आता बास झालं! ड्रायव्हिंग सीटवर आपण बसायला हवं…
X
सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधल्या ‘नेपोटिझम्’ – घराणेशाहीविषयी चर्चा सुरु झाली. याचं कारणच मुळी त्याचा मृत्यू ही आत्महत्या आहे. यावर आधारित होतं. सुशांत डिप्रेस होता. कारण बॉलिवूडमधली घराणेशाही. (आपल्याकडे सा-या प्रश्नांची उत्तरं तयार असतात ! )
पुढे ‘मर्डर’ कथानक सुरु झालं तरीही घराणेशाहीपासून गुन्हेगारी ॲन्गलपर्यंत चर्चेच्या फे-या झडत राहिल्या. रियाला आरोपीच्या पिंज-यात उभं केलं गेलं. नंतर ड्रगविषयीच्या चर्चांचं सेवन सुरु झालं. त्यानंतर कंगनाबाईंनी मर्यादेहून अधिक फुटेज अकारण खाल्लं.
आता मूळ मुद्दा सुशांतच्या आत्महत्येचा आहे, बॉलिवूडच्या घराणेशाहीचा आहे की ड्रगसेवनाचा आहे की ‘पाकव्याप्त काश्मीर’ बनलेल्या मुंबईचा आहे ? कोणाला कशाचा काही पत्ता नाही ! बिहार निवडणुकीपर्यंत हा विषय ताणण्याचा भाजपचा प्रयत्न केविलवाणा आणि घृणास्पद आहे. वाईट वाटतं ते सुशांतबाबत. त्याच्या ख-याखु-या चाहत्यांबाबत.
माझा आत्तेभाऊ अमर्त्य सुशांतचा भयंकर चाहता. त्याने आत्महत्या केली होती, हे त्याला सहन झालं नाही. तो सतत याबाबतचे अपडेटस फ़ॉलो करत होता. मागच्या आठवड्यात तो मला म्हणाला, “तू म्हणतोय ते खरंय. मृत्यूचा वापर करतायेत. सुशांतच्या फॅमिलीला पण वापरलं रे यात.”
अशा असंख्य चाहत्यांच्या मनात सुशांत गेल्यानंतर जी भावना होती तिचा गैरवापर केला गेला. सुशांतच्या सख्ख्या बहिणीने त्याच्या आत्महत्येनंतर लिहिलेली भावुक पोस्ट स्वतःच डिलीट केली कारण ‘मर्डर’ कथानकास ती सोयीची नव्हती !
आकाश बॅनर्जीने त्याच्या व्हिडीओत सुशांत प्रकरणाच्या कव्हरेजच्या संभाषिताचे नऊ टप्पे सांगितले आहेत. कुठल्याही जाणकार माणसाला सहज लक्षात येईल की मूळ मुद्द्यांपासून भटकवण्याचं हे गलिच्छ राजकारण आहे.
आता ड्रगवरची ‘अथांग’ चर्चा पाहून वाटलं की एक तर आपण समाज म्हणून माध्यमांच्या नशेच्या आहारी गेलो आहोत किंवा भयंकर सुन्न/ बधिर (numbness) अशा अवस्थेला आलो आहोत.
समाज म्हणून आपल्याला बायपोलर डिसऑर्डर ग्रस्त व्हायचं नसेल तर आपल्याला हे संभाषित आपल्या प्रश्नांकडे खेचून आणावं लागेल. ते हवं ते नॅरेटिव्ह ठरवणार आणि आपण त्यात वहावत जाणार, हे किती काळ चालायचं !
आता बास झालं, जगण्या-मरण्याच्या मूलभूत प्रश्नांसाठी आपल्याला ड्रायव्हिंग सीटवर बसावं लागेल.