Home > मॅक्स ब्लॉग्ज > Thanks Once Again Babasaheb या सगळ्या ढिगाऱ्यातनं बाहेर काढल्याबद्दल !

Thanks Once Again Babasaheb या सगळ्या ढिगाऱ्यातनं बाहेर काढल्याबद्दल !

एरवी लोभस-सालस असलेल्या माणसात अचानक इतकी घृणा इतका राग? इतका तिरस्कार? इतकी नकारात्मकता नेमकी येते कुठून? आता तर फेसबूकवर जातीधर्मावरून एकमेकांवर शाब्दिक हल्ले करत एकेरीवर येणारे लोक बघतो तेव्हा मला फक्त हसू येतं आणि मी मनोमन पुन्हा पुन्हा त्या महामानवाचे आभार मानतो..

Thanks Once Again Babasaheb या सगळ्या ढिगाऱ्यातनं बाहेर काढल्याबद्दल !
X

मी एका ‘डिकास्ट’ आणि सर्वार्थानं ‘प्रस्थापित’ कुटूंबात जन्माला आलो, माझे माय आजोबा एका मोठ्या गावचे सरपंच होते. तिथं त्यांचा चौसोपी वाडा होता, आजी तिथल्या मुख्य शाळेची मुख्याध्यापिका होती. पार्श्वभूमी ग्रामीण असली तरी त्यांच्या बोलण्यात चुकून न चा ण/ण चा न किंवा श चा ष/ष चा श होत नसे. इकडं बाबांकडं त्यांच्या आजीचाच विधवा पुनर्विवाह झालेला असल्यानं ‘सुधारक’ वातावरण होतं; तिच्या पहिल्या घरचे मुलं आणि आमचे आजोबा सोबतच गुण्यागोविंदानं वाढले. ती आमच्या पणजोबांपेक्षा वयानं मोठी असल्यानं घरात आपसुक मातृसत्ताक पद्धती होती.

आजोबा पंचक्रोशीतले लोकप्रिय मुख्याध्यापक होते. आजी कमी शिकलेली असली तरी पहिली ते दहावीच्या सगळ्या कविता तिच्या तोंडपाठ होत्या. सिनेमा आणि राजकारणावर ती संदर्भानिशी कुणाशीही चर्चा करू शकत असे. गावात बदली होऊन आलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बायकांची गावातली पहिली मैत्रीण आमची आजीच असायची. ग्रामीण भागात काम करण्याच्या अट्टाहासामुळं आमचीही आई-बाबांसह बदलीच्या गावी भटकंती होत असे. शिक्षित दाम्पत्य म्हणून गावात आपसूक मान आणि प्रेम दोन्ही मिळत असे. माझ्या बारावीच्या आसपास आम्ही पहिल्यांदा शहरात म्हणजे नाशकात शिफ्ट झालो.

इथं आमच्या बाजूच्या इमारतीत नुकतेच नोकरीला लागलेले बाहेरून आलेले काही तरुण मुलं ‘पेईंग गेस्ट’ म्हणून रहात असत आणि तोंड ओळख होताच त्यांनी मला एकदा त्यांच्या रूमवर बोलवलं. चांगल्या सुसंस्कृत घरातून आलेली होतकरू, निर्व्यसनी मुलं होती, ते ‘चेस’ खेळत त्यामुळं कधीकधी मी ही त्यांच्या सोबत चेस खेळायला जाऊ लागलो. मी वयानं लहान असलो तरी तसा बरा खेळत असल्यानं ते वारंवार मला बोलवू लागले. आमची चांगली मैत्री जमली,घरी काही गोडधोड बनलं किंवा मिठाई आणली तरी मी या मित्र कम दादा मंडळींसाठी नेत असे. मोठा भाऊ पुण्यात होस्टेलला असल्यानं मला यांच्या रुपानं मोठे भाऊच भेटले; थोडक्यात काही दिवसांतच आमचा चांगलाच स्नेह जमला. त्या कालावधीतच जवळच्या नातलगाचं लग्न होतं, या मोठ्या मुलांत राहून राहून मी ही थोडा मोठा झालो होतो.

