्स भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथे पूर्ण केला.

१९९६-९७ मध्ये त्यांनी मध्ये मिरज, नाशिकमधील रुग्णालयात medical physicist म्हणून कार्य केले. दिल्ली येथे असणाऱ्या विज्ञान व तंत्रज्ञान अधिविभागाद्वारे चालणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोग (यु.जी.सी.) याद्वारे चालणाऱ्या 'Inter-University Accelerator Centre येथे Nuclear Science centre चे सहसंशोधक शास्त्रज्ञ म्हणून आपली मोहोर उमटवली. याबरोबरच त्यांनी बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ लखनऊ येथील उपयोजित भौतिकशास्त्राचे अधिविभागप्रमुख म्हणूनही स्थान भूषवले. High Energy Accelerator Research Organization जपान येथे सुद्धा visiting Scientist म्हणून काम केले. त्यांचे अगणित संशोधन प्रबंध पाहून ते उत्कृष्ठ प्राध्यापक, प्रतिभावान संशोधक व लेखक असल्याचे सहजच दिसून येते.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांसारख्या व्यक्तींसोबत असो किंवा सर्वसामान्य विद्यार्थी असो ते तेवढ्याच सहजतेने संवाद साधतात. त्यांच्यातील आत्मविश्वास, सकारात्मकता तसेच उत्साही वृत्ती, इतरांना कार्यासाठी उद्युक्त करण्यासाठी प्रेरित करण्याचे कौशल्य, याबरोबरच विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड या गोष्टी आम्हा विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनल्या. Nuclear Physics सारखा विषय डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकलेली आमची ही पहिलीच बॅच. हा मान आमच्या बॅचला मिळाला तो सोनकवडे सरांमुळेच.

'मेलं तरी आलंच पाहिजे...' 'पाठ करूनच ठेवा...' यापेक्षा 'बेटे...अपनी basic Concepts clear करो' यावर त्यांनी विशेष भर दिला व तसे प्रयत्न देखील केले. चर्चापद्धतीने अध्यापन करण्याकडे त्यांचा कल असतो. 'अपनी ideas share करना सिखो' असे ते म्हणतात. अहोरात्र काम करणं हीच त्यांची सर्वात उत्तम ओळख ठरेल, याचा साक्षात्कार झाला तो म्हणजे ते आले २०१४ ला आणि लगेचच २०१५ जानेवारी मध्ये International Conference On Material Science आपल्या अधिविभागामध्ये आयोजित केली. 'प्रश्न विचारा किंवा उत्तरे द्या' या त्यांच्या पॅटर्नमुळे वर्गात विद्यार्थी अलर्ट होऊनच बसत. आपोआप मुलभूत संकल्पना दृढ होत गेल्या. त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तर एक ग्रंथ निर्माण होईल असेच म्हणावे लागेल.

सध्याच्या कौतुकाचा विषय सोनकवडे सर ठरण्याचे कारण म्हणजे, सध्या कोरोना च्या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. भारतासारख्या लोकसंख्येचे माहेरघर असणाऱ्या देशाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. महाराष्ट्रातील मायानगरी व पुण्यनगरी यांसारख्या महानगरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणीच लोकांचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. त्यासाठी मुंबई च्या ICT (Indian Chemical Technology) च्या मदतीने अत्याधुनिक व कमी खर्चात 'सॅनिटायझर टनेल' निर्मितीमध्ये सोनकवडे सरांची कामगिरी मोलाची ठरते. या प्रकल्पामध्ये त्यांनी ते टनेल डिझाइन करण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. पाण्यात १% सोडियम हायपोक्लोराईडच्या मिश्रणाचा वापर केला जातो. टनेलमधून जाताना ४-५ सेकंद वेळ व्यक्तीला लागतो. त्या कालावधीत फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण केले जाईल. या टनेलचे मॉडेल म्हणून १२ फूट लांबीचा पोर्टकेबिनचा वापर केला आहे. नोजलद्वारे निर्माण होणाऱ्या धुक्याच्या अधिक चांगल्या वितरणासाठी संगणकामध्ये सॉफ्टवेअर डिझाइन व सिम्युलेट केले आहे.

या टनेलमुळे रेल्वे स्टेशन, बस-स्थानक, भाजी मंडई, कार्यालये, विद्यापीठे, रुग्णालये यांच्या प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरण शक्य होईल. कोरोनाशी लढा देण्यासाठी कमी खर्चात या अलौकिक उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या या संशोधन कार्यामुळेच या सॅनिटायझर टनेलची निर्मिती शक्य झाली आहे आणि हे तुमचे योगदान देशासाठी नक्कीच महत्वपूर्ण मदत असेल, असे गौरवोद्गार आपल्या राज्याचे माहिती व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काढले आहेत. चंद्रकोरीप्रमाणे आदरणीय सोनकवडे सरांचे कार्य चंद्रकोरीप्रमाणे सतत वृद्धिंगत होत राहो हीच आम्हा विद्यार्थ्यांची सदिच्छा.

Updated : 9 April 2020 11:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top