आत्मसन्मानाची रणभूमी : कोरेगाव भीमा
या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी भीमा नदीच्या काठावर २६ मार्च १८२१ रोजी विजयस्तंभाचा पाया घातला. सुमारे ६५ ते ७५ फूट उंच असलेल्या या विजयस्तंभावर २० शहीद आणि ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरली आहेत.
X
Koregaon Bhima कोरेगाव भीमाची लढाई ही केवळ दोन सैन्यांमधील ऐतिहासिक संघर्ष नव्हता, तर ती हजारो वर्षे सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाच्या आत्मसन्मानाची, अस्मितेची आणि मानवमुक्तीची लढाई होती. महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर असलेले कोरेगाव भीमा हे गाव १ जानेवारी १८१८ रोजी इतिहासाच्या पटलावर कोरले गेले.
या लढाईत एका बाजूला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य होते, तर दुसऱ्या बाजूला पेशवा बाजीराव दुसरा यांच्या नेतृत्वाखालील पेशवाई साम्राज्य. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते. या सैन्याचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होते. या सैन्यात बॉम्बे नेटिव्ह लाइट इन्फंट्रीच्या दुसऱ्या बटालियनमधील सुमारे ५०० महार सैनिक होते. त्यांच्या सोबत युरोपियन सैनिक, मद्रासी तोफखाना, घोडदळ आणि अधिकारी होते. लेफ्टनंट पिटसन, लेफ्टनंट जॉन्स, असिस्टंट सार्जंट विंजेट, लेफ्टनंट स्वान्सटन, लेफ्टनंट चिसलोम आणि सहाय्यक सार्जंट वायली यांचा या मोहिमेत समावेश होता.
पेशवाई साम्राज्याच्या बाजूने तब्बल २८,००० सैनिक होते. यामध्ये सुमारे २०,००० घोडदळ आणि ८,००० पायदळ होते. मराठा, अरब आणि गोसावी सैनिकांचा त्यात समावेश होता. या सैन्याचे नेतृत्व बापू गोखले, अप्पा देसाई आणि त्रिंबकजी डेंगळे यांनी केले होते. त्रिंबकजी डेंगळे हे या लढाईत प्रत्यक्ष सहभागी होते.
पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन अत्यंत अमानवी स्वरूपात होत होते. महार, मांग आणि इतर अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजघटकांना शस्त्र धारण करण्यास मनाई होती. त्यांच्या गळ्यात थुंकण्यासाठी गाडगं, पावलांच्या खुणा पुसण्यासाठी कंबरेला फेसाटी बांधली जात असे. मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी सामाजिक गुलामगिरीचे समर्थन केले होते. अशा परिस्थितीत महार समाजाला अत्यंत हीन वागणूक दिली जात होती. या अन्यायाविरुद्ध उभे ठाकरणे, हीच कोरेगाव भीमाच्या युद्धामागील खरी प्रेरणा होती.
१८०० च्या दशकात मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांत विभागले गेले होते. पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले अशी सत्ता विभागलेली होती. ब्रिटिशांनी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा आणि नागपूर येथील संस्थानांशी तह करून त्यांचे प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणले. १३ जून १८१७ रोजी पेशवे आणि गायकवाड यांच्यात महसुलावरून वाद झाला. बाजीराव पेशव्यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली आणि त्यातून बडोद्याचा मोठा भाग अप्रत्यक्षपणे ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. यामुळे पेशवाई केवळ नामधारी उरली.
५ नोव्हेंबर १८१७ रोजी खडकीच्या लढाईत ब्रिटिशांनी पेशव्यांचा पराभव केला. त्यानंतर पेशवे साताऱ्याकडे पळाले आणि पुण्यावर ब्रिटिशांचा ताबा प्रस्थापित झाला. कर्नल जनरल स्मिथ आणि चार्लस बार्टन बर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्य पेशव्यांचा पाठलाग करत होते. पेशवे कोकणात जाण्याच्या प्रयत्नात असल्याची भिती स्मिथ यांना वाटत होती. त्यामुळे शिरूर येथे जादा सैन्य तैनात करण्यात आले. ३० डिसेंबर १८१७ रोजी बाजीराव पेशवे चाकण येथे पोहोचल्याची माहिती स्मिथ यांना मिळाली. पुण्यावर अचानक हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता. ३१ डिसेंबर १८१७ रोजी रात्री ८ वाजता कॅप्टन स्टॉंटन शिरूरहून निघाले आणि १ जानेवारी १८१८ रोजी सकाळी कोरेगावजवळ पोहोचले. तेथील टेकडीवरून त्यांना भीमा नदीकाठी पेशव्यांची प्रचंड फौज दिसली.
