Home > मॅक्स ब्लॉग्ज > शिक्षक पूजनीय केवळ शिक्षक दिवसालाच का ?

शिक्षक पूजनीय केवळ शिक्षक दिवसालाच का ?

बैलाचा जसा एक दिवस बैल पोळा असतो तसाच आपल्या देशात ५ सप्टेंबर रोजी शिक्षकासाठी शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यादिवशी शिक्षका विषयी मोठी- मोठी वाक्य बोलले जातात अत्यंत लाघवी व अलंकृत भाषेत शिक्षकांचा गौरव केला जातो, प्रत्यक्षात असलेल्या विदारक परीस्थितीवर परखड भाष्य केलं आहे, राज्य समनव्यक शिक्षणक्रांती संघटनेचे डॉ. विवेक कोरडे यांनी.....

शिक्षक पूजनीय केवळ शिक्षक दिवसालाच का ?
X

श्रावण महिन्याच्या समाप्तीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रात बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यादिवशी बैलाला सजवून त्याच्या अंगावर रंग रंगोटी केली जाते तेच नाहीतर बैलांच्या अंगावर विशिष्ट राजकीय वाक्य लिहिल्या जातात. शेतकरी राजा त्यादिवशी बैला प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचे पूजन करतात त्यादिवशी बैलाला कुठल्याही कामावर नेल्या जात नाही. तसे बघितले तर आज बैलांची जागा ट्रॅक्टर ने घेतली आहे. असे असतानाही एक संस्कृती म्हणून बैल आजही पूजनीय आहे. परंतु बैलांचे महत्व मात्र हळू हळू कमी झाले आहे हे हि तितकेच खरे आहे. आता इथे बैल आणि बैल पोळ्याचा संदर्भ देण्याचे कारण असे कि, बैलाचा जसा एक दिवस बैल पोळा असतो तसाच आपल्या देशात ५ सप्टेंबर रोजी शिक्षकासाठी शिक्षक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यादिवशी शिक्षका विषयी मोठी- मोठी वाक्य बोलले जातात अत्यंत लाघवी व अलंकृत भाषेत शिक्षकांचा गौरव केला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि बैलांचा आणि शिक्षकांचा इथे काय संबंध. तर संबंध असा आहे बैल जसा मुका प्राणी आहे त्याला बोलता येत नाही आपला मालक शेतकरी जेव्हढे त्याच्या कडून काम करवून घेईल तेव्हढे काम तो मोठ्या निष्टेने करतो. त्याच प्रमाणे शिक्षकांचे आहे सरकार मधले बसलेले अशिक्षित व मुजोर राजकीय पुढारी व व्यवस्थेतील भ्रष्टाचार करून गब्बर झालेली वरिष्ठ अधिकारी व शिक्षण सम्राट संस्था चालक जे काम सांगतील ते काम तडीस नेण्याचे काम शिक्षक व प्राध्यापक कोणतीही तक्रार न करता व तोंडातून ब्र न काढता करीत असतात. दोघां मध्ये केवळ हे एकच साम्य नाही असे बरेच साम्य आहेत किंबहुना दोघेही शोषणाचे प्रतीक आहेत.