आपलं स्वत:चंही कुणी परिचित आहे, स्वतंत्र ओळखी आहेत आपलेही मित्र वगैरे लग्नात असावेत म्हणून मी कौतुकानं चारही दादांची नावे पाकिटावर टाकत त्यांना ‘खास’ आमंत्रण देऊन आलो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणं डिनरनंतर चेसचे दोनेक डाव आणि थोड्या गप्पाटप्पा यासाठी मी त्यांच्या रूमवर सवयीनं गेलो पण दोनेकदा बेल वाजवूनही दरवाजा उघडला नाही. कदाचित लवकर झोपी गेले असावेत या समजामुळं मी आपलं घरी परतलो, आता सवय झाली होती तिसऱ्या दिवशीही जेवणानंतर माझे पाय आपसूक तिकडं वळले मी बेल वाजवणार तोच माझं लक्ष्य कोपऱ्यातल्या डस्टबिनकडं गेलं त्यात मी दिलेली लग्नपत्रिका फाडून फेकलेली होती, तिचे शक्य होतील तितके तुकडे केले होते.

मी एक तुकडा उचलला गौतम बुद्धाची प्रतिमा पेनानं खरडून फाडलेली होती, अत् दिप भव या वाक्यातला भ खोडून तिथं झ लिहिलेलं होतं, आंबेडकरांची प्रतिमाही शक्य तितकी विद्रुप केली होती आणि जिथं जिथं प्रतिशब्द जसं उपासक-उपासिका, मंगल परिणय वगैरे तिथं तिथं बीभत्स शिव्या लिहिलेल्या होत्या. मी दारावरची बेल न वाजवता घरी परतलो, एका निरुपद्रवी अन् प्रेमानं दिलेल्या त्या कागदाचा कुणाला इतका राग यावा? की त्यांनी त्यावर चिरखडावं? त्याला ओरबाडावं? फाडावं? माझ्या मनात एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले.

पहाटेपर्यंत विचार केला तेव्हा कळलं “आता ‘आपण’ आणि ‘यांच्या’ इथं जायचं का ?” या प्रश्नामुळं मंडळींचा ‘इगो’ दुखावला असावा. “हम अलग हैं हमें अपनो में मत मिलाईये” हे त्यांना ठासून सांगायचं असावं.

जात-धर्म नेमंक काय असतं? हेच न कळणाऱ्या आणि माझ्या आधी तीन पिढ्यांनीच मोठ्या संघर्षानं स्वत:ला पुरेपूर सिद्ध केलंय हा विश्वास असणाऱ्या मला पहिल्यांदाच “मी वेगळा आहे” असं कळलं तेव्हा या ‘वेगळा’ शब्दातही आजवर न कळलेले बरेच स्तर लपलेले असल्याचंही जाणवलं जसं मागासवर्गीय-दलित-सरकारचे जावई आणि ‘ते’ लोकं.

मी जन्मानं काहीही असलो तरी मी कुणापेक्षा कुठंही कमी नव्हतो, बालपणी सगळ्या सार्वजनिक उत्सवात सहभागी होत होतो, माझा देश इथली संस्कृती किती महान आहे यावर शाळेत भाषणं देत होतो पण या घटनेनंतर हे सगळं कायमचं बदललं. आता इतकी मळमळ, इतकी खदखद आणि एवढा क्षोभ असेल तर तेव्हा या समुहातल्या लोकांना आणि त्यांचा संघर्ष पुढं नेणाऱ्या डॉ. आंबेडकरांना काय लेव्हलचा त्रास झाला असेल? या कल्पनेनंच अंगावर काटा आला.

एरवी लोभस-सालस असलेल्या माणसात अचानक इतकी घृणा इतका राग? इतका तिरस्कार? इतकी नकारात्मकता नेमकी येते कुठून? आता तर फेसबूकवर जातीधर्मावरून एकमेकांवर शाब्दिक हल्ले करत एकेरीवर येणारे लोक बघतो तेव्हा मला फक्त हसू येतं आणि मी मनोमन पुन्हा पुन्हा त्या महामानवाचे आभार मानतो..

एखादी व्यक्ती चांगलीये की वाईट हे ठरवण्यासाठी मला कुठल्याही जातीधर्माच्या लेबलची गरज भासत नाही..

थॅंक्स वन्स अगेन बाबासाहेब या सगळ्या ढिगाऱ्यातनं बाहेर काढल्याबद्दल !

#ThanksAmbedkar

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

वैद्यकीय व्यावसायिक


Updated : 6 Dec 2025 1:29 PM IST
author-thhumb

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

वैद्यकीय व्यावसायिक


Next Story
Share it
Top