कोरेगाव गावास लहानशी तटबंदी होती. इंग्रज सैन्य तेथे आश्रयास गेले. पेशव्यांच्या तोफखान्याने मारा सुरू केला. जागा अडचणीची असल्याने तोफा थांबवून अरब आणि पायदळ सैनिकांनी प्रत्यक्ष हल्ला केला. संगिनी आणि तलवारींचे भीषण युद्ध झाले. संपूर्ण दिवस चाललेल्या या लढाईत महार सैनिकांनी अतुलनीय शौर्य दाखवले. रात्री नऊ वाजेपर्यंत युद्ध चालले आणि अखेर पेशव्यांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. सकाळी इंग्रजांना दिसले की मराठा सैन्य छावणी सोडून गेले होते.
या लढाईत पेशव्यांचे सुमारे ३०० ते ६०० सैनिक मारले गेले, तर ब्रिटिश सैन्याचे सुमारे २७५ सैनिक मारले गेले आणि १७५ जखमी झाले. महार रेजिमेंटचे २२ सैनिक आणि मद्रास तोफखान्याचे १२ सैनिक धारातीर्थी पडले. या विजयामागे महार सैनिकांची हजारो वर्षांच्या अपमानाविरुद्धची उर्मी, आत्मसन्मानासाठीची जिद्द आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची तीव्र इच्छा होती.
या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी भीमा नदीच्या काठावर २६ मार्च १८२१ रोजी विजयस्तंभाचा पाया घातला. सुमारे ६५ ते ७५ फूट उंच असलेल्या या विजयस्तंभावर २० शहीद आणि ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरली आहेत. सोमनाक कमळनाक नाईक, रायनाक येसनाक नाईक, गोंदनाक कोढेनाक, रामनाक येसनाक, भागनाक हरनाक, अंबनाक काननाक, रूपनाक लखनाक यांसारख्या वीरांची नावे या स्तंभावर अजरामर झाली आहेत. स्तंभावर ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’ असे शब्द कोरलेले आहेत. ‘अविश्रांत’, ‘अन्नपाण्यावाचून सलग बारा तास लढले’, ‘अविचल धैर्य’, ‘शौर्यपूर्ण कृती’, ‘त्यागपूर्ण धाडस’ अशा शब्दांत महार सैनिकांचा गौरव करण्यात आला आहे.
ही लढाई मनुस्मृतीचा पराभव आणि सामाजिक गुलामगिरीच्या अस्ताची नांदी मानली जाते. शौर्याला जात आणि धर्म नसतो, हे महार सैनिकांनी प्रत्यक्ष रणांगणावर सिद्ध करून दाखवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून ‘वीर शिवाजी के बालक हम, है महार सैनिक हम’ हे संचलन गीत गात महार रेजिमेंट युद्धासाठी निघाली होती.
पुढील काळात महार समाजाच्या शौर्याची परंपरा काठियावाड, मुलतान, कंदहार येथेही दिसून आली. १९४१ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे महार रेजिमेंटला संघटनात्मक स्वरूप मिळाले. आजही महार रेजिमेंटच्या मानचिन्हावर कोरेगाव विजयस्तंभ, दोन क्रॉस मशीनगन आणि ‘एम. जी.’ ही आद्याक्षरे दिसतात.
दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो बौद्ध, दलित, शीख आणि इतर समाजघटकातील लोक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९२७ रोजी येथे भेट देऊन या समरभूमीला मानवमुक्तीचा प्रेरणास्रोत मानले.
कोरेगाव भीमाची लढाई ही केवळ ब्रिटिशांचा विजय नसून, महार समाजाच्या आत्मसन्मानाचा, शौर्याचा आणि इतिहासाने दिलेल्या न्यायाचा विजय आहे. ही रणभूमी आजही समतेच्या, स्वाभिमानाच्या आणि मानवी प्रतिष्ठेच्या संघर्षाची साक्ष देत उभी आहे.
विकास परसराम मेश्राम
मु+पो, झरपडा,ता, अर्जूनी/मोर, जिल्हा गोंदिया
मोबाईल नंबर -7875592800