जगात कोणत्याही गोष्टीचे जेव्हढे प्रकार नसतील तेव्हढे प्रकार शिक्षक व प्राध्यापकांचे आहेत त्यामध्ये शिक्षण सेवक, विनाअनुदानित शिक्षक, पूर्णवेळ शिक्षक, अर्धवेळ शिक्षक, कंत्राटी शिक्षक, रात्र शाळा शिक्षक, १५ लाख भरून लागलेला शिक्षक, ३५ लाख भरून लागलेला शिक्षक, शिक्षक भरती घोटाळ्यात सापडलेल्या शिक्षक जी गत शिक्षकांची तीच गत प्राध्यापकांची आहे यामध्ये सुद्धा असेच वेग वेगळे प्रकार सापडतात त्यामध्ये विनानुदानित प्राध्यापक, कायम विनाअनुदानित प्राध्यापक, पूर्णवेळ प्राध्यापक, कंत्राटी प्राध्यापक आणि सीएचबी प्राध्यापक. यामध्ये ह्या सीएचबी प्राध्यापकाचा हा वेगळाच स्वाग आहे तसे बघितले सीएचबी प्राध्यापक हा शिक्षण क्षेत्रातील त्याचे नेमके कोणते स्थान आहे हे आजवर शासन सुद्धा सांगू शकले नाही. परंतु हा सीएचबी प्राध्यापक शासन आणि भ्रष्ट शिक्षण सम्राट यांच्या खूप लाडका घटक आहे. हा लाडका असण्याचे कारण असे कि जसा एखादा बैल खूप कमी चारा खातो व खूप जास्त काम करतो तो बैल त्या शेतकऱ्यांचा खूप लाडाचा असतो. त्याच प्रमाणे ह्या सीएचबी प्राध्यापकांचे आहे ह्यांना शासन खूप कमी मानधन म्हणजेच पगार देतो ह्यांच्या पगाराची तुलना आपण पूर्णवेळ प्राध्यापक वर्गाशी केली तर पूर्णवेळ प्राध्यापकाचा पगार हा लाखाचे वर असतो तर सीएचबी प्राध्यापकाचा पगार हा महिन्याला ८ ते १० हजार असतो. पूर्णवेळ प्राध्यापकांचा लाखाच्या वरील पगार नियमित महिना संपल्या नंतर त्यांच्या खात्यात जमा होतो. या सीएचबी प्राध्यापकाचा ८ ते १० हजार पगार मात्र शासन दोन दोन वर्ष देत नाही. एव्हढे असतानाही महाविद्यालयातील सर्व कामे हे सीएचबी प्राध्यापक करतात किंबहुना महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये हे ह्या सीएचबी प्राध्यापकांच्या भरवश्यावर चाललेली आहेत. ह्याचे कारण म्हणजे गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्रातील प्राध्यपक भरती हि रखडलेली आहे. मग तुम्हीच सांगा शिक्षकांचे एव्हढे सर्व प्रकार असताना प्रत्येक प्रकारातील शिक्षकांच्या समस्या ह्या वेग वेगळ्या असताना सर्वासाठी शिक्षक दिवसाचे महत्व सारखे असणार आहे काय?

बरे शिक्षण क्षेत्र हे आता पूर्वी सारखे पवित्र वगैरे राहिले नाही कारण या क्षेत्रात आता प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचाराणे प्रवेश केला आहे. कारण शिक्षकांच्या भरती मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे हे नुकत्याच महाराष्ट्रातील उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यांमधून निदर्शनास येते. या शिक्षक भरती घोटाळ्यात अनेकांचे हात आज दगडाखाली आहेत अनेक शिक्षक आपल्या स्वार्था पायी व शॉर्टकट नोकरीच्या आमिषाला हुरळून जाऊन संघटित गुन्ह्यामध्ये अडकले आहेत. शेवटी आता हे प्रकरण न्यायालयात आहे परंतु आता पर्यंतच्या अनुभवा वरून तरी एक लक्षात येईल कि यामध्ये नुकसान होणार आहे ते या पैसे देऊन नोकरीवर रुजू होणाऱ्या शिक्षकाचे आणि हे सर्व घडवून आणणारे राजकीय पुढारी व भ्रष्ट अधिकारी यामधून अलगद बाहेर पडणार हे निश्चित. महाविद्यालयीन शिक्षणात सुद्धा आज सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू होण्याकरिता ५० लाखाचा भाव सुरु आहे आणि येव्हढे पैसे देऊन नोकरी लागण्यासाठी जीवाचा आटा पिटा करीत असंख्य नेट सेट पीएचडी झालेली पात्रताधारक लाईन मध्ये उभे आहेत. काही एव्हढे पैसे देऊन लागले आहेत आता तुम्हीच सांगा घोटाळा करून लागलेले शिक्षक तसेच पैसे भरून लागलेले प्राध्यापक शिक्षण क्षेत्राचे किती पावित्र्य राखणार आहेत हा प्रश्नच आहे?. परंतु या बाबतीत बैल मात्र प्रामाणिक आहेत त्यांच्या मध्ये ह्या गोष्टीला महत्व नाही म्हणजेच बैल पोळा व शिक्षक दिवस ह्यामध्ये हा फरक आहे परंतु हा फरक शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने मात्र स्वागतार्ह निश्चितच नाही.

नुकतेच केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रात न्यू एज्युकेशन पॉलिसी एनइपी २०२० आणलेली आहे. या द्वारे शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग सुरु झाले आहेत. ह्यामध्ये नुकतेच केंद्र सरकारने देशभर जवळपास सहा लाख खेड्यामध्ये विनाशिक्षक चालणाऱ्या शाळा म्हणजे, डिजिटल स्कूल स्थापन करण्याची योजना केंद्राने हाती घेतली आहे. या योजनेमागचा उद्देश सरकारच्या म्हणण्या नुसार असा आहे की, या माध्यमातून खेळ्यामधील शाळांमध्ये आधुनिक पद्धतीने कल्पक प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना देता येईल. तसेच अनेक विद्यार्थी शिक्षकाच्या भीतीपोटी व इतर विद्यार्थी हसतील या संकोचापोटी वर्गात प्रश्न विचारीत नाहीत. मात्र, या शाळांमध्ये प्रत्यक्ष शिक्षकच नसल्यामुळे डिजिटल कनेक्टिव्हिटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारताना संकोच होणार नाही. म्हटले तर हे फायदेच आहेत. परंतु फक्त एव्हढेच कारणासाठी व विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी सरकार हे धोरण राबवित असेल का? हा प्रश्न तर आहेच शिवाय यामध्ये शिक्षकांचे केवळ केंद्रस्थानच नाहीतर त्यांना कुठल्याही प्रकारचे महत्व इथे देण्यात आले नाही, कारण योजनेच्या नावातच विनाशिक्षक डिजिटल स्कूल असे आहे. एका अर्थाने, हे शिक्षणाचे यंत्रमानवीकरण आहे. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षकाचे अस्तित्व लोप पावत जाणार आहे.

एनईपी २०२० अंतर्गत पुन्हा एक नवीन प्रयोग शासन स्तरावर राबविण्यात येणार आहे तो म्हणजे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस ह्या योगाने अंतर्गत कुठल्याही अकॅडेमिक अहर्ता नसली तरी कॉर्पोरेट किंवा औद्योगिक क्षेत्रात १५ वर्षा वरील अनुभव असलेल्या लोकांना कला वाणिज्य विज्ञान भाषा विधी तंत्रज्ञान अश्या विविध क्षेत्रात डायरेक्ट प्रोफेसर म्हणून रुजू होता येईल. ह्या मागचा उद्देश शासनाचा असा आहे कि मुलांमध्ये विविध प्रकारचे कौशल्य जोपासली गेली पाहिजे त्यांना त्या क्षेत्रातील पूरक ज्ञान मिळाले पाहिजे. वर वर उद्देश खूप चांगले जरी दिसत असले तरी ह्या योजने मागचा शासनाचा उद्योग धार्जिण्या अजेन्डा मात्र लपून राहिला नाही आहे. म्हणून या योजनेतून शासनाला काय साध्य करायचे आहे हे तर येणार काळच सांगू शकेल. परंतु ह्या निमित्ताने अजून नवीन शिक्षक व प्राध्यापकांची एन्ट्री शिक्षण क्षेत्रात होणार हे निश्चित आहे. आपल्या मडक्यातील पाणी पिल्यामुळे राजस्थानातील इंद्र कुमार मेघवाल नामक एका दलित विद्यार्थ्याला तेथील शाळेतील शिक्षकाने एव्हढे मारले कि त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. एव्हढे भयानक प्रकार आज शिक्षण क्षेत्रात घडत आहेत आणि अशामध्ये केंद्र सरकारच्या या नवीन योजनांना किती प्रतिसाद मिळेल याचा आपण ढोबळ मानाने विचार करू शकतो. तर एव्हढ्या सर्व समस्या उच्च शिक्षणात असताना आज आपण शिक्षण क्षेत्रातील केंद्रबिंदू असलेला शिक्षकांचा दिवस म्हणून शिक्षक दिसास साजरा करतो आहे. या निमित्ताने शासनाला आमची एकच विनंती आहे कि शिक्षण क्षेत्रातील समस्या लावकरात लवकर सोडवाव्यात ...


डॉ. विवेक कोरडे

राज्य समनव्यक शिक्षणक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य

मोबाईल नबर :- ८७८८०८०७३३

Updated : 5 Sep 2022 6:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top